शत जन्म शोधिताना.. अर्थ आणि रसग्रहण

Submitted by श्रीयू on 19 October, 2012 - 16:23

शत जन्म शोधिताना.. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर काव्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा सुरु केला आहे. मायबोली वरील मान्यवरांनी कृपया या कवितेचा अर्थ,संदर्भ,रसग्रहण इथे लिहावे. शिवाय या कवितेवरील माहिती, इतर संदर्भ, मान्यवर कवी/लेखकांनी केलेले रसग्रहण इथे टाकल्यास स्वागतच..

शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||

कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
नाटक: सन्यस्तखड्ग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सन्यस्तखड्ग नाटकातील नायक युद्धात पराभूत होऊन शत्रूचा बंदी होतो तेव्हा त्याच्या पत्नीच्या भावना व्यक्त करणारा हे गीत आहे एव्हढा एक संदर्भ youtube वर मिळाला.

http://www.youtube.com/watch?v=0GvP5t2QAZM

मा. दिनानाथ मंगेशकरांच मूळ गाणं उपलब्ध आहे का?

वसंतरावांच हे गाणं उपलब्ध आहे,त्यात वसंतरावांनी क्षण तो क्षणात गेला या ओळींवर अतिशय सुंदर जागा घेतल्या आहेत.
http://www.esnips.com/displayimage.php?album=&cat=0&pid=4882877

पण या गाण्याचे रसग्रहण कुठे मिळाले नाही.

>>सन्यस्तखड्ग नाटकातील नायक युद्धात पराभूत होऊन शत्रूचा बंदी होतो तेव्हा त्याच्या पत्नीच्या भावना व्यक्त करणारा हे गीत आहे एव्हढा एक संदर्भ youtube वर मिळाला.<<

असे नसावे. हा संदर्भ तपासायला हवा.
बर्‍याच काळाच्या प्रतीक्षेनंतर नायक [जो सेनापती असावा] आणि त्याच्या पत्नीची भेट होते. आणि भेट होते ना होते तोच शत्रूच्या आक्रमणाची वार्ता आल्याने नायक पुन्हा तातडीने युद्धावर जातो त्यावेळी त्याच्या पत्निच्या तोंडचे हे पद असावे असे वाटते.म्हणूनच ती म्हणते कि
'क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी '

पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेय,

" उत्कट भव्य ते घ्यावे , मिळमिळीत अवघेचि टाकावे' हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्वचित आढळतो. त्यामुळे कवितेत देखिल ते कल्पनेची हिमालयीन शिखरे गाठतात. प्रियकर प्रेयसीच्या मीलनाच्या प्रतीक्शा काळाबद्दल कविता लिहितांना ते म्हणतात-

शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||

कालाचं किति विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा! एका सुर्यमालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणतांना आपण थकून जाऊ. हा महाकवी शतसूर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिभा घेऊन आलेल्या ह्या कवीला कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी 'कमला', 'सप्तर्षी', 'विरहोछ्वास' असल्या प्रतिमेची उत्तुंग शिखरे दाखवून देणार्या काव्यांची जन्मस्थळं ठरली."

>> कालाचं किति विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा! एका सुर्यमालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणतांना आपण थकून जाऊ. हा महाकवी शतसूर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिभा घेऊन आलेल्या ह्या कवीला कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी 'कमला', 'सप्तर्षी', 'विरहोछ्वास' असल्या प्रतिमेची उत्तुंग शिखरे दाखवून देणार्या काव्यांची जन्मस्थळं ठरली>>

मी भास्करशी सहमत. पण सावरकरांना केवळ प्रियकर प्रेयसीचा मीलन प्रतिक्षा काळ अभिप्रेत आहे असे त्यांच्या 'आर्ति'' या शब्दामुळे वाटत नाही. 'विश्वाचे आर्त' या ज्ञानेश्वरांच्या शब्दांशी नाते सांगणारे हे शब्द जीवनाच्या मूळ दु:खमयतेशी नाते सांगतात, फक्त विरहदु:खाशी नाही असे मला वाटते. नाटकातल्या प्रसंगापलिकडला आध्यात्मिक अर्थही सूचित होतोय..

आकाशस्थ ग्रहतार्‍यांचे सावरकरीय आकर्षण त्यांच्या अजून एका कवितेत प्रकटलेय
ऐश्वर्ये भारी या अशा ऐश्वर्ये भारी
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी
या कवितेतही असेच विराट रूपक असल्याचे स्मरते. कविता आत्ता मिळत नाहीय..

मराठीच्या या दुसर्‍या ज्ञानेश्वरांना प्रणाम.

केवळ विस्मित होऊन पहावं असं सावरकरांचं आयुष्य आणि लेखन कार्य. आभार हृदयनाथांचेही की हा महाकवी त्यांनी उपेक्षेच्या काळकोठडीत कायमचा बंदिस्त होऊ न देता सामान्य माणसांपर्यंत आणला..

