हा खेळ आकड्यांचा!

Submitted by चिमण on 3 September, 2012 - 04:24

(सदर लेख जत्रा २०११ दिवाळी अंकात, 'विद्यापिठातील संशोधनाची ऐशीतैशी' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता)

एका फुटकळ शहरात फुटकळ विद्यार्थ्यांसाठी फुटकळ लोकांनी चालवलेलं ज्ञानपिपासू नावाचं एक फुटकळ विद्यापीठ होतं. डोंगरावरचे भूखंड स्वस्त असतात म्हणून की काय हे पण डोंगरावरतीच वसलेलं होतं. टेकड्यांवर पूर्वी देवळं दिसायची तशी हल्ली विद्यापिठं दिसायला लागली आहेत! श्री. फुटाणे त्याचे एका वर्षापासूनचे शिळे कुलगुरू! कुलगुरू होण्यापूर्वी फुटाणे परीक्षा विभागाचे मुख्य होते. 'परीक्षा विभागातील कार्यक्षम आणि सशक्त अधिकारी' असा टिळा घेऊन कुलगुरू निवासात रहायला आल्या आल्या ते कैलासवासी झाले.. केवळ कुलगुरू निवासाचं नाव 'कैलास' होतं म्हणून! कार्यक्षम वगैरे ठीक होतं पण ते सशक्त प्रकरण काय असेल ते कुणालाच झेपलं नाही.

इतर विद्यापीठात चालतं तसचं कुठल्या न कुठल्या आकडेवारीच्या मागे सतत धावण्याचं काम इथेही चालायचं! किती मुलं पदवी परीक्षेला बसली? का बसली? किती पास झाली? किती मागासवर्गीय होती? किती पहिल्या वर्गात पास झाली? वर्गात न बसता किती पास झाली? किती विद्यार्थ्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला? किती उत्पन्न झालं? त्यातलं फीचं किती?.. कायम असली आकडेघाशी! मग तिची मागील वर्षांच्या आकडेवारीशी व पूर्वी ठरवलेल्या लक्ष्यांशी तुलना करायची, आणि परत पुढील आकडेवारी काय असावी त्याचे लक्ष्य ठरवायचे! 'मरावे परि आकड्यातुनि मारावे' हे सर्व आकडेशास्त्र्यांचं ब्रीद वाक्य!

प्रत्येक बातमीला ३ बाजू असतात असं म्हणतात - समर्थकांची, विरोधकांची आणि खरी! तशा इथल्या प्रत्येक आकड्याला पण असायच्या. कुठल्याही आकड्यातून प्रत्येक जण आपापल्या अंतस्थ हेतुंना सोयिस्कर अर्थ काढायचे.. साहजिकच ते परस्परविरोधी असल्यामुळे 'आकडे तेथे वाकडे' अशी नवी म्हण रुजली होती. उदा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी ०.५% वाढली तर विरोधक 'शिक्षण अजूनही लोकाभिमुख होत नाहीये' म्हणून नक्राश्रू ढाळायचे, समर्थक 'शिक्षण हळूहळू पण निश्चितपणे तळागाळा पर्यंत झिरपतंय' असा दुर्दम्य आशावाद दाखवायचे, तर आकडेमोडीत झालेली चूक ही खरी बाजू असायची!

बरेचसे आकडे सरकारी आहेत.. सरकारी नियमांइतकेच कालबाह्य! त्यातले काही तर त्यांची उपयुक्तता संपल्यानंतरही वर्षानुवर्ष काढत असतात. १९७३ साली आलेल्या पुरामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील परिणामासंबंधीचे आकडे अजूनही काढले जातात. हो, ज्ञानपिपासू विद्यापीठ तेव्हा अस्तित्वात नव्हतं तरीही! बैल कसे एकदा गुर्‍हाळाला जुंपले की आपोआप गोल गोल फिरायला लागतात तसे ते कर्मचारी विद्यापीठात आले रे आले की आकड्यां भोवती फिरतात. अशा ह्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट पायरी वर फसलेल्या लोकांनी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं कालबाह्यतेचं समर्थन का करावं?

