"प्रवाही" - राजीव मासरूळकर

Submitted by राजीव मासरूळकर on 10 September, 2012 - 13:20

**प्रवाही**

तारूण्याला जाळून घ्यावे, नशाच देशी ओतून घ्यावी
प्राचीन अर्वाचीन नी पहिल्या धारेचीही कोळून प्यावी
मुरवून देहामध्ये अस्सल झिंग, मातीला माथा द्यावा
पावित्र्याचा फाडून बुरखा, रंग जिन्याचा जाणूनघ्यावा !

कर्तव्यांसह हक्कांचे मुद्देही टांगावे वेशीला
रात्रंदिन झिंगून जपावे सत्य इमानाला शीलाला !
चढता चढता हळूहळू ती उतरत जावी हवी नकोशी
आयुष्याच्या अधोगतीला काळ ठरावा अंतिम दोषी !

थेंब नुरावा बाटलीत अणुरेणूंनी कल्लोळ करावा
दिशाहीन डोळ्यांच्या देखत हातांनाही कंप सुटावा
रेडेवाल्या गुराख्याकडे थेंब मागुनी मिळो न काही
तल्लफ सोडून अगम्यतेच्या मार्गे व्हावे स्वतः प्रवाही !

- राजीव मासरूळकर
दि . ५ सप्टेंबर २०१२
रात्री ९:०० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users