"प्रवाही"

Submitted by राजीव मासरूळकर on 10 September, 2012 - 13:22

**प्रवाही**

तारूण्याला जाळून घ्यावे, नशाच देशी ओतून घ्यावी
प्राचीन अर्वाचीन नी पहिल्या धारेचीही कोळून प्यावी
मुरवून देहामध्ये अस्सल झिंग, मातीला माथा द्यावा
पावित्र्याचा फाडून बुरखा, रंग जिन्याचा जाणूनघ्यावा !

कर्तव्यांसह हक्कांचे मुद्देही टांगावे वेशीला
रात्रंदिन झिंगून जपावे सत्य इमानाला शीलाला !
चढता चढता हळूहळू ती उतरत जावी हवी नकोशी
आयुष्याच्या अधोगतीला काळ ठरावा अंतिम दोषी !

थेंब नुरावा बाटलीत अणुरेणूंनी कल्लोळ करावा
दिशाहीन डोळ्यांच्या देखत हातांनाही कंप सुटावा
रेडेवाल्या गुराख्याकडे थेंब मागुनी मिळो न काही
तल्लफ सोडून अगम्यतेच्या मार्गे व्हावे स्वतः प्रवाही !

- राजीव मासरूळकर
दि . ५ सप्टेंबर २०१२
रात्री ९:०० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानय ही पण
वृत्त मस्त निवडलेत

शीर्षकात आपले नाव आहे ते सम्पादित करा / डिलीट करा
लिहिणार्‍याचे नाव इथे लेखनात आपोआपच दिसते .ते पुन्हा लिहायची गरज उरत नाही

धन्यवाद

ही माझीच कविता पुन्हा वाचली. म्हटलं काय हरकत आहे आपणच वाचायला.
गद्याकडून काव्याकडे गेलो असल्याचे जाणवले. तेही ठीकच.
आता पुढे जायला हवे .
Happy

कर्तव्यांसह हक्कांचे मुद्देही टांगावे वेशीला

आयुष्याच्या अधोगतीला काळ ठरावा अंतिम दोषी !

थेंब नुरावा बाटलीत अणुरेणूंनी कल्लोळ करावा
दिशाहीन डोळ्यांच्या देखत हातांनाही कंप सुटावा
रेडेवाल्या गुराख्याकडे थेंब मागुनी मिळो न काही
तल्लफ सोडून अगम्यतेच्या मार्गे व्हावे स्वतः प्रवाही !

सुंदर ओळी.

या ओळी वाचून कवी बेफिकीर यांची ही कविता आठवली.

कळावे

गं स

गंभीर समीक्षक ,
हार्दिक आभार .

बेफिकीरजींची कविता वाचायला दिल्याबद्दलही मनःपुर्वक धन्यवाद .
मस्त आहे त्यांचीही कविता . खूप आवडली .

भारती ताई ,
अनुभव अपरिचीत असूनही कविता वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !

(देशी द्विअर्थी <द्वैर्थी> आहे थोडी. देशभक्तीच्या नशेचा विचार करून वाचून बघता का एकदा ?)

किंवा देशी म्हणजे ग्रामीण लोकांची जगण्यातली जिद्द, झुंज, वगैरे या अर्थानेही.
(ग्रामीण जीवनवाद)

...मुरवून देहामध्ये अस्सल झिंग, मातीला माथा द्यावा
पावित्र्याचा फाडून बुरखा, रंग जिन्याचा जाणूनघ्यावा

...रेडेवाल्या गुराख्याकडे थेंब मागुनी मिळो न काही
तल्लफ सोडून अगम्यतेच्या मार्गे व्हावे स्वतः प्रवाही !

व्वा!!

कर्तव्यांसह हक्कांचे मुद्देही टांगावे वेशीला
रात्रंदिन झिंगून जपावे सत्य इमानाला शीलाला !...

दोन्ही ओळींच्या अर्थात विरोधाभास जाणवतो.म्हणजे सत्य इमान आणि शील जपताना
कर्तव्य आणि तितकेच हक्क डावलून कसे चालेल हा मला पडलेला प्रश्न.
कदाचित तुम्ही ते वेगळ्या अंगानेही लिहिले असावे.

रोहन्ता ,
विस्तृत प्रतिसादासाठी खूप खूप आभार.
Happy

वेशीला टांगणे या वाक्प्रचाराचा मी सार्वजनीक ठिकाणी वाच्यता करणे या अर्थाने वापर केला आहे. त्यामुळे तो विरोधाभास नसून सुसंगतच आहे असे मला वाटते.