निघोज येथील रांजण खळगे : भौगोलिक चमत्कार
गेली ३२/३३ वर्षं नगरलाच रहात असूनही निघोजला कधीच जाणं झालं नाही. निघोजबद्दल एकलं होतं खूप! पण शेवटी ऑगस्टमधल्या एका रविवारी मात्र सहकुटुंब निघोजला जाणं झालं. आणि इथे यायला आपण इतका उशीर का केला असंच वाटलं.
अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते. वाटेत झेंडूची नयनरम्य फ़ुलशेती लागते.
या गावात "श्री मळगंगा माउली"चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
दर्शनानंतर सगळेच रांजण खळग्यांना भेट देण्यासाठी उत्सुक होते. हे गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब होते. भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रद्न्य भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वहात जाते. आम्ही बरंच अंतर चालून पुढे गेलो तेव्हा "क्लीप् स्वॅलो" पक्षांचे थवे अत्यंत लगबगीने पाण्याच्या पृष्ठभागावरून ये जा करत उडत होते. पाण्यावरून ते कडेच्या खडकात अदृश्य होत होते. तेव्हा कळलं की या पक्ष्यांची या खडकांमधे चिखल आणि लाळेनी बनवलेली असंख्य घरटी आहेत. माझा लेक मात्र येथे दोन तीनदा येऊन गेलेला असल्याने त्याला बराच माहिती होती.
तो या नदीकाठच्या खडकांवरून उतरून बराच खाली आपल्या कॅमेऱ्यासह स्थानापन्न झालेला होता. या पक्ष्यांच्या फ़ोटोसाठी! पण म्हणावे तसे स्पष्ट फ़ोटो मिळाले नाहीत.
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.
फ़क्त एकच गोष्ट जाणवली म्हणजे परिसरातला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा प्रचंड कचरा.
पर्यटकांनी जेवण झाल्यावर चक्क रांजण खळग्यातच थर्माकोलच्या पत्रावळ्या अक्षरश: दाबून बसवल्या होत्या. आणि इतरत्रही बराच कचरा होता.
इथे पर्यटकांसाठी "परिसरात प्लॅस्टिक/थर्माकोलचा कचरा टाकू नये" अश्यासारख्या पाट्या लावण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर जागोजागी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था व्हायला हवी आहे.
आम्ही गावातल्या मंदिरात जेव्हा ट्रस्टींना भेटलो तेव्हा या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आणि या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या.
पण संध्याकाळी परतीच्या प्रवासात "पुन्हा अकदा तरी निघोजला यायचंच" असं सर्वानुमते ठरलंच!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाटेतली फुलशेती
रांजणखळग्यांचे विविध प्रकार
परिसरातलं मंदिर
मळगंगा देवीचं मुख्य मंदिर
झुलता पूल
रांजणखळग्यांच्या पुढ्चा कुकडी नदीचा प्रवाह
रांजणखळग्यांच्या बाजूने लांब दिसणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा
निघोज गावातले मळगंगा देवीचं संगमरवरी मंदिर
याच मंदिरातला देवीचा मुखवटा
वाव.. मस्त आहे हा रांजणखळगा
वाव.. मस्त आहे हा रांजणखळगा प्रकार....
मानुषी..किती नवीन आणी रंजक
मानुषी..किती नवीन आणी रंजक माहिती सांगितलीस...
रांजण खळगे... पहिल्यांदाच ऐकलं ..
'थर्माकोलच्या पत्रावळी''........ कचरा करणार्यांना काही शिक्षा,दंड वगैरे नाही आहे का??
जोपर्यन्त स्वतःचीच जाण नसेल तोपर्यन्त सूचना पाट्यांना कोण भीक घालणारे!!!
वर्षू तुझा राग अगदी
वर्षू तुझा राग अगदी समजला.
जोपर्यन्त स्वतःचीच जाण नसेल तोपर्यन्त सूचना पाट्यांना कोण भीक घालणारे!!! >>>>>>>>>>>>>
आणि याच्याशी तर १००% सहमत.!
धन्यवाद साधना ,वर्षू !
