ती वेळच होती वेडी!

Submitted by आर.ए.के. on 26 September, 2012 - 07:11

तो असाच आहे...नक्की कसा आहे ते नाही सांगता येत्.....पण असाच आहे.... स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणारा...थोडासा बेपर्वा, थोडासा हळवा, थोडा स्वच्छंदी , थोडा मनकवडा..... कसाही असला तरी आता तो माझा आहे... माझा नवरा...!
तसा तो माझाच आहे ह्या जाणिवेला मी बर्‍याचदा गृहीतच धरते....पण कधी कधी ती जाणिव मला स्वतःलाच प्रकर्षाने जाणवते...! माहित नाही का पण कधी कधी त्याच्या बद्दल मला वाटणारं प्रेम अगदी उफाळून येत्...आणि मग त्याला ते कळावं यासाठीची धडपड चालू होते. स्वतःत होणार्‍या या बदलांबद्दल जिथे मी स्वतःच अनभिज्ञ असते तिथे त्याला याची जाणिव व्हावी अशी अपेक्षा करणं तसं चुकीच आहे. पण मी ती करते आणि मग त्याने लक्ष नाही दिलं तर त्याच्यावर चिडते...! हे नेहमीच होत्..आत कुठेतरी कळत असतं, हा वेडेपणा आहे, पण मनाला ते मान्य करायच नसतं...अशावेळी त्याने फक्त सोबत राहावं , विनाकारण माझी समजूत काढावी आणि त्याला माझ्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाची कबूली द्यावी असं वाटत असतं...माझी होणारी चिडचिड , छोट्या छोट्या गोष्टींवर माझं नाराज होणं , माझा हळवेपणा हे सगळं फक्त त्याच्या जवळ असण्याने आणि त्याच्या प्रेमाच्या दोन शब्दांने दूर होणार असतं. त्याच माझ्याकडे लक्ष आहे ही जाणिवच माझ्या या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन असते, पण त्याला हे कळणारं कसं..? माझ्यात होणारे हे बदल त्याच्यासाठी अनपेक्षित असतात्..आणि अशावेळी माझं सगळं शहाणपण मीच कुठेतरी गुंडाळून ठेवलेल असतं...आणि ह्यातूनच चहाच्या कपातली वादळं जन्माला येतात...
पण ही वादळं मुळातच फक्त शमून जाण्यासाठीच निर्माण झालेली असतात.
ह्या वादळांमुळे जी उलथापालथ होते, जी हालचाल होते ती एकप्रकारचं चेतन्य निर्माण करते आमच्या नात्यात, उत्साह निर्माण करते, एकमेकांना जवळ आणते!
आज हे सगळ तत्त्वज्ञान सुचत आहे कारण आज माझा वाढदिवस आहे आणि त्याने अजूनही माझ्यासाठी गिफ्ट आणलेल नाहीये.... पण आतून उगाच असं वाटतयं की तो मला सरप्राईज देणार....! आणि मी त्याच्या सरप्राईज ची अगदी आतुरतेने वाट पाह्तेय!
तो मला नेहमी विचारतो तुला मी काय आणू? तू म्हणशील ते ,म्हणशील तेंव्हा तुला द्यायला मी तयार आहे. पण मी काय आणू ते तूच मला सांगत जा ! आधी जेंव्हा तो असं म्हणायचा तेंव्हा मला या गोष्टीची मजा वाटायची. पण अगदी आज माझा वाढदिवस आहे आणि आजही तो मला हाच प्रश्न विचारतो आहे हे पाहून माझ डोक सरकलं! मी रागानेच त्याला म्हणाले (अर्थात तो राग मी त्याला जाणवू दिला नाही) "काहीच नको आणू. एखाद गुलाबाच फूल दिलसं तरी चालेल"! तो म्हणाला "बघ बरं का परत नको चिडूस मी काही दिलं नाही म्हणून !" आता मात्र माझी सहनशक्ती संपली. मी त्याला म्हणाले , " तुला काय आणायचे आहे ते आणं. मला नको विचारू काय आणू म्हणून...नाही काही आणलसं तरी चालेल" यावर तो म्हणाला ," हे बघ , मला खरच नाही कळत ग ह्यातलं काही....तू म्हणशील ते आणून देईन मी तुला ..अगदी कितीही महागडं असलं तरी....पण मला सांग...! ह्यावर माझा पारा अजूनच चढला... आणि एन वाढदिवसादिवशी मी त्याच्याशी अबोला धरला.
वाईट या गोष्टीच नव्हतं की त्याने काही आणलं नाही , वाईट या गोष्टीच वाटत होतं की त्याने मनाने काही आणण्याचा प्रयत्न पण केला नाही. इतके दिवस मला तो रोज विचारायचा तुला वाढदिवसाच काय गिफ्ट आणू? आणि मी काहीच सांगितलं नाही म्हणून याने काहीच नाही आणलं. How rude!
