माझी गणेश-पूजा

Submitted by मुंगेरीलाल on 9 October, 2012 - 10:02

गणेश चतुर्थीचा दिवस. हवा बदल असेल किंवा आणखी काही, मला सकाळ पासूनच अंगात कणकण होती. ही म्हणाली, जमणार आहे का तुला नाहीतर मी पूजा करून घेते. मी लगेच उदार अंत:करणाने होकार दिला.

तसा मी देव-भक्त कॅटेगरी मध्ये मोडणारा नाही. देवावर विश्वास आहे कि नाही याचा इथे मुद्दा नाही. कारण तो नेमका कसा ठेवायचा हे मला अजूनतरी कळलेलं नाही आणि कुणी नीट शिकवलं पण नाही. फक्त ते जरा 'प्रीपेड' प्रकरण आहे असं आस्तिक मंडळींकडून समजलेलं आहे, म्हणजे आधी श्रद्धेचं व्हाउचर फाडावं लागतं आणि मग कधीतरी तुमच्या नावानं कुरियर येतं, पण सारखी 'निघालं का? आलं का? दुसऱ्याला गेलं का? मग मला रिफंड तरी द्या' अशी चौकशी आणि भाषा करायची नाय, नाहीतर पुन्हा डबल किमतीचं व्हाउचर फाडावं लागतं म्हणे. मला मुळात लॉटरी-बिट्री चा नाद नाही त्यामुळे मी त्या फंदात पडलो नाही. नास्तिक मंडळींची देव नसतो यावर गाढ श्रद्धा असते म्हणे. आहे कि नाही गम्मत. दोन मित्र एकच कप चहा वन-बाय-टू करून तोच पिता-पिता वाद घालत असतात तशा श्रद्धा madam यांच्या कॉमन मैत्रीण Happy असो.

तर मी काय मध्यम मार्ग काढलाय कि चल म्हणालं कुणी तर जातो देवळात वगैरे आणि बेसिक गोष्टीला उगीच नाही म्हणत नाही, म्हणजे बरोबर जायचं, उंबऱ्यात एका हातानी कबड्डी-छाप नमस्कार करायचा, आत जाऊन हाताला लागतील तेवढ्या घंटा वाजवायच्या, एक राउंड मारून पुन्हा नमस्कार, आजूबाजूचे लोक साधारण जितका वेळ डोळे मिटून थांबतात तितका वेळ थांबणे - (काही मागायचा प्रश्नच नाही. तशी आजकाल फॅशनच आहे म्हणा.. म्हणतात "मी नुसता मन:शांती साठी जातो", बरंय बाबा. हे म्हणजे पेट्रोल पंपावर जायचं पण "नुसतं कोरं २ लिटर टाका, ओईल नको" सारखं झालं. देवही म्हणत असेल "ठीक आहे साहेब, झाकण उघडा आणि झिरो बघा"). हं तर मग खडी-साखर कलेक्शन, मग मिटल्या डोळ्यांनी हळूच क्लच दाबून रिवर्स टाकून हळूहळू बाहेर येऊन गार कट्ट्यावर टेकून बसायचं (पावती येईपर्यंत). एक नजर चपला आहेत त्याची खात्री करून मागे वळून, "thanks बॉस, सध्या एवढी कृपा ओके" असं म्हणत परत निघायचं. बस इतकंच. याच्या पेक्षा जास्त ‘बँक ऑफ भगवान’ मध्ये ‘रिकरिंग’ काढायचं नाही आणि काहीच नाही असंही नाही. न जाणो, पुढे मागे त्यांचे चेअरमन असतात किंवा होते असा शोध लागला तर आपले थोडे तरी 'अॅरीयर्स' येतील असा मध्यमवर्गीय आशावाद आणि दरम्यान आजूबाजूची आपली आस्तिक माणसे पण संतुष्ट असा इन्शुरन्स+बोनस फॉर्मुला.

