चाळ नावाची भूताळ वस्ती

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

आजकाल खूप सारे भयपट घाबरत घाबरत का होईना पाहील्यामूळे म्हणा किंवा चाफ्याच्या भूताच्या गोष्टी (म्हणजे चाफ्याने लिहीलेल्या बर का.चाफ्याच्या भूताच्या नव्हेत) वाचल्याने म्हणा ही भय-कल्पना सुचली.
.
मुंबईतल्या कुठल्याश्या एका चाळीत काही भूत रहातात. चाळ तशी एक मजलीच. अजून सुदैवाने कुण्या बील्डरची नजर ह्या चाळीवर गेली नाही. त्यामूळे चाळ अजून टीकून आहे. चाळीच्या तळमजल्यावरच्या जीन्याजवळची खोली ही चाळ सेक्रेटरीची हे वाचकांनी ओळखले असेलच. किंबहुना ह्या मोक्याच्या खोलीमुळेच सेक्रेटरी-पणाची माळ (लिंबू-मिरच्यांची अर्थात ) ह्यांच्या गळ्यात पडली आहे. आजचा दिन विशेष आहे. आज दिवाळी निमीत्त काही सांस्कृतिक कार्यक्रम ठरवण्यासाठी मुद्दाम चाळीची विशेष बैठक बोलवण्यात आलेली आहे. त्याचाच हा लाईव्ह वृत्तांत.
.
सेक्रेटरी भूत : तर जमलेल्या सर्व भूतांनो आणि हडळींनो. आज आपण कश्यासाठी जमलो आहेत ते समस्त चाळकरी मंडळींना ठाऊक असेलच. पण तरीही कार्यक्रमाच्या ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे कार्यक्रमाचा मुळ उद्देश सांगण्यासाठी म्हणून मला ५ मिनीटे देण्यात आलेली आहेत. त्यामूळे या वेळेचा यथा शक्ती , यथा मती उपयोग करण्यास मी बांधील आहे. आणि हेच आद्य कर्तव्य समजून .... (सेक्रेटरी माणसात असताना शाळेत मास्तर असावेत म्हणूनच विद्यार्थ्यांना न कळणार्‍या अगम्य भाषेत ते काहीतरी बोलत रहातात) ..... इतक बोलुन मी माझ बोलण संपवतो. आता टाळ्या येऊ द्यात (' मोठा स्वतःला आचार्य अत्रे समजतो ठोंब्या' इतर भूत मनात विचार करतात. त्यातल एक गलगले टाईप च भूत हेच विचार मोठ्याने म्हणून दाखवत आणि टाळ्यांच्या ऐवजी हशा ऐकू येतो. सेक्रेटरी भूत दूर्लक्ष करत) तर ह्या दिवाळीत काय सांस्क्रुतिक ( ह्यात 'स्क्रु' चा पाय मुद्दामहून उलटा काढलेला आहे. भूताचे सगळेच पाय उलटे असतात म्हणे) कार्यक्रम करायचे ह्यासाठी सभासदांच्या सुचना असतील तर त्या येऊद्यात.
.
राजकीय भूत : ह्या दिवाळीत आपल्या समस्त मतदार भूतबंधू आणि हडळ-भगिनींना रोख ५०० रुपये वाटूया ( खर तर 'राजकीय भूत' ही द्वीरुक्ती आहे. सुजाण मतदारांना हे वेगळ सांगायची गरज नाही. हे भूत अखंड मानवजन्मात अपक्ष म्हणून बागडले. आणि पक्षांतर विरोधी कायद्याला विरोध करता करता धारातिर्थी पडले. पण अजूनही निवडणूक लढवण्याची हिम्मत बाळगून आहे)
.
सुगरण गॄहीणी हडळ: नक्को बाई. असले माकडांच्या भूतांचे चाळे करण्या ऐवजी आपण किनै छान पैकी पाककला स्पर्धा भरवूया बाई. त्यात किनै मी दोन पेश्शल पदार्थ सादर करते.
.
सुगरण हडळीचे यजमान : माझ ह्याला पूर्ण अनूमोदन आहे. (न देऊन करतो काय बापडा. घरी गिळायला हवय ना )
.
