शिखर स्वामिनी कळसुबाई

Submitted by सौमित्र साळुंके on 16 October, 2012 - 07:53

शिखर स्वामिनी कळसुबाई (२४ जून २०१२)

पहाटे सव्वा पाच वाजता घोटी बस स्थानकातून सुटणाऱ्या एस. टी. बसने पावणे सहा वाजता बारी गावात आम्ही पोहोचलो तेव्हा कळसुबाईचा ऐसपैस डोंगर नुकताच जागा झाला होता मात्र अंगावरची धुक्याची दुलई तशीच होती. पहाटच्या अश्या गारव्यात दुलई दूर सारेल तरी कोण? या अश्यावेळी त्याच्या सर्वोच्च माथ्याचे दर्शन होणे केवळ अशक्य. बारी बस थांब्याला लागून असलेल्या लहानश्या दुकानात चहा आणि पोहे घेऊन, थोडासा ‘वॉर्म अप’ करून आणि पाठपिशव्या व्यवस्थित लावून, बरोबर सात वाजता आम्ही पायवाटेला लागलो. सभोवताली हिरवळ आणि वातावरणात प्रसन्न गारवा होताच.
पुढे आम्हाला एक विहीर लागली मात्र त्यात डोकावताच पाण्याच्या दुर्भिक्षाची जाणीव आम्हाला झाली. आता पाणी कुणाकडे मागायचे असा विचार करत असतानाच पुढे एका हातउपश्यावर आम्हाला बायका-माणसांची मोठी रांग दिसली. हि रांग आम्हाला मागे जाणवलेल्या परिस्थितीची अक्षरशः अधोरेषा वाटली. मात्र ग्रामस्थांनी आम्हाला स्वतःहून आमच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून दिले. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की इथे कळसुबाई आणि पुढे भंडारदरा–रतनवाडी परिसरात भेटलेल्या सर्वच व्यक्ती आम्हाला अतिशय अगत्यशील आणि विनम्र स्वभावाच्या जाणवल्या.
या हातउपश्यानंतर आणखी एक हातउपसा आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण गावठाणाच्या वरच्या बाजूस येतो. इथेच आम्हाला शाळेला चाललेल्या काही मुलांनी एका आंब्याकडे बोट दाखवले. याच आंब्याच्या उजवीकडची वाट धरून आपण चालू लागायचं. हीच मळलेली पायवाट आपल्याला शिखराकडे नेते. काही ठिकाणी छोटे छोटे चढ उतार तर काही ठिकाणी अगदी दमछाक करणारी चढण असं करत आम्ही पहिल्या शिडीपाशी येउन पोहोचलो. ज्या ठिकाणी एरव्ही लहान मोठे प्रस्तरारोहण करावे लागले असते अशा तीन ठिकाणी लोखंडी शिड्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र या शिड्यांच्या पायऱ्या काहीश्या अरुंद असल्याने गर्दी न करता, त्या अतिशय शांतचित्ताने चढाव्यात व उतराव्यात, विशेषतः पावसाळ्यात. या शिड्यांचे टप्पे काळजीपूर्वक पार केल्यास हा अतिशय सोपा ट्रेक आहे. फक्त अधून मधून दमछाक होते इतकचं. मात्र दर अर्ध्या पाऊन तासाला चार पाच मिनिटांची विश्रांती घेतल्याने या डोंगर वाटेचा प्रवास आम्हाला अतिशय आल्हाददायक वाटू लागला होता. त्यातच चढाई सुरु असताना आपल्याला वाटेत आंब्याची, करवंदीची आणि जांभळांची गच्च लगडलेली अनेक झाडेसुद्धा लागतात. मात्र त्याचा आनंद परतीच्या वाटेवर असताना घ्यायचा.
पुढे दुसऱ्या शिडीनंतर आपल्याला एक छानशी विहीर सुद्धा लागते. या सर्व प्रवासादरम्यान एक मजेशीर गोष्ट अशी की आपल्याला सतत असं वाटत राहत की डोंगरमाथा जवळ आलाय् मात्र तिथे पोहोचल्यावर लक्षात येतं की मंजील अभी दूर है...
शेवटच्या शिडीच्या आधी एक छानस पठार आपल्याला लागतं. या इथून सभोवारच परिसर अत्यंत सुंदर दिसतो. आपल्या नजरेसमोर वारा शुभ्र धुक्याला स्वतःसोबतवाहून नेत असतो, धुक्याआडून भंडारदरा जलाशयाची निळाई आपल्याला खुणावते, पठारभर इवल्याश्या खेकड्यांची लालचुटूक धावती नक्षी दिसते आणि काळ्याकभिन्न दगडांआडून मोहक रंगांची रानफुलं डोकावतात. निसर्गाच्या या अफलातून रंगसंगतीला मनापासून दाद देत आम्ही शेवटच्या शिडीपाशी येऊन पोहोचलो.
