येणे न हाती, जाणे न हाती, असणे परंतू हातात आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 4 September, 2012 - 05:00

गझल
येणे न हाती, जाणे न हाती, असणे परंतू हातात आहे!
मृत्यू कुणाच्या हातात नाही, जगणे परंतू हातात आहे!!

प्रत्येक व्यक्ती व्यक्ती निराळी, बोलायला अन् वागायलाही;
जुळतील वा ना जुळणार नाती, हसणे परंतू हातात आहे!

सलतील जेव्हा पायात काटे, गवसेल तेव्हा वस्ती फुलांची!
कोठे फुलावे मर्जी फुलांची, फिरणे परंतू हातात आहे!!

भरतील तेव्हा भरतील जखमा, जातील व्रणही कालांतराने....
लागून धक्का ठणकेल सुद्धा, शिवणे परंतू हातात आहे!

येतील हाती ठिणग्या कुणाच्या, हाती कुणाच्या येतील गारा!
लाभेल सोने वा फक्त माती, टिपणे परंतू हातात आहे!!

हे हात दोन्ही आहेत तुमचे, जोडा, उगारा, बांधून ठेवा!
चिथवेल कोणी, चिडवेल कोणी, नमणे परंतू हातात आहे!!

तुमच्या मनाचे तुम्हीच राजे! तुमच्याच इच्छा, तुमचाच ताबा!
सांगेल कोणी काही कराया करणे परंतू हातात आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'परंतु' ला 'परंतू' केले ही सूट..
पण अशी सूट रदीफेत वापरणे जरा जास्त वाटते. परत परत येणारा शब्द जर सूट घेतलेला (अशुद्ध) असेल, तर विरस होतो. (माझा झाला...)

रत्येक व्यक्ती व्यक्ती निराळी, बोलायला अन् वागायलाही;
जुळतील वा ना जुळणार नाती, हसणे परंतू हातात आहे!

वा ! असेच म्हणतो..

तुमच्या मनाचे तुम्हीच राजे! तुमच्याच इच्छा, तुमचाच ताबा!
सांगेल कोणी काही कराया करणे परंतू हातात आहे!!

एकदम मान्य....

एका दिवसात एकाच्याच गझला लागोपाठ वाचल्यात असं कधी होत नाही. पण तुमच्या बाबतीत असं ब-याचदा झालंय. कधी आवडतात कधी नाही..पण गझल आकर्षून घेते हे खरेच. एक वेगळी शैली विकसित होतेय असं वाटतंय. काही शेर फसले तरी चालू ठेवा तुमच्या गझला.
( आज माबोवर संथ हालचाल असल्याने दोन गझला झेपल्या Wink )

प्राणी नाही कुठलाच या कवितेत सतीश देवपूरकर? मोठ्ठीच्या मोठीच केलीत की? डोल बाई डोलाची चारी कमळे मोलाची या चालीवर आहे ना? लब्बाड कुठले. बघ लिटल जिमी, कश्या मोठ्या मोठ्या कविता करतात काही जण. नाही तर तू, नुसता भोकाड पसरतोस. सतीश देवपूरकर एवढे कधी लिहिता हो तुम्ही?

सुन्दर गोटीबन्द गझल
वृत्त एकदम नशीले आहे . धुन्दी आपोआप चढते आहे
गागालगागा ।गागालगागा।गागालगागा ।गागालगागा ही लगावली प्रत्येक ९ मात्रान्वर यति
मनाला शान्त करणारे विचार अन त्याना साजेसे शब्द
..............किती छान आहे हे सगळे !!

गझल पुन्हापुन्हा वचतो आहे मनाला खूप शान्त-शान्त वाटते आहे

अभिनन्दन व धन्यवाद

प्रणाम आपणास

________/\___________

खूप आनन्द दिलात आज !!!

आपला
वैवकु

एक वेगळी शैली विकसित होतेय असं वाटतंय. काही शेर फसले तरी चालू ठेवा तुमच्या गझला.

किरणू, हे तुझ्या टाळक्यापलीकडचं आहे, फुकाचा आव आणू नकोस परिक्षकासारखा. तुला रे कोणी विचारलंय बंद करू की चालू ठेवू? एक सीझनल कीटक असून इतका शहाणपणा?

