वाघ्या हौश्या (एक आठवण)

Submitted by अनिल तापकीर on 13 September, 2012 - 04:18

वाघ्या हौश्या (एक आठवण)

11
voted
भल्या सकाळी जाग आली नि मी उठून झोपेच्या तंद्रीतच गोठ्यात गेलो. हिरव्या वैरणीचा भारा सोडला नि दोन पेंड्या वाघ्या हौश्या पुढे सोडल्या. नि तिथच जोत्यावर टेकून वाघ्या हौश्याच्या देखण्या डौलदार रुपाकड पाहत बसलो.
गेल्या शनिवारीच आण्णांनी चाकणच्या बाजारातून हि देखणी चौषी गोऱ्ही खरेदी केली होती. आख्खा गाव बघाया लोटला होता. आम्ही घरातली पोरं तर येडीच झालो होतो. दोन दिवस शाळला सुदिक दांडी हाणली होती. पर घरची लयच ओरडायला लागली तव्हा शाळेत जायला लागलो. पर मी मात्र सकाळी त्यांना वैरण टाकायचा नेम धरला होता. त्यामुळ दिवसभर शाळत असल तरी काय बी वाटत नव्हतं.
आईनं आवाज दिला म्हणून जरा नाखुशीनच उठलो.
जा लवकर उरकून घे साळत जायचं ना?
हा जायचंय पर अजून लय येळ हाय -मी
आरं लवकर उठून अंघुळ करून अभ्यासाला बसावं, सकाळी सकाळी ध्यानात राहत -आई म्हणाली
आईच आणखीन टुमाकनं नको म्हणून मी बरं बरं म्हणलो नि आंघुळीला नदीवर निघालो. तेवढ्यात अप्पा म्हणाले.आरे अनिल माझ्या बरुबर चल बैलांना पवनी घालायची हाये.
मी आनंदाने लगेच हो म्हणालो कारण माझे आवडते काम होते.
जाता जाता मी म्हणालो -आप्पा आज मधीच बैलांना पवनी कशाकरता, मंगळवारी पवनी घालत्यात ना?
आरे आज आत्याला आणायला पुनावळ्याला जायचंय तव्हा वाघ्या हौश्याच्या बैलगाडी न्यायचीय.
मी लगेच म्हणालो आप्पा मला पण ने ना.
आरे घरातली सगळीच माघं लागल्यात रामू दादा , सुमी वश्या सगळीच रडायला लागल्यात न्याव म्हणून.
पण आप्पा मी तुझ सगळ ऐकतो ना? मग तू फक्त मलाच ने.
बर बघू घरी गेल्यावर असं म्हणून आप्पानं बैल नदीत घातली आणि चांगली चोळून काढली त्यांच्या मांड्या वरील शेणाचे डाग घासून काढले.
बैल पाण्याबाहेर काढल्यावर शुभ्र दुधावानी दिसू लागली. बाहेर काढल्यावर आप्पाने त्यांच्या पायात काळे गंडे बांधले.मी विचारले हे काय बांधतोय.
आरे आपली गाडी पाच सहा गावं पार करून जाणार जो तो आपल्या बैलांकडे बघणार तव्हा वाघ्या हौष्याला दृष्ट नको लागाय.
ह्या काळ्या दोरयानी दृष्ट लागत न्हाय? मी विचारलं
न्हाय लागत मंतरलेला हाय हा गंडा , अस म्हणून आम्ही घरी निघालो. घरी पोहोचेपर्यंत मी मला ने म्हणून आप्पाला इस एक दा म्हणालो. घरी गेलो तर रामू दादा सुमी वश्या सगळी उरकूनच बसली होती.
आप्पांनी गाडी जोडली तव्हा सगळ्या पोरांची रडारड चालू झाली. आप्पाला प्रश्न पडला कोणाला न्याव म्हणून.
तेवढ्यात आण्णा शिमटी घेऊन आला. आण्णाला पाहताच रामू दादाने नि वश्याने धूम ठोकली. मी आणि सुमी घाबरून जाग्यावरच रडत थांबलो. तरी आण्णाने एक एक ओढलीच आम्ही दोघांनीही भोकाड पसरले.
मग अप्पांनी जवळ घेऊन आमची समझूत काढली. सुमीला आत्याला सोडायला नेईन म्हणून समझुत काढली नि तिला चार आणे दिले ति तेवढ्याने खुश झाली.
मला हळूच म्हणाले जा पळ कपडे घालून ये मी उड्या मारीतच घरात पळालो.
घुंगरमाळा घातलेली खिल्लारी बैलाची गाडी धुरळा उडवत निघाली. मी आप्पाचा लाडका होतो म्हणूनच आप्पांनी मलाच बरोबर घेतले होते. एक शिमटी खावी लागली म्हणा. एखादे गाव जवळ आले कि मी आप्पाच्या हातातला कासरा माझ्याकडे घ्यायचो. गावातली माणसं पोर आमच्याकडे टुकू टुकू बघायची त्यांना वाटायचे एवढसं पोरगं गाडी हाकतंय आणि तीही खिल्लारी बैलांची माझा ऊर अभिमानाने भरून यायचा, लय मजा यायची.