आमच्यात एक नवा गडी असल्याने त्याच्या थोडं पुढे एकजण आणि थोडसं मागे एकजण असं करत ती शिडी पार केली. साधारणतः आपण उंचावर शिडी चढत असताना आजूबाजूला दाट धुकं असल्यास काहीशी अनामिक भीती आपल्या जवळपास घुटमळते, विशेषतः नवख्या व्यक्तीच्या. त्यात आता उतरताना कसं उतरायच हा एक प्रश्न पडलेला असतो. मात्र आपल्या सहकाऱ्यांवर ठाम विश्वास असल्यास आणि स्वत:चे मानसिक धैर्य राखल्यास असे टप्पे बिनधोकपणे पार पाडले जातात. आपण कुठे जाणार आहोत त्या बद्दलचा थोडा पूर्वाभ्यास केल्यास या भीतीवर आधीपासूनच बऱ्यापैकी मात करता येते. तसेच कुठल्याही ट्रेक ला जाताना एक दोन अनुभवी ट्रेकर असल्यास त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग आपल्याला होत असतो.
हि तिसरी शिडी पार केली की आपण माथ्यावर येऊन पोहोचतो. इथे येईपर्यंत आपल्याला साधारणपणे तीन तास लागलेले असतात. आणि इथे पोहोचल्या बरोबर आपलं स्वागत करतो भणाणता वारा आणि कोसळत्या जलधारा... शिखर स्वामिनी कळसुबाईमातेच भगव्या रंगात रंगविलेल लहानसं मंदिर या माथ्यावर आहे. आपण देवीचा आशीर्वाद घ्यायचा आणि या लहानश्या माथ्याला चक्कर मारायची. इथे सुरक्षेच्या दृष्टीने रेलिंग्ज लावल्या आहेत त्याच्या पलीकडे जाण्याचे दु:साहस मात्र करायचे नाही. बऱ्याचदा गडमाथ्यावर पोहोचल्यावर थोडं खाण्याची इच्छा आपल्या होतेच आणि आपण खातो सुद्धा. मात्र त्या इच्छेला या माथ्यावर छप्पर मिळत नाही. पाऊस थांबलेला जरी असेल तरी इथल्या अति भन्नाट वारा आपल्याला डबा उघडू देईल तर शपथ! डबा उघडणं दूर, इथे वाहणाऱ्या वाऱ्याकडे तोंड करून तुम्ही एक दोन मिनिट उभे राहून तर बघा. निसर्गाच्या एका तत्वाच्या अपरिमित शक्तीचा एक मिनिटांचा तगडा ट्रेलर बघाल... तोही फोर डी मध्ये.
इथेच जॉन म्युईर याचं एक वाक्य आठवलं,”Climb the mountains and get their good tidings. Nature's peace will flow into you as sunshine flows into trees. The winds will blow their own freshness into you, and the storms their energy...”. मंदिराच्या भिंतीच्या पलीकडे आंम्ही थोडं वेळ अगदी शांत बसून होतो. वाऱ्याचा ती शक्तिशाली शीळ ऐकत, त्याचा अचंबित करणारा वेग बघत...
भर पावसाळ्यात जर इथे आलात आणि सोबत कंपास असेल तर कळसूबाईचे शेजारी अलंग-कुलंग-मदन तसेच भंडारदरा, रतनगड इत्यादींच्या भौगोलिक स्थानाचा अंदाज आपल्याला येतो मात्र त्यांचे दर्शन होणे खूप कठीण आहे. मात्र तरीही ऐन पावसाळ्यात इथे येणं आणि माथ्यावरच्या पाऊस-वाऱ्याच्या खेळात स्वतःला झोकून देणं हि एक थरारक आणि अविस्मरणीय अनुभूती असते.
परतीच्या प्रवासाला निघताना, शाळेत, कुठल्यातरी इयत्तेत, भूगोलाच्या पुस्तकात, काळ्या पांढऱ्या रेघांमधल वाक्य पुन्हा आठवतं, “कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीशिखर आहे” आणि चेहऱ्यावर एक समाधानी हसू उमलत.
हे असे शब्दातीत क्षणचं जगण्याच्या प्रवासाला अखंड उर्जा देत रहातात....
कसे जावे:
१. मध्य रेल्वेच्या घोटी स्थानकापर्यंत ट्रेनने किंवा घोटी बस स्थानकापर्यंत एस. टी. महामंडळाच्या बस ने.
२. पहाटे ५.१५ वाजता घोटी बस स्थानकातून बारी गावात जाणारी बस पकडावी
३. येताना कसाऱ्यापर्यंत एस. टी ने किंवा स्थानिक प्रवासी वाहानांनी येता येऊ शकते
विशेष सूचना: पुरेसे पाणी बारी गावातच भरून घ्यावे किंवा पुण्या-मुंबईहून येताना पुरेसे पाणी सोबतच आणावे

