फाटकी झोळी -३

Submitted by अरुण मनोहर on 12 September, 2012 - 00:01

७ मे
काल जेजे आठवले ते त्या तारखांच्या जवळपास एकदाचे लिहून काढले. पॆटर्न स्वच्छ दिसत होता.
• फ़कीराने दिलेले चित्र घरात आल्यानंतरच सगळे सुरू झाले होते.
• मालिककी नजरका आयना तेरी हर मुराद पुरी करेंगा. फ़कीर म्हणाला होता.
• ते चित्र आपण नेहमी दिसेल अशा जागी लावले.
• आपल्याला त्या चित्रामधल्या रंगीत भोव-यांमधे गोते खायची सवय लागली.
• हळूहळू आपण जे म्हणू त्याच्या बरोब्बर उलटे होते असे अनेक अनुभव आले.
• हे देखील सिद्ध झाले की आपण काही ठरवून तसे मनात म्हटले तर फ़ायदा नाही.
• जे काही मनात आले, ते सहज, उस्फ़ुर्तपणे आले पाहिजे, की मग त्याचे उलटे होते.
• ह्या फ़िनॊमिनमवर आपला कंट्रोल नाही.
• ह्या त्राटकापासून फ़ायदा नाहीच, उलट विनयच्या मृत्यूने खूप नुकसान झाले आहे.
• हे चित्र सरळ फ़ेकून का देऊ नये?
• हा शाप आहे की की वरदान हे नक्की करायला हवे.
• समजा वरदान असेल, तर ते तसे फ़ेकणे हा मूर्खपणा ठरेल.
• शाप असेल, तर नुसते चित्र फ़ेकून तो पुसून जाइल का? काही भलतेच व्हायचे.
• जोपर्यंत ह्याचा छडा लागत नाही, तोपर्यंत मनात वाईट विचारच तेही उस्फ़ुर्तपणेच आणले पाहिजेत! म्हणजे चांगलेच होईल. (उस्फ़ुर्तपणे एखादा विचार कसा आणायचा?)
२१ मे
आज एक लॊटरी तिकीट घेतले आहे. खरतर मी सहसा घेत नसतो. कारण आपल्याला बक्षीस कधी मिळतच नाही. पहिले बक्षीस तर सोडा, साधे शंभर रुपयाचे देखील कधी लागले नाही. ह्यावेळी तरी वेगळे काय होणार? फ़ाडून फ़ेकावे लागेल. (बघुया फ़कीराचा शाप आहे की वरदान)

२४ मे
पन्नास लाख! वॊव! चुकून माकून का होईना, मिळालेत तर आपले जीवनच बदलून जाईल! पण छे! आपल्या नशिबी असे काही ड्रेमेटिक लिहिलेलेच नाही. (हा विचार उस्फ़ुर्त होता की नाही हे कसे ओळखायचे? बघुया, रिझल्टच्या दिवशीच कळेल.)

२ जून
पेपर आणून भराभरा लॊटरी निकालाच्या पानावर उघडला. पहिले काय किंवा शेवटचे चार काय कुठलेच नंबर्स आपल्या जवळ नाहीत. बोगस. पण आपण तर म्हटले होते की ह्या वेळेला देखील तिकीट फ़ाडून फ़ेकावे लागेल! मग त्याच्या उलटे का झाले नाही? म्हणजे तो विचार सहजपणे आलेला नव्हता! जाउदे, आपण खरच फ़ाडूया नको हे तिकीट. जपून ठेउया. तेवढे आपणच त्राटकाला खरे ठरवू या!

७ जून
पेपरमधे छापलेल्या निकालात कदाचित प्रिंटींगच्या चुका असतील म्हणून मुद्दाम दुसरा एक पेपर मिळवून पाहिला. ठणठण गोपाळ! तरीही तिकीट फ़ाडले नाही. डायरीत जपून ठेवले आहे. म्हणजे “ह्या वेळेला देखील तिकीट फ़ाडून फ़ेकावे लागेल” हाच विचार फ़क्त उस्फ़ूर्त होता! बक्षीस मिळणार नाही असे वाटणारे विचार इंड्युस्ड होते. सबब कुछ काम के नही!

