फाटकी झोळी -२

Submitted by अरुण मनोहर on 12 September, 2012 - 00:00

१२ सप्टेंबर
ही कुठली त्राटीका माझ्या मागे लागली आहे तिने आपला प्रताप पुन्हा दाखवला. बी एच ए एलच्या इंटरव्ह्यूसाठी भोपाळला गेलो. एका स्वस्तशा होटेलात खोली घेतली होती, कारण दोन दिवस रहावे लागणार होते. इंटरव्ह्यू ठीकच झाला. “ही नोकरी आपल्याला मिळेलच” असा विचार सहजपणे मनात डोकावून जाऊ नये ह्यासाठी मी खूप प्रयत्न करीत होतो. उलट नोकरी मिळणारच नाही असे स्वत:ला सांगत होतो. अर्थात दोन्हीचाही काहीच उपयोग नव्हता, कारण ते सगळे माझे सांगणे होते. संध्याकाळच्या गाडीचे परतीचे रिझर्व्हेशन होते. मस्त आरामात झोपून जाउ, काही काळजी नाही. दुसरे काही नाही तरी बंगलोरची ट्रीप झाली. दुसरा इंटरव्ह्यू देऊन होटेलवर परत आलो तेव्हा चार वाजले होते. गाडी रात्री आठची होती. दिवसभराच्या धावपळीने होटेलच्या बेडवर जरा डोळा लागला. जरा कसला! केव्हातरी खडबडून जाग आली. क्षणभर मी कुठे आहे ते कळेचना. पंखा डोक्यावर गरगर फ़िरत होता. अरेच्चा, ही तर होटेलची खोली! घड्याळात आठ वाजलेले! बोंबला! गाडी गेली. रिजर्व्हेशन गेले! मस्त आरामात झोपून जाऊ काय? त्राटिकेच्या डोळ्याने पुन्हा प्रताप दाखविला. काय हे लचांड माझ्या मागे लागले आहे! मी सहज म्हणून कुठलाच साधासा चांगला विचार देखील करायचा नाही कां?

३ नोव्हेंबर
सगळीकडे दिवाळीची धूम सुरू आहे. उमेश, सतीश आणि योगेश बरोबर उमेशच्या गच्चीवर पार्टी झाली. मस्तीत भंकस करीत रात्री गच्चीवरून दिवाळीचा दणदणाट ऐकणे, पहाणे, म्हणजे काय ते अनुभवायलाच हवे. हे तिघेही नोकरीचे, म्हणून ह्यांचे खिसे भरलेले. माझ्या बाबतीत सगळाच अंधेरा. दिवाळी वा नो दिवाळी. अजून कुठे पत्रिका जुळलेली नाही. उमेशचे बाबा मिलीटरी कॆन्टीनमधून बाटली आणू शकतात. कधी कधी तो आम्हा मित्रांसाठीपण जुगाड करतो. आज दिवाळी निमित्य तो नक्कीच एखादी बाटली घेऊन येइल असे वाटले होते. आणि नाहीच आणली, तर सगळ्यांकडून थोडे थोडे पैसे जमवून ऐन वेळीस घेऊन येऊ. तिथेच घात झाला. दिवाळी कोरडीच पार पडली. उमेश रिकाम्या हातांनीच आला, आणि पैसे काढायला एक जण साला तयार नव्हता. मनातले सगळेच पॊझिटीव नेगेटिव विचार पिळून बाहेर फ़ेकून देता यायला हवे.

१७ जानेवारी
थंडी ब-यापैकी पडली आहे. आभाळ एकदम स्वच्छ. ढगाचा मागमूस देखील कुठे नाही. मागे एकदा ऐन थंडीत बेमोसमी पाऊस पडला होता. आज तसे काही होण्याची चिन्हे देखील नाहीत. ही थंडी कोरडीच रहाणार! हे सगळे वाटून गेल्यावर चार तासांमधेच जोरदार वारा सुटला आणि न जाणे कोठून ढगांना घेऊन आला. पूर्ण आभाळात दुलई पांघरल्या गेली अन वा-याने त्या दुलईला झटकून तुषारांची सर जमिनीवर शिंपडली. जे होइल असे तीव्रपणे वाटते, त्याच्या बरोब्बर उलटे होण्याची आणखी एक खुणगाठ मिळाली.

