पर्पज ऑफ लाईफ.

Submitted by मुंगेरीलाल on 8 October, 2012 - 11:25

जगण्याचा उद्देश काय? what is the purpose of life? असा प्रश्न एका पोरानं आमच्या कंपनीच्या आतल्या ब्लॉग-साईट वर टाकला. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचणं उद्बोधक होतं.

अगदी ज्ञान मिळवणं, दुसऱ्यांची सेवा करणं, मन:शांती मिळवणं पासून ते भरपूर कमवून लाईफ एन्जॉय करणं, हॅपीनेस मिळवणं पर्यंत आपापली मते व्यक्त केली होती. सगळं पटत होतं पण तरीही काहीतरी सुटत होतं नक्की. या प्रश्नाचं उत्तर सापडणं दूरच, पण असा प्रश्नच कुणी विचारला की क्षणभर एकदम रस्त्यात स्पीड-ब्रेकर आल्यासारखं वाटतं आणि आपली गाडीही नकळत मनातल्या मनात डेड-स्लो होते.

आता हेच पहा ना, happines - याला मराठीत तंतोतंत जुळणारा समर्पक शब्द नाहीये म्हणे - (बरोबर आहे मराठी माणसे फार लवकर रुसून बसतात स्वतावर, दुसऱ्यावर नाहीतर जनरल जग आहेच फिरत, त्याच्याच उरावर बसायचं आणि त्याच्यावरच रुसायचं),

sorry जरा बाजूला गेलो यादीपासून. काय आहे, 'आमच्या पुण्यात' आता बरेच उड्डाणपूल झालेत, पण सगळ्यात लाडका तो पौड फाट्याचा, जो सारखा चर्चेत असतो या ना त्या कारणाने, म्हणजे पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते (नव्हे आता कोन्डीलाच वाहतूक म्हणतात इथे, आणि पोलिसाला कोंडीबा) पण सगळ्यात जास्त चर्चा आणि पर्यायी मार्ग वगैरे चर्चा-चर्वण नळ-स्टोप ते पौड फाटा याचीच असते, शिवाय अगदी पिम्परीतला पत्ता विचारला तरी, 'तुम्हाला पौड फाटा माहितीये?' हो. 'मग त्याच्या विरुद्ध दिशेला जायचं' असाच सांगितला जातो.

त्यामुळे कुठल्याही म्याटरवर बोलताना किंवा लिहिताना फाटे फुटणं किंवा फोडणं (आणि पुढे फाट्यावर मारणं) हे स्वाभाविक आहे. तर मग, चला परत कर्वे रोडला वळून. अंहं, तुमच्या ईंडी-केटर ला विचारीत नाही इथे कुणी, इथे आधी गाडी घालायची आणि मग आपल्याला काही माहीतच नाही, कुणी दिसलंच नाही, खूप घाईत/महत्वाच्या कामात आहे, असा अभिनय करत त्यातूनही कुणी ओरडला तर 'ओ चला, सरका' असं म्हणत टर्न मारायचा आणि मग विजयी मुद्रेने गाडीतल्या माणसांकडे 'सुशिक्षित असूनही कशी काढली' असा कटाक्ष टाकायचा. (हं तर मी जगण्याच्या उद्देश-यादी बद्दल सांगत होतो.)

बघा गफलत झाली. जे मुख्य लिहायचं आणि पुढे चालू ठेवायचं ते मी कंसात लिहिलं. आजकाल मी कंसात फारच वारंवार लिहायला लागलोय असा मला संशय यायला लागलाय. याचा वाचकांना पण त्रास होत असणार नक्कीच (कारण मनातल्या मनात का होईना पण कंसातल्या वाक्याची पट्टी बदलून ते स्वतःशी म्हणावे लागते (असे मराठीच्या वर्गात शिकवले होते किनई) आणि शिवाय मग कंस संपल्यावर पुन्हा कन्सापुर्वीचे शब्द वाचून मधल्या शब्दांची चीप्पी डोक्यावर पेलत पलीकडे जंप मारावी लागते) त्यामुळे सारखे कंस (आणि त्यात फाटे) यांचा वैताग यायला लागतो.

