जुलै २०११ ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा मी त्यावेळी इच्छा असतानाही पाहू शकलो नव्हतो. नंतर एकदा डीव्हीडी वर पाहिला आणि काल पुन्हा एकदा. आधी पाहिला तेव्हा 'बरा' वाटलेला हा सिनेमा काल शांतपणे पाहताना एक वेगळीच अनुभूती मिळाली.
'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' हे नाव सिनेमाचं सार स्वत:च सांगतं.
रोजच्या धावपळीने आपल्यातील काही जण जगण्यापुरती 'सोय' करू शकतात, काही 'आज'सोबत 'उद्या'साठीही तजवीज करतात तर काही आज-उद्या-परवा सगळ्याची सोय लागलेली असतानाही अजून सुखकर व सुरक्षित आयुष्यासाठी - ज्याला काहीच निश्चित मर्यादा नाही - झिजत राहातात. (काही असेही असतात जे काहीच करत नाहीत, ते जिवंत आहेत ह्यावर माझा विश्वास नाही) ह्या धकाधकीत खरोखरच मला, स्वत:ला नक्की काय हवं आहे? माझ्यासाठी एक मनस्वी आनंद मिळण्याची/ मिळवण्याची गोष्ट काय आहे ? आज मी जे काही करतोय, तेच मला हवं होतं का ? हवं आहे का ? उद्या मी जे काही करणार आहे, त्याचा 'आज' हा पाया असेल तर तो माझ्या मनात भक्कम आहे का ? असे अनेक प्रश्न हा सिनेमा कुठलंही अतिरंजन न करता एका चंचल मनात निर्माण करतो आणि अखेरच्या दृष्यात निर्भेळपणे हसणाऱ्या तीन तरुणांच्या डोळ्यांत 'आता मी जगणार आहे..' ह्या भावनेने जी चमक दिसून येते, तिचा हेवा वाटतो !
इम्रान (फरहान अख्तर), कबीर (अभय देओल) आणि अर्जुन (हृतिक रोशन) ह्या तीन मित्रांची ही कहाणी. तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहाणारे हे तिघे मित्र, कबीरचं लग्न ठरलं असल्याने Bachelor's Trip च्या निमित्ताने स्पेनला भेटतात. ट्रीप ही असते की तिघांनी आपापल्या मर्जीचे तीन वेगवेगळे Adventure Sports निवडायचे आणि तिघांनी एकत्र ते करायचे. बाकी कहाणी सांगण्यात, सिनेमा जुना असल्याने व बहुतेक जणांनी पाहिला असायची शक्यता असल्याने आवश्यकता वाटत नाही. पण ह्या सहलीत टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या अनुभवांतून, भेटणाऱ्या व्यक्तींकडून हे तिघं मित्रं स्वत:च स्वत:ला हळूहळू ओळखू लागतात आणि सहलीच्या शेवटापर्यंत त्यांच्यात आमुलाग्र बदल घडतो.

आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारे 'आनंद - बावर्ची - मिली' पासून 'आशायें - बर्फी' पर्यंत अनेक सिनेमे झाले. त्यातील बहुतेक सिनेमे असे होते की कुठल्याही पिढीच्या व्यक्तीला 'पटतील'. 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' तसा नाही. कदाचित माझ्या वडिलांची पिढी ह्या सिनेमाशी नातं नाही जोडू शकणार. कारण ह्यातील बहुतेक संज्ञा (Concepts) आजच्या पिढीच्या आहेत. सिनेमातील पात्रांचे विचार, संवाद कुठेच कुठलं कालजयी तत्वज्ञान सांगत नाहीत. संपूर्ण 'फोकस' 'आज'वर आहे.
जावेद अख्तर ह्यांच्या कविता ह्या सिनेमात खूप महत्वाचं स्थान घेतात.
हवा के झोकों जैसे आज़ाद रहना सीखो,
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो,
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें,
हर एक पल, एक नया समां देखें ये निगाहें..
अश्या शब्दांतून जावेद साहेब आजच्या पिढीशी थेट संवाद साधतात. मी वर उल्लेख केलेली Generation Gap जावेद साहेबांना लागू होत नाही, तेव्हा समजतं की 'जे न देखे रवी..' का म्हटलं जातं.