विझाल्या हे क्रियापदाचे नेमके कोणते रूप?

कडकडेंच्या गाण्यात दीपावली निमाल्या असे ऐकल्याचे पुसटसे आठवते.

@श्रीयु
रसग्रहणासाठी कोणीतरी पुढे येईल अशी आशा आहे. रसग्रहणासाठी आवाहन केल्याबद्दल धन्यवाद!
सावरकरांचे साहित्य संस्कृतप्रचूर असल्याने अनेकदा संपूर्ण अर्थ लागत नाही. पण त्यांचा शब्द नि शब्द अर्थाने ओतप्रोत भरलेला असतो. त्यामुळे अनेकदा कोणीतरी अर्थ विशद करावा अशी इच्छा असते. पाहूया कोणी पुढे येतो का?
संन्यस्त खड्ग नाटकाची रूपरेषा येथे कोणी थोडक्यात दिली तर कविता कलायला मदत होईल.

वाचतोय धागा ! कुणीतरी रसग्रहणासाठी नक्की पुढे येइल. संस्कृतचा फ़ारसा गंध नसल्याने हातावर हात धरुन बसावे लागत आहे. नाहीतर मीच प्रयत्न केला असता. धन्यवाद श्रीयु Happy

संन्यस्त खड्ग नाटकाची रूपरेषा येथे कोणी थोडक्यात दिली तर कविता कलायला मदत होईल. इतक्याने साधेल अस वाटत नाही. आधी सर्वच विषयावरचे स्वा. सावरकरांचे विचार समजायला कठीण आहेत. इथे नाटक न पहाता, समजता जर नाटकाच्या रुपरेषेवर नाट्यपदाचे रसग्रहण करणारा कोणी असेल स्वागत आहे.

@ भारती बिर्जे डि... | 20 October, 2012 - 23:42
>>
पण सावरकरांना केवळ प्रियकर प्रेयसीचा मीलन प्रतिक्षा काळ अभिप्रेत आहे असे त्यांच्या 'आर्ति'' या शब्दामुळे वाटत नाही.<<

'शत आर्ति' मधील आर्तिचा अर्थ मला नीट उलगडला नाही. तो समजल्यावरच आपल्याला जाणवलेल्या अर्थाबद्द्ल विचार करता येईल.

बरेच गायक निमाल्या, असेच गातात. आशा भोसले / आशा खाडीलकर / दिप्ती भोगले तिघींनी निमाल्या असेच गायले आहे.

मी ह्या गाण्याबद्दल असे ऐकले होते की- (ऐकीव असल्याने खात्रीशीरपणे असेच आहे असे सांगता येत नाही)
युद्धात पराभूत होण्याची वेळ आलेल्या राज्याची राणीच योद्ध्याचा वेष घेऊन लढायला जायला निघते.
ती स्वतःचे ते रूप आरशात बघते आणि तिला तिच्या पतीचा भास होतो. तो भास अगदी क्षणभराचा असल्याने 'क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी' असे शेवटच्या कडव्यात आहे.

कुणीतरी सलग आणि विस्तृत अर्थ लिहाना प्लिज Happy मला हे काव्य नीटसे कळले नाहिये पण काहीतरी जादू आहे त्यात जी त्या शब्दांमध्ये गुंतवून ठेवते.

अश्विनी,
मागे मनोगतावर ह्या गाण्याचा अर्थ द्यायचा प्रयत्न केला होता.
मला त्यावेळी ह्या गाण्याची पार्श्वभूमी नीट माहिती नव्हती, त्यामुळे ही एक 'विरहिणी' आहे अशा दृष्टीने मी गाण्याकडे पाहून अर्थ लावला होता. आज अजून थोडा विचार केला आणि मला उमगलेलं जे काही आहे ते खाली लिहितोय. ही विराणी जरी असली तरी तीतून 'परचक्र आल्यावर स्वजनांना किती यातना सोसाव्या लागतात' याकडे निर्देश केला गेलाय असं वाटतं. आपल्या माणसापासून ताटातूट होणं, पुन्हा कदाचित कधीही भेट होऊ न शकणं यापेक्षा मोठी यातना कुठली?
---------------------------
पहिल्या कडव्याचा स्वतंत्र अर्थ लागत नाही, ते दुसर्‍या कडव्याशी जोडून घेतले की अर्थ लागतो.

