दु:ख कोणाचे असू द्या, आपले आहे म्हणावे!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 October, 2012 - 14:02

गझल
दु:ख कोणाचे असू द्या, आपले आहे म्हणावे!
वेदनेसाठी जगाच्या गुणगुणावे, गीत गावे!!

सूर्य एखादाच होतो, मान्य ही वस्तुस्थिती पण;
सूर्यकिरणांची शलाका राहिलेल्यांनी बनावे!

सांग पायांना कुणाच्या टोचले नाहीत काटे?
वेचण्यासाठी फुलांना, दिलखुशीने वणवणावे!

झगमगाटाने जगाच्या का दिपावे माणसाने?
कोणत्याही कोप-याला तेवणारी ज्योत व्हावे!

रूप खडकांचे निराळे, रंग मातीचे निराळे;
हे परागांना विचारा त्यातही कैसे रुजावे!

कुंतलामध्ये प्रियेच्या, मंदिरी किंवा स्मशानी;
फूल कोठेही असू द्या, त्या फुलाने दरवळावे!

ढाळताना आसवे ती कामिनी दिसते अशी की,
माळ मोत्यांची उरावी मात्र मोती ओघळावे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त अगदी सुरेख्.........आवडली.......:)

सांग पायांना कुणाच्या टोचले नाहीत काटे?
वेचण्यासाठी फुलांना, दिलखुशीने वणवणावे!

रूप खडकांचे निराळे, रंग मातीचे निराळे;
हे परागांना विचारा त्यातही कैसे रुजावे! >>> हे दोन्ही अप्रतिमच....

चांगली जमीन व चांगली गझल, तसेच मायबोलीकरांच्या प्रतिसादावर एकही शेर नसल्याने अधिक छान वाटत आहे

मतला, वणवणावे, रुजावे आणि ओघळावे अधिक आवडले

-'बेफिकीर'!

सूर्य एखादाच होतो, मान्य ही वस्तुस्थिती पण;
सूर्यकिरणांची शलाका राहिलेल्यांनी बनावे!

चांगला शेर !
डूज आणि डोन्ट्स सांगणारी गझल जास्तीत जास्त जितकी आवडू शकते, तितकी आवडली. Happy

('गझल कोणाची असू द्या, आपली आहे म्हणावी' असे एक किंचितविडंबन स्फुरत होते. महत्प्रयासाने आम्ही तो उ(चं)बळ दाबला. हे करतांना किती वेदना झाल्या ते आमचे आम्हाला ठाऊक!)

असो.

वा

छान