कभिन्न काळोख दाटलेला सभोवताली!

Submitted by सतीश देवपूरकर on 18 October, 2012 - 05:11

गझल
कभिन्न काळोख दाटलेला सभोवताली!
जणू कुणाची तरी छबी सोबतीस आली!!

तिच्या सुगंधामुळेच वारा उनाड झाला;
कळीकळीच्या दळांमधे हालचाल झाली!

तिची खळी आरपार गेली उरात माझ्या.....
अशीच ती हासते म्हणे नेहमीच गाली!

असाच झोपेतही तिचा जागतो दुपट्टा;
कुणी न घेवो टिपून ओठांमधील लाली!

दिलेस तू स्वप्न, वाटही चालतो तुझी मी.....
तुलाच ठाऊक काय माझ्या असेल भाली!

खरेच आहेत लोक ते एकजात भोळे!
खुशाल मारेक-यांस ते मानतात वाली!

अखेर झाली मलाच चोरी रहावयाची;
घरात निर्धास्त वावरू लागल्यात पाली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाच झोपेतही तिचा जागतो दुपट्टा;
कुणी न घेवो टिपून ओठांमधील लाली!

दिलेस तू स्वप्न, वाटही चालतो तुझी मी.....
तुलाच ठाऊक काय माझ्या असेल भाली!

छान शेर. (भाली च्या ऐवजी भाळी चाललं असतं. चुभूदेघे )

कभिन्न काळोख दाटलेला सभोवताली! सुंदर ओळ

सानी मिसरा अतिशय कमजोर वाटला. ह्या ओळीच्या किंचीतही जवळ जाऊ शकणार नाही असा

तिच्या सुगंधामुळेच वारा उनाड झाला;
कळीकळीच्या दळामधे हालचाल झाली!>>> मस्तच शेर.. 'दळांमधे' असे असायला हवे ना?

====

तिची खळी आरपार गेली उरात माझ्या.....
अशीच ती हासते म्हणे नेहमीच गाली!

असाच झोपेतही तिचा जागतो दुपट्टा;
कुणी न घेवो टिपून ओठांमधील लाली!

लखनवी शायरीच्या अंगाने जाणारे शेर वाटले. अजिबात आवडले नाहीत.

बाकीचे शेर ठीक.

Lol

विजयराव!
मतल्यातल्या उला मिस-याजोगा सानी मिसरा सुचवाल का ?
आमच्या सानी मिस-यात आम्ही सभोवतालच्या कभिन्न काळोखालाच कुणाची तरी छबी आहे असे संबोधले आहे, जी आमच्या सोबतीस जणू आली आहे असे म्हटले आहे. यातून सकारात्मक संदेश जात नाही का?
ही कल्पना हृद्य वाटत नाही का?
की, छबी शब्दास आपली हरकत आहे? (छबी शब्द प्रतिमा/image या अर्थी आम्ही वापरला आहे)
..........प्रा.सतीश देवपूरकर

प्रोफेसर,

उला मिसरा जी 'निगेटीव्हीटी' निर्माण करीत आहे ती सानी मिसर्‍यात अधिक तीव्र झाली तर शेर अजून गहीरा होईल असे वाटते. उला मिसरा वाचकाला एका उंचीवर घेऊन जात आहे आणि सानी मिसरा वाचकाला तिथून इतक्या जोरात खाली पाडत आहे की तो गतप्राण व्हावा.

"जणू कुणाची तरी छबी सोबतीस आली" हा मिसरा काहीच सुचत नाही म्हणून लिहील्यासारखा मला तरी वाटला.

छबी ह्या शब्दाला माझी हरकत नाही.

अर्थात ही सर्व माझी मते आहेत.

अखेर झाली मलाच चोरी रहावयाची;
घरात निर्धास्त वावरू लागल्यात पाली!

<<<

कवी देवपूरकर, अखंड गझल ज्ञानवाटप केल्यावर तुम्ही स्वतःच्या गझलेत हे असे शेर करता, आता जनतेने काय बोलावे?

आम्हास अशी शंका येत आहे की हाच शेर आपल्याला प्रथम सुचलेला असणार आणि त्यावरून उर्वरीत गझल झालेली असणार