चालुक्य पुराण

Submitted by मुंगेरीलाल on 12 October, 2012 - 11:52

तीन महिन्यांपूर्वी सतत डोके दुखते म्हणून डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून B.P. चे निदान केले. रोज घेण्याची गोळी लिहून दिली आणि रक्ताच्या तपासण्या करायला सांगितल्या. अपेक्षेप्रमाणे त्यात हृदयाच्या आवडत्या आणि नावडत्या राण्यांचे (good आणि bad fat वगैरे) आकडे बरेच वाकडे झालेलेच होते. महिन्या-भराने पुन्हा गेल्यावरही तीच गोळी आणि (जवळपास) तेवढीच फी सांगितली.

पुराणातल्या राक्षसा-प्रमाणे (माझा राक्षस-गण आहे) डॉक्टरांना उश्शाप मागितला. ते म्हणाले 'चालू लागा', माझे डोळेविस्फारले. म्हणाले, म्हणजे रोज जमेल तेवढे चला, जास्त ताण घेऊ नका, जिम वगैरे आत्ताच नको. मनात म्हंटले चला, सोप्पे आहे. उद्यापासून सुरु. बायकोने नमनालाच माघार घेतली, तिची टाच दुखते, शिवाय पहाटेची झोप मोडायला तिची कधीही तयारी नसते. एकदा फक्त भूकंप झाला होता त्यावेळी आणि दुसऱ्यांदा माझे स्थळ पाहायला येताना गाडी पकडायची होती त्यावेळी (नंतर मला अजूनही धक्के जाणवत आहेत) ती नाईलाजाने लवकर उठली होती. असो.

तर मी दुसऱ्या दिवसापासून चालायला सुरुवात केली. किती चालावं? टेबलावर रीडेर्स-डायजेस्ट चा अंक पडला होता. त्यात एका लेखात सांगितलं होतं, "केवळ २० मिनिटे चालल्यानेही मोठे-मोठे रोग बरे होतात". छान. मग मी कॉलनीतल्या मैदानाला २-३ चकरा मारल्या. बरे वाटले. वाटेमध्ये विविध प्रकारची माणसे दिसली, जी एरवी कधी जवळून पाहता आली नसती. उदा.एक झपाझप चालणाऱ्या सडसडीत आजी, मैदानात एका बाजूला भरणारा बायकांचा हास्यक्लब, दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांची शाखा, शाळेच्या बस ची वाट पाहत असलेली, एका कंटाळलेल्या गाऊनचं बोट पकडून दप्तर पेलत उभी असलेली एक झोपाळलेली शर्ट-चड्डी आणि त्याच्याच वर्गातली बस मध्ये खिडकी शेजारी आपली नेहेमीची जागा पकडून शेवर्ले गाडीत मागे ऐटीत बसल्याचा आव आणणारी फ्रेश चिमुरडी. शरीराबरोबरच मन ही प्रसन्न झालं.

घरी आल्यावर हिला, "आपण नेहेमीच्या रुटीन मध्ये कित्ती छोटे-छोटे आनंद मिस करतो" वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावर तिने शांतपणे, भिंती-वरच्या घड्याळा-कडे बोट दाखवून, नंतर तेच बोट स्टार-वार्स मधल्या लेझरगन सारखं बाथरूम मधल्या गिझरून वाहणाऱ्या बादलीकडे रोखलं. मी काय समजायचं ते समजलो आणि चांदोबा-मधल्या विक्रमादित्य राजासारखं "अशा रीतीने मौन भंग होताच तो खांद्यावर टॉवेल घेऊन बाथरूम कडे चालू लागला" छाप प्रस्थान केलं.

