माय तुझ्या लेकरांच बघवत नाही जिणं

Submitted by -शाम on 5 October, 2012 - 00:52

माय तुझ्या लेकरांच
बघवत नाही जिणं
सगळ्यांचच जगणं... काबाडाचं

कबूल! की विज्ञानानं
सूर्य तुझा आटवला
ताप त्याचा साठवला... शक्तीसाठी

धूर-धूर केला सारा
बाटविला तुझा वारा
सोडल्या ना चंद्र, तारा... विज्ञानाने

कबूल! तुझ्या भुईत
खोल भोकं पाण्यासाठी
यंत्र फिरे ग्रहापाठी... लोखडांचे

वीज तुझी आकळून
उजाळीले घर-घर
जागा नाही बोटभर... रिती तुझी

दिसती जरी घाव सारे
माये असे तुझ्या उरी
दिस हे बी कवातरी... जातील ना?

यंदातरी माये नुस्तं
दूरून नकोस बघू
सांग तरी कसं जगू ... तुझ्याविना

येड्या लेकरांचा असा
रागराग नको करू
बघ लागलेत मरू... घासापायी

"भूकंप" ओरडतात
होता तुझा थरकाप
झालं म्हणे लई पाप... दुष्काळाला

मागू कसं सपानही
हिरव्यागार पिकाचं
मरण दे सुखाचं... त्येच्यापरी

माय कूस बदलून
देच आळोखं-पिळोखं
आन होऊ दे नवखं... विश्व सारं

......................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! क्या ब्बात है शाम!

माय कूस बदलून
देच आळोखं-पिळोखं
आन होऊ दे नवखं... विश्व सारं
>> केवळ उत्तम क्लायमॅक्स..

छान!

कविता म्हणून छानच !>>> धन्यवाद ज्ञानेश , मी सुद्धा कविता म्हणूनच पोस्टली आहे.
..........................
पण जे सांगू पाहताय ते पटलं नाही.>>> माझ्यामते हे पटलं नसावं...

"माय कूस बदलून
देच आळोखं-पिळोखं
आन होऊ दे नवखं... विश्व सारं "

पण याचा लक्षार्थ वेगळा आहे.

मरुद्या जाऊद्या (anyways) धन्यवाद!

कविता म्हणून छानच !
पण जे सांगू पाहताय ते पटलं नाही.>>>>>>>>> रियली .....हे म्हणजे काहीच्याकाहीचय बरका !!! Happy

मरुद्या जाऊद्या (anyways) धन्यवाद!>>>>> करेक्टय शामराव !! सहमत !!

@शामराव-
"मी सुद्धा कविता म्हणूनच पोस्टली आहे."

अर्थातच ! गुलमोहर विभाग दिसतो आहे. Happy
काव्य आवडले, आशय नाही असे म्हणायचे आहे. तुमच्यासारख्यांना इतकं विस्कटून सांगावं लागावं?

सगळ्यांचच जगणं... काबाडाचं

धूर-धूर केला सारा
बाटविला तुझा वारा
सोडल्या ना चंद्र, तारा... विज्ञानाने

दिसती जरी घाव सारे
माये असे तुझ्या उरी

"भूकंप" ओरडतात
होता तुझा थरकाप

वगैरे जनरलायजेशन्स पटली नाहीत.
याबाबत मतभिन्नता असू शकते, असावी. मी फक्त माझा अभिप्राय दिला.

'मरुद्या जाऊद्या' झालंच आहे, तेव्हा थांबतोच.

---------------------------------------------

@वैभव-
रियली .....हे म्हणजे काहीच्याकाहीचय बरका !!!

बरं.
या आता.

या आता.>>>>>

आलो.....................घ्या आता !!!

अवान्तरः @ज्ञानोबा - स्टाईल फक्त तुम्हालाच मारता येते असा गैरसमज करून घेवू नये !!:P

(निघा आता चला फुटा वैभवराव इथून ; नाहीतर सीरियसली ज्ञानोबान्चा मार खावा लागायचा फुकटचा :अओ:!!)

कविता आवडली!

मागू कसं सपानही
हिरव्यागार पिकाचं
मरण दे सुखाचं... त्येच्यापरी

माय कूस बदलून
देच आळोखं-पिळोखं
आन होऊ दे नवखं... विश्व सारं

हे आता असच होणार वाटतय, मागे फिरायचे दोरही कापलेत जणू !