जरी कळाले वळले नाही

Submitted by निशिकांत on 19 October, 2012 - 01:00

कोणावरती किती मरावे कळले नाही
मनास वेड्या जरी कळाले वळले नाही

गुंतुन गेलो तिच्यात इतका कविता लिहिल्या
तिच्यावरूनी लक्ष जराही ढळले नाही

कमलदलाची अलिप्त संगत पाण्यासंगे
तशी वागली तिने स्वतःला छळले नाही

पिसून गेलो चक्कीमध्ये विरहाच्या पण
दु:ख कधीही जात्यावरती दळले नाही

घाव द्यायचा पेशा असतो कुणाकुणाचा
तडफड बघुनी कुणी कधी हळहळले नाही

श्रावणझड जी माझी होती निघून गेली
निर्झर होवुन प्रेम पुन्हा खळखळले नाही

गजला माझ्या तिने चाळल्या थंड मनाने
आशय वाचुन चित्त तिचे हळहळले नाही

जखमा माझ्या भळभळणार्‍या शरिरावरती
सुक्या बरोबर ओले केंव्हा जळले नाही

विरह पचवला "निशिकांता"ने, गालावरती
दु:ख कधी होऊन आसवे गळले नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users