पण काय करणार, आमचा पौड रोड असाच आहे, ५०-५० फुटांवर कंस असतात त्यात निवांत कामे चाललेली असतात. आता हे आमच्या अंग-'वळणी' आणि अंग-खड्डी अथवा अंग-हड्डी पडलं आहे. मला तर एकदा वाटून गेलं कि सगळं लिखाणच कंसात करावं, कटकटच नको सारखं की-बोर्डवर शिफ्ट-९ आणि शिफ्ट-० असं वारंवार 'शिफ्ट-मध्ये पाळ्या करायची. म्हणजे काय कि जनता आणि महापालिका यांनी एकत्र बसून ठरवून टाकायचं कि रस्ता प्रकारच नको ठेवूया, सगळीकडे नुसतं खोदू आणि काहीतरी बांधू. कित्ती छान. रोजगारच रोजगार. गाड्या बंद.

नाहीतरी सारखं किती दुसऱ्याचं बघून नव्या गाड्या घ्याव्या लागतात. आपण हुंडाई घेतली कि बाजूचा होण्डी ने जळवतो, आपण ती घेतली कि समोरून एक सुपर-शिष्ट पण जबर-चिकणी बाला नाक उपर्दिष्ट करत (कारण रस्ता दिसत नाही ना) BMW चालवत जाते. मग तर आपला घोर तेजोभंग. आधीच महागडी गाडी, त्यात बाई, त्यात सुंदर, त्यात सरळ समोर बघत गेली. जीवघेणी सामाजिक विषमता किंवा कलियुग, कलियुग म्हणतात ते हेच.

मग आपण घरी येऊन Times च्या मधल्या पानावर झळकणाऱ्या आवडक्का ('ऑडी चं लाडकं नाव) कडे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' सारखं पहात राहायचं आणि नंतर बेसिन वरच्या आरशात स्वतः कडे नजर गेल्यावर ओशाळून तरीही 'मुंगेरी'पण शिल्लक असेल तर संध्याकाळी क्रॉस-वर्ड मध्ये Monk who sold Ferrai चाळत शेवटच्या पानावर 'खरच विकतोय का बेटा, आपल्याला सेकंड-hand घेता येईल का' असा भाबडा विचार करत बसतो. तेव्हढ्यात बायको 'आधीच घरी सक्सेस, प्रोग्रेस, विनिंग, गेट-रिच वगैरेच्या विषयाची पुस्तके पडून आहेत' याची जाणीव करून देत नजरेनेच 'ठेव पुन्हा रकान्यात' अशी खूण करते. मघाशीच तिने 'माझं लंडन' (आणि अजून ५-७ शहरे - हो, पुस्तक छान असल तरी, तिथला वडिलोपार्जित सात-बारा नसतानाही कस्सं काय बाबा अस्सं सरळ ‘माझं’ म्हणतात कोडंच आहे, कल्पना चावला ला बरी सुचली नाही कल्पना, जीव धोक्यात घालण्यापेक्षा खालीच बसून, माझा चंद्र, माझा मंगळ असं बगळ्या-बगळ्या कवडी दे छाप म्हणत राहायचं), तसेच 'मधल्या-वेळचे खाणे' ते 'करीना कसे (पहिल्यासारखे) भरीना (पोटात)' पासून Modern home decor (या पुस्तकाच्या किमती पेक्षा प्रत्यक्ष प्लायवूड, फेविकॉल आणि इतर डेकोर सामान स्वस्त असतं) इत्यादी पुस्तके हाताळून मोठ्ठ्या निश्वासाबरोबर पुन्हा परत ठेवलेली असतात त्यामुळे मला अशी खूण करण्याचा तिला नैतिक आणि व्यावहारिक अधिकार असतो. त्यामुळे आपणही तिचे अनुकरण करून बाहेर पडतो. असो.

