स्टोरी सलील ची ...

Submitted by Mandar Katre on 8 October, 2012 - 13:20

स्टोरी सलील ची ...

आज सकाळीच सलीलचा फोन आला ,चांगला तासभर बोलला .मीही भारावलो ,चक्क अमेरिकेतून फोन! बोलणे झाल्यावर फोन खाली ठेवला आणि माझं मन सलीलच्या भूतकाळात निघून गेलं...

३० वर्षांपूर्वीची गोष्ट .सलील ,माझ्या भावाचा एक मित्र .याचे वडील एका कारखान्यात मॅनेजर. पण स्वभाव लहरी. घरी बायको आणि एक मुलगा.पण त्या काळात सुमारे ३० हजार रुपये महिना पगार असलेली नोकरी सोडून माथेरानला हॉटेल काढायचे खूळ डोक्यात शिरले. नोकरी सोडून हॉटेल काढलेही ,पण पार्टनरने फसवल्यामुळे यांच्या हाती राहिले धुपाटणे! त्यात यांना रमीचा नाद.एकदा रमी खेळायला बसले म्हणजे ३-३ दिवस हलायचे नाहीत.मग घरच्यांना शोधून आणावे लागायचे क्लबमधून ,आणि तोपर्यंत पगाराची रक्कम संपलेली असायची रमीत हरून!

मग हॉटेलमध्ये फसले म्हणून एक कापड-गिरणी विकत घेतली.तीही दुसर्या मित्राबरोबर पार्टनरशिपमध्ये! तिथे पुन्हा तोच प्रकार. मग गिरणीसद्धा लिलावात निघाली.अशा सगळ्या परिस्थितीत सलीलच्या आयुष्याची मात्र लहानपणापासून फरफट झाली. वयाच्या ८व्या वर्षी आई जग सोडून गेली.मग बाबांनी दुसरे लग्न केले.आणि सलीलची रवानगी पाचगणीच्या बोर्डिंग स्कूल मध्ये .अशाही परिस्थितीत सलील अभ्यासात अतिशय हुशार होता . काही नातेवाईकानी थोडीफार मदत केली,अतिशय मन लावून त्याने बारावी पूर्ण केली. कॉलेज केले आणि एका चांगल्या कंपनीत जॉईन झाला.

पण इथेही त्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नाहीत.नेमक्या पगाराच्या दिवशी बाबा यायचे ,आणि मला कर्जाचे हफ्ते फेडायचे आहेत असे सांगत अर्धा-अधिक पगार घेवून जायचे! शेवटी तो कंटाळला आणि नोकरीचा राजीनामा देवून दूर कुठेतरी अज्ञात-वासात निघून गेला...

या गोष्टीला १५ वर्षे उलटली...मध्ये त्याचा काहीच संपर्क नव्हता. आणि २ वर्षापूर्वी मी फेसबुक उघडल्यावर पाहतो,तर एक नवीन फ्रेंड रिक्वेस्ट आलेली.सलील देशमुख! मी चाट पडलो, नाव ओळखीचं होतं,पण नक्की कोण ते लक्षात येईना ...मग जरा मेंदूला ताण दिल्यावर आठवलं,अरे हा तर आपला सलील! मी चटकन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि चॅटिंग बॉक्स उघडला .तो ऑनलाइन होताच! कुठे आहेस? माझा पहिला प्रश्न !पलीकडून उत्तर –अमेरिका !

मी आश्चर्याने थक्क झालो. परिस्थितीने इतकी कडक परिक्षा घेतलेला सलील चक्क अमेरिकेत? पण खूप बरेही वाटले! मग मी माझा फोन नंबर दिला . अन त्याने फोन केला. खूप काही बोलला . भरभरून ...तो,बाबा,आई,आणि अमेरिकेबद्दलही .

नोकरी सोडल्यावर बाबांच्या स्वभावाला वैतागून त्याने त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले .इतर कुणालाही काहीही न सांगता तो गोव्याला गेला. तिथे चांगले सहा महिने होता ,छोटीशी नोकरी करत .त्यातून ५० हजार साठवले,आणि एका जुन्या मित्राने २ लाख दिले .पासपोर्ट होताच. शेवटी क्युबाला जाणार बोट पकडून तो क्युबाला पोचला .तिथून मग एजंट्स ना पैसे चारून अमेरिकेत अनधिकृत प्रवेश !

त्यानंतर मग कुठे शेतमळ्यात मजूर म्हणून, तर कधी गॅरेज मध्ये /धाब्यावर ...मिळेल आणि पडेल ते काम करत दिवस काढले. शेवटी एका दूरच्या मित्राची भेट झाली ,आणि त्याच्या ओळखीने एका मॉलमध्ये काम मिळाले...अशी गेली १०-१२ वर्षे त्याने अमेरिकेत काढली .महिना उत्पन्न १५००-२००० डॉलर्स !जगण्यापुरते काम !

मी विचारले ,अरे लग्नाचे काय? तिकडे मिळाली नाही का कोणी? तर म्हणाला ,अरे कसले लग्न आणि कसले काय? इथे जगण्याचे वांदे झालेत ,अरे रोज संध्याकाळी भूतकाळ खायला उठतो रे ...मग मी आणि बाटली .....बस....दुसरे आहे कोण आपल्याला? मी निरुत्तर!

बरं पुढे काय ठरवले आहेस? इकडे परत येणार का? तर म्हणाला होय,यायची इच्छा खूप आहे . समुद्रकिनारी एखादे छोटेसे घर असावे अशी खूप इच्छा आहे रे! आत्ता वय आहे ४५ ,आणखी ४-५ वर्षे काही पैसा जमतो का ते पाहतो ,आणि मग येणार परत !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

फोन ठेवला ,आणि माझं मन सुन्न झालं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा परिच्छेद नसला तर लि़खाण अधिक भावले असते...

असो, असे खूप लोक आहेत अमेरिकेमधे, भारतामधून त्यामधे जरा कमी, आणि महाराष्ट्रामधून कमीच कमी.

छान.

सलिल सारखे बरिच मन्डली आहेत बाहेरगावी,

अमेरिकेत पन्जाबि अन पटेल लोक भरपुर आहेत अनधिक्रुत निवासी