त्यादिवशी ऑफिस-मध्ये माझ्या चेहेऱ्यावरचा ताजेपणा सगळ्यांना खचितच जाणवत असावा. एक-दोघांनी ते बोलूनही दाखवलं. मी म्हटलं, वॉकिंग सुरु केलंय गेले ३-४ दिवस (खरं-तर एकच दिवस झालं होता, पण चालायच्या बाबतीत जरा इकडे-तिकडे सांगितलेलं चालायचंच, नाही का? Positive थिंकिंग म्हणजे हेच की). मग त्यांना इतरही अनुभव, फायदे (जे घरी सांगता आले नाहीत ते) कथन केले. खूप प्रभावित झाले बिचारे. काहींनी 'मी पण एकेकाळी चालायचो पण या गोष्टी बंद पडतात' वगैरे सांगायचा प्रयत्न केला मध्ये-मध्ये, पण मी थांबलो नाही, रेटून नेलं. (आजकाल लोकांचं लिसनिंग फारच विक झालाय, त्यामुळे त्यांना धरून ठेवून रेटून बोलावं लागतं. Happy )

लंच नंतर एक सहकारी भेटले, त्यांनी मात्र माझा यशस्वी-पणे हिरमोड केला. म्हणाले, किती चालता? म्हंटले, २-३ चकरा. म्हणजे किती मिनिटे? म्हंटले, मोजली नाहीत, असतील १५-२०. म्हणाले, मग काही उपयोग नाही. विसाव्या मिनिटानंतरच तुमची बॉडी कॅलाऱ्या जाळते, त्यानंतरची मिनिटे ही खरी कामाची. मी हिरमुसून दुसऱ्या दिवशी मोजून ३० मिनिटे चालून, मार्केट मधल्या गरीब हमाला सारखी, त्यातली खिशात १०च पडली असे समाधान मानून ऑफिस ला आलो. आज कालच्या सारखं तजेलदार वाटत नव्हतं. ब्याटरी-संपलेल्या गाडीला ढकलून नेल्यासारखं बॉडी ला बाहेर काढलं असा वाटत होतं. असे २-३ दिवस गेले, आता जरा सवय झाली होती. हालचालीत पण वेगळेपणा जाणवत होता.

तेवढ्यात गावी जावं लागलं. तिथे काका असतात. ज्यासाठी गेलो ते काम झालं, जेवण वगैरे झालं, मग पुण्यातली धावपळ, ट्राफिक वगैरे विषय झाले. मी छाती पुढे काढून 'सध्या मी रेगुलर चालतो' वगैरे सांगितलं. आमचे काका बोलण्यापूर्वी काही सेकंद रोखून पाहतात. तो काळ सरल्यावर मी ते काय म्हणणार हे ताडून, "मी २० मिनिटाच्या पुढे 'कॅलरी-जाळ' क्षेत्रात चालतो" हे आधीच नमूद केलं. त्यावर ते मान हलवत म्हणाले, "कमीत कमी (यानंतर galary पर्यंत जाऊन तंबाकू थुंकून, अमिताभ KBC मध्ये बरोब्बर उत्तर सांगण्यापूर्वी जीव टांगणीला लावतो तसा ग्याप घेऊन) १ तास चालायला पाहिजे नाहीतर तुमच्या अंगातले cholesterol जळत नाही" हे सांगून निरुत्तर केले. सटकन FM चे एरियल खाली केल्यासारखा चेहेरा झाला. पण बरे झाले, नवी माहिती मिळाली. आता नव्या टार्गेट ला डोळ्यासमोर ठेवून मी परतलो.

गावाला जाण्याच्या खंड पडल्यामुळे की काय आता मात्र माझा चालण्यातला उत्साह, आनंद नष्ट झाला असावा अशी शंका आली. येणारे अनुभव बदलले आहेत. आता सकाळी लवकर जाग येत नाही, आली तरी 'निसर्गाचं देणं' हुकुमी वेळेत परत देऊन बाहेर पडणं होत नाही. चालताना रस्त्यातल्या गाड्या उगीचच अंगावर आल्यासारख्या वाटतात (वर वाटेत घाईच्यावेळी कडमडल्या-प्रीत्यर्थ जळजळीत कटाक्ष ते वेगळेच). कोपऱ्या-कोपऱ्या वरच्या मुन्शिपाल्टी च्या बायका कचरा जाळून सकाळी मिळणाऱ्या थोड्या-फार शुद्ध हवेची वाट लावताना पाहून चिडचिड होते. पण त्यांना थांबून त्याची तक्रार करायची हिम्मत होत नाही, त्यांची एकंदर उंची-तब्येत, हातातला झाडू आणि माया-ममता-जयललिता यांना लाजवेल अशी करडी नजर पाहून "भाऊ, किती वाजले, काडीपेटी हाय का?" इतपतच प्रश्नांना कशीबशी उत्तरे देऊन मी पुढे जातो. नाही म्हणायला रस्त्यावरची भटकी कुत्री मला त्रास देत नाहीत (बऱ्याच जणांना याचा मुख्य त्रास होतो), पण मी हे भूषण म्हणून कुणाला सांगत नाही, नाहीतर याला गल्लीतले कुत्रे पण विचारीत नाही अशी मंडळी सांगत फिरायची. असो.

