‘ विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती ’

Submitted by अमृता०१ on 27 September, 2012 - 14:19

‘ विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती ’

जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्क्षलवादाचा प्रभाव आसलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. सरकारी अनुदान नाही तरीही मोफत शिक्षण आणि मोफत मध्यान भोजन दिले जाते. शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० % हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थांना स्वावलंबी बनवणे पुढचे उद्दिष्ट आहे. प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.

प्रशिक्षणादरम्यान शाळेच्या शैक्षणिक उपक्रम आणि अनुभवांबद्दल चर्चा घेत होतो. शाळेचे वैशिष्ट्य म्हणून त्यांनी आमच्या शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाहीत, शाळेची सफाई आणि देखभाल विद्यार्थी , अध्यापक कार्यकर्ते मिळून करतात असे सांगीतले. विद्यार्थांच्यात शाळेबद्दल आपलेपणा वाढावा आणि श्रम संस्कार रुजावा म्हणून हि रचना विकसित केल्याचे त्यांनी सांगीतले. ४ दिवस मी रोज सकाळी शाळा भरताना आणि सुटताना पाहत होतो ..विद्यार्थी त्यांना दिलेला नियोजित भाग साफ करत होते शिवाय शाळेची पारस बाग , बागीच्या व शाळेचे आवर स्वतःहून स्वच्छ ठेवत होते. शिबिरासाठी आलेल्या अध्यापकांच्या जेवणानंतर सफाई करता होत.

आपण काय करतो ? याचा मी दोन मुद्यांवर विचार करत होतो, पहिला आपला शालेय स्वच्छतेतील सहभाग आणि कोणत्या गोष्टी आपण नियमित जाणीवपूर्वक करतो .

आपले काम करताना आपण अस्वच्छता करतो आहोत याचे बरेचदा आपल्याला भानच नसते , सहज पेन्सील वा पेनाने बेंचवर गणित सोडवतो वा नोंदी करतो , कागद बेंचखाली टाकतो. सहज केलेल्या कृतीतून शालेय सौदर्य ; स्वच्छता बिघडते आहे याची जाणीव आपल्याला नसते. काहींच्या हातून तर जाणीव पूर्वक मोडतोड होते .वर्गात आल्यावर सहज पंखे सुरु केले जातात पण त्याच सहजतेने ते वर्गाबाहेर जाताना बंद केले जात नाहीत. अशा सध्या सध्या गोष्टीतून शाळा किती आपली आहे हे प्रतीत होत असते.

अजून एक असा प्रसंग आठवतो . १९९९ साली मी , पोंक्षेसर, प्रियव्रतदादा, अजेयदादा असममधील हाफलॉंग गावातील निवासी शाळा पाहण्यासाठी गेलो होतो . आमचा मुक्काम शाळेच्या आवारातील छात्रवासात होता. आम्ही गाडीतून उतरून तिथल्या प्रमुखांना भेटण्यासाठी गेलो , त्यांचाशी बोलून आम्ही आल्याचे त्यांना सांगेपर्यंत छात्रावासातील विद्यार्थांनी आमचे सामान गाडीतून उतरवले होते , १५ -२० मिनिटात त्यांनी मछरदाणीसह निवासाची व्यवस्था केली. रात्री विद्यार्थांबरोबर जेवणासाठी पंगतीत बसलो. भोजन चालू असताना वीज गेली , ४०-५० विद्यार्थी भोजनगृहात असून देखील आरडाओरडा झाला नाही कि कोणी किंचाळले नाही. ज्या विद्यार्थांकडे मेणबत्ती आणि पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी होती फक्त त्यांनीच जागा सोडली आणि मेणबत्या लावल्या. रात्री आम्ही या प्रसंगाबद्दल आश्चर्य व्यक्त करत आणि आपले विद्यार्थी वीज गेल्यावर कसे वागले असते यावर चर्चा करत झोपी गेलो. सकाळी याबद्दल तिथल्या अध्यापाकांशी आणि कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा शाळेतील सर्व कामे छात्रावासातील विद्यार्थी करतात अगदी स्वच्छतेपासून .....स्वयंपाकापर्यंत असे कळले. स्वयंपाक घरात रोज सकाळसंध्याकाळ विद्यार्थी अर्धातास काम करतात . विद्यार्थ्यांच्या वयानुसार निवडणे , भाजी चिरणे ,पदार्थ चुलीवर शिजवणे अशी कामे वाटून दिली होती .शाळेच्या सर्व कामात विद्यार्थांचा सहभाग होता .विद्यार्थी आणि अध्यापाकांशी याबद्दल बोललो तेव्हा काम करण्यातून शाळेबद्दल निर्माण झालेला आपलेपणा , शाळेतील रचना माझ्यासाठी आहेत आणि त्या स्वच्छ राखणे आणि नीट ठेवणे आमची जबाबदारी आहे असे भान त्यांच्यात निर्माण झाल्याचे जाणवले.