पण कधी-कधी या मध्यम मार्गांनी मी गोत्यात पण येतो. वर्षातून हमखास एकदा तरी. आणि ते म्हणजे गणपती बसवण्याच्या वेळी. एरवी माझा 'देवलेसनेस' चालवून घेणारी घरची मंडळी का कुणास ठाऊक, घरच्या गणपतीची प्राण-प्रतिष्ठा मीच करावी अशीच अपेक्षा करतात. म्हणजे - सगळे जमले कि ग्रुपमध्ये पहिला गाणं म्हणण्याचा तीव्र आग्रह सगळ्यात बेसूर माणसालाच करतात तसं. त्याची बिचाऱ्याची 'लकडी-कि-काठी' हे गाणं 'जन-गण-मन' च्या चालीवर म्हणण्याच्या पलीकडे तयारी नसते तरीही 'काहीही म्हण, थोडंसं तरी म्हण, ए शांत बसा रे आता तो म्हणतोय' असं करून त्याला पुरता बेजार करतात तसं.

लहानपणी माझा पूजा करण्याशी संबंध आला तो आईमुळे. तोही तिचं एक काम हलकं होऊन तिला स्वैपाक करायला उसंत मिळावी हाच उद्देश. त्यात स्वतः देवाचा फारसा संबंध नाही. आणि कामही सोपे. आधी सुकलेली फुले काढून टाकायची, मग सगळे देव ताम्हणात ठेवून वॉशिंग, मग कळकट कापडाने पुशिंग, पुन्हा पाटावर पार्किंग आणि फ्रेश फुलांनी ड्रेशिंग. झाली पूजा. त्यातल्या त्यात बाळकृष्ण रावांच्या बाईकचा साईड-stand जरा त्रास द्यायचा, पण एखादे फूल खोचून काम भागायचे. पण गणपतीची पूजा हा इतका सोपा प्रकार नाही. एकतर सकाळी उठल्यावरच मला 'काय, करणार ना पूजा?' असा प्रेमळ प्रश्न आणि 'कर रे, तूच करायला पाहिजे' असं विचारणारीच म्हणून मोकळी. त्याक्षणी मला स्त्रियांना संधी द्यायलाच पाहिजे याची प्रकर्षानी जाणीव होते. पण असो. पूजा करणार नाही असं स्पष्ट म्हणण्याची माझी हिम्मत नसते, आणि मी certified नास्तिक पण नसतो त्यामुळे मला हो म्हणण्यावाचून उपाय नसतो. मग authentic पूजा होण्यासाठी कॉट-खालच्या ट्रंकेतून (ती मलाच ओढावी लागते) ठेवणीतलं सोवळं-उपरणं इत्यादी वस्त्र पांडवानी शमीच्या ढोलीतून शस्त्र काढावीत तशी काढली जातात. त्याची लांबी इतकी असते कि ती मळू नयेत म्हणून कॉट-वर चढून (पंखा डोक्याला लागणार नाही या बेतानं) ती नेसावी लागतात. आधीच मला निऱ्या-घालणे प्रकार नीट येत नाही, त्यात ते रेशमी वस्त्र. मग तर अवस्था अजून सुळसुळीत. मग एक जण निऱ्या घालत माझ्याजवळ येतो आणि दुसरी व्यक्ती त्या मागून घेऊन खोचण्याचे सत्कर्म करत असते. त्या दोघांचा डायलॉग साधारणपणे पूर्वी एक खाली आणि दुसरा गच्चीत उभा राहून TV चा अन्टेना adjust करताना जसं 'हं अजून थोडा, हं बस बस, हं दे आता इकडून' तसं चालू असतो. मध्ये माझा tower घामाने निथळत असतो.

जानवे नेहेमी अंगात नसतेच. त्यामुळे ते उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे (सांगणाऱ्याच्या की माझ्या) आणि पूजा करताना गणपतीला सेम की उलटे याच्यात बराच वेळ, सूचना आणि डेसिबल्स जातात. पुन्हा ते वापरातले नसल्याने वळकट्या करत करत गारवेलासारखे अंगावर वर वर येत मागे जात सारखे अस्वस्थ करत असते ते वेगळेच. त्यामुळेच मी वर्षभर कॉर्डलेस ब्राम्हण वेशात राहणे पसंत करतो. कारण अनेकदा माझे जानवे बनियन काढताना नकळत त्याच्याबरोबर वाशिंग मशीन मध्ये जाऊन अडकून बसलेले आहे. असो.