रांजण खळगे... पहिल्यांदाच
रांजण खळगे... पहिल्यांदाच ऐकलं
चौथीच्या भुगोलाच्या पुस्तकात
चौथीच्या भुगोलाच्या पुस्तकात पाहिल होतं चित्रं, प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याचं सौंदर्य जाणवलं.
फोटोत नेमकं कळत नाही लोक्स.
नक्की जाउन याची देही याची डोळा पाहुनच या.
आम्ही गेलो होतो तेव्हा डाळींबाची शेती पाहिली...
मस्त माहिती, सुंदर फोटो. खूप
मस्त माहिती, सुंदर फोटो.
खूप ऐकून आहे, एकदा जायचंय प्रत्यक्ष पहायला....
छान माहीती, आणि प्रकाशचित्रही
छान माहीती, आणि प्रकाशचित्रही सुंदर.
एक झब्बु
सुरेखच. आधी कुठेतरी याबद्दल
सुरेखच. आधी कुठेतरी याबद्दल ऐकलं, वाचलं होतं पण आज अगदी मस्त माहिती मिळाली.
रांजणखळगे आणि परीसर छान दिसतोय. झुलता पूल .... वॉव! पण इतक्या सुंदर ठिकाणी बांधलेल्या झुलत्या पुलाला निळा आणि हिरवा असे ढंगच्यॅक रंगाचा ऑईलपेंट मारण्यातून सरकारी खाक्या दिसतोय.
मस्त फोटो व माहिती! माझंही
मस्त फोटो व माहिती! माझंही खळगे बघायला जाणं आजतागायत झालं नाही!
मानुषी, खूप छान.. मस्त वर्णन
मानुषी, खूप छान.. मस्त वर्णन आणि मस्त प्रचि!!
माझा प्रतिसाद कुठे गेला ? मला
माझा प्रतिसाद कुठे गेला ?
मला जायचे आहे कधीचे. पण मुख्य रस्त्यापासून खुपच आत आहे ना. खरे तर या प्रत्येक खळग्यात एक गोल दगड असायला पाहिजे, ( नक्कीच होता ) पाण्याच्या प्रवाहाने हे गोळे गोल गोल फिरतात आणि त्यानेच तसे खळगे होतात. हे गोल दगड बहुतेक, लोकांनी उचलून नेलेले दिसताहेत.
मानूषी, तिथेच जवळपास एक स्फटीक दगडांचे संग्रहालय आहे ना ?
तिथेच जवळपास एक स्फटीक
तिथेच जवळपास एक स्फटीक दगडांचे संग्रहालय आहे ना ?>> नाही.
तुम्ही म्हणताय ते सिन्नरच असणार.
बाय द वे, हे निघोज गाव छोटं आहे. बरचं आत आहे.
मी लोकसत्तामधे फोटो पाहिले
मी लोकसत्तामधे फोटो पाहिले होते, ते सिन्नरचे का ? खुप सुंदर संग्रह आहे तिथे.. नेहरुंनी जिथे ग्रंथलेख केले, तो नगरचा किल्लाही मी बघितला नाही अजून.
निघोजजवळच एक दर्याबाई पाडळी
निघोजजवळच एक दर्याबाई पाडळी नावाचे गाव आहे, तेही रान्जणखळग्यासाठी प्रसिद्ध आहे.
मस्त फोटो आणि माहिती मानुषी
मस्त फोटो आणि माहिती मानुषी
माझंही निघोजला जाणं राहिलंय.
रच्याकने, दौंडहुन किती लांब आहे निघोज? काही कल्पना?
दिनेशदा, ते संग्रहालय सिन्नरलाच आहे.
जिप्स्या, सातासमुद्रापार
जिप्स्या, सातासमुद्रापार गेल्यावर नगर आणि सिन्नर मधे, अंतर नाही रे रहात !
छान माहिती
छान माहिती
सर्वांना धन्यवाद! पण इतक्या
सर्वांना धन्यवाद!
पण इतक्या सुंदर ठिकाणी बांधलेल्या झुलत्या पुलाला निळा आणि हिरवा असे ढंगच्यॅक रंगाचा ऑईलपेंट मारण्यातून सरकारी खाक्या >>>>>>>>>. मामी अगदी बरोब्बर!
दिनेशदा ते गारगोटी संग्रहालय बहुतेक नाशिकजवळ सिन्नर इथे आहे.