२८ फ़ेब्रुवारी आणि आसपास
एखाद्या चांगल्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी मिळावी ही सुप्त इच्छा सतत मनात घोटाळते आहे. पण कुठेच जमत नाहीयं. बालूनी सिगारेट बनविणा-या कंपनीत मेन्टेनंस इंजिनीयर म्हणून नोकरी घेतली. आता रोज फ़ुकटच्या सिगारेट्स मिळतील म्हणून खुष असेल साला. मी तर अशा तीन दमडीच्या कंपनीत कधीच काम करणार नाही. त्या दिवसांत असेच विचार मनात घोळत असायचे. बाबांचे प्रेशर आता खूप वाढले होते. “किती दिवस असा बेकार बसून रहाणार आहे? वाटले होते, इंजिनियर होऊन बापाला मदत करेल. तुझा छोटा भाऊ विनय देखील थोडे पैसे घरी पाठवत असतो. नोकरी करून ऒफ़िसात पुढच्या परिक्षापण दिल्या आहेत त्यामुळे लवकरच प्रमोशन मिळेल असेही म्हणत होता.

बाबांच्या असल्या प्रेशरमुळे कंटाळून नको असलेल्या ठिकाणी अर्ज टाकले आणि एका शीट मेटल फ़ॆक्टरीत थातूर मातूर जॊब स्विकारला. “तीन दमडीच्या कंपनीत मी कधीच काम करणार नाही” ह्या दर्पोक्तीची ऐशीतैशी बहुदा त्या चित्राच्या संगतीने झालेली.

३ एप्रील
विनयचा फ़ोन आला. त्याला डिपार्टमेंट हेड म्हणून प्रमोशन मिळाले आहे. खूप आनंदात होता. नोकरीत त्याचे व्यवस्थित बस्तान बसले आहे. लग्न होइपर्यंत चांगले सेव्हिंगपण होइल. आपले नाही, तरी निदान लहान भावाचे तरी सगळे छान आहे. विनयचे लाइफ़ आता मस्तपैकी सेट झाले आहे.

२३ एप्रील
अभिताभ बच्चनचा मस्त पिक्चर लागलेला आहे. पिक्चर लागून खूप आठवडे झालेत. इतर लोकांचा कामाचा दिवस असला तरी आज आमच्या फ़ॆक्टरीला स्पेशल सुट्टी आहे. आज जाऊन तो पिक्चर नक्कीच बघता येइल. असा विचार करून गेलो आणि सुरवात झाल्या झाल्याच लाईट गेले. जनरेटर वगैरे काही त्या थिएटरकडे नव्हते. पॊवर खूप वेळ येणार नव्हती म्हणून शेवटी सगळ्यांचे पैसे परत केले. आणखी म्हणाना! मस्त मजेत पिक्चर पहाता येईल म्हणून! कशाला मी असे स्वप्नरंजन करत असतो?
आपल्या नशिबातच काहीतरी तिढा आहे. जेजे होइल असे मला प्रकर्षाने वाटते, त्याच्या नेमके उलटे होणार हा कसला फ़ास गळ्यात पडला आहे?
(नंतर लिहीलेल्या नोट्स) आता लक्षात येतेयं, फ़कीराने दिलेल्या त्या चित्राचीच ही करामत आहे. मात्र वाईट ह्याचे वाटते की मी ठरवून ह्याचा उपयोग काही करू शकत नाहीयं. म्हणजे जे व्हायला हवे त्याच्या अगदी विरुद्ध विचार मुद्दाम मनात आणवून मी हवे ते मिळवू शकत नाहीयं. जो काही विचार असतो तो अगदी सहजपणे, उस्फ़ुर्तपणेच मनात आला असेल, तरच त्याचे उलटे परिणाम दिसताहेत.