१६ जून
फ़ॆक्टरीतले शिट प्रेस मशीन अजूनही बिघडलेलेच आहे. पार्ट ओर्डर केला आहे, पण डिलीव्हरी पाच दिवसांनी आहे. त्याआधी ठीक कसे होणार? शक्यच नाही. पण येवढी साधी गोष्ट जीएमला कळत नाही. आज त्याने सगळे माहित असून देखील खूप कटकट केली. त्याच्या कटकटीने मशीन सुरू होणार आहे का? मग केवळ त्याचे तोंड बंद करायला म्हणून मशीन खोलून ठेवले.

१७ जून
खोललेल्या मशीनचे पुर्जे व्यवस्थित मांडून ठेवत असता अचानक लक्षात आले की मागे खराब झाले असे वाटले तेव्हा उघडले होते, त्यावेळीस एका पार्टला नीट बसविले नव्हते बहुदा. पुन्हा लावून पाहिले तर मशीन छान चालत होते! म्हणजे जो पार्ट खराब वाटला तो खराब नव्हताच! अरेच्चा! “पार्ट येण्याआधी मशीन ठीक होणारच नाही” असे अगदी उस्फ़ुर्तपणे म्हणालो होतो ना आपण!

१८ जून
ते काही नाही. फ़कीराने मागे लावलेले त्राटक काय आहे ह्याचा छडा लागायलाच हवा. काय म्हणाला होता तो फ़कीर? “मालिककी नजरका आयना तेरी हर मुराद पुरी करेंगा.” .... मुराद पुरी करेगा! .... मुराद पुरी करेगा! ... मुराद.. मनातली उत्कट इच्छा. सहजपणे आलेला विचार म्हणजेच जर उत्कट इच्छा असा अर्थ असेल, तर मुद्दाम आणवलेले विचार कामाचे नाहितच. हे तर आपण पाहिले्ही आहे. पण मग सहज विचारांच्या बरोबर उलटे का होते? एक मिनीट. ते आयनाचे काय? “मालिककी नजरका आयना तेरी हर मुराद पुरी करेंगा.” आता हा मालिकका आयना कोठून आणणार? पण मालिक म्हणजे तरी कोण? परवर्दिगार! तो वर बसलेला कर्ता करविता! तोच तर आपल्या मनात, जळी स्थळी पाषाणी सर्वत्र बसलेला आहे असे म्हणतात ना? सर्वव्यापी परमेश्वर! त्याचा आरसा.. तो कुठे मिळेल? एक मिनीट.. त्याचा आरसा म्हणजे कुठलाही आरसा! सगळे जगच जर त्याचे आहे तर कुठलाही आरसा त्याचाच नाही का? अरेच्चा आरसा.. त्याला दिसणारे सगळे उलटे करून बाहेर पाठविणारा आरसा. इच्छांना उलटे करून फ़कीराच्या चित्रावर सोडणारा आरसा!

१९ जून
टेबलसमोरचे चित्र काढून तिथे एक आरसा बसविला. थोडी खटपट करून टेबलच्या साइडला चित्र असे बसविले की बरोब्बर समोरच्या आरशात ते दिसावे. खुर्चीवर बसून त्या आरशातील प्रतिबिंबाच्या रंगफ़े-यात वाहवत गेलो. तीच नेहमीची झिंग जाणवू लागली. काय बरे मागावे? मुराद. मागणे म्हणजे मुराद नव्हे. हे चित्र काही कामधेनू नाही की मागितले ते देइल. हे इच्छापूर्ती त्राटक आहे. मनात सहजपणे इच्छा यायला हवी. नॊट प्रीमेडीटेटेड डिझायर! पण असे कसे करणार? आपलेच मन असते. आपलेच विचार असतात, म्हणून त्यात जेजे येते ते आपणच आतून आणलेले असते. आपण आणलेले असते. उस्फ़ूर्तपणे आणायचे हा शब्दप्रयोगच किती फ़नी आहे! स्वयंभू विचार असे काही असतात का? आपण असे चित्रातील भोवरे बघत बसलो आहो, आणि अचानक बाहेरचे जग नष्ट झाले असे होइल का? किंवा आता बाबा बाहेर गेले आहेत. दोन तास तरी येणार नाही आहेत, ते अचानक परत आले... म्हणजे परत येणार नाहीत.. छे.. परत येतील, कारण आता उलटे होणार नाही ना? म्हणजे उलटे व्हायला नको. आरशातून उलट्याचे उलटे म्हणजे सरळ होणार. म्हणजे दोन तास घरी परत येउ न शकणारे बाबा अचानक परत घरी येतील..
बाबा त्यांनी सांगितल्याप्रमाणेच उशीरानेच परत आले. छे! हे काही मुराद वगैरे पूर्ण करणारे चित्र नाही.