सुन्दर गोटीबन्द गझल
वृत्त एकदम नशीले आहे . धुन्दी आपोआप चढते आहे

काय पण एकेक विशेषणं. एकटाकी, गोटीबंद. वैभ्या, गझल वाचून वाहन चालवू नकोस, मारशील कोणालातरी

मोहिनीबाई व लिटिल जिमी!
आपणा दोघांस साष्टांग दंडवत! आपले प्रतिसाद वाचून इतका हसलो की, डोळ्यातून पाणी आले! सगळा दिवसाचा शीणच गेला एका क्षणात!
असेच हसवत रहा मायबोलीकरांना, म्हणजे इस्त्री केलेले घडीबंद चेहरेही चुरगळण्याची परवा न करता खळखळून हसतील तरी!
आज आपण व आपल्या भोकाड पसरणा-या जिमीने आम्हाला जिंकून घेतले.
सलाम आपणास! अशी विनोदबुद्धी देव सर्वांना देवो हीच प्रार्थना!
.........प्रा.सतीश देवपूरकर

रणजीत!
“परंतु” मूळचा संस्कृत शब्द. मराठीत लिहिताना शेवटचा, अंत्यअक्षरातील उकार हा दीर्घ करतात. भटांनी परंतू असेच रूप वापरले आहे.
अता शब्द आता असा हवा हे खुद्द भट साहेबांनी मला सांगितले, ती त्यांची चूक झाली हेही कबूल केले. पण, परंतू शब्द चुकीचा आहे असे मात्र त्यांच्या बोलण्यात कधी आले नाही. तूर्तास माझी धारणा काय आहे ते लिहिले. तज्ञांना विचारून खात्री करून घेतो व मग परत आपण या मुद्दयावर बोलू.
“परंतू” या शब्दामुळे तुझा झालेला विरस मी समजू शकतो. पण इतका विरस झाला का, की कोणत्याही शेरावर काहीही प्रतिसाद देवू नये असे तुला वाटले.
व्यक्तीश: मला कोणतीही सूट गझलेत घेतलेली आवडत नाही, जे मी शक्यतोवर टाळतो. परंतू बाबत खातरजमा करून घेतो व त्यानुसार पुढे काळजी घेईन.
..........प्रा.सतीश देवपूरकर

देवपूरकर सर,

माझा प्रतिसाद सकारात्मक दृष्टीने घेतल्याबद्दल अनेक आभार..!
मी माझे म्हणणे परत एकदा, अधिक सुस्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करतो -

१. माझ्या मते उच्चारानुसार शब्दाच्या ऱ्हस्व-दीर्घात 'सूट' घेणे अगदी मान्य असावे. उदा. रणजीत/ रणजित ह्यात अर्थाचा बदल होत असला तरी उच्चार करताना आपण कधी दीर्घ किंवा कधी ऱ्हस्व करत असतो. अशी अनेक उदाहरणं देता येऊ शकतील. जसं की - पाऊस-पाउस, ठाऊक-ठाउक, वगैरे.. ह्यात परंतु-परंतू सुद्धा मान्य!
पण -
२. ही 'सूट' म्हणून असावी.. आणि सूट अर्थातच (शब्दार्थानुसार) एखाद-दुसऱ्या ठिकाणी असावी. रदीफ प्रत्येक शेरात असते, म्हणजे प्रत्येक शेरात अशी सूट घेणे हे मला अति वाटते. (अर्थात, माझ्या आत्तापर्यंतच्या इवल्याश्या गझलप्रवासातसुद्धा मी अश्या सूटी अनेकदा घेतल्या आहेत. पण हा विचार माझा नंतर 'बनला' आहे.)

आपण एखाद-दुसऱ्या ठिकाणी 'परंतू' केले असते, तर ठीक.. पण रदीफेतच ते आल्याने प्रत्येक शेरात ते माझ्या तरी डोळ्यांना खुपलं. परिणामत: शेर, त्यातील खयाल ह्याकडे माझं लक्ष कमी गेलं.

जो शब्दसमूह/ जी ओळ रचनेत पुन्हा पुन्हा येणार आहे, ती पूर्णत: निर्दोष असावी असा एक वाचक म्हणून जर मी आग्रह धरला तर त्यात काही अनाठायी नसावं असं मला वाटतं. (ह्याच विचारानेच मी 'अठवण' कधीच स्वीकारू शकत नाही. शब्दकोष काहीही म्हणोत. प्रचलित भाषा मला तरी जास्त भिडते.)

काही कमी-जास्त लिहिले-बोलले गेल्यास तसे सांगावे.

धन्यवाद !

....रसप....