मग मला शोभिवंत बांधून/गुंडाळून, गंध लावून, जानव्यात ओवून पीच वर आणलं जातं. आतापावेतो माझ्या चेहेऱ्यावर भक्ती-भाव, प्रासादिक आनंद वगैरे नुसतं दिसून नव्हे तर ओसंडून जाताना दिसणं अपेक्षित असतं. माझा आतून 'भावे प्रयोग' करायचे आटोकाट प्रयत्न चालू असतात. मग अचानक आरोळी येते, 'चला, सांगा त्याला'. मग (बहुधा पत्नी) पहिली बोलिंग घेते आणि सूचना देते 'सगळं ठेवलं? (तिनेच ठेवलेलं असतं सगळं, तरीही), हं, आता एक फूल घे, कुठलंही घे, पण म्हणजे फार मोठं नको, छोटं घे कुठलंही, पांढरं हं तेच ते. (मग कुठलंही का म्हणाली आधी?) बुडव पाण्यात. हं, शिंपड सुपारीवर, ठेव तिथेच' तेवढ्यात बाजूने वडील (त्यांना मी आजतागायत पूजा करताना पाहिलं नाहीये, फक्त दिग्दर्शित मात्र करतात आवडीने) म्हणतात 'आधी स्वतःला गंध लावायचं होतं. बरं ठीक आहे, चालतं, आता लाव. त्याला napkin दे गं गंधाच बोट पुसायला. हं आता दुधात फूल बुडव आणि पुन्हा तसंच' मी तसं करायला लागलो कि बायको मधेच 'ते नव्हे, दुसरं फूल घे, घे कुठलंही घे, पांढरं घे छोटं' मागून आई एकदम 'कलशाची आणि घंटेची पूजा करावी आधी, फळं पाडशील सांभाळून, उदबत्ती पेटवली का?' अशी मल्टीपल चानेल एकावेळी माझ्या कानात भक्ती-रस ओतत असताना शेजार-पाजारच कुणी आलेलं असेल तर मधूनच 'चांगलं दिसतंय सोवळं, याच्याआधी कधी पाहिलं नाही यांना याच्यात' वगैरे (मी ऑफिसला फ्रायडे ड्रेसिंग ला नेसणं अपेक्षित होतं कि काय?) तसंच पुढे ' छान आहे मूर्ती, शाडूची वाटतं. कितीला पडली? माझी जाऊ पण करते, घरीच, क्लासेस पण घेते विशेष म्हणजे तिकडे न्यू-जर्सी ला, त्यांना फार असतं तिकडे आपल्यापेक्षा देवा-धर्माचं' वगैरे तारे तोडत माझ्या कशा-बशा बेअरिंग धरलेल्या 'भावे प्रयोगाला' कर्तरी लावत आणि एकाग्रतेला चिडवत, टोचत असतात. असा तिन्ही दिशांनी डॉल्बी-डिजिटल 'कान-फेस्टिवल' चालू असेपर्यंत आता माझ्या सुटलेल्या पोटाने सोवळे टिकवून धरण्याच्या प्रयत्नामुळे माझी मान नकळत मागे जाऊन, अंगकाठी टायटॅनिकच्या कोपऱ्यात ती फेमस पोझ घेतात तशी होऊन (फक्त हात पसरता येत नाहीत आणि मी एकटाच असतो) कंबरेतून असह्य कळ येत असते. तरी सूचना चानेल चालूच, 'हं आता मालावस्त्र घालायचं, दुर्वा ना, खोच त्याच्या बगलेत उभ्या. आता हा नैवेद्य (येवढं कळत नाही का मला? टेम्पर चा काटा क्षणभर लाप्पकन लाल एरीयाकडे, पुन्हा नॉर्मल) ठेव समोर, आधी मंडळ करायचं, म्हण प्राणायस्वाहा...' असं करता करता ताटामध्ये (याला आज तबक म्हणायचं) असलेल सगळं वाहून, गणपती पार शत्रूच्या गोटात हवेतून उतरून झाडे-फुले गणवेशावर खोचून दबा-धरून बसलेल्या कमांडो सारखा होऊन जवळपास दिसेनासा झाला कि 'आता कसं तेज दिसतंय चेहेऱ्यावर' म्हणत 'चला, आता सुखकर्ता..' असं म्हटलं कि माझा जीव ताम्हणात पडायचा.