कामात सहभाग आणि कामातील नियमितता या दोन गोष्टी वरील शाळांतील विद्यार्थांच्या वृत्ती घडणीत महत्वाच्या आहेत असे जाणवले .

झारखंड वरून परत आल्यावर या दोन प्रसंगावर विचार करत होतो आणि संदर्भ म्हणून विनोबांचे साहित्य चाळत होतो कारण विनोबांनी शिक्षणाची व्यापक भूमिका मंडली आहे आणि श्रम संस्कारावर बरेच प्रयोग केले आहेत. विद्यार्थाचे दोन गोष्टीसाठी शिक्षण व्हावे असे विनोबा म्हणतात पहिली म्हणजे विद्या आणि दुसरी व्रत. विनोबांनी यासाठी ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ हे शब्द वापरले आहेत.

प्रबोधिनीत आपण विद्यास्नातक होण्यासाठी विषयाध्यन करतो , प्रकल्प करतो , एखाद्या विषयाचा अभ्यास करून प्रार्थनेच्या वेळी बोलतो , विद्या कशी ग्रहण करायची यासाठी स्वयं अध्ययन कौशल्ये आणि अभ्यास तंत्रे शिकतो , व्यक्तीमत्व विकसनासाठी विविध शिबिरातून गट कार्ये शिकतो , दलावर वेगवेगळे खेळ खेळतो , राखी विक्री करतो ,दिवाळीत फराळ विकतो , गड किल्ल्यांवर साहस सहलींना जातो अशा अनेकविध गोष्टीतून आपण विद्यास्नातक होण्यासाठीची कौशल्ये आणि पात्रता सध्या करतो.

व्रतस्नातक होण्यासाठी आपण काय करतो , वर्षारंभी संकल्प करतो. संकल्प वैयक्तिक करतो तसेच सामूहिक वर्गशः करतो . वर्षांती किती साध्य झाले; किती नाही, का साध्य झाले का नाही जमले याबद्दल विचार करतो . सहा वर्ष ‘ ठरवायचे आणि प्रयत्न करायचा आणि किती जमले त्याचा आढावा घ्यायचा ’ ही सवय थोडीतरी अंगी मुरते . ही कृती म्हणजे व्रतस्नातक होण्यासाठीचे शिक्षण. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी नियमबद्ध होणे म्हणजे व्रत घेणे.

आपण विद्याव्रत घेतो म्हणजे आपण ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ होण्याचे ठरवतो.

प्रबोधिनीत विद्याव्रतात विदया म्हणजे काय ? विद्या कशी मिळवायची ? प्राप्त ज्ञानाचा वापर कसा आणि कशासाठी करायचा याचे अध्यायन करण्यास आपण सुरुवात करतो म्हणजे आपण विद्यार्थी होतो .

उत्तम माणूस होण्यासाठी स्वतःला ओळखणे , स्वतः मध्ये बदल घडवण्यासाठी निश्चय पूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात करणे म्हणजे आपण व्रतार्थी होणे .

विद्यार्थी आणि व्रतार्थी होणे म्हणजे विद्याव्रती होणे.

श्री श्री विदया मंदिर आणि हाफलॉंग छात्रावासातील विद्यार्थी काम उत्तम कसे करायचे हे शिकली म्हणजे विद्यार्थी होण्याचा त्यांनी प्रयत्न केला . शाळेतील कामे नियमित करणे , शालेय स्वच्छता आणि सौंदर्य माझी जबाबदारी आहे अशी भावना या नियमित कृतीतून निर्माण होणे म्हणजे त्यांनी व्रतार्थी होण्याचा प्रयत्न करणे होय.

प्रबोधिनीत शिक्षण घेत असताना ‘ विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती ’ होण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केल्यास आपणास ‘ विद्यास्नातक ’आणि ‘व्रतस्नातक ’ होणे शक्य आहे.

उपासना म्हणजे ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याचे साधन आहे. पुढील आठवड्यात चिंतनाच्या वेळी विद्यार्थी आणि व्रतार्थी म्हणून मी कसा आहे , कसे असायला हवे यावर विचार करा असे सुचवतो.

