बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: ऑक्टोबर, २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 9 October, 2012 - 00:40

नमस्कार मंडळी,

दर चार वर्षानी ज्या महिन्याची आपण आतुरतेने वाट पहातो तो महिना उजाडला आहे. ऑक्टोबर महिना म्हणजे Presidential Debates चा महिना. निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात नेताना हीच डिबेट्स् पुढच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नशीब ठरवतील. १९६० साली खरं तर मी जन्मलो नव्हतो, पण २६ सप्टेंबर १९६० साली रिपब्लिकन पक्षाचे बहुतेक विजयी मानले जाणारे निक्सन आणि मॅसॅच्युसेट्स् मधला नवखा सिनेटर जॉन एफ् केनेडी यांच्या मधल्या जगप्रसिद्ध प्रेसिडेंशिअल डिबेटने इतिहास बदलला. ८८% अमेरिकन जनतेने ते डिबेट आधी ऐकले आणि मग जॉन एफ् केनेडी यांच्यावर त्यावर्षी नोव्हेंबरमधे शि,मोर्तब केले. २०१२ चे पहिले डिबेट ३ ऑक्टोबरला असून माझ्या प्रमाणे तुम्हीही ते उत्सुकतेने ऐकले असेल. आता तुम्ही म्हणाल की बृहन्महाराष्ट्र (बृ. म.) मंडळाचा आणि अमेरिकन राजकारणाचा काय संबंध? पण मित्रांनो, इथेच मला असे नमूद करावंसं वाटतं की, १९६५ साली Lindon Johnson ने पास केलेल्या INS Act of 1965 नंतर अमेरिकेत येण्यासाठी असलेल्या प्रत्येक देशाचा कोटा संपला, आणि भारतीय उपखंडातून बुद्धिजीवी लोक व्यावसायिक अनुभवांवर आणि शिक्षणासाठी अमेरिकेत स्थलांतरित होवू लागले. शिक्षण, संस्कृती, साहित्य, उद्यमशीलता यासर्वात आपल्या मराठीजनांनी नवा इतिहास लिहिला. फक्त राजकारणाच्या प्रमुख धारेमधे मराठी मंडळी (स्वाती दांडेकर यांच्या सारखे काही अपवाद वगळता) जाणीवपूर्वक मागे राहिली. अल्प संख्यांकातून चार वर्षापूर्वी राष्ट्राध्यक्ष निवडून आल्यावर रुजलेला euphoria/उत्साह आपल्या महाराष्ट्रीयनांपर्यत/भारतीयांपर्यंत पोहोचावा हीच माझी एक मनापासूनची इच्छा आहे.

सप्टेंबरचा महिना उत्तर अमेरिकेत अत्यंत धामधुमीचा गेला. लेबर डे वीकेंड्ला टोरांटो मराठी भाषिक मंडळाने आयोजित केलेल्या संमेलनासाठी मी गेलो होतो. महाराष्ट्रातल्या साहित्य महामंडळाने आयत्या वेळेस पाठिंबा काढल्याने "विश्व साहित्य संमेलन" हे नाव न वापरता "साहित्य आणि संस्कृती संमेलन" या नावाने ते संमेलन पार पडलं. कोण चूक, कोण बरोबर याचा उहापोह न करता, बृ. म. मंडळाचे एक सदस्य मंडळ हे अधिवेशन करतेय आणी तिथल्या स्वयंसेवकांना पाठिंबा देणं हे माझे आद्य कर्तव्य आहे ह्याच भावनेने मी तिथे गेलो. टोरांटोवासियांनी तीन दिवस उत्तम कार्यक्रमांनी आणि संयोजनाने सुमारे ३५० रसिकांची मने जिंकली. सुखाचा मार्ग पोटातून जातो’ असे माझे मत आहे त्यामुळे उत्तर अमेरिकेतल्या कुठल्याही कार्यक्रमात भोजनाची व्यवस्था उत्तम असली की रसिकांना तो कार्यक्रम आवडतो. बघा, पटतंय का, माझे हे म्हणणे...

१९ तारखेला गणरायाचे वाजत-गाजत आगमन झालं. आमच्या डेलावेअरच्या मंदिराच्या पूजेत आम्ही उभयतांनी भाग घेतला. याच गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर बृ. म. मंडळ आणि झी मराठी यांनी एक करार केला. अमेरिकेतल्या १० मंडळांच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आम्ही प्रायोजक आणि सभासदांसाठी छोट्या गणेशमूर्ती भेट दिल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे उत्तर अमेरिकेतल्या गुणी कलाकारांना, झी मराठीवर आपले कार्यक्रम दाखवायचे व्यासपीठ/forum उपलब्ध करून दिले. आपल्या मंडळातले दिवाळी, गणपती तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आता झी मराठीवर दाखवता येतील.

२२ तारखेला क्लिव्हलंड मंडळाला भेट दिली. नुकतेच नूतनीकरण केलेल्या इंडियन कम्युनिटी सेंटरमधे गणेशपूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सोबत रुचकर जेवणही होतेच. हवामान खराब असूनही मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. २३ तारखेला पिट्स्बर्ग मंडळाच्या गणेशोत्सवात सहभागी झालो. मिरवणूकीत लेझीम खेळताना लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. पिट्स्बर्गचे मंडळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक देवळात कार्यक्रम करते आणि जमलेल्या सर्व भाविकांना त्या सोहोळ्यात, तसेच भोजन-प्रसादासाठी सामावून घेते ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
२६ तारखेला न्यू जर्सीच्या मराठी विश्वच्या गणेशोत्सवासाठी मिळालेल्या अगत्याच्या निमंत्रणाला मान देऊन मी तेथे गेलो. तिथे १३०० सभासद उत्साहाने आरती, प्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रमांस उपस्थित होते.
क्लिव्हलंडचे हिरा राणे, पिट्स्बर्गचे शंतनु भिडे, न्यू जर्सीचे विवेक पाटील यांचे आणि त्यांच्या कार्यकारिणीचे मनःपूर्वक आभार. विविध मंडळाच्या सभासदांबरोबर गणेशोत्सवाच्या दरम्यान, जो समन्वय साधता आला त्यातच या मंडळ-भेटी सार्थकी लागतात. २ ऑक्टोबरला गांधी जयंती झाली. समन्वयावरून त्यांच्या स्मृतीला स्मरून त्यांच्या ओळी आठवतात...

‘Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.’...

धन्यवाद!

आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com फोन: 302-559-1367

Group content visibility: 
Public - accessible to all site users