परवाच कार-पूल मधून येताना मी 'ती पहा आवडक्का गेली' असे नुसते म्हंटले तोच गाडीतला दुसरा, 'परवा मी याच रोड वर जग्वार पहिली' असं उगीचच (उग्गीच बरंका, कई गरज नव्हती) बोलला. काही जण ना, चिक्की विकायची पात्रता नाही तरी दुसऱ्याला विक्की-पिडत (विकिपीडियाचे एजंट) असतात. पु.लं.म्हणायचे 'आता पूर्वीसारखं पुणं राहिलं नाही असं म्हणायला वयाची अट नाही' तसं आता गाडीची ऐट मारायला ती विकत घ्यायची अट नाही, नुसती 'तुमच्या पेक्षा भारी गाडी माझ्या गल्लीत पाहिली' असे म्हंटले तरी समोरच्याचे क्षार-आणि-पाणी करायला पुरते. त्यात एक परदेशवारी करून आलात (भलेही कंपनीच्या पैशात आणि एका studio खुराड्यात चौघे राहून) तर विचारायलाच नको. 'तिथे ना अरे, मर्सिडीसा, बिय्यंडबल्युवा म्हणजे तर कच्चरा, अगदी भांडी घासणाऱ्या बायका वापरतात. आहेस कुठे?' असा डायलॉग परतल्यावर टाक असा व्हिसावर stamp च मारलेला असतो.

आताशा हा डायलॉग जरा कमी झालाय कारण घरटी एक-दोन जण साताऱ्याचा पोरगा सैन्यात जातो तसा 'बाहेर'चं पाणी पिऊन आलेलाच असतो. आल्यावर ८ दिवस बिसलेरी आणि sandwich वर राहून इथलं प्रदूषण आणि चार डॉक्टर झाले की व्रत संपते. (हे डॉक्टर पुण्याचे असले तर 'मीपण मागच्याच आठवड्यात NY ला होतो' असे सांगून तुमची लवकर उतरवतात) .

मग तिथून सरळ, निदान महागडी गाडी नसली तरी, गेला-बाजार बॉडी तरी बनवू असं म्हणत जिमची पायरी चढायची, तिथल्या चतुर मुलीला, 'नो, नो, द ओन्ली पर्पज इज कीपिंग फिट' असं सांगत मनातल्या मनात 'आता इतकं लोखंड उचलीन की सहा महिन्यात अंगावर सहा गाठोडी (six pack म्हणे) उगवलीच पाहिजेत' अशी मुंगेरी-कल्पना करायची. सावित्रीच्या लेकींचही तसंच. भेटल्या की सलामीलाच 'व्वा, बारीक झालीस' असं चपळाईने अगोदर म्हणायचं, म्हणजे समोरची हमखास 'डिफेन्स' वर जाते. मग ती साईना इतकी चपळ असेल तर सावरून, 'छे ग काहीतरीच काय? तूच फार वाळलीयेस ' असं वरकरणी २० टक्के विनय, २० टक्के ख़ुशी आणि ६० टक्के संशयमिश्रित नजरेनी (पिकावर कसं नत्र, स्फुरद आणि एन्डोसल्फान मिसळून मारतात) तिला टोलवायचं. मग तुल्यबळ असल्याची खात्री पटल्यावर दोघी 'कोर्ट' सोडून इतर विषयाकडे वळतात. असो.

कधी कधी असं वाटतं, की आपलं बरचसं आयुष्य जमेल तितकं दुसऱ्यापेक्षा चांगलं जगण्याचा प्रयत्न करण्यात जातं. मग त्यात शिक्षण/करियर आलं, कला आली, साहित्य आलं, गाड्या आल्या, विकेंड ट्रिप्स आल्या, वाचन आलं, गाणं आलं, contacts आले. नसेल तर तसं किमान दाखवता तरी आलं पाहिजे, तेही नाही जमलं तर समोरच्याचं जे काही चाललंय ते फार काही ग्रेट नाही असं सतत सिद्ध करता आलं पाहिजे. तेही नाही जमलं तर सरळ कोशात जायचं. आवर्जून दखलच घ्यायची नाही कुणाची आणि मोकळ्या मनानी काही व्यक्तच करायचं नाही, जे काही करायचं ते उपभोग, तुलना किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून करायचं.