२४ औगस्ट
अजूनही रोज मी ते चित्र आरशातच पहातो. तेव्हापासून आतापर्यंत असे बरेच अनुभव आलेत की मला जे काही होईल असे अगदी सहजपणे वाटून गेले आहे, ते सारे तसेच्या तसे झाले आहे. म्हणजेच, आरशाचा परिणाम नक्की होत असावा. पुर्वी जे वाटायचे, त्याच्या उलटे व्हायचे. आता जे वाटते, तसेच होते आहे. साध्यासुध्याच घडलेल्या गोष्टी. पण त्या प्रसंगाचे तसे घडणे हे नेहमी माझ्या सहज विचारांशी निगडीत नक्कीच आहे. फ़ॆक्टरीत जातांना नेमकी मोटारसायकल बिघडली. तरीही का कोण जाणे असे वाटून गेले होते की आपण वेळेवरच पोहोचणार. आणि अचानक लिफ़्ट मिळाली होती. नुकत्याच लागलेल्या सिनेमाला खूप गर्दी होती. मित्राबरोबर अगदी वेळेवर पोहोचलो, तरी का कोण जाणे तिकीटे मिळतीलच असे वाटून गेले होते, आणि खरच, एका माणसाने त्याचा बेत रद्द झाल्याने मला दोन तिकीटे एकही जास्त पैसा न घेता दिली होती.

हे तर नक्की झाले, की आरशात ते चित्र सतत पाहिले की मनातले विचार साध्य होतात. पण तरीही माझा ह्यावर ताबा मात्र नाही. म्हणजे ते विचार अगदी उत्कटतेने मनात उमटलेले असावे, तरच ते साध्य होतात. कुठलाही विचार ठरवून मनात आणला असेल तर मात्र चित्र काहीच मदत करीत नाही.

२७ औगस्ट
आज टेबलसमोर बसून बराच वेळ आरशातले चित्र न्याहाळत होतो. फ़कीराने दिलेल्या ह्या विचित्र भेटीचा अर्थ लावलाच पाहिजे. तो तुम्हारी हर मुराद पुरी होंगी असे का म्हणाला असेल? विचार अगदी उत्कटतेने मनात उमटलेले असावे, तरच ते साध्य होतात. पण माझा कंट्रोल नाही. मग मुराद कशी पुरी होणार? अरेच्चा, जेव्हा एखादी इच्छा मुद्दाम काही प्रयास न करता मनाच्या तळातून बाहेर प्रकटते, त्यांनाच आपण सहज उमटलेले विचार असे म्हणतो कां! म्हणजेच, आरसा लावण्यापुर्वी जेजे विचारांच्या उलटे घडले, आणि आरसा लावल्यानंतर जेजे विचारांप्रमाणेच घडले, ते सगळे आपल्या आतल्या इच्छेशी निगडित घडले. फ़किराचे त्राटक काम करत असावे.

म्हणजे आता जे हवे ते साध्य करण्याचा जादूचा मंत्रच जणू आपल्याला लाभलेला आहे. पण हे सगळे नीटपणे सिद्ध करायला हवे. आपण मनात येइल त्याप्रमाणे वस्तू हलवू शकू, आपले जीवन घडवू शकू! जगातला सर्वात शक्तिशाली, सर्वात धनवान माणूस बनविण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. हे सिद्ध करायला काहीतरी निर्विवाद दृष्टांत मिळायला हवा. लॊटरीचे बक्षीस मिळेल ही इच्छा काही केल्या सहजपणे उमटू शकत नाही हे मागेच सिद्ध झाले आहे. तिकीट घेतले की मनात स्वप्नरंजने सुरू होतात. बक्षीस मिळाले की आपण यंव करू, त्यंव करू. पण हे सगळे आपले बाह्य मन बोलत असते. त्या स्वप्नरंजनात आतली इच्छा, बाहेरची इच्छा काही कळत नाही.

आरशातल्या चित्रामधले रंग आणखीन गडद होत चालले आहेत. मला मिळालेले चित्र माझी मुराद पूर्ण करू शकते. हा संबंध निर्विवाद सिद्ध करण्यासाठी हा पाण्याने भरलेला काचेचा प्याला कामास येइल. हा नक्कीच खाली पडून फ़ुटणार. रंगांचे भोवरे गरागरा फ़िरत आहेत. हा प्याला भोव-यात सापडून फ़ुटणार. फ़कीराचे बोल सिद्ध होणार. बराच वेळ झालेला आहे. झोपायला हवे.

