पाहिले केव्हा तुला, ते आठवाया लागले!

Submitted by सतीश देवपूरकर on 13 September, 2012 - 14:53

गझल
पाहिले केव्हा तुला, ते आठवाया लागले!
दाट काळोखातही, आता दिसाया लागले!!

वीज चमकावी तशी चमकून तू गेलीस अन्.....
हे उभे आयुष्य माझे लकलकाया लागले!

वागता आलेच नाही मज हिशेबाने कधी;
ना समजले श्वास केव्हा हे सराया लागले!

दूर....अगदी दूर वणवा पेटला रानामधे.....
हे शहरच्या शहर इकडे का जळाया लागले?

संपले तारुण्य डोळेझाक करताना अरे!
रक्त वार्धक्यात आता सळसळाया लागले!!

माझिया वाट्यास आली साथ स्नेहाची तुझ्या;
स्तब्ध हे अस्तित्व माझे झुळझुळाया लागले!

लागले प्यावे विषारी रोज बाळकडू मला;
वाटते आता कुठे, काही भिनाया लागले!

गाइल्या नाहीत गझला माझिया कोणी कधी!
आज मी मेल्यावरी जग, गुणगुणाया लागले!!

काय मी उपयुक्त इतकी बाब वाटू लागलो?
लोक मज लोभीपणाने वापराया लागले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुधाकरा!
गाइल्या..... गायला......दोन्ही चालते. मी प्रथम गायल्या असेच लिहिले होते. पण सौभाग्यवतींनी सुचविले गाइल्या, म्हणून मी गाइल्या असे लिहिले!
(तू फोन केला होतास का काल? नंतर फोन आला नाही!)
........प्रा.सतीश देवपूरकर

सुंदर