माझ्या वाटेवर माझे नाव होते उमटले..

Submitted by रसप on 16 September, 2012 - 00:12

मागे पाहता वळून
मला बरेच दिसले
काही राती रेंगाळल्या
काही दिवस थांबले

एका एका क्षणावर
होते काही कोरलेले
आता कळेना दुरून
होते मीच लिहिलेले

आठवते एव्हढे की
ढसाढसा रडलो मी
आणि कधी मोकळ्याने
खदाखदा हसलो मी

कमावले खूप काही
काही आणले खेचून
उपभोगले थोडेसे
बाकी राहिले पडून

किती जोडली माणसं
ऋण ठेवून, फेडून
काही सोबत चालली
काही सावलीमागून

कधी ठेचकाळलो मी
कधी भरकटलोही
कधी तोल सावरला
कधी धडपडलोही

आज प्रवास हा माझा
इथे येऊन संपला
क्षण हिशेबात एक
नकळतच गुंतला

जसे घडायचे होते
सारे तसेच घडले
हीच होती माझी वाट
आज कळून चुकले

मागे पाहता वळून
मला बरेच दिसले
माझ्या वाटेवर माझे
नाव होते उमटले

....रसप....
१५ सप्टेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/blog-post_16.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता !

संदीप खरेच्या ओळी आठवल्या-

कवितादेखील असतेच कोण?
वाळूत मागे उरले पाय..
"असे कधी चाललो होतो"
याच्याशिवाय उरतेच काय?