आत्याच्या गावी पोहचलो तिथंही आमच्या खिलारी बैलांचे कौतुक झाले. जेवण खावन उरकून आम्ही चार वाजता आत्याला घेऊन निघालो.मारुन्जीची शिव ओलांडून आम्ही मानच्या पान्धीत गाडी घातली (आता तिथ आय टी पार्क आहे ) दोन्ही बाजूंनी दाट झाडी दिवस मावळायला आला होता त्यामुळ तिथ थोडा अंधार पडल्यागत वाटत होता. तेवढ्यात झाडीतून एक धिप्पाड माणूस बाहेर आला. नि गाडीला आडवं होत म्हणाला पाव्हनं तमाकू द्या जरा.
आप्पांनी त्याच्याकडे पहिले नि त्यांच्या मनात काय आले ते म्हणाले सरा बाजूला मी न्हाय तमाकू खात
तो माणूस गाडीला आडवा होऊन गाडी थांबवायला बघत होता. नि आप्पा गाडी जोरात हाकायला बघत होते. तेवढ्यात अजून तिघेजण झाडीतून बाहेर आले. नि गाडीला आडवे झाले. नि आत्या सुद्धा ओरडली आप्पा गाडी पळव हे चोर हायेत. ते चौघेही गाडीच्या समोर होते नि बैलांच्या येसणी धरायला पाहत होते
आत्या ओरडताच आप्पांनी बैलांच्या अंगावर कासरा टाकला नि त्यांच्या शेपट्या पीरगळाल्या वाघ्या हौश्या ने अशी काही मुसंडी मारली कि चोरांना झक मारून बाजूला व्हायला बाजूला होता होता त्यातील दोघे पडले. मी पार घाबरून गेलो होतो.आप्पा आत्याला म्हणाला कि पोराला निट धर .
आत्याने माळा पोटाशी धरले. तरीही मी आत्याच्या कुशीतून मागे पाहत होतो.
आडवा हौश्या अशी काही उधळली कि मागे फक्त धुरळाच दिसत नि त्या धुराळ्यात गाडीमागे पळणारे दोघेजण दिसत होते. बराच वेळ आमच्या गाडीचा पाठलाग चालू होता. परंतु पुढे मान गावाची एक वाडी लागली नि चोरांनी पाठलाग थांबविला.
वाडीवर आल्यावर आप्पाने गाडी थांबवली. बैलांच्या तोंडातून फेस गळत होता. आप्पा खाली उतरला नि त्यांच्या पाठीवर थोपटले. तेवढ्यात पारावर बसलेली काही माणसं जवळ आली. त्यातील काहीजण आप्पाला ओळखीत होते.त्यातील एकजण म्हणाला काय झाल ओ पाव्हन आप्पांनी सारी हकीकत सांगितली ते म्हणाले आव पाचच्या नंतर पान्धीतून कुणीच येत न्हाय मागच्या आठवड्यातच दोघांना त्य चोरांनी लुटलं हुतं बर झाले ह्या बैलांनी तुम्हाला वाचविले भारी हाय खिल्लारी जोडी चांगलं जपा त्यांना. आप्पाने हो म्हणून मान हलवली नि आम्ही निघालो.
घरी आल्यावर आत्याने सारा प्रसंग सगळ्यांना सांगितला. आण्णा म्हणाले पुरण पोळीचा सयपाक kara नि चांगल्या पाच पाच पोळ्या वाघ्या हौष्याला चारा आज आपल्या पोरीची अब्रू नि डाग दागिने वाचावाल्यात त्यांनी.
पुढे जवळ जवळ चौदा वर्षे हि जोडी आमच्या कडे होती. पंधरा दिवसाच्या अंतराने हि जोडी गेली आम्ही त्यांना आमच्या शेतातच पुरले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंन्र्दधनू,भारतीजी,एकवाचक्,नि अनघाजी,धन्यवाद.
अनघाजी,शेतात नागर हाकणे,पिकाला पाणी देणे. बैलगाडीतुन मालाची ने आण करणे.हे सर्व अनुभव वेगळेच असतत

छान प्रसंग लिहला आहे. परन्तु हा प्रसंग खुप वर्ष्यापुर्वी घडलेलआ दिसतोय कारण जिथे घडला तिथे आता आय टी पार्क आहे.

अश्विनीमामी नि कौतुक धन्यवाद.
मामी बैल हा प्राणी साधारणता २० वर्षे जगतो.
कौतुक हा प्रसंग ३० -३२ वर्षापुर्वी घडलेल आहे.

धन्यवाद, माधवजी.
खिल्लारी हि एक बैलाची जात असते. प्राण्यांमध्ये ही वेगवेग्ळ्या जाती असतात. म्हण्जे खिल्लारी, जर्शी, गावरान, इ. त्यामध्ये खिल्लारी ही जात सर्वात चांगली.

सायो,विध्याक्,इब्लिस्,आनि वैद्यबुवा सर्वांना धन्यवाद
इब्लिसजि धन्यवाद बरका सुचविल्याबद्दल अहो काय होते मि एखादि कथा कविता लिहिलि कि बर्याच साइट्वर टाकतो म्हनुन कॉपीपेस्ट करतो आनि अश्या चुका होतात पुढील वेळी लक्ष ठेवील.