गेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 October, 2012 - 11:28

गझल
गेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी!
उरलेल्या आयुष्याची मीहून बांधली मोळी!!

मज हाय! लागले द्यावे, केवढे मोल जगण्याचे!
मी मिटून डोळे माझ्या स्वप्नांची केली होळी!!

हे हात स्वत:चे सुद्धा हाताशी नव्हते माझ्या;
मजवरती तुटून पडली दु:खांची अवघी टोळी!

देशात आमुच्या सद्ध्या, केवढी सुबत्ता आहे!
हातात भिका-यांच्याही भरजरी रेशमी झोळी!!

मी ताव तव्याचा, केव्हा, पोळपाट झालो होतो;
येणा-याजाणा-यांनी भाजून घेतली पोळी!

तोडून बंध नात्यांचे, सोयरे मोकळे झाले....
स्मरणांची एकेकाच्या वेढती मला वेटोळी!

प्रत्येक शेर लिहिताना, केवढ्या यातना झाल्या....
दिसतील इथे अर्थांची तुम्हास कैक भेंडोळी!

त्यामुळेच बहुधा त्यांना वश जनता होत असावी....
आश्वासन अरे कशाचे? देतात अफूची गोळी!

सत्तेवरती कोणीही, कायमचा टिकून नसतो;
समजतोस तितकी नाही, ही जनता साधी भोळी!

मी तुझे दिले ना सांडू अश्रूंचे अस्सल मोती!
वेचली वळचणीखाली, मी एक एक पागोळी!!

अद्याप पंचनामाही करण्यास कुणी ना आले!
जाणारे गेले...उरली, रक्तांची ती थारोळी!!

चंद्रशेखरांनी लिहिली लघुकविता चारोळींची;
सुळसुळाट झाला, जो तो, लागला लिहू चारोळी!

मी इथे उभा अन् माझे मन पार राहिले मागे.....
जगण्याने केली माझी पुरतीच जणू खांडोळी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी इथे उभा अन् माझे मन पार राहिले मागे.....<<< वा

घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे

दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने ----- हे आठवले

गझल छान.

थोडा प्रयत्न केलात तर शंभर सव्वाशे शे'र गाठता येतील. मग महागझल म्हणता येईल, महाकाव्याच्या चालीवर
__/\__