आणि मला सरप्राईजेस आवडतात. गिफ्ट कस आपल्या नकळतच आणलं गेलं पाहिजे अशी माझी ठाम समजूत आहे. उगाच ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं आहे तिला कोणत्या तरी दुकानात घेवून जावुन "घे...तुला काय घ्यायचं आहे ते " असं म्हणणं म्हणजे कर्तव्य म्हणून किंवा पद्धत आहे म्हणून गिफ्ट देण्यासारखं असतं. असं गिफ्ट देण्यात आणि घेण्यात काहीच मजा येत नाही. ह्याउलट ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं आहे त्या व्यक्तीच्या आवडी निवडी लक्षात घेउन मनानेच एखादी वस्तू त्या व्यक्तीच्या नकळत आणून दिली तर घेणार्‍याला आनंद होतोच पण गिफ्ट घेणार्‍याच्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून देणार्‍यालाही आनंद मिळतो. गिफ्ट नेहमी महागडं असण्याची गरज नसते.
गिफ्ट म्हणजे एखादं गुलाबाच फूल पण असू शकतं.
पण हे त्याला नाही कळत.....! आणि ते समजून घेण्याची त्याला गरज नाही वाट्त!
मला प्रचंड राग आला होता....वाईटही खूप वाटत होत.... वाढदिवसादिवशी झालेला हिरमोड खूपच बोचत होता.
त्याने खूप प्रयत्न केले माझ्याशी बोलण्याचे, माझी समजूत काढण्याचे.....पण मी काहीच एकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी त्याने पण प्रयत्न सोडले आणि माझ्याशी अबोला धरला!
दुपार पर्यंत आम्ही एकमेकांशी बोललोच नाही. शेवटी पुन्हा तोच आला आणि म्हणाला " मी संध्याकाळ्च्या शो ची तिकिट्स बूक केली आहेत. आपण जाउया पिक्चर पाहायला "
खर तर त्याने सांगितलेली एकही गोष्ट एकायची नाही असं मी ठरवल होतं. पण मला माझा वाढदिवस एवढा horrible जायला नको होता म्हणून मी तयार झाले. Atleast उद्या मी ऑफिसमधे सांगू तरी शकेन..वाढदिवसादिवशी आम्ही पिक्चर पाहिला म्हणून!
वीकेंड असल्या कारणाने आ़ज प्रचंड गर्दी होती. संध्याकाळचा शो असल्याने जेवण पण बाहेरच करणार होतो. ह्या सगळ्यात आम्ही एकमेकांशी बोलत नव्ह्तो. मल्टीप्लेक्स च्या कलकलाटातून वाट काढून आम्ही एका हॉटेल मध्ये येवून बसलो. शो सुरु व्हायला अजून दीड तास होता. आम्ही खाण्याची ऑर्डर दिली.
आता मात्र तो सरसावून बसला. माझा हात हातात घेवून तो हळूवार पणे म्हणाला , " Happy birthday!" सकाळ पासून त्याने मला विश सुद्धा केलं नव्हतं! त्याने बोलायला सुरुवात केली.(आणि जेंव्हा तो बोलायला लागतो तेंव्हा माझा विरोध गळून पडतो!)
" I am sorry! तुझा वाढदिवस एव्हढा वाईट पद्धतीने वाया घालवला आपण! पण मी काय करू गं? मला नाही जमत तुला असे सरप्राईजेस द्यायला! लहानपणी मला जे हवं असायचं ते मी आई-बाबांकडून मागून घ्यायचो. मोठेपणी मित्राची एखादी वस्तू आवडली तर ती त्याला विचारून घ्यायचो त्याला माझी एखादी वस्तू आवडली तर देऊन टाकायचो. हे गिफ्टस देणं वगेरे कधी केलच नाही त्यामुळे तुला काही आणताना प्रश्न पडतो. आणि मागे एकदा नाही का चेन्नई वरून येताना तुला हातातलं कडं आणलं तर ते तुला मनगटाएवजी दंडात आलं! मी एखादि गोष्ट आणली आणि ती तुला नाही आवडली तर काय ही भिती सुद्धा असतेच मनात , म्हणून मी तुला म्हणतो तू हव ते माग, मी देईन!
ह्यामागे मला गिफ्ट आणायचा कंटाळा आहे, मला त्यात इंटरेस्ट नाहिये किंवा मला पेसे वाचवायचे आहेत असा उद्देश नसतो गं....खरचं नसतो..! कदाचित आत्तापर्यंत मी त्या गोष्टीत लक्ष घातल नाही म्हणून असेल्....मला ते जमत नाही.
पण आज तुझ्या वाढदिवसादिवशी मी तुला प्रॉमिस करतो की मी या गोष्टीत लक्ष घालेन आणि पुढच्या वर्षी तुला मस्त गिफ्ट आणेन! " एव्हढं बोलून तो गोड हसला!