फिल्मी भूत : डॅम इट्ट (हे एकदम एकदम 'महेश कोठारे' स्टाईलीत) असल काय करण्यापेक्षा आपण रोज रात्री सिनेमाचे खेळ दाखऊ मस्त पैकी. जमल्यास खेळ संपल्यावर कॉफी आणि बटाटावड्यांचा कार्यक्रम करू. बटाटा वडा आणि कॉफी बनवण्याच काम ह्या सुगरण हडळ बाईंना देऊ आणि वाटप त्यांचे यजमान करतीलच. सगळ ठरल तर मग. ह्यात हयगय नको. आय वाँट रीझल्ट (हे जयराम कुलकर्णी स्टाईलीत. आता महेश कोठारे इन्स्पेक्टर हीरो म्हटल्यावर जयराम कुलकर्णी हे कमीशनर आणि हिरवीणीचे बाप ह्या दुहेरी भूमिकेत असणारच नाही का ? बटाटा वड्यात बटाटा आणि कांदा सामोस्यात कांदा असलाच पाहीजे अगदी तसे )
.
मध्येच दोन तीन इंग्रजी शब्द ऐकून आत्तापर्यंत झोपलेल इंग्रजाळलेल भूत जाग होत
इंग्रजाळलेल भूत : आय फुल्ली एग्री. इंग्रजी शिक्षणाशिवाय इट्स खूप डीफीकल्ट यु सी.
.
सेक्रेटरी भूत : तुम्ही गप्प बसा हो. तूमचा इंग्रजीचा कार्यक्रम आपण नाताळात करू. आता दिवाळीच काय ते बोला .
.
सुगरण गॄहीणी हडळ: नायतर काय हो. काय मेल्ल ते बोलण. इंग्रजी सुया टोचल्यासारख
.
सुगरण हडळीचे यजमान : माझ पूर्ण अनूमोदन
.
सगळे इंग्रजाळलेल्या भूताला रट्टे देताहेत हे बघून इतर भूत मागे कशी रहातील. काही झाल तरी मुंबईकर भूत आहेत ती. गर्दीत अशीच हात साफ करून घेतल्याशिवाय कशी रहातील
.
सामान्य भूत त्यांना वाटत की इंग्रजी फक्त त्यांनाच येत. आम्हाला काहीच येत नाही. त्यांना बघा 'जी' च ईंफेक्शन झालय .
.
सेक्रेटरी भूत : 'जी' च ईंफेक्शन ?
.
फिल्मी भूत : 'जी' च ईंफेक्शन ? हा कसला आजार ? जीव घेणा असतो का ?
.
सुगरण गॄहीणी हडळ: साथीचा रोग आहे का ? जपून रहायला हव.
.
सुगरण हडळीचे यजमान : माझ सौं ना पूर्ण अनूमोदन
.
इंग्रजाळलेल्या भूताची 'उरलेली' झोप आणि 'कालची उरलेली' खाडकन उतरते.
.
इंग्रजाळलेल भूत : (रडवेल होऊन ) ओह गॉड अजून माझी 'वील' केलेली नाही. स्टॉक मार्केट मधले पैसे काढून घ्यायला हवेत. अजून बँकेच लोन फिटलेल नाही.. हे एक फक्त चांगल झाल म्हणायच.
.
सामान्य भूत : नाही मंडळी घाबरू नका. हा कसलाही शारिरीक आजार नाही. झालाच तर एक मानसिक आजार आहे. जी च इन्फेक्शन म्हणजे त्यांना 'ग' ची बाधा झाली आहे अस म्हणायच होत मला. पण इंग्रजीत त्याला समांतर म्हण आठवेना म्हणून असा घोळ झाला बघा. म्हणून मराठीत बोलायच असत. कळ्ळ का हो ?
.
इंग्रजाळलेल भूताला हायस वाटत. ते कवटी हलवत.
.
राजकीय भूत : तर मंडळी आपण आज पासून केवळ आणि केवळ मराठीत बोलायच. त्या ठेंगण्या जयाबाईंच्या ठुसक्या नाकावर ठेचून आपल टीच्चून म्हणायच ' आम्ही महाराष्ट्रात रहातो. आम्ही मराठीतच बोलणार'. बोला आवाज कुणाचा ?
.
इंग्रजाळलेल भूत : ठीक आहे. मी माझ्या ब्लॉग वर त्यासाठी उद्याच माफी मागेन.
.