नानाविधं आकडेवारीतून विद्यापीठाचं अंतरंग व शैक्षणिक आरोग्य कळतं असा वरच्या लोकांचा विश्वास असतो. त्यामुळेच, चुकून माकून कधी ठरवलेले लक्ष्य गाठलेच तर लोकांना आकडा लागल्याचा आनंद होतो. विद्यापीठातून प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर निबंधांबद्दलही असे खूप आकडे होते, विद्यापीठ अनुदान मंडळाकडून दर वर्षी ते मागवले जायचे.. संशोधनावर संशोधन करण्यासाठी असावं बहुधा! बर्‍याचशा आकड्यांबद्दल कुलगुरूंचा, बोगद्यामधे असतो तितका, अंधार होता. आयुष्यात त्यांचा लोकसंख्या सोडता बाकी फारशा संख्यांशी प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. त्यांना त्या बद्दल फार काही माहिती असण्याचं कारणही नव्हतं म्हणा! नगरसेवकाला स्वतःच्या वॉर्डाची काय दशा आहे हे कुठं माहिती असतं? त्याला ते वृत्तपत्रातूनच समजतं! तसंच कुलगुरूंच होतं. पण यावेळी संशोधनपर निबंधांबद्दलचे आकडे मंडळाने नेहमी प्रमाणे फायलीत ठेऊन दिले नाहीत तर 'या वर्षात विद्यापीठातून कमितकमी १५० शास्त्रीय लेख छापले गेले नाहीत तर विद्यापीठाचे अनुदान बंद करू' असं धमकीवजा पत्र विद्यापीठाला पाठवलं.. धमकी'वजा' म्हंटलं तरी पत्रात धमकीच 'अधिक' होती.

कुलगुरू भिकार्‍याला देखील भीक घालायचे नाहीत तेव्हा असल्या धमक्यांना कुठून घालणार? पण या वेळची गोष्ट वेगळी होती. या वर्षी विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष श्री. भणभणकर हे होते. त्यांची ज्ञानपिपासू विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची संधी फुटाण्यांच्या कनेक्शन्समुळे गेली होती आणि त्याचा राग भणभणकरांच्या मनात भणभणत असणार अशी फुटाण्यांची अटकळ होती. खरं तसं काही नव्हतं. 'देशात दर्जेदार संशोधन का होत नाही?' यावर संसदेत उठलेल्या गदारोळामुळे शिक्षणमंत्र्यांनी निर्विकारपणे अनुदान मंडळाकडे त्याबद्दलची माहिती विचारली. मंडळाने त्यातून 'देशातलं संशोधन वाढायला पाहीजे' असा सोयिस्कर अर्थ काढला आणि सर्व विद्यापिठांना तशी पत्रं पाठवून दिली. बाकी, निबंधांची संख्या वाढली म्हणून संशोधनाचा दर्जा सुधारला असं म्हणणं म्हणजे प्रवासी वाढले म्हणून पिएमटीची वागणूक सौजन्यपूर्ण झाली असा अर्थ काढल्यासारखं आहे. किंवा ब्लॉगची संख्या वाढल्यामुळे साहित्याचा दर्जा सुधारला असं म्हणण्यासारखं!

फुटाण्यांना आपल्या कारकीर्दीत अनुदान थांबणं ही गोष्ट कॉमनवेल्थ गेम्स मधल्या परकीय खेळाडूंचं बाथरुम तुंबण्या इतकी लांच्छनास्पद वाटणं स्वाभाविक होतं! आत्तापर्यंत त्यांच्या कारकीर्दीत तुंबण्याच्या फारशा घटना घडलेल्या नव्हत्या. परीक्षा विभागात असताना चुकीचा प्रश्न पेपरात येण्याच्या एक दोन घटना आणि एक दोन पेपर फुटण्याच्या मामुली घटना. बास! इतकं तर बहुतेकांच्या कारकिर्दीत तुंबतच! या नाकर्तेपणाच्या शिक्क्यापायी ते फुटाण्यातल्या चोरासारखे वगळले गेले असते आणि आणखी तीन वर्षांसाठी कुलगुरू पदाची खुर्ची उबवायला मिळाली नसती. त्यामुळे त्यांना सर्व विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलावण्या शिवाय गत्यंतर नव्हतं.

तत्पूर्वी, त्यांनी गेल्या वर्षात विद्यापीठातून एकूण किती निबंध प्रसिद्ध झाले, इतर विद्यापीठांतून किती झाले याची आकडेवारी मागवून घेण्याची अक्कलहुशारी दाखवली.. कदाचित हाच तो त्यांचा बहुचर्चित सशक्तपणा असावा! गेल्या वर्षात विद्यापीठातून एकूण फक्त ८ निबंध प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमिवर, अनुदान मंडळाच्या गणपतीला १५० निबंधांचा नैवेद्य कसा दाखवणार? आधीच, 'फीच्या चरकात पिळवटून पोरांचं शोषण करणारं ज्ञानपिपासू विद्यापीठ हे प्रत्यक्षात रक्तपिपासू आहे' अशी हेटाळणी नेहमी सर्वत्र व्हायची. त्यात हे जमिनीत मुरणारं पाणी बाहेर आलं तर नावातलं 'ज्ञान' गळून नुसतं 'पिपासू' राहील अशी सार्थ भीति कुलगुरूंना होती.

