बघाया जरा ओल फिरतोय हल्ली

Submitted by निशिकांत on 17 September, 2012 - 03:19

उशा पायथ्याला किती संपदा पण सुखाचाच लवलेश नसतोय हल्ली
मनाच्या कपारी किती कोरड्या! मी बघाया जरा ओल फिरतोय हल्ली

किती एकटेपण मला तू दिले रे, नसे हात धरण्यास हातात देवा
कधी सांगतो गोष्ट, प्रतिसाद देण्या मला मीच हुंकार भरतोय हल्ली

कुटुंबातही मेळ उरला न आता घरी वागती सर्व परक्या प्रमाणे
बरी वाट वृध्दाश्रमाचीच वाटे, जिव्हाळा कुठेही न मिळतोय हल्ली

जरी रंग नवखे दिले कुंचल्याने जुनेर्‍याच भिंती कशा या घराच्या
तरी व्यर्थ लपवावया सुरकुत्या मी सदा सर्वदा यत्न करतोय हल्ली

तिचे बोलके नेत्र गुपचुप असे का? कळेना तिच्या अंतरी काय आहे
बघाया जरा भाव डोळ्यातले मी तिच्या काजळालाच पुसतोय हल्ली

दिसेनात आता विभूती कुठेही नमस्कार ज्यांना लवूनी करावा
प्रतिष्ठा किती लाचखोरांस आहे जयांना जमानाच पुजतोय हल्ली

चला व्यक्त करण्या मनाच्या चिडीला जनांदोलने पेटवू या गड्यांनो
करू निश्चयाने पदच्यूत जो जो खुलेआम देशात चरतोय हल्ली

जशी देवभक्ती करू लागलो मी कळाले मला मंदिरी लूट आहे
किती राबता चोरट्यांचा इथेही, जगाचा नियंताच निजतोय हल्ली

जरा थांब "निशिकांत" जातोस कोठे? तुला भोग आहेत भोगावयाचे
शतायुष्य आहे मला शाप पण मी, विधात्या! हसायास जगतोय हल्ली

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा काका हरएक शेर वाचतच रहावा असा झालाय
वृत्त-निवड एकदम सही केलीत

पर्सनली मला तिच्यासाठी, कुटुम्बासाठी. देशासाठी, देवासाठी व "निशिकान्त्" साठी केलेले शेर जास्त आवडले

धन्यवाद!

उशा पायथ्याला किती संपदा पण सुखाचाच लवलेश नसतोय हल्ली
मनाच्या कपारी किती कोरड्या! मी बघाया जरा ओल फिरतोय हल्ली

जरी रंग नवखे दिले कुंचल्याने जुनेर्‍याच भिंती कशा या घराच्या
तरी व्यर्थ लपवावया सुरकुत्या मी सदा सर्वदा यत्न करतोय हल्ली

तिचे बोलके नेत्र गुपचुप असे का? कळेना तिच्या अंतरी काय आहे
बघाया जरा भाव डोळ्यातले मी तिच्या काजळालाच पुसतोय हल्ली

<<< शेर व वृत्त मस्त, अभिनंदन निशिजी Happy

(करतोय, नसतोय, या रुपाचा वापर प्रवाही झाला)

खूप आनंद मिळाला वाचण्याचा.अगदी सर्वंकष विचार भावपूर्ण शैलीत उतरलेत.

जवळजवळ सगळ्याच ओळी स्वतंत्ररीत्या आवडल्या.

आपल्या गझला आनंददायी होत आहेत.

शुभेच्छा!