एक चित्रकार त्याच्या कॅनव्हासवर व्यक्त होतो, एक गायक त्याच्या मैफलीत व्यक्त होतो आणि एक कवी त्याच्या शब्दांतून.. प्रत्येक कलाकार त्याच्या सृजनातून व्यक्त होत असतो. तसाच एक दिग्दर्शक त्याच्या सिनेमातून व्यक्त होतो. सिनेमा संपल्यावर जेव्हा एक चित्र - एक मैफल - काव्य पूर्ण झाल्याची अनुभूती येते, तेव्हा तो सिनेमा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं मी मानतो.
'ज़िंदगी'ला 'ज़िंदगी'ने दिलेली 'ज़िंदगी'ची भेट अनुभवायची असेल तर 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' अवश्य पाहावा. आजची पिढी नक्की काय आहे ? हे समजण्यासाठी 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' पाहावा.
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहें हो तो ज़िन्दा हो तुम,
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो तो ज़िन्दा हो तुम.
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/zindagi-na-milegi-dobara.html
खुप वेळा पाहिला आहे...डायलोग
खुप वेळा पाहिला आहे...डायलोग पाठ झालेत...

कधी न्व्हे ते कॅट पण आवडली थोडी...
मला उडे...आसमाँ मै खाबो के परिंदे ...ह्या गाण्यामधे घोडे पळताना दाखवल्याचा जो सीन आहे तो प्रचंड आवड्तो.....
कदाचित माझ्या वडिलांची पिढी
कदाचित माझ्या वडिलांची पिढी ह्या सिनेमाशी नातं नाही जोडू शकणार. >>>>> +१० माझ्या बाबांना पण फार अपील नाही झाला हा पिक्चर.....
जुलै २०११ ला प्रदर्शित झालेला
जुलै २०११ ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा मी त्यावेळी इच्छा असतानाही पाहू शकलो नव्हतो
व्हेरी सॅड.. मोठ्या पडद्यावर अतिशय सुंदर दिसतो हा चित्रपट. मी दोनदा पाहिला. आणि नंतर डिविडी विकत घेतली. आता अधुनमधुन पाहत राहते. अतिशय सुंदर चित्रपट.
'सॅनोरिटा' यातलच गाणय
'सॅनोरिटा' यातलच गाणय न?
स्वछंदी, मोकळ मोकळ वाटल होत.... (मूव्ही पाहून सुध्दा ! )
एकदम पटेश!!! मी हा सिनेमा
एकदम पटेश!!!
मी हा सिनेमा थेटर मधे जाउन पाहिला. आणि एकदम भारावुन गेले. काही तरी न सांगता येणारे गवसले होते. ह्रितिक रोशन मधे मला माझा नवरा दिसु लागला. किती काळ असं पळत, दुसर्यांच्या अपेक्षा पुर्ती चं ओझं आपल्या मनावर बाळगत रहाणार? कधी ना कधी आपले आपण असणं गरजेचं आहेच ना.... हे आपलं असणं आजकाल शोधायला लागतं हेच तर दुर्दैव आहे... हेच आजकालचं आयुष्य आहे...
खुप अंतर्मुख केलं ह्या सिनेमाने... खुप विचार करायला लावला.... नवर्याला आर्थातच हा सिनेमा सामान्य वाटला. खुप चर्चा करुन शेवटी "तु वेडी आहेस.. रडतेस कसली सिनेमा पहाताना" ही कोमेंट ऐकायला मिळाली!!!
अचानक पणे काही कारणास्तव मला होस्पिटल मधे रहायला लागलं मागच्या महिन्यात अगदी २-३ दिवस. एक छोटं ओप्रेशन करायला लागलं. त्या वेळेस ते ३ दिवस आम्ही दोघ एकटे होतो सकाळ संध्याकाळ... अचानक हा सिनेमा पहायची सणक आली.... 'तुझे नेहेमीचे चाळे.." असं म्हणत नवर्याने लॅपटॉप वर लावुन दिला. त्याच्या नकळत तो ही त्यात गुंतत गेला. सिनेमा संपला तेंव्हा नवर्याचं मत सिनेमा बद्दल खुप बदललं होतं. आणि खरं सांगते... अजिबात अतिशियोक्ती नाही... गेले महिना भर तो अगदी वेळेवर ऑफीस मधुन निघतो, एक दोन पोर्ट्फोलियो पण हाता खालच्यांना डेलीगेट केले आहेत..... त्याच्या नकळत तो ह्या प्रोसेस वर विचार तरी करायला लागला.... हे ही नसे थोडके.....आर्थात हे त्या सिनेमा चं श्रेय आहे हे तो मान्य करणार नाहीच.... तरीही परिणाम नकळत पणे होतो आहे....