जिप्सीभौ द्या इकडे निघोजला लवकर भेट! म्हणजे लोकांना रांजणखळग्यांचे "जिप्सी अॅन्गल"मधले
सुंदर फोटो बघायला मिळतील.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
छान लेख ! या माहितीबद्दल
छान लेख ! या माहितीबद्दल धन्यवाद !
भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. >>>>>>
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.>>>>>>>>>
या खळ्ग्यान्ची उत्पत्ति कशी झाली याबद्दल कुणाजवळ काही अधिक माहिती किवा references असतील तर जरुर कळ्वावेत.
सुंदर फोटो आणि छान माहिती.
सुंदर फोटो आणि छान माहिती. कधी ऐकला-बघितला नव्हता हा प्रकार!
रांजणखळगे (पॉट होल्स) गुगलल्यावर http://www.esakal.com/esakal/20110722/5162082629374176204.htm इथे आणखी काही फोटो दिसले.
>>एकच गोष्ट जाणवली म्हणजे परिसरातला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा प्रचंड कचरा.
किती दुर्दैवाची बाब आहे! वरच्या लिंकमधल्या फोटोतल्या प्रवाहातपण दिस्तोय तो कचरा. कठोर नियम, दंड आणि जनजागृतीनं काही बदल घडणं शक्य आहे का?
खूपच सुरेख जागा आहे, कधीतरी
खूपच सुरेख जागा आहे, कधीतरी नक्की भेट द्यायला हवी
आणि प्रचिही छान आहेत.
मानुषी... सुंदर लेख.... असेच
मानुषी...
सुंदर लेख....:-)
असेच एक ठिकाण रायगड जवळ काळ नदीच्या पात्रात वाळणकोंड येथे आहे...
तेथील रांजण खळगे निघोज एवढे मोठे नाहीत् पण बर्यापैकी आहेत.. तेथे देखिल काळ नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वहात जाते...
अरे वा छानच लिहिलयसही छान गं
अरे वा छानच लिहिलयसही छान गं . माझ्याकडचे शोधते फोटो झब्बू द्यायला
मानुषीताई, मस्त. मी ७-८
मानुषीताई, मस्त. मी ७-८ वर्षांपूर्वी पाहिली आहेत. अर्थात तेव्हा इतका कचरा नव्हता.
@बिनधास्त,
तुम्ही गूगलवर निघोज पॉटहोल्स फ्लुविअल प्रोसेसेस असा काहीसा सर्च द्या. तुम्हाला वैज्ञानिक रेफरन्सेस मिळतील.
@दिनेशदा,
नाही ही पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली रचना आहे. खळग्यात दगड नव्हते, नाहीत. असलच एखादा तर चुकार अपवाद. या रचनेला पाण्याचा प्रवाह, त्याचा वेग, दिशा, उतार, खडकांची रचना, खडकांचे कॉम्पोझिशन अशा बर्याच गोष्टी कारणीभूत असतात. जगात असे रांजणखळगे इतरत्रही आहेत
एक दर्याबाई पाडळी नावाचे गाव
एक दर्याबाई पाडळी नावाचे गाव आहे>> चिखल्या जरा डिटेल दे रे भाउ.
तिकडे जाता येइल.
छान माहिती, प्रचि मस्तच
छान माहिती, प्रचि मस्तच
उत्तम माहिती आणी फोटो. मी कधी
उत्तम माहिती आणी फोटो. मी कधी वाचलेच नव्हते या बद्दल.
सर्वांना धन्यवाद! वरदातैंचा
सर्वांना धन्यवाद!
वरदातैंचा प्रतिसाद अपेक्षित होता. तै ठांकू!
आणि ज्यांना निघोज पहायचंय त्यांनी ठरवा की एक "रांजणखळगे गटग" करायचं का?
आभार वरदा, पुर्वी लोकसत्तामधे
आभार वरदा, पुर्वी लोकसत्तामधे वाचले होते.
मानुषी, अगदी खरे सांगायचे तर एखाद्या शाळेचे, साफसफाई अभियान तिथे नेले पाहिजे, अर्थात मोठी माणसेही हे करु शकतात, पण लहान मुलांनी केले तर तो वारसा पुढे जाईल !
Pages