सर्दा जयजयकार

Submitted by मुंगेरीलाल on 17 October, 2012 - 13:52

ऑक्टोबरचा शेवट जवळ येतोय. रखडलेला पाऊस संपून उन्हाचा प्रताप जाणवायला लागलाय. त्यातच अचानक गारठा वाढल्याची जाणीव झाली. काल झोपताना घसा खव-खवल्या सारखं वाटलं. लगेच मनाचा 'कारणे शोधा' खेळ सुरु झाला. "रात्री जेवताना दही खायला नको होतं असं वाटून गेलं. आयुर्वेद-वाले ओरडतात त्यांची चेष्टा केल्याचं पाप भोवलं बहुतेक." पासून ते, "घरी येऊन गेलेलं कोण कोण खोकत, सुरसुरत होतं ते आठवून पाहणं" आणि सरते शेवटी, "या गोष्टी या सिझन मध्ये व्हायच्याच, आपलाच resistance कमी पडला" हा समजूतदार निष्कर्ष काढला, साहजिकच आहे. दोन दिवसापासून रात्री बारा एक पर्यंत आलटून पालटून Laptop आणि सदा'शिव' फोन (टच-स्क्रीन) वर हात आणि बोटे चालवून झोपेचं आणि दुसऱ्या दिवशीच्या (आठवड्यातून एकदाच घडणाऱ्या) मॉर्निंग-वॉक चं स्वतःहून खोबरं केलं, हेच नडलं असं स्वतःला स्पष्टपणे सांगितलं.

सर्दीला परिचित मंडळी फारशा गंभीरतेने घेत नाहीत, विशेषतः दुसऱ्याला झालेल्या. ऑफिसवाल्यांचा, त्यात काय रजा काढायची, साधी सर्दी तर आहे, असा अविर्भाव असतो. त्यात घरी अस्पृश्यांसारखी वागणूक. म्हणजे जेवताना “पोळीच्या डब्यात हात घालू नको, काय हवंय ते मागून घे”, झोपताना “पंखा बंद होणार नाही, तू बाहेरच्या खोलीत झोप हवं तर”, टीव्ही पाहताना “ई.. हा इथे पडलेला रुमाल ‘त्याचा’ आहे का? तो उचल जरा”, पोरांना “ए, त्याच्या जवळ-जवळ करू नका रे, कितीदा सांगायचं (+धपाटा फ्री)” वगैरे.

नाक चोंदणे, गळणे, लाल होते, अंगदुखी याचबरोबर सर्दीतला मुख्य फटाका म्हणजे शिंका. त्या कधी चालू होतील आणि किती फैरी झाडल्या जातील याचा काही अंदाज नसतो. आपण सगळं ‘कोरडं’ करून आवरून थोडा वेळ टीव्ही पाहावा म्हणून कॉटवरून उतरून बाहेरच्या खोलीत निघण्याचाच अवकाश की खिंडीत गाठलंच म्हणून समजा. आधी नाकपुडीच्या वरच्या भागात होणारी हलकी, खट्याळ हुलकावणी युक्त हुळ-हुळ. आपण मनोनिग्रहाने ती परतवायचा आटोकाट प्रयत्न करत अर्धवट ओठ विलग, नाक हवेत अर्धवट बॉनेट उघडल्यासारखे आणि डोळे अजिंठ्याची अप्सरा अथवा गौतम बुद्धाप्रमाणे अर्धोन्मीलित करून दोन पावले टाकतो तोच ती “मी आ....ले, निघा...ले” असा संदेश देत स्फोट घडवून आणतेच. कधी कधी तर तिचा जोर इतका असतो की मला घटना घडून जाऊन डोळे उघडल्यावर मला माझी दिशा आणि अक्षांश, रेखांश पूर्णपणे बदललेले जाणवतात. ह्यावेळी रुमाल बरोबर असेल (नसतोच) तर ठीक, नाहीतर काही खरं नाही. ही सलामी ऐकल्या-ऐकल्या आजू-बाजूची मंडळी कोरसात धृपद म्हणावं तसं, “पायात घाल, अंगात घाल, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको” असं आवर्जून आवाज चढवून घोकत असतात. आता तुम्ही जर मोक्याच्या क्षणी बेसिन अडवून मजा पाहत उभं राहाल तर घेतला ‘वसा’ मी टाकणार कसा त्यात हेच मला कळत नाही.

