प्रसन्न मन

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 10:42

आयुष्य़ातील दुःखावरील मात करण्यासाठी भगवंताने, सद्गुरुनी, संतांनी दिलेला हा महामंत्र आहे. सर्व वयातील सर्व अवस्थांतील मानवांना उपयोगी पडेल असा हा मंत्र आहे.
जीवनात दुःख हे अपरिहार्य आहे, अटळ आहे. त्यातील शारीरिक दुःखावर उपाय करून थोडासा आराम मिळवता येतो. बऱ्याचशा वृद्धांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे विकार या वयात दोस्ती करून कायमचे चिकटतात. गुडघेदुखी हा तर जवळ जवळ सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा सोबती असतो. काहींचा जिवलग तर काहींचा अधुन मधुन. पण सर्वांवर आता प्रभावी उपाय उपलब्ध झाले आहेत. नियमित आहार, नियमित व्यायाम व वेळोवेळी औषध योजना या त्रिसूत्रिद्वारे रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येतो, उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवता येतो व गुडघे दुखी सुसह्य करता येते. पण याही विकारांना एका चौथ्या आधाराची गरज असते आणि ती म्हणजे मनःशांती. मन जर शांत ठेवलं तर सारी दुखणी सुसह्य होतात
या शारीरिक व्याधींबरोबरच काही मानसिक दुःखेही या वयात भेडसावू लागतात, मुलाबाळांची नवी पिढी आपल्याला विचारीत नाही; आपला सल्ला न घेताच महत्वाचे निर्णय घेतात; त्यांच्या कार्यक्रमात आपल्याला सहभागी करत नाहीत; आपण घरात नसल्यासारखेच वागतात, आपली पोतेऱ्यासारखी अवस्था करतात ... वगैरे वगैरे. आपल्याच घरात आपण नगण्य आहोत हे फार बोचरे शल्य त्यांना खुपत असते.
माणसाची जशी एक शारीरिक प्रकृती असते तशी एक मानसिक प्रकृतीपण असते. या प्रकृतीला शांत मनाची आवश्यकता असते. मन शांत कशाने होते? नको असलेले विचार मनातून काढून टाकल्यामुळे. भीतिचा विचार मनातून काढून टाकला की मन शांत. किती सोपा उपाय. सांगायला फार सोपा पण प्रत्यक्षात आणायला महाकठीण. ते काय डोक्यावरची टोपी काढून ठेवण्याइतके सोपे आहे होय?

पण या सर्वांपेक्षाही उत्तम, रामबाण उपाय म्हणजे अध्यात्मिक वृत्तीची जोपासना करणे. माणसाची जशी शरीरप्रकृती आणि मानसिक प्रकृती असते तशी एक अध्यात्मिक प्रकृती असते. ही प्रकृती सुदृढ करण्यासाठी गीतेतील वेगवेगळ्या मार्गांचा अभ्यास करून कुठलातरी एक मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करावा. श्रीमद भगवत गीतेत मानवी जीवनाचे केलेले विश्लेषण, भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद आपल्या मनातले भीतिचे सावट दूर करायला खूप उपयोगी पडतात. भक्तीमार्ग देतो दुःख सोसायची ताकद, कर्ममार्ग शिकवतो, परिणामाबद्दल उदासीनता; आत्म्याचे तत्वज्ञान मृत्युची भीती नष्ट करते. एका गीतेचा किंवा मराठीतील ज्ञानेश्वरीचा जरी डोळस अभ्यास केला तरी मनाला शांती देणारी, दुःख सोसण्याची ताकद देणारी, आणि भीतीचे सावट दूर करणारी अध्यात्मिक वृत्ती तयार होते आणि मन राहते कसे प्रसन्न!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम सही. मनोशारिरिक व्याधींचे मूळ अस्वस्थ मानसिकतेतच आहे अन निरामय आरोग्याचेसुद्धा !
म्हणून मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धींचे साधन,,

च् च्....
उचला कॉपी करा डकवा...
काय हे....!

बाकी मूळ लेख चांगलाय... त्या निमित्ताने वाचला गेला..