तमाम रसिक मित्रमैत्रिणींनो! ही गझल आज गणेशचतुर्थीला (सुट्टी व फुरसत मिळाल्याने) पूर्ण केली आहे. या गझलेचा फक्त मतला व एक शेर एवढेच मी साधारणपणे १९९२ साली कधीतरी लिहिल्याची माझ्या डायरीत नोंद सापडली. सकाळी सकाळी माझे जुनेपुराणे लेखन चाळत असताना हा मतला व शेर माझ्या पहाण्यात आला व मी जाम अस्वस्थ झालो, कळवळलो! इतका चांगला मतला चुकून तसाच मागे पडून राहिलेला दिसला. आवेग अनावर झाल्याने, उरलेले १३ शेर, पत्नी नावाची सुट्टीची भुणभुण backgroundला चालू असताना व नित्यकर्मे करत असताना इश्वरी कृपेने पूर्ण करून सध्यापुरती हातावेगळी झाली, तब्बल २० वर्षांनी! मनस्वी आनंद झाला! गणपती बाप्पांचे मनापासून आभार मानले. आज मी जाम खुशीत आहे. हा माझा अलौकिक आनंद माझ्या मायबोलीकरांनाही द्यावा या हेतूने ही गझल मी इथे देत आहे. गोड मानून घ्यावे! असाच आपला लोभ पामरावर असू द्या! असो.
मला या गझलेतील पहिला मिसरा तरही गझलेसाठी देण्याची इच्छा आहे. तेव्हा समस्त रसिक, सहृदयी, मायबोलीकर गझलकार मित्रमैत्रिणींना माझी नम्र विनंती, की त्यांनी या ओळीवर तरही गझल लिहावी. मला वाचायला आवडेल!
तरहीसाठीचा मिसरा असा आहे.......
“आले रडू तरीही रडता मला न आले!”
मला न आले........रदीफ.
काफिये माझ्या गझलेतील घ्यावेत वा अन्य उचित काफिये देखिल चालतील!
टीप: केवळ अनावधानाने व मूड न लागल्याने मला ही गझल हातावेगळी करायला २० वर्षे लागली. असो.
सगळ्यांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गझल
आले रडू तरीही, रडता मला न आले!
ठरवूनही कधीही, हसता मला न आले!!
एकेक श्वास माझा, जेव्हा तपासला मी;
तेव्हा कबूल झालो.....जगता मला न आले!
जगण्यामधेच माझ्या इतका झिजून गेलो;
दुनिये! तुझ्याचसाठी, झिजता मला न आले!
संधीप्रकाश माझा दिसतो अजून सुद्धा!
मजला कबूल आहे....ढळता मला न आले!!
आकाश जाहलो अन्, मग फाटलो असा की;
नंतर कधीच ‘मजला’ शिवता मला न आले!
मजला पुरून उरला काळोख हा जगाचा!
मी लाख पेटलो, पण, जळता मला न आले!!
हा भार प्राक्तनाचा घेवून सोबतीला;
मी वाटचाल केली! पळता मला न आले!
आयुष्य सर्व माझे उघडे सताड पुस्तक!
माझा स्वभाव नाही.....कुढता मला न आले!!
माझ्यातुझ्यात होता इतकाच भेद मित्रा.....
तू तोडलेस लचके....डसता मला न आले!
असते किती? किती अन् करतात ते दिखावा!
हृदयातले प्रदर्शन करता मला न आले!!
माणूस जोडण्याचा होताच हातखंडा!
इतका दुभंगलो की, जुळता मला न आले!
हातात प्राक्तनाच्या होते हुकूम काही;
दुर्दैव! नीट पत्ते पिसता मला न आले!
मी जन्मजात वणवा होतो, कबूल मजला!
इतकेच दु:ख आहे......विझता मला न आले!!
देऊ कशास दूषण, वा-यास वा कुणाला?
होतो परागकण मी, रुजता मला न आले!
आयुष्य अंगवळणी पडले असून सुद्धा;
याचेच दु:ख आहे......रुळता मला न आले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
उचंबळाची जागा कळवळीने
उचंबळाची जागा कळवळीने घेतल्यास होणार्या निर्मितीवर थेट सकारात्मक परिणाम होतो, असं जाणवलं. किंवा कदाचित हा सुचणं आणि सुचल्यासारखं वाटणं ह्यातला फरक असावा..