तर मंडळी, अशी ही वर्षातून २-३ दा छळणारी सर्दी आताही उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे हे मी ओळखलंय. फार स्वतःला दोष देण्यात अर्थ नाही. सर्दी, खोकला आणि फार तर चवीपुरता ताप याचा योग बहुतेक माझ्या यंदाच्या राशीभविष्यात लिहिलेलाच आहे. यंदा जमेल तितकी ती एन्जॉय करता येईल का ते पहायचं आहे. आता पुढचं प्लानिंग. ओढवू शकणाऱ्या परिस्थितीची बायकोला कोपऱ्यात बोलावून शांत-पणे कल्पना दिली. "तरी मी म्हणत होते" स्तोत्रा पासून 'घालीन लाटणे, ओढीन चरण' पर्यंत तीन वेळा ऐकून झाल्यावर आवश्यक काळजी आणि लागणारी सेवा आणि शुश्रुषा या महत्वाच्या मुद्द्याकडे तिचं लक्ष वेधलं. खोलीतला मोक्याचा, पंख्याचा वारा लागणार नाही, हाताशी Laptop, मोबाईल, टेबल-दिवा वगैरे लगेच हाताशी येतील तरीही बैठकीतला TV बरोब्बर दिसेल असा कोपरा हेरून ठेवला. पायमोजे, विक्स, कानटोपी, ३ मऊ रुमाल, वाचायला उत्तम पुस्तके असे जंगम सामान तसेच अलोपाथिक (क्रोसिन, septran वगैरे डॉक्टर ने शिव्या घालण्यापूर्वी स्वतःची बुद्धी चालवून घ्यायची) औषधे, गवती-चहा, आले-सुंठ, दालचिनी यांचा stock तपासून घेतला आहे. ऑफिस मध्ये अशावेळी नेमके टाळता न येणारे काम निघते, त्यांना पाठवायचा कारुण्यपूर्ण, खेद-दर्शक SMS सगळी प्रतिभा पणाला लावून रचून ठेवला आहे. फक्त सकाळी उठून 'सेन्डा'यचा बाकी ठेवला आहे. आता शोले मध्ये विरू आणि जय शेवटी पिस्तुले भरून पुलाच्या एका बाजूला दबा धरून बसतात तसा मी ready आहे, त्या पहिल्या दणदणीत मुहूर्ताच्या शिंके-ची वाट पाहत. एकदा शिक्का-मोर्तब झाले कि पुढील शिंकाच्या रणधुमाळीमध्ये "मी और मेरी सर्दी, अक्सर एक दुसरेसे बाते करते है" म्हणत उरलेला सोहळा पार पाडण्याचे ठरवले आहेच. आपणही रजा शिल्लक असेल तर नुसत्या या पोस्ट वर 'कॉमेंट' मारण्या व्यतिरिक्त मला अवश्य भेटायला येण्याचे करावे. चार शिळोप्याच्या गप्पाही होतील आणि न-जाणो, हा अनमोल ठेवाही तुम्हाला देता येईल. एक मिनिट....ऑक..छी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
सदाशिव फोन भारी शब्द आहे.
सर्दी माझ्या आसपास फिरकत नाही नी इकडच्या स्वारीला दर पंधरा दिवसानी असतेच.
पंखा एसी आणि खिडक्या हे नेहमीच्या वादाचे विषय आहेत.

हे फार म्हणजे फार मस्त लिहिलंय. Lol
लकी आहात २-३दाच सर्दी होते तुम्हाला. घासून गुळगुळीत झाली असली तर मला परफेक्ट सुट होणारी कोटी म्हणजे "मला वर्षातून फक्त दोनदा सर्दी होते अन दोन्ही वेळी ती ६-६ महिने टिकते":(
वातावरण बदल तर आहेच शिवाय गवतावर चालण्यापासुन ते तेलाच्या फोडणीपर्यंत अन कच्च्या फळांच्या वासापासून ते कपड्या/पुस्तकातल्या न दिसणार्‍या धुळीपर्यंत कशानेही सर्दी होते मला. अ‍ॅलर्जीक सायनसायटीस.:(