एकदा अशी सवय जडली की कसला पर्पज सापडतोय जगण्याचा? सालं लिहितोय तसंच आपण सारखं कंसातच जगतोय का? मनातल्या भावनाही कंसात, प्रेम ही कंसात आणि दुष्मनीही कंसात. बाहेर सभ्य, सुशिक्षित, सोयीस्कर वागणं. तडफड सगळी कंसात. वैताग आहे नाही? एकदा चालता चालता एकदम डोक्यात आलं, जगण्याचा सोल पर्पज मरणे तर नसावा? किती सोपा. खरंच की. पण हे मरणं म्हणजे मृत्यू नव्हे. तो तर अटळच आहे, पण त्याच्या आणि जन्माच्या मध्ये मरता येतं का? हे म्हणजे कशासाठी तरी किंवा कुणासाठी तरी मरणं to die for something or someone कदाचित हाच पर्पज असावा जगण्याचा. आणि असं अनेकदा तसंच एकाच वेळी अनेक गोष्टींसाठी ही मरता येतं. मग तो देश असेल, समाज असेल, कला, साहित्य, पर्यावरण काहीही असेल, ते जर मला सापडलं तर जगण्याचं सार्थक झालं, त्या गोष्टी माझ्यासाठी वेगळ्या असतील, तुमच्यासाठी वेगळ्या असतील आणि जगा साठी वेगळ्या असतील. असू दे ना. जोपर्यंत आपण एकमेकांना त्यांच्या-त्यांच्या परीने मरू देतो, तोपर्यंत त्याच्यावर मत व्यक्त करायची किंवा त्याच्यासारखं बनायची गरजच नाही. मग कुणी पुढेही नाही आणि कुणी मागेही. आणि एकदा 'मी' ला कुटून जे करायचं त्यात फुंकून टाकलं की किती जगलो याला काय महत्व? मग खरी चिंता मला काही दुर्धर रोग होईल का, माझा अपघात होईल का, मला कुणी मारेल का, मी सगळा पैसा संपून उपाशी मरेन का अशा गोष्टींची करण्यापेक्षा मी माझ्या मर्जीने कशासाठी तरी मरत का नाही, नुसताच का मध्यमवर्गीय रहाट-गाडग्यात जगवत बसलोय स्वतःला याची जाणीव होते. म्हणूनच असेल कदाचित, पूर्वीच्या आज्या लाडाने हाक मारायच्या, 'मेल्या, उठ सकाळ झालीये!'  तिनं कधी चुकूनही 'जगल्या' म्हटल्याचं आठवत नाही मला.

थोडक्यात, रोज कोणता नवीन Android, iPad आलाय आणि अजून मी काय उपभोगू या विचारसरणीचा क्षणभर पुनर्विचार करून, नव्याने आयुष्याकडे निर्भयपणे पाहता आलं तर खरंच विसर्जनाचा अर्थ समजला असं म्हणेन. जरा बोर केलं का शेवटी? सॉरी, काय आहे, वर चढून मनाचा माळा आवरायला काढला की नुसती छान छान जुनी हरवलेली खेळणीच सापडतात असं नाही, जरा साचलेल्या धुळीचा लोट उठून शिंका पण येतात. चालायचंच, फार जपून उपयोग नाही स्वतःला. म्हणा, काsssही होत नाही मला. एवढयानी काही मी मरत नाही Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहितोय तसंच आपण सारखं कंसातच जगतोय का?
जगण्याचा सोल पर्पज मरणे तर नसावा? >>>>> सुपर्ब!!!!! Happy

'आता इतकं लोखंड उचलीन की सहा महिन्यात अंगावर सहा गाठोडी (six pack म्हणे) उगवलीच पाहिजेत'
'आधीच घरी सक्सेस, प्रोग्रेस, विनिंग, गेट-रिच वगैरेच्या विषयाची पुस्तके पडून आहेत'
>>>> Biggrin मस्तच लिहिताय. सही पंचेस!

जरा व्यवस्थित परिच्छेद पाडलेत तर वाचायला सोपं जाईल.

मस्त पंचेस!!
लिहितोय तसंच आपण सारखं कंसातच जगतोय का?
आपलं बरचसं आयुष्य जमेल तितकं दुसऱ्यापेक्षा चांगलं जगण्याचा प्रयत्न करण्यात जातं >> +१

......जमेल तितकं दुसऱ्यापेक्षा चांगलं जगण्याचा प्रयत्न करण्यात जातं >> +१
अगदी पटलं.

एकदम खुसखुशीत झालाय लेख.

समोरच्याचे क्षार-आणि-पाणी करायला पुरते >>
चिक्की विकायची पात्रता नाही तरी दुसऱ्याला विक्की-पिडत >>
अंगावर सहा गाठोडी>> जबरी पंचेस!

आणि ते शेवटचे बोर करणे खूप आवडले.

