महाभारतातील आसाम

Submitted by गारम्बीचा बापू on 24 September, 2012 - 22:01

महाभारताच्या घटनाक्रमात सर्व पांडव व कुंती कचापर्यंत पोहोचले. तो आसामशी आलेला पहिला संबंध नजरेत भरतो. नंतर श्रीकृष्णाच्या दोन स्वा-या झाल्याचे कळून येते. पहिली स्वारी नरकासुराच्या वधासाठी प्राक्ज्योतिषपूरवर व दुसरी तेजपूरच्या (शोणितपूर) बाणराजावर. अर्जुनाच्या स्वा-या तीन. पहिली मणिपूपर्यंत (चित्रांगदेशी विवाह), दुसरी प्राक्ज्योतिषपूरच्या भागदत्तास आव्हान दिले ती व तिसरी अश्वमेध यज्ञासाठी मणिपूपर्यंत. या सर्वाना गंगा-ब्रह्मपुत्रा हा जलमार्गच सोयीचा होता.

आसामच्या इतिहासावर एक ओझरती नजर टाकली तरी महाभारताने तिथे आगळा इतिहास घडवून आणल्याचे प्रकर्षाने जाणवते. रामायणाचे कथानक उत्तरेकडून दक्षिणेकडे तर महाभारताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत जाते. यात बराच अर्थ भरलेला दिसतो. एक तर साम्राज्यविस्ताराची दिशा कळून येते. दोन्ही मिळून संपूर्ण भरतखंड व्यापतात. एवढेच नव्हे तर विशिष्ट वैष्णव संस्कृतींचा प्रसारही घडवून आणतात. मनोवेधक अद्भुत कथा नव्या मातीत व मनांत पेरत जायचे व तिथे त्या जशा उगवतील तशा स्वीकारायच्या हे हिंदू धर्माचे धोरण त्यामध्ये दिसून येते.

महाभारत फ्लॅशबॅक पद्धतीने सादर होते. अभिमन्यूचा नातू जन्मेजय याला ते वैशंपायनाने कथन केले. पण आसामसंबंधीच्या घटनांचा विचार प्रस्तुत असल्यामुळे प्रारंभ ययातीपासून न करता कंसवधापासून केला. त्यातही आधी काय व नंतर काय घडले, या ऐतिहासिक दृष्टीला प्राधान्य देऊन फक्त महत्त्वाच्या घडामोडींचा क्रम लावला. तो सोबत जोडलेला आहे. असा प्रयत्न विवाद्य राहणार. कारण त्यात महाभारतकथेवर काही पुराणे, तंत्रग्रंथ, स्थानिक दंतकथा यांचे झालेले संस्कार विचारात घेतले आहेत.

इथे आसाम शब्दात संपूर्ण ईशान्य भारत अभिप्रेत आहे. आज त्यात सात राज्ये असली तरी ब्रिटिशकाळात त्याला आसामच म्हटले जाई. देशाच्या फाळणीमुळे हा प्रदेश भारताच्या मुख्य भूमीपासून बराचसा तुटलेला असला तरी प्राचीन काळापासून संलग्न होता. त्याच्या सीमा सुस्पष्ट होत्या. ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश उत्तर, दक्षिण व पूर्वेकडे पर्वतराजींनी वेढलेला आहे. गारो टेकड्यांना वळसा घालून दक्षिणेकडे वळणारी ब्रह्मपुत्रा आणि उत्तरेकडून पद्मा नदीला म्हणजे एकत्रित गंगा-ब्रह्मपुत्रेला येऊन मिळणारी करातोय नदी एकेकाळी आसामची पश्चिम सीमा होती. गंगा-ब्रह्मपुत्रा हा जलमार्ग असून त्यांच्या उपनद्यासुद्धा वापरातल्या जलमार्ग होत्या. या प्रदेशाला प्राक्ज्योतिष व नंतर कामरूप म्हटले जाई. तो वैदिक आर्याच्या दृष्टिपथात होता. गृह्यसूत्रात त्याचा उल्लेख प्राक्ज्योतिष असा येतो. पण तेव्हा तो शब्द उगवत्या सूर्याचा प्रदेश या अर्थाने होता. वैदिक वाङ्मयात त्याला व्रात्यांची भूमी म्हटले आहे.

