घडून गेले ..

Submitted by भारती.. on 2 October, 2012 - 14:39

घडून गेले..

घडून गेले घडता घडता सारे तेव्हा
ऐन दुपारी दिसले लखलख तारे तेव्हा

बाजाराच्या कहरामध्ये भेटलास तू
हुज्जत मी घातली जरा अविचारे तेव्हा

घराघरांना रंगीत काचा आणिक पडदे
मीही केली बंद मनाची दारे तेव्हा

बाप फिरवतो चाकखुर्चितून तरुण लेका
अर्थ बदलती दिसती असे सहारे तेव्हा..

नवी राजवट आलेली कैद्यांना कळले
- चेहरे नवे, आले नवे पहारे तेव्हा !

स्पर्शांच्या भाषेची कसली विरामचिन्हे
सर्वांगावर लिहिले फक्त शहारे तेव्हा

शहर लोटते पुढे कसे मी दूरुन बघते
तुझ्या जयाचे दुमदुमतात नगारे तेव्हा

चित्रामधला गाव फुलांचा पहा भारती
तुझ्या नभातून कोसळतात निखारे तेव्हा ..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स बिनधास्त, मुक्तेश्वर,विनीता, बागुलबुवा. विक्रांत इतक्या छान प्रतिसादांसाठी.

बेफिकीर,
<< जेव्हा मुळातच कवी असलेला कोणी फक्त फॉर्म थोडासा बदलून लिहितो तेव्हा किती खुलून दिसते. बरेचदा गझल बाराखडीपासून शिकली जाते, पण येथे काव्यापासून तंत्र हा प्रवास झालेला दिसतो आहे. >>
म्हणजे मी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेय :)) पण हे 'थोडासा फॉर्म बदलणे' म्हणजे एक मानसिक उंबरठा ओलांडणे होते..
आनंददायक होती माझ्यासाठी ही प्रक्रिया.आभार.

Pages