शत जन्म शोधिताना । शत आर्ती व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंती गाठी ॥

: एखादी स्त्री/ गौळण हे गीत गाते आहे असा विचार केला तर, ती म्हणते की मी शतजन्म.. अक्षरशः शतजन्म 'ह्या' ला शोधीत होते, त्यामध्ये शत आर्ती व्यर्थ झाल्या. 'आर्ति व्यर्थ झाल्या' ह्याचा नीटसा अर्थ उमगला नाही पण कदाचित, त्या शोधामध्ये 'आर्ती' म्हणजे दुःखे व्यर्थ ठरली, असा अर्थ असावा. एखादी गोष्ट आपण खूप मन लावून करत असलो की ती करताना आपल्याला थोडं दु:ख्/यातना सोसाव्या लागल्या तरीही त्याची विशेष जाणीव आपल्याला उरत नाही, तसेच काहीसे.
शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या/निमाल्या- वरच्याच एका प्रतिसादात कुणीतरी पु.लंची वाक्ये लिहिली आहेत, त्यानुसार 'कालाचे विराटरूप' दाखवण्यासाठीचा हा शब्दप्रयोग आहे. एखाद्याची आतुरतेने वाट बघताना, एक एक क्षण सुद्धा सरता सरत नाही. त्यामुळे या गाण्यातल्या नायिकेला 'वाट बघण्याचा' एक एक क्षण हा शतजन्मांइतका मोठा वाटतोय. किंवा तो एक एक क्षण इतका मोठा वाटतोय की त्या एका क्षणात 'शतसूर्यमालिका' विझून जातील.
इतका काल वाट पाहिल्यानंतर.. 'तेंव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी'- म्हणजे, एवढं सगळं सोसल्यानंतर.. एक क्षणभर मला माझा 'प्रिया' भेटला, अगदी क्षणभरच. की जणू मी युगानुयुगे ज्या सुखाची/ सुखासाठी (अर्थात प्रियाच्या भेटीसाठी) साधना केली, त्या साधनेची आणि सिद्धीची आज गाठ पडली, म्हणजे थोडक्यात ती साधना फळाला आली.

हा हाय जो न जाई । मिठी घालू मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखी हातचा सुटोनी ॥

ह्या कडव्यामुळेच मला ही विरहिणी वाटते, कारण त्यात ती गौळण 'सखी' ला सांगतेय की,
मी उठून त्याला मिठी घालू गेले, पण तोच तो एका क्षणात हातचा सुटोनी गेला.
'कानडाऊ विट्ठलू' गाण्यातही अशाच अर्थाची एक ओवी येते 'पाया पडू गेले तव पाऊलचि न दिसे'. अर्थात ती अध्यात्मिक अर्थाने आहे आणि इथे केवळ अध्यात्मिक अर्थ अपेक्षित नाहिये असेच वाटते.
-----------------------------

वाह चैतन्य ! हा अर्थही चपखल वाटतोय. थँक्स Happy

आपल्या माणसापासून ताटातूट होणं, पुन्हा कदाचित कधीही भेट होऊ न शकणं यापेक्षा मोठी यातना कुठली? >>> जिव्हारी !!!!

चैतन्य दिक्षित,
आपला अर्थ लावण्याचा प्रतत्न कौतुकास्पद नक्कीच आहे.
पण हे एक नाटकातले पद आहे आणी त्याचा नाटकातील कथानकाशि संबंध असणार आहे.
तेव्हां नाटकाचे कथानक आणि हे पद येण्याआधीच्या घटना कळल्यानंतर अर्थ लावणे उपयुक्त ठरेल असे मला वाटते.
आपल्या सुदैवाने
सुमेधाव्ही यांनी 22 October, 2012 - 07:00 ला खालील प्रतिसाद दिला आहे:
"माझ्याकडे नाटकाचे पुस्तक आहे पण थोडी शोधाशेध करावी लागेल. मला सापडले पटकन तर टाकेन दोन दिवसांत."

तेव्हा येत्या एक दोन दिवसात नाटकाचे कथानक आणि हे पद येण्याआधीच्या घटना येथे टाकण्याची विनंती मी सुमेधाव्ही यांना करीत आहे.