६ मे
अचानक आलेल्या फ़ोनने आमचे सगळ्यांचे जगच उलटपलट करून टाकले. नोकरीच्या गावी विनयला खूप मोठा अपघात झाला होता. ट्रकने त्याच्या मोटारसायकलला ढडक दिली आणि तो जबर जखमी झाला होता. जवळचे कोणीही त्याच्या बरोबर नव्हते. कोणीतरी अनोळखी लोकांनी त्याला हॊस्पी्टलमधे नेले, पण वाटेतच विनयने प्राण सोडले. हातातोंडाशी आलेला होतकरू तरूण मुलगा असा तडकाफ़डकी जातो काय! आईबाबांना काहीही कळेनासे झाले.
(नंतर लिहिलेल्या नोट्स) आज विनयला जाऊन महिना झाल्यानंतरही आम्ही कोणीच ह्या धक्क्यातून अजून सावरलेलो नाहीत. कां असा तो आम्हाला सोडून गेला? माझ्या टेबलसमोर बसून विचार करीत असतांना समोरचे ते चित्र मला वेडावू लागले. पुन्हापुन्हा मी त्या डोळ्यातून फ़ेकल्या जाणा-या रंगांच्या भोव-यात खेचल्या जाऊ लागलो. भुकेल्या फ़कीराला जेवण देऊन मी त्याचे असे काय वाईट केले, की त्याने असे त्राटक माझ्या गळ्यात बांधले? ते चित्र घरात आल्यानंतरचे एकएक अनुभव आठवायला लागले.

“तीन दमडीच्या कंपनीत मी कधीच काम करणार नाही”- आता बसलोय भंगार कंपनीत पत्रे ठोकत.
“ही थंडी कोरडीच रहाणार!” आणि नंतरचा बेमोसमी पाऊस.
“संध्याकाळच्या गाडीचे परतीचे रिझर्व्हेशन आहे. मस्त आरामात झोपून जाउ, काही काळजी नाही.” हॊटेलात झोपून गाडी चुकणे आणि जनरल डब्यात अवघडून केलेला प्रवास.
आणखी कितीतरी...
आणि आता हा शेवटचा कृर झटका. विनयला प्रमोशन मिळाल्यावर, “विनयचे लाइफ़ आता मस्तपैकी सेट झाले आहे.” ह्या साध्या स्वप्नरंजनाचे कसले अघोरी परिणाम भोगावे लागले! पण हे सगळे आपल्यामुळेच झाले असा विचार वेडेपणाचाच नाही काय? आणि फ़कीर एखाद्या चांगल्या कृत्याची असा शाप देऊन आपल्याला सजा थोडीच देणार आहे? काय माहित! हे फ़कीर फ़ार सटकलेले असतात. कदाचित आपल्याला त्याच्या हाकेला ओ द्यायला उशीर झाला असेल म्हणून त्याचे टाळके सटकले असेल! कदाचित दिलेले अन्न त्याला पुरेसे नसेल! पण तो चित्र देतांना जे बोलला त्यावरून तो रागवला होता असे काही वाटले नव्हते. मग असे हे काय होते आहे?

खर तर अशा बेशिस्त विचारांनी काही निष्कर्श काढण्यापेक्षा आपण अगदी संगतवारपणे सगळे लिहून काढायला हवे. ते चित्र मिळाल्यानंतर आपल्याला जे काही अनुभव आले असे वाटते ते कालक्रमानुसार लिहायला ह्या डायरीशिवाय दुसरी चांगली जागा नाही. आठवणा-या सगळ्या गोष्टी त्या तारखांच्या जवळपास लिहून काढायला हव्यात. काय बरे म्हणाला होता तो फ़कीर...... पण इथे नको. माझा तो वाढदिवस..... त्याच पानावर लिहूया...

********************
क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users