असो.
---------------------------------------------------------------------------------
आले रडू तरीही, रडता मला न आले!
ठरवूनही कधीही, हसता मला न आले!!
एकेक श्वास माझा, जेव्हा तपासला मी;
तेव्हा कबूल झालो.....जगता मला न आले!
माझ्यातुझ्यात होता इतकाच भेद मित्रा.....
तू तोडलेस लचके....डसता मला न आले!
हातात प्राक्तनाच्या होते हुकूम काही;
दुर्दैव! नीट पत्ते पिसता मला न आले!
हे चार शेर आवडले.
==========================================
बाकी शेरांवर २० वर्षांनी लिहिन, उचंबळून आल्यास किंवा कळवळून आल्यास..
....रसप....
सणाच्या दिवशी तरी रडू नका हो
सणाच्या दिवशी तरी रडू नका हो !
दिनेशदा! संक्षिप्त, तटस्थ व
दिनेशदा!
संक्षिप्त, तटस्थ व व्यवहारी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
टीप: मतला व गझल आपण फारच गडबडीत वाचलेले दिसते.
रडणे/हसणे या मानवसुलभ भावना आहेत. आम्ही म्हणत आहोत, रडता मला न आले, हसता मला न आले!
तेव्हा सणासुदीला आम्ही रडतो आहोत हा आपला झालेला समज पाहून चकीत झालो. शिवाय आज आम्ही जाम खुशीत आहोत, हे सरळ गद्यात प्रस्तावनेत आम्ही प्रांजळपणे म्हटलेच आहे. असो.
कोणत्या शेरावर जर काही म्हणाला असतात तर मला स्वत:ला तरी ते उद्बोधक वाटले असते!
>...............प्रा.सतीश देवपूरकर
रण...जीत; उचंबळ/कळवळ,
रण...जीत;
उचंबळ/कळवळ, सुचणे/सुचल्यागत वाटणे वगैरे भावनीक व वैचारीक कल्लोळ पोचला.
माझा स्वत:चा ‘सुचणे’, ‘सुचल्यासारखे वाटणे’ अशा कोणत्याच आभासावर विश्वास नाही.
मी लिहित नसून, वेळ आली की, माझ्याकडून लिहिले जाते, हा माझा अनुभव आहे.
गुणगुणाया लागलो अन् गीत झाले!
कोण जाणे, कोण स्फूर्ती देत होते?
असा आमचा अनुभव आहे!
असो.
प्रत्येकाची निर्मितीप्रक्रिया ही व्यक्तीनुसार, पिंडानुसार वेगवेगळी असते, हेच खरे!
३ शेर आवडल्याबद्दल/आवडून घेतल्याबद्दल धन्यवाद!
अनावधानाने व मूड न लागल्याने मला ही गझल पूर्ण करण्यास २० वर्षे लागली!
पण रसप, तू तर व्यवधानी आहेस म्हणे!
उचंबळणे, कळवळणे वगैरेंशी तुझा संबंध आहे म्हणायचा का?
तेव्हा २० वर्षांनी तू काहीबाही लिहिणार? आणि मी त्याची वाट बघणार?.......वाट बघ!
सर्वच शब्दांच्या पलीकडचे आहे रे! असो.
प्रतिसाद देण्याची तसदी घेतल्याबद्दल, धन्यवाद!
.............प्रा.सतीश देवपूरकर
सुंदर आवडली.
सुंदर
आवडली.
एकेक श्वास माझा, जेव्हा
एकेक श्वास माझा, जेव्हा तपासला मी;
तेव्हा कबूल झालो.....जगता मला न आले!>>>>>> हा एकच शेर आवडला
मरणाच्या दारामध्ये,खोटेच
मरणाच्या दारामध्ये,खोटेच कशाला बोलू?
मी कबूल करतो आहे,मज जगता आले नाही
-- सदानंद डबीर
हा शेर आठवला.
माझ्यातुझ्यात होता इतकाच भेद
माझ्यातुझ्यात होता इतकाच भेद मित्रा.....
तू तोडलेस लचके....डसता मला न आले!
>>क्या बात! क्या बात! क्या बात!
धन्यवाद सुधाकर!
धन्यवाद सुधाकर!