(पिकावर कसं नत्र, स्फुरद आणि एन्डोसल्फान मिसळून मारतात)>>> झक्कास Happy
बर्याच दिवसात मस्तपैकी कायतरी वाचायला मिळालं. लिहते रहा... Happy

मस्तच! मजा आली वाचायला!
आरामात, रमतगमत फेरफटका मारल्यासारखी शैली आहे!

कधी कधी असं वाटतं, की आपलं बरचसं आयुष्य जमेल तितकं दुसऱ्यापेक्षा चांगलं जगण्याचा प्रयत्न करण्यात जातं.>>+१००
पुलेशु...

आधीच महागडी गाडी, त्यात बाई, त्यात सुंदर, त्यात सरळ समोर बघत गेली. जीवघेणी सामाजिक विषमता किंवा कलियुग, कलियुग म्हणतात ते हेच. >>>>>>>>>>> Rofl
मग तुल्यबळ असल्याची खात्री पटल्यावर दोघी 'कोर्ट' सोडून इतर विषयाकडे वळतात. असो.>>>>>> १०० टक्के खरं Happy
जोपर्यंत आपण एकमेकांना त्यांच्या-त्यांच्या परीने मरू देतो, तोपर्यंत त्याच्यावर मत व्यक्त करायची किंवा त्याच्यासारखं बनायची गरजच नाही. मग कुणी पुढेही नाही आणि कुणी मागेही. आणि एकदा 'मी' ला कुटून जे करायचं त्यात फुंकून टाकलं की किती जगलो याला काय महत्व? >>>>>>>>>>>>>अगदी खर...मस्त Happy
खुप आवडल Happy

पु.लं.म्हणायचे 'आता पूर्वीसारखं पुणं राहिलं नाही असं म्हणायला वयाची अट नाही' तसं आता गाडीची ऐट मारायला ती विकत घ्यायची अट नाही, नुसती 'तुमच्या पेक्षा भारी गाडी माझ्या गल्लीत पाहिली' असे म्हंटले तरी समोरच्याचे क्षार-आणि-पाणी करायला पुरते.>>

मस्त लिहिलंय . असा अनुभव खरंच आला पुण्यात यावेळेस. जो बघेल तो सांगतोय कि मी हि गाडी पाहिली आणि मी ती पाहिली. ती नुसती पाहण्यात तुमचा काय पुरुषार्थ असं विचारावं असं वाटायचं मला.म्हणजे नवीन गाडी दिसली यात अप्रूप वगेरे भावना मी समजू शकते पण त्या सांगण्यातला आविर्भाव खटकला बुवा मला.

कधी कधी असं वाटतं, की आपलं बरचसं आयुष्य जमेल तितकं दुसऱ्यापेक्षा चांगलं जगण्याचा प्रयत्न करण्यात जातं.>>+१००

नसेल तर तसं किमान दाखवता तरी आलं पाहिजे, तेही नाही जमलं तर समोरच्याचं जे काही चाललंय ते फार काही ग्रेट नाही असं सतत सिद्ध करता आलं पाहिजे >>> सही

खूप छान लेख. एकदम मनातलं लिहिलंय ....

कधी कधी असं वाटतं, की आपलं बरचसं आयुष्य जमेल तितकं दुसऱ्यापेक्षा चांगलं जगण्याचा प्रयत्न करण्यात जातं. मग त्यात शिक्षण/करियर आलं, कला आली, साहित्य आलं, गाड्या आल्या, विकेंड ट्रिप्स आल्या, वाचन आलं, गाणं आलं, contacts आले. नसेल तर तसं किमान दाखवता तरी आलं पाहिजे, तेही नाही जमलं तर समोरच्याचं जे काही चाललंय ते फार काही ग्रेट नाही असं सतत सिद्ध करता आलं पाहिजे. तेही नाही जमलं तर सरळ कोशात जायचं. आवर्जून दखलच घ्यायची नाही कुणाची आणि मोकळ्या मनानी काही व्यक्तच करायचं नाही, जे काही करायचं ते उपभोग, तुलना किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून करायचं. >>>>> +१००

मस्त लिहिलंय.

वर चढून मनाचा माळा आवरायला काढला की नुसती छान छान जुनी हरवलेली खेळणीच सापडतात असं नाही, जरा साचलेल्या धुळीचा लोट उठून शिंका पण येतात>> अगदी अगदी.

छान observations आणि presentation. कला आहे तुमच्याजवळ.

Pages