ईशान्य भारताइतकी वांशिक, भाषिक, भौगोलिक, धार्मिक व सांस्कृतिक विविधता देशात अन्यत्र कोठेही आढळणार नाही. येथे आपसात संघर्ष होते. तरी याच प्रदेशाच्या पहाडी भागातील मंगोलॉइड जनजाती, मैदानी प्रदेशातील आसामीभाषी व आहोम या जनसमुदायांनी इस्लामी आक्रमणाशी निकराचा लढा दिला. ११८६ ते १२०६ या वीस वर्षात घोरींचे राज्य गझनीपासून बंगालपर्यंत पसरले. बख्त्यार खिलजीने नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला, बिहार गिळला व बंगालचा शेवटचा हिंदू राजा लक्ष्मणसेन याला संपविले (११९८). नंतर त्याने (१२०६) आसाममधून चीनवर स्वारी करण्याचे मनसुबे रचले, पण त्याचे सर्व सैन्य कामरूपने कापून काढले. बख्त्यारचा मृतदेहही सापडला नाही. त्यानंतर मुसलमानांनी आसाम जिंकण्यासाठी निकराने प्रयत्न चालू ठेवले. १२०६ ते १६७० या काळात आसामने एकूण सतरा इस्लामी आक्रमणांना प्रभावीपणे तोंड दिले व इस्लामी राज्याला आपल्या प्रदेशात कायमचा थारा मिळू दिला नाही.

ईशान्य भारतातील भिन्न भिन्न जनसमुदायांना एकत्र येऊन जिद्दीने लढण्याची स्फूर्ती देणारा सामायिक स्रेत होता तो धर्माचा. ते स्वत:ला हिंदू म्हणविणारे होते. हे एक लक्षणीय ऐतिहासिक घटित असून भारतीय इतिहासात त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही, याची आसामी इतिहासकारांना खंत वाटते.

एक इतिहासकार म्हणतो,

...there is probably no part of India about whose past less is generally known. In the history of India, as a whole, Assam is seldom mentioned, and few writers are found to have devoted more than dozen lines to the treatment of the history of this provience. - N. N. ACHARYYA, 1966

बौद्धांसारखे धर्मप्रचारक हिंदूंकडे नव्हते. तरी हे आश्चर्य घडून आले याचे कारण ते महाभारताने घडवून आणले. हे दाखवून देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. महाभारताच्या घटनाक्रमात सर्व पांडव व कुंती कचापर्यंत पोहोचले. तो आसामशी आलेला पहिला संबंध नजरेत भरतो. नंतर श्रीकृष्णाच्या दोन स्वा-या झाल्याचे कळून येते. पहिली स्वारी नरकासुराच्या वधासाठी प्राक्ज्योतिषपुरवर व दुसरी तेजपूरच्या (शोणितपूर) बाणराजावर. अर्जुनाच्या स्वा-या तीन. पहिली मणिपूपर्यंत (चित्रांगदेशी विवाह), दुसरी प्राक्ज्योतिषपूरच्या भागदत्तास आव्हान दिले ती व तिसरी अश्वमेध यज्ञासाठी मणिपूपर्यंत. या सर्वाना गंगा-ब्रह्मपुत्रा हा जलमार्गच सोयीचा होता. बंगालमधून झालेल्या सर्व इस्लामी स्वा-या याच मार्गाने झाल्या. शिवाय नद्यांच्या दोन्ही किना-यांवरून रस्ते उपलब्ध होते.

आता उलट दिशेने पाहिले असता भागदत्त व जैतियांचा राजा, हे दोघे राजसूय यज्ञात पांडवांच्या बाजूने हजर होते. पण पुढे अर्जुनाने दिग्विजयाच्या वेळी त्याला आव्हान दिल्यामुळे भागदत्त भारतीय युद्धात कौरवांच्या बाजूने लढून मरतो, पण आसामात अमर बनतो. आसामच्या इतिहासावर झालेला त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे.