तर असे 'चालु'क्य-पुराण आहे. मध्यंतरी पत्नी-च्या आग्रहाने विद्युतपळपुटी (ट्रेड मिल) विकत घेतली आहे. ती घेतानाच अनेकांनी "काही घेऊ नकोस, वापर होत नाही, शेवटी कपडेच वाळत घातले जातात, पाहिजे तर माझ्याकडे पडली आहे ती घेऊन जा (कधी, कशी ते सांगत नाहीत)" वगैरे हातातली कामे टाकून परोपरीने सांगितले तरीही मी ती घेतली. फक्त घेताना दुकानदाराला यावर कपडे छान सुकतील ना, हे विचारून घेतले. त्यानेही आ वासून, मग वरमून हो म्हंटले. ठरल्या-प्रमाणे सध्या हे यंत्र पाय पोटाशी घेऊन छताकडे पहात कोपऱ्यात बसून आहे. ३ महिने होत आलेत. डॉक्टरना पुन्हा भेटायची वेळ आली आहे. वजन तेवढेच भरणार आहे, तीच गोळी continue करायची हे तेवढीच फी भरून ऐकायचे आहे. मनाची तयारी झाली आहे, फक्त appointment घ्यायची बाकी आहे. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पण नेहमी प्रमाणे मस्तच लिहिलयत.
पण आधीच्या दोन्ही गोष्टी ह्यापेक्षा खूप छान जमल्यात, हे तितक जमल आहे अस वाटत नाही.

धन्यवाद. अनु, मला शंका होतीच. प्रत्यक्षात हे लिखाण आधीचं आहे त्यामुळे गमतीची गोष्ट म्हणजे मला स्वतःलाही ते जरा बाळबोध वाटतं. कदाचित माझा पोस्ट करण्याचा अनुक्रम चुकला किंवा कॅटेगरी विनोदी ऐवजी इतर काहीतरी ठेवायला हवी होती. असो.

पण आधीच्या दोन्ही गोष्टी ह्यापेक्षा खूप छान जमल्यात, हे तितक जमल आहे अस वाटत नाही.
>>>>> +१. मजा नाही आली.

विद्युतपळपुटी... Rofl
<<एका कंटाळलेल्या गाऊनचं बोट पकडून दप्तर पेलत उभी असलेली एक झोपाळलेली शर्ट-चड्डी आणि त्याच्याच वर्गातली बस मध्ये खिडकी शेजारी << सॉल्लीड वर्णन! Lol

खुप आवडलं लेखन! Happy

मस्त............ हे सुध्दा............
.
.
.
परत एकदा वाचुन ....बघा ............काही ठिकाणी नक्कीच रिकाम्या जागा राहिलेल्या आहेत.... तिथे अजुन पंचेस टाकु शकतात आपण ..

नाही म्हणायला रस्त्यावरची भटकी कुत्री मला त्रास देत नाहीत (बऱ्याच जणांना याचा मुख्य त्रास होतो), पण मी हे भूषण म्हणून कुणाला सांगत नाही, नाहीतर याला गल्लीतले कुत्रे पण विचारीत नाही अशी मंडळी सांगत फिरायची. असो.
Rofl

छान आहे हेही.

गॉड सचिन तरी कुठे नेहमीच century मारतो Happy पण ५०+ काहिहि वेलकम असतं चाहत्यांना.
पीच वर खेळत राहण महत्वाच शतक होत राहतात, त्यान भागिदार्‍या वाढतात इतरांना बॅट तळपवायला संधी मिळ्ते Happy

>>याला गल्लीतले कुत्रे पण विचारीत नाही अशी मंडळी सांगत फिरायची...
हा मात्र गेल सारखा १०८ कि काय मीटर चा षटकार आहे... लई भारी.

आवडलं Happy

Pages