बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: ऑगस्ट , २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 21 September, 2012 - 00:03

मंडळी नमस्कार!
बघता बघता ऑगस्ट महिना उजाडला. माझ्या अध्यक्षपदाचे १ वर्ष संपले. ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणण्याऐवजी अर्धा भरलेला आहे असे मानणारा माझ्यातला आशावादी म्हणतो की अजून एक वर्ष बाकी आहे. या गतवर्षामधील एकंदरीत कामाचा आढावा घेतला तर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कामकाजात उत्तम प्रगती आहे. येत्या वर्षभरात त्यातील बऱ्याच नवीन उपक्रमांना मूर्त स्वरुप येईल.
एकंदरीत अमेरिकेतले, प्रामुख्याने ईस्ट कोस्टवरचे उन्हाळ्याचे महिने मला खूप भावतात. शाळा कॉलेजला सु- असल्यामुळे मुलं घरी असतात. दिवस मोठा असल्याने बाहेरचे अनेक कार्यक्रम वाढतात. उदाहरणार्थ- वीकेंड्सना ऑऑड, समुदकिनाऱ्याला सहली, आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्यांच्या ग्रॅज्युएशन पार्टीज. मी कॉलेजमध्ये असताना मात्र जुलै महिना म्हणजे मुसळधार पाऊस हे समीकरण ठरलेले. पावसामुळे लोणावळ्यातला भुशी डॅम भरून वाहू लागल्याची बातमी आली रे आली की लगेच मित्रांबरोबर लोणावळ्याची सहल. भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पावसात भिजून तिथेच भाजलेले कणीस खाणे म्हणजे स्वर्गसुख. पण यंदा महाराष्ट्रात काय किंवा अमेरिकेतही काय, पाऊस औषधाला सापडेल तर शपथ. ढगातले पाणी पळाले म्हणून सर्व लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
यंदाच्या उन्हाळी सुटीतले आणखी एक आकर्षण म्हणजे लंडनचे ऑलिम्पिक्स. वर्णभेद, जातिभेद, सीमावाद विसरून वैयक्तिक आणि सांघिक कौशल्याचा एक महान आविष्कार. गेल्याच महिन्यात ऑलिम्पिक्सचा उद्घाटन सोहोळा बघत होतो. डॅनी बॉइलने कार्यक्रम उत्तम सादर केलाच पण मला सर्वात एक गोष्ट भावली ती म्हणजे शेवटी ऑलिम्पिक्सची ज्योत पेटवायला टीनएजर्स आणि नवोदित खेळाडू होते. ते बघून मनात चट्कन विचार आला की बृहन्महाराष्ट्र मंडळाने उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृतीची ज्योत अशीच तेवत ठेवायची असेल तर आपल्या कार्यक्रमातून, अधिवेशनातून आपल्या युवा पिढीने सहभागी होणं हेही तेवढंच गरजेचं आहे. त्यांच्या अभिरुचीचे उपक्रम आपल्याला हाती घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच की काय, बृ. म. मंडळाच्या मराठी शाळेतल्या तसेच इतर मराठी बोलणाऱ्या मुलांसाठी लवकरच आपण वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करत आहोत. त्याबद्दल अधिक माहिती तुम्ही पुढच्या अंकात वाचालच. या कार्यक्रमाच्या अंतीम फेरीतील स्पर्धक २०१३च्या प्रॉव्हिडन्स अधिवेशनात आपल्या खांद्याला खांदा लावून सहभागी होतील.
अधिवेशनाची तयारी जोरात चालू आहे. निधी-संकलन व कार्यक्रमांच्या आयोजनासाठी उत्तर अमेरिकेतून तसेच भारतातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार. यंदा काहीतरी वेगळं, भव्य, दिव्य तरीही भावनिक ओलावा असलेलं, ऋणानुबंध हे सूत्र असलेलं आपलं अधिवेशन अनुभवताना झाले बहु होतील बहु परंतु या सम न हा हे विचार खचितच तुमच्या मनात घोळतील.
या अनोख्या अधिवेशनातले प्रमुख आकर्षण म्हणजे सारेगम स्पर्धा. उत्तर अमेरिकेतल्या गानसेनांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उत्तर अमेरिकेतल्या १२ मंडळामध्ये या स्पर्धा लवकरच सुरू होतील. यातून निवड झालेले सहा अंतीम स्पर्धक हे प्रॉव्हिडन्सच्या अधिवेशनात मुख्य व्यासपीठावरून आपली गायकी सादर करतील. अधिक माहितीसाठी बृ म. मंडळाच्या वेबसाईटला जरुर भेट द्या.
नाविन्याची कास धरून पुढे जात असतांना तुम्हाला एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल सांगतो. उत्तर अमेरिकेतल्या धकाधकीच्या जीवनात मागे वळून बघताना तुमच्या आयुष्यातला एखादा दिवस, प्रसंग जो संस्मरणीय असतो तोच तुम्ही आम्हाला कळवायचाय. विषय आहे मला अजूनही आठवतंय. तुमच्या शब्दात तुम्ही तो अनुभव आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही निवेदकामार्फत त्याचा पॉडकास्ट करून ब्रॉडकास्ट करू आणि नंतर या संकलनाची सीडी बनवून त्याचे वितरणही करू. कशी वाटली कल्पना?
सांगण्यासारखं खूप आहे, पण त्यापेक्षा तुमच्याकडून ऐकण्यासारखंही खूप आहे. तूर्त अर्धविराम,
आपला,
आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com,
फोन: ३०२-५५९-१३६७

Group content visibility: 
Public - accessible to all site users