पांडवांना पूर्व दिशेवर लक्ष केंद्रित करावे लागले. कारण त्यांचे मुख्य शत्रू-विरोधक तिकडे होते. त्यांना पराभूत करून मांडलिक बनवणे व प्रसंगी राजकीय विवाह रचून युती पक्की करणे, ही शिष्टसंमत राजनीती होती. सत्तासंघर्षाचा खेळ होता. भारतीय युद्धातसुद्धा सत्पक्ष-असत्पक्ष असा भेद नव्हता. पांडव जिंकले म्हणून त्यांना सत्पक्षी ठरविण्यात आले. जास्त राज्ये कौरवांच्या बाजूनेच लढली. गुजराथ, मध्य प्रदेश, गंगा-यमुनामधील पांचाळ, सातपुड्याच्या पश्चिमेकडील विराट पांडवांकडे होते. पंजाबातील मद्रदेश अनुकूल असला तरी सिंधचा जयद्रथ शत्रू होता. वायव्य सरहद्दीकडून धोका नसला तरी गांधार कौरवांच्या बाजूला होता. रुक्मिणीहरणानंतर विदर्भ व जरासंध वधानंतर मगध पांडवांच्या बाजूला आले, पण मगधला लागून असलेले अंग तर कर्णाचे राज्य. अंग, वंग, कलिंग, कुंद्र ही पूर्वेकडील बाणराजाच्या पुत्रांनी स्थापन केलेली दैत्य राज्ये पांडवांची शत्रू होती. कोसल म्हणजे अवधचा संबंधसुद्धा दैत्यांशी जोडला जातो. महाभारतात वैष्णव-वैदिक संस्कृती न मानणा-या पूर्वेकडील पांडवविरोधी राज्यांना दैत्य म्हटले आहे. ही राज्य शिवभक्त आहेत.

दैत्यांखेरीज पांडवांना परके असलेले तीन जनसमुदाय होते. निषाद, नागच, किरात.

निषाद हे येथील ऑस्ट्रॉलॉइड, भिल्ल, गोंड वगैरे वनवासी. नाग म्हणजे नागपूजक वन्य जमाती. किरात हा शब्द मंगोलॉइड लोकांसाठी वापरलेला आहे. ईशान्य भारतात हिमालयाच्या पायथ्याशी राहणारे. निषाद व नाग शत्रू नसले तरी पांडवांना परके व खालच्या दर्जाचे आहेत. लाक्षागृहात कुंती व पांडव जळून मेले असे भासविण्यासाठी सहा निषाद व्यक्तींचा बळी दिला गेला. अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरवण्यासाठी एकलव्याची करियर बरबाद करण्यात आली. असे प्रकार आजही घडतात. शेती, नागरीकरण, रस्ते, सुरक्षा यासाठी जंगलतोड अपरिहार्य होती. म्हणून खांडववन जाळण्यात आले. पण त्यापूर्वी त्यातील वनवासींना विश्वासात घेता आले नसते का? विकासविरुद्ध विकासपीडितांचे जीवन, हा प्रश्न आजही नीट सोडवला जात नाही. खांडववनाच्या आगीतून वाचलेल्या तक्षकाने अखेर सूड उगवला. त्यात निरपराध परिक्षिताचा बळी गेला. नागपूजक संख्येनेही मोठय़ा प्रमाणावर होते. म्हणून अखेर नागपूजेला शैव व वैष्णवांनी आपल्या धर्मात सन्मानाने सामावून घेतले. कसे ते सांगण्याची आवश्यकता नाही. किरातांना महाभारतात मान आहे. त्यांच्या परंपरांचा आदर केला जातो. त्यांच्याशी सोयरिक होऊ शकते. अर्जुनाला पाशुपत अस्त्र देणारा शिव मंगोलॉइड रूपात प्रकटतो. दुर्दैवाने या शिवाच्या मंगोलॉइड चेह-याला शिल्प व चित्रकलेने कधीच स्वीकारले नाही. घटोत्कचाचे उदाहरण अत्यंत हृदयद्रावक आहे. अर्जुन वाचला पाहिजे म्हणून त्याचा बळी आवश्यक होता. आजच्या शब्दात घटोत्कचाला ‘कॅनन फॉडर’ बनवण्यात आले. पण महाभारत अशा गोष्टी लपवून ठेवत नाही.

