हे असे होईल काही, वाटले नव्हते!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 October, 2012 - 21:55

गझल
हे असे होईल काही, वाटले नव्हते!
एवढे आभाळ केव्हा फाटले नव्हते!!

हात गगनानेच माझा सोडला होता;
पंखही मीहून माझे छाटले नव्हते!

चांगली आहे कसोटी आज डोळ्यांची;
एवढे अश्रू कधीही दाटले नव्हते!

हा असा दुष्काळ नव्हता पाहिला केव्हा;
माणसांचे प्रेम इतके आटले नव्हते!

लालसा होती तरीही संत तो होता!
लालसेने स्वत्व त्याचे बाटले नव्हते!!

रेटला आजन्म गाडा देशसेवेचा;
आपले संसार त्यांनी थाटले नव्हते!

दु:ख माझ्या पाचवीला पूजले होते!
कोणतेही दु:ख ओझे वाटले नव्हते!!

भाग्य तू पिसलेस जितक्या पोटतिडकीने;
कळकळीने तेवढ्या मी काटले नव्हते!

रक्त हृदयातील माझ्या ओतले होते;
कल्पनेने चित्र मी रेखाटले नव्हते!

आजही टिकवून आहे मी मन:शांती!
एवढे कोणीच मजला लाटले नव्हते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असे होईल काही, वाटले नव्हते!
एवढे आभाळ केव्हा फाटले नव्हते!!

मतला छान आहे..

हात गगनानेच माझा सोडला होता;
पंखही मीहून माझे छाटले नव्हते!

हा शेर आवडला..(उला मिसरा जास्त आवडला)
सानी मिसऱ्यात शब्द रचना थोडी विस्कळीत वाटली...'पंखही' मधला 'ही' भरीचा वाटला...

मी हा शेर असा वाचला...

हात गगनानेच माझा सोडला होता;
"पंख मी माझे कधीही छाटले नव्हते "

बाकी शेर विशेष प्रभावी वाटले नाहीत..

शुभेच्छा..