काळ वाटतोच मंद!

Submitted by सतीश देवपूरकर on 7 October, 2012 - 04:39

श्री.वैभव वसंत कुलकर्णी यांच्या प्रेरक व आग्रहपूर्वक अनुमतीनुसार आम्ही ही रचना येथे देत आहोत.
गझल

काळ वाटतोच मंद!
अन् हवा, तशीच कुंद!!

आजही तुझ्या नशेत.....
विश्व सर्व धुंदफुंद!

त्या तुझ्या खळीमुळेच;
मी तुझ्यात सीलबंद!

ते तुझे मदीर नेत्र.....
मी निशीदिनीच धुंद!

राग तो कसा लपेल?
चेहराच लालबुंद!

शायरी तिनीत्रिकाळ!
हा न एक फक्त छंद!!

त्यामुळेच शोभिवंत......
मी, तुझाच बाजुबंद!

शेर बोलतो परंतु....
पाहिजे उरात कंद!

सूर, ताल, लय समस्त...
शायरीच गोटिबंद!

पाहिलेस एक अंग!
शायरीस कैक स्कंद!!

शब्द, शब्द नालमेख!
गझलकार नालबंद!!

काव्यताटव्यातलाच.....
एक मी मधूमिलिंद!

शायरी तिच्यामुळेच!
तीच एक पायबंद!!

गझल एकमेव नाद
कोणता न छंदफंद!

गुणगुणायला सुरेल.....
हा ‘सतीश’ तालबंद!

शायरी ‘सतीश’चीच....
दरवळेल मंद मंद!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळेच शोभिवंत......
मी, तुझाच बाजुबंद!

काव्यताटव्यातलाच.....
एक मी मधूमिलिंद!

हे दोन शेर फारच आवडले !!

मक्ते दोन आहेत .. ही बाब आवडली प्रथमच तखल्लुस घेतल्याचे पाहिले ..हीही बाब आवडली ; दुसरा मक्ता आवडला , पहिला तितका नाही आवडला क्षमस्व !!

सीलबन्द चा शेर समजला नाही भावलाही नाही

'नालबन्द' मधे नालमेख हा शब्द आवडला नवा आहे माझ्यासाठी ,..........हा शेर माबोकर नाहिदभाई नालबन्दयाना अर्पण करावा असे मला वाटून गेले !! Happy

धुन्दफुन्द =??

मतला>> नाही बुवा आवडला .........क्षमस्व

एकन्दर गझल "एक चान्गला प्रयत्न!! " या प्रकारात सामविष्ट करता येईल अशी झाली आहे !!(वै म.गै न!!)

माझा नामोल्लेख केलात त्याबद्दल ऋणी !!(अशानेच माझ्यासारखी ना-लायक माणसे फेमस होतात हळूहळू Wink !!)

धन्यवाद
पुनश्च धन्यवाद

गझल एकन्दर आवडली आहे असे म्हणता येईल वाईट नक्कीच नाही आहे ही.........

वाईट वाटून /मनाला लावून अजिबात घेवू नये ही विनन्ती !!

धन्यवाद
पुनश्च धन्यवाद

आपला नम्र
वैवकु

वैभवा!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

‘कुंद’ या शब्दाचा अर्थ तू काय घेतलास?

त्या तुझ्या खळीमुळेच;
मी तुझ्यात सीलबंद!

गद्य अर्थ.........
तुझ्या त्या (गालावरील गोड) खळीमुळे आम्ही कायमचे तुझ्यात बंदीवान झालो. कायमचे तुझ्यात, तुझ्या प्रेमात, तुझ्या सौंदर्यात, तुझ्या त्या मोहक खळीत गुंतून पडलो. आता यापुढे आम्ही दुस-या कुणाचे होणे शक्य नाही, फक्त आणि फक्त तुझेच आहोत. जणू काही आम्हास तू तुझ्या खळीने सीलबंद केले.

सीलबंद पत्र करतात. म्हणजे पत्र बंद करतात, त्यावर लाखेचे सील लावतात व त्यावर आपली मोहर उमटवतात. इथे आम्हास तू तुझ्यात नुसतेच बंद नाही केलेस तर तुझी मोहर उमटवून जणू सीलबंद केलेस. आमचे हे भाग्यच आहे की, तुझी मोहर आमच्यावर उमटावी व आम्ही तुझ्यात कायमचे सीलबंद व्हावे!

तालबंद म्हणजे तालबद्ध/तालात/तालानुसार.

नालमेख व नालबंदचे तुला कोणते अर्थ समजले?
शब्दांना नालमेख व गझलकाराला नालबंद का म्हटले आहे?
काय म्हणायचे आहे या शेरात?

धुंदफुंद.....म्हणजे सतत कसल्यातरी धुंदीत, तारेत असणे.
मतल्याचा तुला बोध झालेला अर्थ कोणता ?
प्रयत्न चांगला आहे, वाईट नाही असे वाटल्याबद्दल धन्यवाद!

लायक/नालायक कुणाचेच फेमस होणे हे क्षणीक असते. मी तरी त्या गोष्टीला फारसे मोजत नाही असो.

आपल्या प्रतिसादातील संभाषणानुसार, तुझा नामनिर्देश केला इतकेच!

वाईट वाटून घेणे/न घेणे, मनाला लावून घेणे/न घेणे बद्दल म्हणशील तर मला माझे काही शेर नमूद करावेसे वाटतात..........

हा सुखाचा कैफ माझ्या काय कामाचा?
कैद मी व्हावे असा हा पिंजरा नाही!
....................................................................

मला अरे घ्यायची न शोभा करून माझी;
तुझा खुलासा भले जरी शोभिवंत आहे!

..................................................................
वेगळा ठेका, निराळा ताल ,माझा!
मी मृदंगाची चुकीची थाप आहे!
.................................................................................................

अनुभवाने बोललेला
शब्दही सिद्धांत होतो!

................................................................................................
थकतील हात खणताना, उरतील हिरे अर्थांचे!
या नव्हेत गझला माझ्या, या चैतन्याच्या खाणी!!

.............................................................................................
विकायला मी बसलो सोने, कुणी न आले;
विकत घ्यायला माती नुसती झुंबड होती!

................................................................................................
हसलो न मी सुखांनी, रडलो न वेदनांनी;
इतकी मिळू दिली ना मजला उसंत कोणी!

..........................................................................................................
आजही टिकवून आहे मी मन:शांती;
एवढे कोणीच मजला लाटले नव्हते!

.............................................................................................
...................प्रा.सतीश देवपूरकर

श्री.वैभव वसंत कुलकर्णी यांच्या प्रेरक व आग्रहपूर्वक अनुमतीनुसार आम्ही ही रचना येथे देत आहोत.>>>>>

वैवकु - तुम्हाला कधी ही माफ करणार नाही.