मेंबर्-मेंबर

Submitted by शाबुत on 5 October, 2012 - 00:36

"मेंबर - मेंबर"

मला एक एजंट,
म्हणजेच माझ्या मित्राचा-मित्र भेटला होता.
तेव्हा मी रस्त्यावरच्या दुकानात किराणा घेत होतो
जुनी ओळख दाखवत त्यानं
समोर येऊन हसत मुखानं हातात हात घेतला
'कसं काय!' विचारलं.
मीही त्याला "आता जे चालु आहे, त्यालाच बरचं म्हणायचं!"
असचं काहीतरी समाधानी उत्तर दिलं.
तो म्हणाला, मला तुमच्या घरी येयाचं आहे
यावर मी म्हणालो "भाग्य आमचं, आताच चला"
तो म्हणाला "आता नाही!"
कारण आता मला एकाकडे जायाचं आहे
त्याच्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे.
तुम्ही वेळ द्या, म्हणजे तेच मला तुमच्याशी बोलता येईल.
मी म्हणलो "उद्याच या!"
त्यानंतर तो त्याचं महत्वाचं काम टाळुन
माझ्याशी अर्धा तास रिकामं बोलत बसला.
जेव्हा माझा किराण्याच्या पिशवीनं हात दुखायला लागला
तेव्हा मी त्याला "येतो" म्हणालो,
शेवटी परत त्यानं उद्याची वेळ नक्की केली.
दुसऱर्‍या दिवशी तो न चुकता घरी आला
तो जेव्हा कामाचं बोलायला लागला
तेव्हा त्याच्या पहिल्या चार-पाच वाक्यातच
माझ्या लक्षात आलं की,
"तो मला श्रीमंत करुन सोडण्याच्या इच्छेने झपाटलेला आहे."
खरं तर त्याची इच्छा निर्मळ होती
अगदी खळखळत्या झर्‍यासारखी
सुरुवातीला त्याच्या बोलण्यातुन तसचं जाणवत होतं.
त्यासाठी मला पैशाची थोडीफार गुंतवणुक करायची होती.
पण, अशा कोणत्याही स्किम मधील व्यवहार निर्मळ नसतो
हेही मी ऐकुन होतो.
तसचं, झर्‍याच्या वाहत्या पाण्याला
एकदा नदीला मिळाल्यावर
नदीची जंगलातली वळणं माहीती नसतात
फक्त प्रवाहाबरोबर वाहत राहावं लागतं.
त्याचं बोलुन झाल्यावर,
मी त्याला म्हणतो...
मला नोकरी सोडुन कशातच यश मिळालं नाही...
मी आतापर्यंत कोणत्याही स्किममधे भाग घेतलेला नाही...
मला आता गुंतवणुक करायची नाही...
कारण "माझ्याजवळ पैसे नाहीत!"
एवढं बोलुनही तो
माझा पिच्छा सोडत नाहीत
मी त्याला घरातुन बाहेर काढुन देऊ शकत नाही
कारण त्याला मी थोडंफार ओळखत असतो
तेव्हा त्याचं बोलणं ऐकुन घेणं कर्तव्य ठरतं
कारण आता तो माझ्या फायद्याचंच बोलत असतो.
तो एक-एक उदाहरण देत जातो
"बेंडकाला त्याचं लहानसं डबकचं आपलं जग वाटतं,
कारण तो त्या डबकाच्या बाहेर उडी मारतच नाही!"
तरी, त्याच्या बोलण्याची मला भुरड पडत नाही,
"माझा जवळचा नातेवाईक अशाप्रकारच्या स्किम फसवला गेला आहे."
हेही मी त्याला सांगुन पाहतो.
त्यावर तो लगेच म्हणतो,
यात कोणतीही फसवणुक होणार नाही
कारण "आमची स्किम वेगळी आहे."
मी त्याला गंमतीनं म्हणतो,
तुम्हाला माहितीच आहे की
या जगात प्रत्येक माणुस वेगळा आहे
अगदी दोन जुळ्यामधेही थोडाफार फरक असतो
त्यांच्या शरीरात नसला तरी स्वभावात नक्कीच असतो.
यावर तो म्हणतो "अगदी बरोबर!"
कारण त्याला माझ्याकडुन रक्कम मिळेपर्यंत
माझं काहीही ऐकुन घेणं भाग असतं.
माझ्या आधीच्या मताला धार आणण्यासाठी मी पुढे म्हणतो,
चिंचेच्या झाडाला किती पानं असतात
उत्तरासाठी मी त्याच्याकडे पाहतो
यावर तो एकदम गप्प असतो.
मग मीच हसत म्हणतो, "अगणित!"
जे मोजल्या जावु शकत नाहीत
किंवा कोणाला ते मोजायची गरज वाटत नाही.
