काही चरे ..

Submitted by कमलाकर देसले on 21 October, 2012 - 05:10

"काही चरे ..

ही नव्हे कविता. नव्हे ही छापलेली अक्षरे ;
काळजाच्या काळजीने ओढले काही चरे ...

पाय साधे लाभती ना चांगल्या घटनेस का ?
आणि अफवेलाच फुटती पंख येथे का बरे..

आढ्यता नाही खरी .ती सर्वनाशाची मुळी ;
नम्रतेने लाभते उंची. जरासा वाक रे ..

रक्त जाळुन,घाम गाळुन बांधले खोपे कुठे;
एक साध्या फुंकरीने पाडली त्यांनी घरे ..

सत्य कोठे बोलते का सत्य मी आहे असे !
बोलते खोटारडे की,आमचे आहे खरे ...

वाहुनी उपदेश गेला. बोध झाला पांगळा ;
बांधता उंडारली ही इंद्रियांची वासरे..

कोठल्याही कालचा संदर्भ त्याला चालतो;
संकटांनी दु:ख येते ,फक्त हे नाही खरे ...

थेट सत्याला भिडावे एवढे कळले मला ;
केवढे वाईट असते कल्पनेचे कापरे ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे शेर खास आहेत
अनेक कल्पना नाविन्यपूर्ण वाट्ल्या - इंद्रियांची वासरे,कल्पनेचे कापरे ,अफवेला फुटणारे पंख, काळजाची काळजी

कोठल्याही कालचा संदर्भ त्याला चालतो;
संकटांनी दु:ख येते ,फक्त हे नाही खरे ...>>>. हा शेर सर्वोत्तम वाटला !!

कालचा = काळाचा / 'काल'चा असा श्लेश वापरून अर्थ लावले.
दु:ख प्रत्यक्षात असण्यापेक्षा त्याची नेमकी जाणीव असणे / होणे महत्त्वाचे !! .....हा निष्कर्श काढला

धन्यवाद

वैभवजी, आभारी आहे . आपण मन:पूर्वक वाचतात . याचे समाधान वाटते. आपणास गझल जशी जाणवली तीच माझ्याही मनात आहे . धन्यवाद .

थेट सत्याला भिडावे एवढे कळले मला ;
केवढे वाईट असते कल्पनेचे कापरे ..<<< अच्छा शेर

चांगल्या खयालांची गझल, नवीन खयालांची गझल

(काही मिसरे अधिक सफाईदार झाले असते असे वाटत आहे)

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

आनंदजी ,धन्यवाद ." वाकरे" दुरुस्त करतो .
भूषणजी ," (काही मिसरे अधिक सफाईदार झाले असते असे वाटत आहे)">>> शक्य आहे .बघूया जमते का !आभारी आहे .

कमलाकरराव!
ब-याच दिवसांनी आपली गझल वाचली!
आनंद झाला!
आपले खयाल छान आहेत.
पण अजून चिंतन करायला हवे होते असे वाटले.
वृत्तहाताळणी ठीक.
आपली ही गझल वाचून आम्हास काही खयाल स्फुरले, ते येथे देत आहोत.
तुलना करायचा हेतू नाही.
गैरसमज नसावा.
ही गझल गैरमुरद्दफ, म्हणजे फक्त काफिये असणारी आहे.
हेच काफिये घेवून असेही व्यक्त करता येते, इतकेच काय ते.
हे शेर आपल्या गझलेला पर्यायी शेर नव्हेत.
केवळ आस्वादासाठी, व चिंतनार्थ आम्ही देत आहोत.
हे शेर आमचेही नव्हेत.
मूळ खयाल आपलेच आहेत.
काही ठिकाणी संपूर्ण भिन्न अर्थाचे देखिल शेर आहेत.

आम्हास स्फुरलेले शेर खालीलप्रमाणे.....................

ही नव्हे कविता, न ही छापील नुसती अक्षरे!
काळजामध्येच पडलेली खरे तर, ही घरे!!

चांगल्या घटनाच का असतात इथल्या पांगळ्या?
मात्र अफवांनाच फुटती पंख येथे का बरे?

आढ्यतेने वागणारी माणसे होती खुजी;
माणसे होतात मोठी लीनतेने,... वाक रे!

खोपटी बांधयलाही जन्म अवघा लागतो!
पापणी लवते न लवते तोच कोसळती घरे!!

काय बेमालूम खोटे बोलती खोटारडे;
ओरडावे लागते सत्यास की, त्याचे खरे!

काय त्या उपदेशरूपी दावणीने व्हायचे?
दावणी तोडून पळती इंद्रियांची वासरे!

ओढवोनी माणसे घेतात दु:खे का बरे?
चोरपायांनीच येते दु:ख हे नाही खरे!

प्रेम असते त्या ठिकाणी वाव भीतीला नसे!
ना धजावे फिरकण्याला कल्पनेचे कापरे!!

....................प्रा.सतीश देवपूरकर
..............................................................................................

कमलाकरजी,

चांगली गझल....
वापरलेल्या नवीन कल्पना आवडल्या...

प्रोफेसर साहेब,
ओढवोनी माणसे घेतात का दु:खे कळेना....
चोरपायांनीच येते दु:ख हे नाही खरे!
वरील शेरात उला मिसऱ्यात एक गुरु जास्त आहे...

कमलाकर
छान आहे गझल. कल्पनाही छान.

(काही मिसरे अधिक सफाईदार झाले असते असे वाटत आहे)>>> सहमत

सतीश यानी लिहिलेले शेर्ही मस्त जमलेत.

वैभव(फाटक),
धन्यवाद, चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल!
दुरुस्ती केली आहे.
पहाशील का?
शेर कसे वाटले?
..........प्रा.सतीश देवपूरकर