प्रशांत दिवेकर . १८ ऑगस्ट २०१२ ,ज्ञान प्रबोधिनी , सोलापूर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माणूस होण्यासाठी स्वतःला ओळखणे , स्वतः मध्ये बदल घडवण्यासाठी निश्चय पूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात करणे म्हणजे आपण व्रतार्थी होणे . >>> वा वा वा वा, किती सुंदर आणि आचरणीय गोष्टी आहेत या - आपल्यालाही करता येतीलच की..

कामात सहभाग आणि कामातील नियमितता या दोन गोष्टी वरील शाळांतील विद्यार्थांच्या वृत्ती घडणीत महत्वाच्या आहेत असे जाणवले . >>>> मनापासून पटले. हे सर्व खरतर शालेय जिवनात सुरवात करुन आयुष्यभर सतत अमलात आणणे ह्या सदरात मोडले पाहिजे Happy

पु.ले.शु.

मी एकदा प्रा. शिवाजीराव भोसले यांचे याच संदर्भातले भाषण ऐकले होते. ते म्हणाले " मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेत शिकलो. आम्हाला इथल्या वसतीगृहात स्वतःचा स्वैंपाक करावा लागे. यातुन मला स्वावलंबनाचे धडे मिळाले. जर मी पुढे शिकलो नसतो तर एखादी खानावळ चालवण्याइतपत कौशल्य माझ्याजवळ या शाळेमुळे सहजच जाता जाता मिळाले होते.

आजच्या पदवीधराकडे सुध्दा कोणतेही व्यवसाय कौशल्य नसते. परिणामी नोकरीसाठी प्रयत्न करण्याशिवाय पदवीधरांकडे कोणताही पर्याय किंवा आत्मविश्वास नसतो.

या लेखात म्हणल्या प्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेतही विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती अश्या अर्थाची योजना असावी.

अमृता, लेख उत्तम आहेच पण प्रकाश दिवेकर हे मूळ लेखक आहेत का ? तसे असेल तर त्यांना मायबोलीचे सदस्यत्व घ्यायचा आग्रह करा आणि त्यांना स्वतः इथे लिहायला सांगा.
इतरत्र प्रकाशित झालेले लेख, मायबोलीवर, दुव्याच्या रुपात, कानोकानी या सदरात द्यायची सोय आहे.

विद्यार्थी आणि व्रतार्थी होणे म्हणजे विद्याव्रती होणे >> मी शाळेत असताना या प्रक्रियेतून गेलेली आहे म्हणून च हे हे लेखन सर्वांपर्यंत पोचवावे असा मला वाटलं. दोन्ही गुण आत्मसात करायचे म्हणजे सर्वात महत्वाचे आहे कि "नियंत्रण" याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणे. विद्यार्थी शालेय जीवनात इथे नमूद केलेल्या सर्व प्रक्रिया आणि अनुभवामधून गेला तर या सर्व घडामोडींचा त्याला त्या वेळेस नाही पण जेंव्हा विद्यार्थी दशा (theoretically ) संपते त्यानंतर उपयोग होतो..एक उत्तम मनुष्य घडताना उपयोग होतो. कुठल्याही यशस्वी गोष्टीसाठी तिचा पाया पक्का,सुधृढ आणि योग्य असायला हवा असा म्हणतात तेच गणित इथेही लागू आहे कि विद्यार्थी जर योग्य वेळेस व्रतार्थी झाला तर पुढील आयुष्यात कुठल्याही अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्याचे सामर्थ्य त्याला मिळते.

दिनेशदा

प्रशांत दिवेकर हे माझे शाळेतील सर आहेत. ते जे काही लेखन करतात ते मी इलेक्ट्रोनिक माध्यमात आणण्याचा आणि बाकी सर्वांबरोबर share करण्याचा प्रयत्न करते आहे.

त्यांना मायबोली वर account काढण्याची विनंती केलेली आहेच.

आणि पुढल्या वेळेपासून आपण सांगितलेल्या सदरात च लेख देईन. यावेळेसाठी माफी!

अमृता, मूळ लेखकाला इथे सभासद म्हणून यावे या माझ्या आग्रहामागचा हेतू हा आहे कि इथल्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत थेट पोहोचाव्यात आणि त्यांनी थेट प्रतिसाद द्यावे. कुणालाही मायबोलीवर लेखन करणे, अगदी सहजच जमते. त्यात अवघड असे काहिच नाही.

आणि मायबोलीसाठीच खास लेखन व्हावे, हा आग्रह मायबोलीशी असलेल्या बांधिलकीमधून आलाय.