रसिकांच्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार !
धन्यवाद चैतन्य: तुम्ही विषद केलेला अर्थ समर्पक वाटतो.
पहिल्या दोन ओळींचा अर्थ पुढील कडव्याचा संदर्भ घेऊन लागतो.
पण भारती या वर म्हणल्याप्रमाणे फक्त प्रियकर प्रेयसी यांचा विरह एव्हढाच मर्यादित अर्थ नसावा.
इथे स्वातंत्र्याला प्रियकराचे रूपक वापरले असावे का? श्री. चैतन्य वर म्हणाल्याप्रमाणे
शत जन्म शोधिताना | शत आरती व्यर्थ झाल्या
या ओळीचा अर्थ स्वातंत्र्याचा संदर्भ घेऊन असा होईल :
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेली प्रतीक्षा,त्यासाठी केलेले अथक प्रयत्न,सोसलेले अनन्वित हाल,सहन केलेल्या वेदना त्यापुढे इतर दुःखे ही सगळी व्यर्थ आहेत.
शत सूर्य मालिकांच्या| दीपावली विझाल्या || या ओळी त्या प्रतीक्षा कालाच विराट रूप दर्शवतात.
आणि पुढील ओळी त्या प्रियकराची भेट म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्ती आणि त्यासाठी केलेल्या तपश्चर्येची सिद्धता दर्शवतात.
आणि स्वतः सावरकर या कठीण अशा तपश्चर्येला 'सुख साधना' म्हणतायेत . 'बुध्याची धरिले करी हे वाण सतीचे' म्हणणारा हा महानायक आहे.स्वातंत्र्य प्राप्तीचा दुर्दम्य आशावाद सावरकर ध्वनित करीत असावेत का?
किती अन्वयार्थ लावावेत? फक्त दोन चार ओळीत सावरकरांची प्रतिभा 'भेदिले सूर्य मंडला' चा अनुभव देऊन जाते. त्यांचा या विराट प्रतिभेला दंडवत !!
रसिकांच्या आणखीन प्रतिसादांच्या प्रतीक्षेत !

आर्ति चा एक अर्थ earnest desire आहे. अतिशय आंतरिक इच्छा

"अनेक जन्म शोधले( अनेक जन्म मी त्याला शोधतेय), अनेक आंतरिक इच्छा व्यर्थ ठरल्या(त्याला भेटण्याची मनातली आतूर इच्छा अनेकदा व्यर्थ ठरली).
अनेक सूर्यमाला धगधगून शांत झाल्या ( अनेक सूर्यमाला उजळून संपून गेल्या, इतका प्रचंड काळ लोटला)
तेव्हा कुठे प्रियकराच्या भेटीचा एक क्षण नशीबी आला.
अनेक युगांची ही साधना अशी या भेटीने पूर्ण झाली.

तो क्षण व्यर्थ जाऊ नये म्हणून मी उठून त्याला मिठी घातली.
पण सखे, ती भेट, एका क्षणातच संपून गेली."

मला वाटतं यात, "जन्मोजन्मी ज्याची वाट पाहिली तो अखेर भेटला. पण ते भेटणे केवळ एका क्षणाचेच ठरले" असे ही प्रिया आपल्या सखीला सांगते आहे.
किंबहुना वाट पाहणं हे किती मोठ्ठं असतं अन भेटीचा काळ हा जणू एकच क्षण असावा तसा वाटतो, असं काही सांगायचं असावं असं वाटतय. चुभूद्याघ्या.

सावरकरांनी लिहिलेले असल्याने याचा थोडा वेगळा अर्थ स्वातंत्र्य प्राप्ती संदर्भातही लावता येईल.
पण मग शेवटच्या दोन ओळींचा अर्थ काय लावावा? Uhoh हे गीत त्यांनी नक्की कधी लिहिलय हे कोणी सांगू शकेल का ? मी पण शोधते.

चैतन्य छान विवेचन केलयस रे Happy

कवितांच्या रसग्रहणापेक्षा नाट्यगीतांचे रसग्रहण करणे त्यामानाने सोपे असावे कारण त्यासोबत येणार्‍या कथेच्या अनुशंगाने येणारे ते नाट्यगीत असते.

चैतन्य
छान विवेचन.
आणि अवल
किंबहुना वाट पाहणं हे किती मोठ्ठं असतं अन भेटीचा काळ हा जणू एकच क्षण असावा तसा वाटतो, असं काही सांगायचं असावं असं वाटतय

तुम्ही हे सोपं करुन सांगितलत! Happy
श्रीयू
चांगला धागा. वाचताना बरीच नविन माहिती कळत आहे.

चैतन्य, अर्थ सुंदर असला तरी मला नाही वाट्त इथे तो लागू होतोय, सावरकरांचे हे नाटक, स्वातंत्र्य लढ्या संबधितच होते. ( छुप्या अर्थाने, अर्थातच ) ती नायिका, विरहिणी वगैरे गाणार्‍यातली नाही.

रच्याकने, कानडाऊ विठ्ठलू मधला तो क्षण, श्रुती साडोलीकर, नेमका पकडत असत, अशोक रानड्यांची ती चाल, आशा भोसलेच्या चालीपेक्षा खुपच वेगळी आहे. पण ते गाणे आता कुठे उपलब्ध असेल असे वाटत नाही. रानड्यांच्या, देवगाणी कार्यक्रमात ते होते.

’आर्ति’ म्हणजे बहुदा उत्कट इच्छा, आतुरता असाच अर्थ असावा. परवा तुकोबांची गाथा चाळताना एक ओळ वाचण्यात आली...

तुका म्हणे तरी सज्जनांची कीर्ति । पुरवावी आर्ति निर्बळाची ।

Pages