'आपल्या विद्यापीठातून फारसं संशोधन होत नाही अशी टीका मी नुकतीच ऐकली! यावर तुमचं काय म्हणणं आहे?'. कुलगुरूंनी चिंतेचा षड्ज लावला.

'कोण म्हणतं असं? जे कुणी म्हणत असतील त्यांना संशोधन कशाशी खातात ते माहीत नाही!' कुणीतरी निषेधाचं रणशिंग फुंकलं.

'संशोधनाचं कसं असतं.. अमेरिकेत एखादा शोध लागतो. मग काही महिन्यांनी रशियन लोकं, तोच शोध बोरिस झकमारोस्की नावाच्या शास्त्रज्ञाने १७९९ सालीच लावला होता असं जाहीर करतात. त्या दोघांची वादावादी चालू असताना जपानी लोकं मात्र शांतपणे त्या शोधाचा वापर करून नवीन उपकरण बाजारात आणतात'. या प्रमुखाला विनोद करायचा असतो की काही तरी गंभीरपणे म्हणायचं असतं ते कधीच कुणाला समजायचं नाही.

'कुठल्या प्रकारचं संशोधन?' एका प्रमुखाला, प्रतिभा पाटलांना राष्ट्रपती म्हणायचं की राष्ट्रपत्नी अशा प्रकारचा, पेच पडला असावा! लोक उगीचच फाटे फोडणार याची कुलगुरूंना पूर्ण कल्पना होती म्हणूनच त्यांनी 'झाकली मूठ अनुदानाची' असा पवित्रा घेतला होता.

'म्हणूनच मी विद्यापीठाने गेल्या वर्षी किती पेपर्स छापले त्याची माहिती काढली. तर ८ पेपर्स झालेत. फक्त ८! आपल्या विद्यापीठात १५ च्या वर विभाग आहेत आणि फक्त ८ पेपर्स? ही अगदीच नामुष्कीची गोष्ट आहे. बाकीच्या विद्यापीठांचं बघा, वर्षाला दिडदोनशे छापतात. प्रत्येक विभागाने १० जरी पेपर्स टाकले तर आपल्यालाही ते सहज जमेल'. कुलगुरू समेवर आले. त्यांना पेपर टाकणं आणि पोष्टात पत्रं टाकणं यातला फरक माहीत नसावा.

'पण सर, आपल्या माहितीत काहीतरी चूक आहे. आमच्या विभागातूनच ८ पेक्षा जास्त पेपर्स नक्की गेले आहेत'. त्यातले साभार किती परत आले ते संख्याशास्त्राच्या प्रमुखांनी सोयिस्करपणे सांगायचं टाळलं. साध्यासुध्या संख्यांतून असंख्य विस्मयकारक अनुमानं काढणं हा त्यांच्या डाव्या हाताचा मळ होता.

'मी गेल्या वर्षाबद्दल बोलतोय. विद्यापीठ सुरू होऊन १२ वर्षं झाली. आणि इतक्या वर्षात तुम्ही फक्त ८ पेपर्स छापले त्यात भूषणावह काय आहे?'

'विथ ड्यू रिस्पेक्ट सर! पण रिसर्चचे पेपर छापणं हे काही परीक्षेचे पेपर छापण्या इतकं सोप्पं नाही. परीक्षेच्या पेपरात एखादा प्रश्न चुकला तरी सगळ्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे पूर्ण मार्क देऊन नामानिराळं होता येतं. रिसर्च पेपर मधे चूक झाली की पूर्ण पेपर रिजेक्ट होतो.'

हायझेनबर्गच्या अनसर्टन्टी बद्दल अनसर्टन्टी असली तरी कुलगुरूंच्या बायोडेटा बद्दल कसलीही अनसर्टन्टी पदार्थविज्ञान विभागाच्या प्रमुखांना नव्हती. तसं, शिक्षणाशी फटकून असलेल्या कुलगुरूंनी विद्यापीठ चालवणं म्हणजे शेळीवरून उंट हाकण्यासारखंच आहे यावर सर्व प्रमुखांचं एकमत असणं हे एक आश्चर्यच होतं! त्यामुळे कुलगुरूंनी संशोधनावर काहीही भंकस केल्यावर त्यांची चिडचिड न व्हायला ते काही मादाम टुसॉड्स मधले पुतळे नव्हते. पण असं उघडपणे कुलगुरूंना ते कसे बोलणार? निधड्या छातीच्या सैनिकाला देखील आपल्या बायकोला 'तुला स्वयंपाक येत नाही' असं म्हणायची छाती होत नाही. मग हे तर एका यःकश्चित विद्यापीठातले यःकश्चित संशोधन करणारे यःकश्चित पोटार्थी! रिटायरमेंटच्या जवळ आलेले असल्यामुळे असेल कदाचित पण पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख त्याला अपवाद होते. 'विथ ड्यू रिस्पेक्ट सर' अशी वरकरणी सभ्य प्रस्तावना करून, वेळोवेळी कुलगुरूंना शालजोडीतले मारायचं काम ते आवडीने करायचे. अजून त्यांचे जोडे संपलेले नव्हते..