छान लिहिलं आहे....
@ मो. कि. मी. ,
@ मो. कि. मी. ,
मो कि मी, सहीच. मला सिनेमा
मो कि मी,
सहीच.
मला सिनेमा आवडला पण भारावून वैगेरे जायला झालं नाही.
अनुमोदन रसप. लेख आवडला. हा
अनुमोदन रसप. लेख आवडला.
हा सिनेमा मला प्रचंड आवडला होता.कुणीकुणी नाक उडवलं, श्रीमंत पोरांचे श्रीमंती चाळे म्हणून,पण मी demoralise झाले नाही. .
कारण जावेदची कविता,स्वगतांसारखी झुळझुळणारी, कोणत्याही एका वयोगटापलिकडच्या शाश्वताकडे नेणारी. झोयाची प्रसन्न टवटवीत मांडणी त्या आशयाला उचलून धरणारी. अन त्या आशयाशी एकरूप झाल्यामुळे फुलारलेली देहबोली प्रमुख स्टारकास्ट्ची. नेत्रसुखदायी लोकेशन्स.
मनाला विश्रांती नुसती. सुखस्वप्नांच्या पूर्तीची दिवास्वप्नं..
ह्या सिनेमात काय आहे
ह्या सिनेमात काय आहे पहाण्यासारखे हा एक मोठाच विनोदी विषय आहे!
रसप. आम्हा दोघानाही हा
रसप. आम्हा दोघानाही हा चित्रपट खोलवर स्पर्शून गेला..
या सिनेमा पासून प्रेरणा घेऊन माझ्या नवर्याने २२ वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. एक महिन्याचा वेळ काढून तो भारतात गेला . लहानपण च्या मित्रांना , लांबलांब च्या नातेवाईकांना, त्याच्या हयात नसलेल्या वडिलांच्या हयात असलेल्या मित्रांना आवर्जून भेटला. त्यासाठी त्याला ट्रेन्,विमान,कार ने महिनाभर निरनिराळ्या शहरांतून हिंडावे लागले. पण एकदम रिफ्रेश होऊन परत आला. आता त्याच्यापासून प्रेरणा मिळून त्याचे इथले मित्र ही अश्याच योजना आखण्याचा प्रयत्न करत आहेत.
वेळ नाही या कॉमन सबबी खाली आपण सर्वच कधीनकधी सोप्या साध्या ,लहान लहान आनंदाला आपल्यापासून लांब ठेवतो.
वर्षू नील - प्रतिसाद खूप
वर्षू नील - प्रतिसाद खूप आवडला आणि पटला.
खुप छान चित्रपट. यातल
खुप छान चित्रपट. यातल 'खाबोंके परिंदे' माझ अतिशय आवडीच गाण.
वेळ नाही या कॉमन सबबी खाली
वेळ नाही या कॉमन सबबी खाली आपण सर्वच कधीनकधी सोप्या साध्या ,लहान लहान आनंदाला आपल्यापासून लांब ठेवतो.>>>>
अगदी अगदी... मी वर लिहिलच आहे.... फरक पडतोय निश्चीत..... खरच कधी कधी नकळत होत असतं....
मला पुर्वी असं व्हायचं. करीयर करीयर करत खुप काही गोष्टी मागे पडल्या. मग वेळीच सावरले.... मुलीचं लहान पण पुर्ण अनुभवलं. ती मोठी झाल्यावर मग परत सुरुवात केली. पण तीही मर्यादेत..... किती पळायचं हे आपणच ठरवायचं असतं.
तुमच्या ह्यांचं कौतुक आहे.....