इतक्यात कसलासा गलका ऐकू येतो. सगळे बघतात. तर तिकडून एक 'व्ही आर एस' वाल भूत आणि 'सी आर एस' वाली हडळ कसला तरी आरडा ओरडा करत सभेच्या दिशेने येत असतात. अधिक लक्षपूर्वक ऐकल्यावर समजत की ते दोघे सुगरण गॄहीणी हडळ आणि तीचे यजमान यांच्या नावाने शंख करत येत असतात.
.
व्ही आर एस भूत: काय रितभात आहे का नाही तूमच्या खवीस बंड्याला. चक्क आमच्या पोरीला फूस लावतो.
.
सेक्रेटरी भूत : का हो काय झाल ?
.
सी आर एस हडळ : ह्यांचा खविस हो. चक्क गच्चीवर हात धरला की आमच्या हडळीचा.
.
सुगरण गॄहीणी हडळ: ए सटवे. तोंड सांभाळून बोल. दात पाडून टाकेन
.
सी आर एस हडळ : ए भवाने . तूझ्या झिंज्या उपटून हातात देइन
.
सुगरण गॄहीणी हडळ: ओ तुमी गप्प का बोला ना काहीतरी
.
सुगरण हडळीचे यजमान : हो हो गप्प रहातो का काय . माझ तूला पूर्ण अनूमोदन
.
आता सुगरण हडळीचा पारा चढतो. तोफेच तोंड आता सी आर एस हडळीला सोडून स्वतःच्या यजमानांच्या दिशेन होत.
.
सुगरण गॄहीणी हडळ: ऍ हॅ . काय मेल बोलल आमच ध्यान. आता मी त्या सटवीचे दात पाडणार म्हटल तर आमच सोंग म्हणतय माझ अनूमोदन. काय स्वतःची अक्कल आहे का नाही .. (हे ऐकून व्ही आर एस वाल्या भूताला यजमानांची दया येते. काय करणार मसणोमसणी मातीची मडकी. ते मुद्दामच थोडस विषयांतर करतात आणि मुळ मुद्द्याकडे म्हणजेच भांडणाकडे वळतात.
.
व्ही आर एस भूत : (यजमानांना उद्देशून ) मी तूमच्या पेकाटात लाथ घालेन
.
सुगरण हडळीचे यजमान : (गडबडीत) मी तूमच्या कानशीलात लाथ घालेन
.
(व्ही आर एस भूतच नव्हे तर सर्व सभासद अचंबीत होतात. अशी धमकी आत्ता पर्यंत कुणीच ऐकलेली नसते. यजमान 'जॅकी चॅन' स्टाईल मध्ये हवेत उड्डाण करून व्ही आर एस भूताच्या कानाच्या जागेच्या दोन इंच खाली पण गालाच्या जागेच्या दोन इंच वर 'कराटे' प्रकारातली लाथ घालत आहेत असा नयनरम्य देखावा सभासदांच्या डोळ्याच्या खोबणी समोर येतो.
त्याच वेळी यजमानांच्या मनःचक्षू समोर आपण अश्या प्रकारची सुरस आणि चमत्कारीक कामगिरी बजावलेली आहे आणि आपल्या सुगरण हडळ पत्नी आपल्याला ओवाळत आहेत. गोडाचा घास भरवत आहेत असा देखावा उभा रहातो.)
.
व्ही आर एस भूत गडबडून जात. तेंव्हा त्यांच्या हडळ-पत्नी, पतीच्या रक्षणाला उभ्या रहातात.
.
सी आर एस हडळ : आधी तुमच्या खविसाला सांगून ठेवा . आमच्या हडळीच्या वाटेला जायच नाय सांगून ठेवते.
.
सुगरण गॄहीणी हडळ: जा ग जा. त्या दिवशी माझ्या सांडग्या -कुरडयांच्या वाळणावर, तू धूतलेले कपडे पिळलेस ते माझ्या नजरेतून सुटल अस वाटल का काय तुला ?
.
व्ही आर एस हडळ : आणि तू अख्ख्या महिला मंडळात माझ्या स्वयंपाकाची खिल्ली उडवत फिरवत असतेस ते मला माहीती नाय अस वाटल का काय तूला ?
.
सुगरण गृहीणी हडळ : मग तुला येतच कुठ जेवण करता ?
.