बास ! काय बोलणार ह्यावर? तो अगदी मुद्देसूद पणे त्याचा पॉईंट पट्वून देतो आणि मला ते पटतं....(मला पटवून घ्यायच नसलं तरीही...) खरंतर त्याचा हाच मुद्देसूदपणा आवडतो मला. तो तसा वागतो पण त्यापाठीमागे त्याची काही कारणे असतात..! त्यामुळे त्याने नीट समजावून सांगितल्यावर मला त्याची कारणे पटतात! आता माझी मलाच वाटायला लागलं, काय बिघडलं असतं जर मी त्याला एखादी वस्तू आणायला सांगितली असती तर? आजचा दिवस एव्हढा वाईट नसता गेला. मी उगाच ताणून धरलं! आणि मग अचानक मला "ती" जाणिव प्रकर्षाने झाली. नेहमीप्रमाणे गोड बोलून त्याने माझ्यावर गारूड केलं होतं...मला पुन्हा एकदा जिंकलं होत....(की मला हरवलं होत??). मी पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले होते...

पण हे नेहमी असचं होतं.....तो नेहमी मला हरवतो....This is not fair ! एकीकडे मला असं वाटत तर दुसरीकडे वाट्तं त्याच्यासाठी काहीपणं...! त्याच्या या बोलण्यानंतर मला सलील कुलकर्णींच एक गाण आठवलं,
मी फसलो म्हणूनि ह्सू दे वा चिडवू दे कोणी,
ती वेळचं होती वेडी अन नितांत लोभसवाणी!!

आता बघूया पुढचा वाढदिवस कसा साजरा होतो ते...! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हे...?? आमच्यात पण हे अगदि असच सुरु असत...:) खुप छान लिहिलय्...

चला म्हणजे मी एकटी नाही आहे, हे दु:ख बरचस युनिव्हरसल आहे तर... हे ह्या गोष्टीमुळे समजल.
धन्यवाद, आर के>>>>>>>+१

बायको आणि माझ्या निवडीत जमीन अस्मानचा फरक आहे. त्यामुळे सरप्राईज वगैरेचे नाटक लग्नाच्या २ वर्षातच बंद झाले. एखाद्या रकमेचा आकडा मी ८ दिवस अगोदरच घोषीत करून टाकतो आणि तीला शॉपिंगला सोडून देतो.

छान!!

Pages