मुंगी उडाली आकाशी - अभंगाचा अर्थ हवा आहे

Submitted by mansmi18 on 4 September, 2012 - 02:02

नमस्कार,

आजच युट्युब वर संत मुक्ताबाईंचा हा अभंग ऐकला
http://www.youtube.com/watch?v=0qdUa1qBhBM

मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||
थोर नवलाव झाला | वांझे पुत्र प्रसवला ||
विंचु पाताळासी जाय | शेष माथा वंदी पाय ||
माशी व्याली घार झाली | देखोनी मुक्ताई हासली ||

नेटवर शोधल्यावर असा अर्थ मिळाला:
मुंगी हे सुक्ष्म जीवात्म्याचे रुप..ती परमात्म्याशी एकरुप झाली असता सहज सुर्यालाही पोटात घेउ शकते..
या आत्मसाक्षात्काराच्या अनुभवातुन पुर्णपणे गेल्यावर मुक्ताई स्वानंदाने हासते.

इथल्या इतर कोणी आणखी अर्थ विषद करुन सांगितल्यास आवडेल.
(खासकरुन "क्ष" आणि "सावट" याना विनंती).. इतरांचेही स्वागत..

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा प्रकारच्या अभंगांना 'कूट-अभंग' असे म्हणतात. मुक्ताई, नामदेव व अन्य काही संतांच्या अशा अनेक कूटरचना आहेत. उदा. नामदेवांची ही रचना- "मुंगी व्याली- शिंगी झाली- तिचे दूध किती.. सात रांजण भरून गेले, बारा हत्ती पेले..." वगैरे वगैरे फार मोठे आणि मजेदार आहे.

अशा प्रकारच्या रचनांमधील शब्द आणि अर्थवैचित्र्यामुळे सामान्य जनतेचे लक्ष त्याकडे वेधले जाते, आणि मग अशा 'अलर्ट' झालेल्या श्रोत्यांपर्यंत आपल्याला सांगायचा तो संदेश व्यवस्थित पोचतो- हाच अशा कूटरचनांचा उद्देश असावा.
वरील रचनेत मुक्ताईंनी काही अशक्य कोटीतल्या गोष्टी लिहिल्या आहेत, आणि निरुपण करत असतांना- "मग असेही घडतांना मी पाहिले आहे, तर अमुकतमुक गोष्ट (सामान्य माणसाकडून साधनेद्वारे आत्मज्ञान / आध्यात्मिक उन्नती / मोक्षप्राप्ती यासदृष्य काहीतरी) का नाही होऊ शकत?" अशा पद्धतीने समेवर यायला वरील प्रकारचे अभंग उपयोगी पडत असावेत.

मुंगी म्हणजे जीवात्मा, सूर्य म्हणजे परमात्मा वगैरे अर्थ ओढूनताणून लावताही येईल, पण माझ्यामते ते "रिडींग टू मच बीटवीन द लाईन्स" होईल. या ओळींना लाक्षणिक अर्थ वगैरे काही नसावा. वाचल्यावर समजणारा शाब्दिक अर्थ, हाच खरा अर्थ समजावा.

मला वाटते मुक्ताबाईंना एक absurd feel द्यायचा आहे.. ' देखोनी मुक्ताई हासली' असं म्हणताहेत त्या. काहीतरी अशक्य कोटीतलं घडलंय जे विनोदी आहे ,ते पाहून त्यांना हसू येतंय.

या रचनेचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतील. मला ही नेहमी .'ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या'ची ही मराठी लोभस आविष्कृती आहे असे वाटते.

अगा जे घडलेची नाही तयाची वार्ता पुससी काई.. मिथ्या,अस्तित्वात नसलेल्या मायेने, (मुंगीने) ,सूर्याला (ब्रह्मजाणिवेला/ ज्ञानाला ) गिळून टाकले हा मुक्ताबाईंच्या अभंगाचा विषय आहे .वांझेला पुत्र झालाय, माशीला घार झालीय.. जे भ्रामक, क्षूद्र त्यानेच आपली जाणीव संपूर्णपणे व्यापली आहे हे पाहून त्यांना गंमत वाटतेय.

एक व्यापक अर्थ असा जाणवला..

ज्ञानदेव सततच्या होणार्‍या अवहेलनेने व्यथित होऊन रागाने कुटीत जाऊन दार बंद करुन बसले. ज्ञानदेवांसारख्या सहनशील व्यक्तीने रागावणे ही अशक्यप्राय घटना दर्शवण्यासाठी ही रचना केलेली आहे असे वाटते.

हा अभंग ज्ञानदेवानी समाधी घेतल्यानंतर लिहिला असावा असे वाटते, रच्याकने खूप (म्हणजे खूपच) वर्षापूर्वी संत ज्ञानदेव हा चित्रपट एका शनिवारी दूरदर्शन वर लागला होता, आणि ज्ञानदेवाची समाधी हा प्रसंग झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे काहीतरी भाषण वगैरे सुरु झाले , म्हणून आम्ही शेजारून घरी परत आलो (आम्ही शेजारी जावून टी. व्ही. बघायचो) , ते भाषण संपले आणि मुंगी उडाली आकाशी असा अभंग सुरु होवून चित्रपट पुढे सुरु झाला , म्हणून परत शेजारी उरलेला चित्रपट बघायला गेलो असे आठवते (रम्य तो भूतकाळ..:) अर्थात यावरून तो अभंग समाधी नंतरच लिहिला असेल नाही, पण जाता जाता एक आठवण...