व्ही आर एस हडळ : मग माहेरची मी श्रीमंत आहे म्हटल. स्वयंपाक करण्यासाठी आमच्या कडे पेश्शल आचारी ठेवतात. एका मसणवटीत एका वेळी ५० भूत जेवतात. तू ये कधीतरी पाहुणचाराला.
.
फिल्मी भूत : मी काही बोलल तर चालेल का ?
.
सुगरण गॄहीणी हडळ: (झुरळ बघीतल्यासारख करत) तुम्ही ?
.
सी आर एस हडळ : (उंदीर बघीतल्यासारख करत) तुम्ही ?
.
फिल्मी भूत : नाही म्हणजे मगास पासून बोलीन म्हणत होतो . पण हिम्मतच झाली नाही. अगदी तुमच्या यजमानांसारखीच. तुम्ही ते मगासच गच्चीवरच लफड म्हणत होतात ना..
.
सुगरण गॄहीणी हडळ: (आवाज चढवून) लफड ?
.
सी आर एस हडळ : (जरबेन) लफड?
.
फिल्मी भूत : (घाबरून ) नाही हो म्हणजे मला तस म्हणायच नव्हत. पण आम्ही फिल्मी लोक कुठल्याही गोष्टीला लफड, भानगड असच म्हणत असतो. ते म्हणातात ना 'भूत्याची खोड मेल्यावरही सुटत नाही' तसलाच काहीसा प्रकार. तर सांगायचा मुद्दा हा की ह्या दिवाळी च्या सांस्कॄतिक कार्यक्रमामध्ये आम्ही तरुण भूत मिळून 'जोधा-अकबर' चा प्रयोग करणार आहोत. त्यासाठी आमची लपून-छपून तालीम चालू आहे. मगाशी तुम्ही गच्चीवर बघीतलात तो त्यातलाच एक भाग होता.
.
राजकीय भूत : मग हे सांगायच कुणी ?
.
सामान्य भूत : आणि कधी सांगायच ? औरंगजेबाचा जन्म झाल्यावर का ?
.
सगळे एकत्र खिदळतात. तो आवाज काहीसा ' शु कोई है' किंवा 'कही किसी रोज' सीरीयल मधल्या पार्श्वसंगीतासारखा येतो.
.
फिल्मी भूत : माझ्या कवटीतल्या रिकाम्या जागेत एक मस्त आयडीयाची कल्पना आलीये (हे सांगताना फिल्मी भूत आयडीया जाहीरातीतल्या 'व्हॉट्ट आयडीया सरजी' वाल्या अभिषेक बच्चन सारख उडी मारत )
.
सेक्रेटरी भूत : कसली आयडीया?
.
फिल्मी भूत : आपण 'जोधा अकबर' च्या प्रयोगा बरोबरच शंकर पाटलांच्या 'दोन बायकांचा दादला' सादर केल तर? म्हणजे आपला मराठी बाणाही जपला जाईल. नाही का ?
.
व्ही आर एस भूत : कल्पना चांगली आहे पण त्यात काम करणार कोण ?
.
फिल्मी भूत : कोण म्हणजे ? आत्ता इतक्यावेळ तुम्ही काय बघत होतात? तालीम बघीतली नाहीत का नाटकाची
.
इतक्यात ..
सी आर एस हडळ किंचाळते
.
सी आर एस हडळ : अय्या साडे सात वाजले. माझी 'अवघाची संसार' सुरू झाली. आजचा एपीसोड महत्वाचा आहे. आजच्या एपीसोड मध्ये त्या आसावरीला खरोख्रच वेड लागलेल असत का ती वेडाच नाटक करत असते ते कळणार आहे. मी लगेच 'पळते' आपल 'उडते'.
.
सुगरण गॄहीणी हडळ: हो ग हो. आठ वाजता माझी ' या सुखांनो या ' लागणार. मग 'असंभव' बघायची. मेली 'मनुष्य' जन्मापासून त्या दोन्ही सीरीयली न चुकता बघण्याची सवय आहे. आत्ता मोडून कशी चालेल.
.
सी आर एस हडळ : होय ग बाई चल आपण जाऊया लवकर.
.
(आणि इतक्या वेळ भांडणार्‍या दोन्ही हडळी गळ्यात गळे अडकवून उडत उडत आपल्या खोलीत जाऊ लागतात. आणि इतर पुरूष भूत-मंडळींना नळावर जाऊन आपापल्या घरासाठी पाणी भरायच असत त्यामुळे सहाजिकच सभा बरखास्त होते)