आरत्या आणि त्यांची लांबी-रुंदी हा स्वतंत्र विषय आहे. असो. अशा तऱ्हेने पूजा पार पडल्यावर बायको 'याच्याकडून पूजा करून घेतली' या विजयी मुद्रेने आणि आई 'लहानपणा पासूनच करायचा तो' अशा प्रतिसादाने माझ्याकडे वळून एका सुरात 'काय, प्रसन्न वाटलं कि नाही?" असं हमखास विचारतात. त्यावर, 'हो, हो अगदी कृत-कृत्य वाटलं' असं म्हणत कोपऱ्यात जाऊन एव्हाना मजबूत बसलेली सोवळ्याची गाठ सोडायचा प्रयत्न करत हवेतला खवळून टाकणारा ताज्या, गरम मोदकाचा वास नाकात भरून घेत असतो.

तर, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यंदा मात्र अंगात कणकण असल्यामुळे मला या सगळ्यातून सूट मिळाली आहे, त्यामुळे मी देवाचे आभार मानतो आहे, शेवटी ‘कणकण’ मे भगवान हेच खरं. पुढच्या वर्षी मात्र न्यू-जर्सी च्या जावे-प्रमाणे अगदी घरी मूर्ती करून भरपाई करायची आणि १ महिना आधीपासून पूजा सिक्वेन्स पाठ करून स्वतःच भराभर करायचं असं निश्चय केला आहे. बाप्पांचे आशीर्वाद आधीच मागतो. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालय हे पण!!!

मग सगळे देव ताम्हणात ठेवून वॉशिंग, मग कळकट कापडाने पुशिंग, पुन्हा पाटावर पार्किंग आणि फ्रेश फुलांनी ड्रेशिंग. झाली पूजा. त्यातल्या त्यात बाळकृष्ण रावांच्या बाईकचा साईड-stand जरा त्रास द्यायचा, पण एखादे फूल खोचून काम भागायचे. > Lol

मस्त! मला एका आठवले.

आमच्या शेजारच्या काकुंची ती आठवण. त्यांचा भाचा एकदा त्यांच्याकडे आला, तर त्या म्हणाल्या बाळु आजच्या दिवस जरा पूजा कर रे आमच्या देवांची.

झाले बाळोबा वैतागले, म्हणाले. मावशे, आधीच घरी गळ्यात पूजा बांधली होती, तिच्या पासुन सुटका हवी म्हणून २ दिवस इथे आलो, तर माझ्या नशिबी तेच का?

चला रे गण्या, शंकर्‍या ( गणपती, शंकर इत्यादी ) बसा एकदाचे ताम्हणात अंघोळीला.:हाहा:

.

हेही मस्त. सगळेच भारी.
कबड्डी-छाप नमस्कार
बायको 'याच्याकडून पूजा करून घेतली' या विजयी मुद्रेने आणि आई 'लहानपणा पासूनच करायचा तो' अशा प्रतिसादाने Lol

मस्त आहे अगदी. आमच्या घरी पण शेम टु शेम.
<<कबड्डी-छाप नमस्कार,

मग सगळे देव ताम्हणात ठेवून वॉशिंग, मग कळकट कापडाने पुशिंग, पुन्हा पाटावर पार्किंग आणि फ्रेश फुलांनी ड्रेशिंग. झाली पूजा. त्यातल्या त्यात बाळकृष्ण रावांच्या बाईकचा साईड-stand जरा त्रास द्यायचा, पण एखादे फूल खोचून काम भागायचे. >

सहीच. मजा आलि वाचताना.

Pages