@ सौमित्र साळुंके
२४ जून २०१२
saumitrasalunke@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय. शेवटचा चढ जिथे सुरु होतो, तिथे एक विहिर होती. मी स्वतः तिचे पाणी प्यायलो आहे. अजून आहे ना ती ?

या चढाची एक मजा म्हणजे, हा सर्व चढ डोंगराच्या एकाच बाजूने आहे. म्हणजे खाली ऊभा असेल कोणी, तर त्याला शेवटपर्यंत आपण दिसू शकतो.

हो, ती विहिर आहे. पूर्ण भरलेली होती जूनमध्ये. मात्र. गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं.

सुंदर वर्णन... खुप आवडलं... सोबत फोटो हवेत.

मात्र तरीही ऐन पावसाळ्यात इथे येणं आणि माथ्यावरच्या पाऊस-वाऱ्याच्या खेळात स्वतःला झोकून देणं हि एक थरारक आणि अविस्मरणीय अनुभूती असते. >>> अगदी अगदी... आम्ही भर पावसात कळसुबाईचा ट्रेक केला होता. चढाई संपता संपत नव्हती. शिखरावर पोहचल्यावर वार्‍याचा जोराने आणि पावसाच्या मार्‍याने हैराण झालो होतो.

सुंदर वर्णन... खुप आवडलं... सोबत फोटो हवेत.>> +१०१

दिनेशदा आहे ती विहीर अजुनही.
आम्ही हिवाळ्यात गेलो होतो पाणी होतं तिथे.
तिथेच एक टपरी असते आता. तिथे भजी वै मिळु शकतात. अर्थात ती सिजनल असणार..

आम्ही हिवाळ्यात गेलो होतो पाणी होतं तिथे.तिथेच एक टपरी असते आता. तिथे भझी मिळु शकतात.मीत्रा ..मस्त लिहिलयस फोटो टाक ना

आम्ही हिवाळ्यात गेलो होतो पाणी होतं तिथे.तिथेच एक टपरी असते आता. तिथे भझी मिळु शकतात.मीत्रा ..मस्त लिहिलयस फोटो टाक ना

काय सुरेख लिहिलंस रे ...... जादूभरी लेखणी आहे तुझी....

जॉन म्युईर साहेबांची वाक्ये तर किती तरी वेळा वाचत होतो...

ते जरा फोटोचंही बघ ना....