समाप्त

विषय: 
प्रकार: 

केद्या, बढीया रे ! तसं म्हणशील तर चाफ्फ्याचे भुत ही काही अतीशयोक्ती नाही Happy नाहीतरी मला आजुन प्रत्यक्षात पाहीलेय कुणी ? आणि भुतालाही कुणी पाहीले नसणारच Lol
............................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

'राजकीय भूत' ही द्वीरुक्ती आहे.>>>>.. Lol

चाफ्याच्या भूताच्या नव्हेत>>>> चाफ्या ह्या भुताच्या अस म्हणतोयस का तु?? Proud
असु दे असु दे. होती कधी कधी स्पेलिन्ग मिस्टेक.

"अय्या साडे सात वाजले. माझी 'अवघाची संसार' सुरू झाली. आजचा एपीसोड महत्वाचा आहे. आजच्या एपीसोड मध्ये त्या आसावरीला खरोख्रच वेड लागलेल असत का ती वेडाच नाटक करत असते ते कळणार आहे. मी लगेच 'पळते' आपल 'उडते'."

Happy

रविन्द्र

महेश कोठारेच्या पिक्चरमधे कमिशनरची भुमिका करणार्‍या नटाचे नाव जयराम कुलकर्णी आहे ही एक उपयुक्त माहिती मिळाली.

--------------
The old man was dreaming of lions

केड्या, काय रे हे? शेवटी दिवाळीत तू कुठचा कार्यक्रम केलास? Happy

सही आहे!

चाफा, झकोबा, रविंद्र , जाई धन्यवाद Happy

टण्या Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

>>> 'भूत्याची खोड मेल्यावरही सुटत नाही'
तेवढ "भुत्याची खोड जलमल्यानन्तरही सुटत नाही" अस केल तर?

छान आहे.
भूताची गोष्ट म्हणून वाचायला घेतली होती Lol

छान आहे.
भूताची गोष्ट म्हणून वाचायला घेतली होती Lol