आसामवरील सतरा इस्लामी आक्रमणे

१) १२०६ = बख्त्यार खिलजी

२) १२२७ = घियासुद्दीन तुघलक

३) १२५७ = तुघ्रिलखान

४) १३३७ = मुहम्मदशाह

५) १४९८ = पश्चिम आसाम तात्पुरता काबीज.

६) १५२७

७) १५३१

८)१५३७ = पहिल्या आहोम राजाने तिन्ही आक्रमणे परतवून लावली. आसामींचा भरपूर फायदा झाला. तोफा व बंदुका चालवायला ते शिकले.

९) १५६८ = युद्धनौकांचा पहिला हल्ला, पण धुव्वा.

१०) १६१५ = नौदल-घोडदळ-पायदळ पराभूत.

११) १६१९ = शत्रूचा तात्पुरता विजय

१२) १६३५ = हल्ला परतवला

१३) १६३५ = पुन्हा हल्ला. सराईघाटच्या लढाईत विजय

१४) १६३७-३८ = दोन्ही पक्ष थकल्यामुळे तात्पुरती सीमारेषा ठरली.

१५) १६६२ = मीरजुमलाला प्रथम यश पण शत्रूची हकालपट्टी.

१६) १६६९-७० = रामसिंगाची मोहीम. त्याच्या पदरी अपयश

१७) १६८२ = मदाधर सिंहने गोहाटीहून मोगलाना हाकलून लावले.

मूळ सन्कल्पना-दिलीप बाळकृष्ण लाड (दामोदर गुरुजी प्रतिष्ठान}
''प्रहार'' या दैनिकात पूर्व-प्रकाशित
येथे पूर्व परवानगी ने प्रकाशित

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती आहे पण फारच विस्कळीत स्वरूपामधे आहे. थोडे व्यवस्थितरीत्या मुद्दे मांडले असते तर वाचायला सोपे गेले असते.

बापु,

उत्तम माहिती.
बारा लढायानंतर वाचलेला आसाम आता पुरता घुसखोरांच्या हातात गेलेला आहे.

शेवटची १३ वी लढाई म्हणुन आसाम गणसंग्रामचा लढा लिहीण्यास हरकत नसावी.

माझी एक शंका -
पश्चिमेकडे ( गांधारापलिकडे) साम्राज्यविस्तार का बरे केला नसावा कुणीच? की तेव्हा पण तिथल्या लढाऊ जमातीना हरवणे आपल्याला शक्य होत नव्हते? त्यावेळी सहाजिकच मुस्लिम धर्म बनला नव्हता मग कोण होते ते लोक? आर्य? भटक्या जमाती?

मला वाटते आपले शंका निरसन करण्यास बापूसाहेब उपलब्ध नाहीत ,कारण सदराचा आयडी बंद असावा असा कयास आहे .

गांधार पलीकडे हिंसक लुटारू टोळ्यांचे अस्तित्व होते. तरीही सम्राट विक्रमादित्याने सध्याचे इराण ,सौदी इत्यादी प्रदेशावर आपला अंमल बसवला होता.

मुख्य म्हणजे इतर परदेशी/सत्ताकांक्षी राज्यकर्त्या प्रमाणे विक्रमाने तेथे लूट / अत्याचार केले नाहीत, तर आपल्या दरबारातील अनेक तंत्रज्ञ /वकील आणि शिक्षक सौदीला पाठवून तेथील प्रजेला उत्तम राज्यकारभार कसा करावा,याचे प्रशिक्षन दिलेले होते .

यासंबंधी उल्लेख अनेक जुन्या फारसी काव्यात तसेच मक्केतील शिलालेखात आहेत,असे मागे वाचले होते .......

धन्यवाद...

उत्तम माहीती आहे. सराईघाटाच्या लढाईचा उल्लेख केला आहे.परंतु लचित बदफुकन यांचा उल्लेख नाही. त्यामुळे लेख अपूर्ण वाटतो.

लचित बदफुकन यांनी शिवाजी महाराजांशी संधान बांधले होते असं बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या एका व्याख्यानात ऐकल्याचे स्मरते. कुणास अधिक माहीती असेल तर ती कृपया सांगणे.

-गा.पै.