कागदी फुलांचा बाजार

Submitted by sanika11 on 15 September, 2012 - 01:55

कागदी फुलांचा जगी , मांडला बाजार सारा
सुगंध लुटा तयांचा, सांगत सुटला तो वारा

फसव्या आकड्यांची मांडली फसवी गणिते
पोकळ शब्दांनी रचलेली दिखाऊ सुनिते
कोरड्या मनाने ग्रासली सारी विचारधारा
कागदी फुलांचा जगी , मांडला बाजार सारा

खोट्या कळवळ्यांचा फोफावला गारवा
सूर शोधित फिरतो बघ वणवण मारवा
अढळपदास धुंडाळी दशदिशी ध्रुवतारा
कागदी फुलांचा जगी , मांडला बाजार सारा

बोन्सायच्या झाडावर खिळती नजरा सार्‍या
शोभेच्या बागेत सुकल्या जाई-जुई बिचार्‍या
देव नसलेल्या देवळाचा सजला सोनेरी गाभारा
कागदी फुलांचा जगी , मांडला बाजार सारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users