Lol
मस्तच लिहिलय Happy

सदा'शि' << भारी शब्द आहे एकदम Happy

>>घेतला ‘वसा’ मी टाकणार कसा त्यात हेच मला कळत नाही<< हे इमॅजिनुन अगदी.... याक्क् Lol

मस्त Happy

मस्त लिहीलय Lol
सदा'शिव' >> लै भारी शब्द!
>>घेतला ‘वसा’ मी टाकणार कसा त्यात हेच मला कळत नाही<< हे इमॅजिनुन अगदी.... याक्क् >> +१

नाक चोंदणे, गळणे, लाल होते, अंगदुखी याचबरोबर सर्दीतला मुख्य फटाका म्हणजे शिंका. त्या कधी चालू होतील आणि किती फैरी झाडल्या जातील याचा काही अंदाज नसतो. आपण सगळं ‘कोरडं’ करून आवरून थोडा वेळ टीव्ही पाहावा म्हणून कॉटवरून उतरून बाहेरच्या खोलीत निघण्याचाच अवकाश की खिंडीत गाठलंच म्हणून समजा. आधी नाकपुडीच्या वरच्या भागात होणारी हलकी, खट्याळ हुलकावणी युक्त हुळ-हुळ. आपण मनोनिग्रहाने ती परतवायचा आटोकाट प्रयत्न करत अर्धवट ओठ विलग, नाक हवेत अर्धवट बॉनेट उघडल्यासारखे आणि डोळे अजिंठ्याची अप्सरा अथवा गौतम बुद्धाप्रमाणे अर्धोन्मीलित करून दोन पावले टाकतो तोच ती “मी आ....ले, निघा...ले” असा संदेश देत स्फोट घडवून आणतेच. कधी कधी तर तिचा जोर इतका असतो की मला घटना घडून जाऊन डोळे उघडल्यावर मला माझी दिशा आणि अक्षांश, रेखांश पूर्णपणे बदललेले जाणवतात. ह्यावेळी रुमाल बरोबर असेल (नसतोच) तर ठीक, नाहीतर काही खरं नाही. ही सलामी ऐकल्या-ऐकल्या आजू-बाजूची मंडळी कोरसात धृपद म्हणावं तसं, “पायात घाल, अंगात घाल, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको” असं आवर्जून आवाज चढवून घोकत असतात. आता तुम्ही जर मोक्याच्या क्षणी बेसिन अडवून मजा पाहत उभं राहाल तर घेतला ‘वसा’ मी टाकणार कसा त्यात हेच मला कळत नाही.

>>>>> अगदी अगदी. प्रचंड प्रत्ययकारी वर्णन!!! Biggrin

सदाशिव फोन >>> सहीच. Happy

लढाईची तयारीही जोरात आहे. Happy आता होऊन जाऊ द्या!!! Proud

मस्त Lol

मस्त आहेत तुमचे सगळेच लेख. आवडला.

मुंगेरीलाल के हसीन सपने च्या चालीवर. मुंगेरीलालची विनोदी लेखने.

नेहेमी प्रमाणे उत्साहवर्धक आणि मनापासून दिलेल्या प्रतिक्रिया पाहून आनंद झाला. नेहेमीच्याच जीवनातले साधे अनुभव जमेल तितक्या हलक्या-फुलक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आप वाचेंगे तो और भी लिखेंगे Happy धन्यवाद.

मुंगेरीलाल,

झ्याक लिवलंय! प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभ राहतात. घेतल्या वशावरची कोटी अफलातून!! Proud ते सदाशिव फोनपण लई भारी. आमच्या लहानपणी सदाशिव टेलर्स (२४ तास चालू * ) होते. कालाय तस्मै नमः!

आ.न.,
-गा.पै.

* : कृपया कंसातील वाक्याचा अनर्थ करू नये. चालू हे क्रियापद आहे. २४ हा आकडा पाहून ते विशेषणासारखे वाचू नये! Wink

आज सर्दी, ताप आणि खोकल्याने थोडासा का होईना, आजारी आहे म्हणून सुटी टाकलीच आणि हे वाचायला मिळालं. तंतोतंत लागू Happy मजा आली Happy

जबरी!! खूप आवडला!!!
सदा'शिव', जय-विरु, मै और मेरी सर्दी, अजिंठ्याची अप्सरा अथवा गौतम बुद्ध वगैरे सगळेच झकास!

Pages