''चुकले माझे''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 September, 2012 - 09:17

समजुन येते ज्याचे त्याला, ”चुकले माझे”
धमक लागते म्हणावयाला ”चुकले माझे”

लाख चुका पदरात घ्यावया तयार आहे
फ़क्त एकदा बोल तयाला ,” चुकले माझे”

पश्चात्तापातील मजा का मिळेल त्याला?
चुकून जो ना कधी म्हणाला,''चुकले माझे''

भ्रमात राहू नकोस की हे जगत नासमज
कधी तरी समजेल जगाला,''चुकले माझे''

दिशादिशांनी दबाव ''कैलास'' येत आहे
निरपराध मी म्हणू कशाला? ''चुकले माझे''

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाख चुका पदरात घ्यावया तयार आहे
फ़क्त एकदा बोल तयाला ,” चुकले माझे”

पश्चात्तापातील मजा का मिळेल त्याला?
चुकून जो ना कधी म्हणाला,''चुकले माझे''<<< वा

शेर आवडले.

(आता तुमच्यावर 'चुकले का हो' या सदराखाली आरोप होतील, काळजी घ्या) Wink

आवडली

डॉक्टरसाहेब!
गझल आवडली! रदीफ छान आहे.
नम्रपणे काही गोष्टी, जाणवल्या त्या, मांडाव्या वाटत आहेत, अगर इजाजत हो तो!
मतल्यात समजुन ऎवजी समजून असे हवे.
म्हणून, तुमच्या मतल्याच्या अर्थाला धक्का न लावता, मतला मी असा वाचून पाहिला.............
लगेच कळते ज्याचे त्याला, “चुकले माझे”!
धमक लागते म्हणावयाला, “चुकले माझे”!!(सुंदर ओळ)

शेर नंबर ४ मी असा वाचून पाहिला..............

फार काळ ना रहायची ही चूक झाकली;
कधी तरी समजेल जगाला.... “चुकले माझे”!

शेर नंबर ५ मी असा वाचून पाहिला...........

खुलेल केव्हाही “कैलासा” मूठ झाकली;
खुल्लम खुल्ला सांग जगाला.... “चुकले माझे”!

टीप: चुकले माझे अशा रदीफामुळे, सर्व शेर चुका, चुकणे भोवती घुटमळताना दिसतात. चुकले माझे रदीफाचे अवतरण चिन्ह काढले तर, शेरांवर पडणा-या मर्यादा संपाव्यात असे वाटून गेले. पहा बारकाईने विचार करून!
अवतरण चिन्हे काढून, हाच रदीफ व असेच काफिये ठेवून, शेरांत वैविध्य आणता
यावे, असे वाटून गेले. (पर्यायी गझल देणे टाळत आहे.......गैरसमज होवू नये म्हणून)

टीप: परवा मी तरहीसाठी एक ओळ सुचवली होती. कमीत कमी आपण व भूषणरावांनी तरी तरही लिहावी अशी माझी इच्छा होती.
तरहीची ओळ होती.........
आले रडू तरीही रडता मला न आले!
मला न आले........रदीफ. काफिये मी वापरलेले वा इतर उचित काफिये वापरावेत!
मी दिलेली ओळ तरहीस देण्याच्या पात्रतेची नाही का, ते कळवावे.
असे नाही ना, की ओळ मी दिली आहे म्हणून कुणीही तरही लिहीत नाही, त्या ओळीवर?
लोभ असू द्या डॉक्टरसाहेब!

>...........प्रा.सतीश देवपूरकर

समजुन येते ज्याचे त्याला, ”चुकले माझे”
धमक लागते म्हणावयाला ”चुकले माझे”

साधा... सोपा... सरळ... थेट.. चांगला मतला !

लाख चुका पदरात घ्यावया तयार आहे
फ़क्त एकदा बोल तयाला ,” चुकले माझे”

मस्त शेर. खयाल आवडला.
मात्रा वृत्त असल्याने 'घ्यावया, तयाला' हे कृत्रिम शब्द सहज टाळता येऊ शकले असते, असं मला वाटतं.

पश्चात्तापातील मजा का मिळेल त्याला?
चुकून जो ना कधी म्हणाला,''चुकले माझे''

बढीया..!
पश्चात्तापात पण एक मजा आहे. आपली चूक कबूल करणे, ह्यातही एक आनंद आहे. स्वत:च स्वत:वर जिंकल्याचा ! वाह ! फार मस्त खयाल ! हासील - ए - गझल !

भ्रमात राहू नकोस की हे जगत नासमज
कधी तरी समजेल जगाला,''चुकले माझे''

दुसरी ओळ जास्त 'थेट' व सहज वाटली.

दिशादिशांनी दबाव ''कैलास'' येत आहे
निरपराध मी म्हणू कशाला? ''चुकले माझे''

सुंदर मक्ता !

.