२८ औगस्ट
काल रात्री केव्हातरी दचकून अचानक जाग आली होती. बाहेर वारा सुटला असावा. टेबलवर ठेवलेला प्याला तसाच होता.
सकाळी उठल्यावर पेला खाली पडून फ़ुटलेला दिसला. साइडच्या भिंतीवर लावलेले चित्र टेबलवर पडले होते. त्याच्या धक्क्याने पेला खाली पडलेला असावा. रात्री वारे वहात होते, त्याचा परिणाम!... पण म्हणजे त्राटक काम करीत आहे! वॊव! कल्पतरूच हातात आला आहे. उपयोग कसा करून घ्यायचा ते व्यवस्थित मॆनेज करायला हवे. पूर्ण जगाची किल्ली माझ्या हातात आली आहे.

लगेच ते चित्र पुन्हा त्याच्या जागी बसविले. आरशातून दिसणा-या त्यातील रंगांच्या भोव-यात नजर लावली. नेहमी गरागरा फ़िरणारे रंग आज स्तब्ध होते. असे कसे झाले? जेव्हा केव्हा पाहिले तेव्हा रंगांमधे नजर स्थिर केल्यावर रंगांचे भोवरे फ़िरायला लागायचे. आज ते भोवरे स्तब्ध का?

.... हे लिहीत असतांनाच एका विचाराने दरदरून घाम फ़ुटला. काल अचानक जाग आली तेव्हा पेला व्यवस्थित जागेवर पाहून झोपलो होतो. त्राटक खरे असो वा नसो, आपल्याला काही ह्या त्राटकाचा उपयोग होणार नाही असे दिसते. अशा विचारांत झोप केव्हा लागली होती ते कळलेच नव्हते. हे असे विचार स्वयंभू असतील, तर त्राटक लागू होऊन, त्राटकाने स्वत:लाच निष्प्रभ ठरवले की काय! अरे देवा! काय करून बसलो मी?

फ़कीराने त्याच्या फ़ाटक्या झोळीतून आपल्याला कल्पतरूचे रोप काढून दिले होते. पण आपली झोळी देखील फ़ाटकीच आहे आणि ते रोप जमिनीवर निसटून पडू शकते हे आपल्याला कळले नाही. आता फ़ार उशीर झालेला आहे..............

४ सप्टेंबर
गेली काही दिवस रोज चित्राकडे आरशामधून नजर लावून बसत आहे. शेवटी शेवटी ते रंगीत भोवरे गोल गोल फ़िरायला लागतात की काय असे वाट आहे. खूप वेळ टक लावून बघत बसल्यामुळे चक्कर आल्यासारखे होत असावे का? की तो चमत्कार पुन्हा परत आला असावा? मनात सहज यावे असे दाखवून वेगवेगळे विचार आणीत असतो. त्यातले काही खरे होतात, काही होत नाही? जे खरे ठरले ते फ़कीराच्या त्राटकामुळे झाले, की आपोआपच झाले? जे खरे ठरले नाहीत, ते आपल्या मनात ती इच्छा स्वयंभू आली नव्हती म्हणून, की त्राटक हे थोतांड होते म्हणून?
विचार करकरून डोके फ़ुटायची वेळ आली आहे. पुन्हा एकदा आरशाशिवाय ते चित्र पाहून उलटा दृष्टांत दिसतो का ते पहावे का? मग पुन्हा नेगेटीव्ह विचार करत बसण्याची सवय करावी लागेल. काय करू?

१० सप्टेंबर
टेबलवरचा ग्लास खाली पडला नव्हता, तेव्हा रात्री वैतागून काही तरी विचार करून मी त्राटक नष्ट केले. हे खरे की हे सगळे भ्रम आहेत हे खरे? ह्या पैकी काहीही खरे असेल, तरी मी भ्रमिष्ट होणार हे मात्र खरे दिसत आहे. (वेट... हा विचार त्या त्राटकावर पडला असेल तर............?)

१५ सप्टेंबर
ह्या पानावर नुसती असंबद्ध रेखाटणे होती.

ह्यापुढची पाने उपलब्ध नाहीत.

****************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users