'आधी आघाडीच्या समस्या माहिती पाहीजेत. त्या साठी चांगलं ग्रंथालय हवं. मग संशोधनासाठी अद्ययावत उपकरणं, देशोदेशीच्या सेमिनारांना जाण्याच्या संधी आणि पैसे, बाहेरच्या शास्त्रज्ञांबरोबर चर्चासत्रं हवीत. अशा बर्‍याच गोष्टी आहेत. पण डोनेशन म्हणून घेतलेले पैसे आमच्या हाताला लागतील तर ना!' कुलगुरू शिक्षण क्षेत्रातले नसले तरी ते तथाकथित ज्ञानी लोकांना चांगलेच ओळखून होते. जो पर्यंत प्रमोशन सारख्या गोष्टींसाठी अडत नाही तो पर्यंत ते तत्व वगैरे बाष्कळ बडबड करत रहातात हे त्यांना माहीत होतं. कुठे काय आणि किती बोलायचं, आपल्या मर्यादा आणि ताकद याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी त्या टोमण्याकडे दुर्लक्ष केलं. शिवाय, त्यांनी संशोधनावर काही बोलणं म्हणजे छापखान्यात खिळे जुळवणार्‍याने कादंबरी कशी लिहावी यावर भाष्य केल्यासारखं झालं असतं.

'या यादीत सिम्पोझियम मधे टाकलेले पेपर्स दिसत नाहीत'. काही विभागांचे बरेच पेपर फुटकळ सिम्पोझियम मधे जायचे. भूगर्भशास्त्र त्यातलंच एक होतं! तसल्या सिम्पोझियमना आणि तिथे प्रकाशित होणार्‍या संशोधनाला सामान्यतः जगात काडीचीही किंमत दिली जात नाही. कारण तिथे काहीही फालतू पेपर्स घेतले जातात. तिथल्या पेपर सिलेक्शनबद्दल तज्ज्ञांच्या वर्तुळात एक अशी आख्यायिका आहे.. जमिनीवर एक रेघ मारायची आणि आलेले सर्व पेपर वरून खाली सोडायचे. जे रेषेच्या डावीकडे पडतील ते घ्यायचे, उजवीकडचे नाकारायचे! पण हे सगळं कुलगुरूंना माहिती असण्याची शक्यता नव्हतीच.

'हो का? बरं, मग गेल्या वर्षात किती पेपर्स झाले त्यात?' कुलगुरूंना लक्ष्मी रोडवर पार्किंग दिसल्याचा आनंद झाला.

'अम्ss! मला आत्ता ऑफ-हॅन्ड माहिती नाही! पण ४/५ तरी नक्कीच आहेत.' भूगर्भाने भूगर्भ पोखरून उंदीर काढला.

'ओह! मला वाटलं जरा मोठा तरी आकडा सांगाल! बरं, ते धरले तरीही एकूण संख्या १३च्या वर जात नाहीये!' तिथे झाडाची मुळं वर आलेली असल्यामुळे पार्किंग करणं शक्य नव्हतं.

'पण सर, हल्ली चांगले विद्यार्थीच येत नाहीत'. गणित विभाग प्रमुखांनी 'हल्ली' वर जोर देऊन जुनाच हायपॉथिसिस मांडला. विद्यार्थ्यांना नेमकं उलट वाटतं. विद्यार्थी-मास्तर, सून-सासू, मुलगी/मुलगा-आई/बाप ह्या वयानुरुप बदलणार्‍या आणि नेहमीच एकमेकांशी झगडणार्‍या अस्वस्थ अवस्था आहेत. एक अवस्था आपल्या अपयशाचं खापर नेहमी दुसर्‍या अवस्थेवर फोडत असते.

'वर्षात १० पेपर्स फार होतात. प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्यांना ५०% सवलत हवी त्यात!' समाजशास्त्राच्या प्रमुखांनी एक मागासलेलं विधान केलं.