तरी शाळेच्या जिवशास्त्राच्या पुस्तकात लिहलेलं असतं की
चिंचेच्या झाडाचं प्रत्येक पान हे वेगळं आहे
कारण एकाही पानाच्या शिरांची रचना दुसर्‍यासारखी नसते.
माझं एवढं बोलणं ऐकुण तो जायाला निघतो
कारण, हे सावज आपल्या जाळ्यात अटकणार नाही
या निर्णयापर्यत तो येऊन पोहचतो.
त्याक्षणी माझा कडेलोट होतो,
"मी तुमच्या स्किममधे गुंतवणुक करणार आहे!"
असं वाक्य माझ्या तोंडुन अचानक बाहेर पडत
नंतर त्याच्या चेहरा एकदम उजळुन निघतो.
व्यवहारात माणुस जसं बोलतो तसं वागतोच असं नाही
तसचं डोक्यात जसा विचार सुचतो त्याला शरीर साथ देतं असंही नाही
हेही मला अनुभवानं पटलं.
कारण,
त्याच क्षणी माझ्या मनाला आशा लागली होती
"एकदम खुप पैसे कमवण्याची!"
आताच्या जगात पैसा कोणाला नको आहे
कोण्याही मार्गानं आला तरी तो हवाच-हवा.
तसचं,
दररोजच्या नोकरीच्या वातावरणात मी बोअर झालेला असतो
त्यात मला थोडा बदल हवा असतो.
एजंट "नेट मार्किटींगची" छापलेली कागदं माझ्यासमोर पसरतो
आधी मला त्याचा मेंबर व्हावं लागणार असतं
नंतर मला तिन मेंबर करावे लागणार होते.
तो जोशात येऊन बोलायला लागतो,
"आजची माझी थोडीसी गुंतवणुक
भविष्यात किती फायदा देऊ शकते
मी किती लवकर श्रीमंत होऊ शकतो."
असे हजारो-लाखो रुपयांचे हिसेब
तो माझ्यासमोर एका दमात मांडतो.
आता तो मला बोलायला संधी देत नाही
कारण,
त्याच्या शब्दात विश्वास ठासुन भरलेला असतो
तो एजंट मला वेगळ्याच जगात घेऊन जातो
जिथं त्याला यशाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं
म्हणुन तो "जे काही सांगतो ते ऐकत राहावं असं वाटतं!"
एजंटच्या दुष्टीने थोडीच म्हणजे,
माझ्या एका पगाराची रक्कम त्याच्या हवाली केली
त्यानं त्या कंपनीची रीतसर पावती दिली.
एक तर मी भावनिक माणुस
कोणाच्याही गोड बोलण्याला भुलणारा
कोणावरही लवकर विश्वास ठेवणारा
अगदी नाकासमोर सरळ व्यवहाराने जगणारा.
आमच्या सारखे कोणाच्याही लवकर जाळ्यात सापाडतात
एकदा सापडले की आतमधे "हंगामा"ही करत नाही.
मी फसवल्या गेलो आहे
हे कळायला महीना-दिडमहीना लागला
कारण तो मित्राचा-मित्र परत भेटला नाही
त्यानं मला एकही मेंबर पाहुन दिला नाही
आता ती स्किम बंद होण्याला आली होती
कारण तिचा गाजावाजा कमी झाला होता
तिच्यात नवीन गुंतवणुक होत नव्हती.
आठवडाभर,
मीही मित्रांत-नातेवाईकात फिरुन पाहीलं
पण मला त्या एजंटसारखं बोलणंही जमणार नव्हतं
आपल्या ओळखीतल्या माणसाला फसवणंही जमणार नाव्हतं
मला एकही मेंबर पटवता आला नव्हता
तिनचा आकडा तर दुरच राहीला.
खरं तर,
मला ऐकट्याला वर येण्यासाठी
जवळच्या तिन लोकांना खड्यात लोटायचं
नंतर त्यांच्यापासुन तोंड लपवत राहायचं
हे काम माझ्याच्याने होणारं नव्हतं
म्हणुन मी आपली गुंतवणुक बुडाली
असं गुहीत धरुन शांत बसलो.
*****

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.....!

मला ऐकट्याला वर येण्यासाठी
जवळच्या तिन लोकांना खड्यात लोटायचं
नंतर त्यांच्यापासुन तोंड लपवत राहायचं
हे काम माझ्याच्याने होणारं नव्हतं
अगदी पटल.

छान.. Happy अ‍ॅम्वे का? की त्या कुठल्याश्या जपानी गाद्या. की असच स्वप्नरंजन ? Happy