'नोबेल प्राईजमधे तशी सवलत द्यायला लागले की आपण पण देऊ!' कुलगुरूंच्या सुमार जोकवर सगळे बेसुमार हसले.

'मला वाटतं त्याचं कारण आपली फी आहे. गरीब पण हुशार मुलांची इतकी फी देण्यासारखी परिस्थिती नसते. आपण फी कमी केली तर काही वर्षात फरक दिसायला लागेल'.. पॉलिटिकल सायन्सच्या प्रमुखांनी समस्येला अति डावी बगल दिली! त्यांना गरिबांचा पुळका होता अशातला भाग नव्हता. विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या मुलांना फी मधे सवलत नव्हती. लवकरच त्यांना स्वतःच्या मुलासाठी संपूर्ण फी भरावी लागणार होती ही खरी व्यथा त्या मागे होती.

'हे पहा!'.. कुलगुरूंची बॅटरी संपली.. 'मला पुढच्या १० वर्षानंतर संशोधनातली वाढ नकोय. पुढच्या वर्षामधे हवी आहे.'

'जे वर्षाला दिडदोनशे छापतात त्यातला बराचसा कचराच असतो पण! उगाच आपलं भारंभार काही तरी कशाला छापायचं?' एक ढुढ्ढाचार्य बकले.

'तोच कचरा त्यांची ग्रँट टिकवतंय. हेच सांगायला ही मिटींग होती. या वर्षी १५० पेपर केले नाहीत तर संशोधनाची ग्रँट गेलीच म्हणून समजा. मंडळाचं तसं पत्र मला आलं आहे'. सर्व प्रमुखांना मिटिंगचा हेतू आणि गांभीर्य या दोन्ही गोष्टी एकदमच समजल्या. इतका वेळ घड्याळाकडे बघत बघत ते कुलगुरूंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण, संशोधनाची वाट लागली तरी कुलगुरू कुणाच्या टाळूचा केस पण वाकडा करू शकले नसते. मात्र मंडळाचं अनुदान हे सगळ्यांचच राखीव कुरण असल्याने नुसती चौकशी समिती नेमून चालढकल करण्यासारखं ते प्रकरण नव्हतं. त्यामुळेच, 'दर महिन्याला प्रत्येक विभागानकडून मला प्रोग्रेस रिपोर्ट मिळायला हवा' या कुलगुरूंच्या हुकुमाला सगळ्यांनी मान्यता दिली.. हरी अडल्यावर दुसरं काय करणार?

अशा रीतिने कुलगुरूंनी आपला अस्वस्थपणा विभाग प्रमुखांकडे ढकलला. विभाग प्रमुखही निष्काम कर्मयोगी असल्यामुळे त्यांनीही तत्परतेने कुलगुरूंचा आकडा जसाच्या तसा आपल्या प्रोफेसरांकडे दिला. आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत पोचला.

पहिले तीन चार महिने काहीच प्रोग्रेस दिसला नाही. संशोधन वेगात चालू आहे अशा नुसत्या बंडला प्रोग्रेस रिपोर्टात मारल्या. पण दर महीन्याला तेच कसं काय लिहीणार? काही घडतच नव्हतं. विभाग प्रमुखांपासून सर्व संशोधकांना एकच चिंता लागायला लागली.. आकडा कसा गाठायचा? मटका प्रेमी पण पहात नसतील इतक्या उत्सुकतेने सगळे दर महिन्याला तो आकडा पहायचे. काही महिन्यांनी कुलगुरूंनाही खुर्चीचं बूड डळमळीत झाल्यासारखं वाटायला लागलं. तशात, पाचव्या महीन्यात एका वर्तमानपत्रानं ज्ञानपिपासूच्या काही संशोधक विद्यार्थ्यांना वेड लागल्याचे वृत्त दिलं आणि त्याचं खापर कुलगुरूंवर फोडलं. खरं तर एकालाच लागलं होतं. पण बातम्या सनसनाटी केल्याशिवाय कोण वाचणार? तर तो संशोधक म्हणे कागदावर भराभर काहीतरी लिहायचा आणि नंतर तो कागद लपवून ठेवायचा. कारण त्याच्या मते त्याला फार चांगल्या कल्पना सुचायच्या आणि दुसरे त्या चोरून ते संशोधन स्वतःच्या नावावर खपवतील म्हणून! त्या बातमीत वरती अशी मल्लिनाथी पण केलेली होती.. 'हे सर्व कुलगुरूंनी टाकलेल्या अनाठायी प्रेशर मुळे झालं आहे असा दावा एका मान्यवर प्रोफेसरांनं (आपलं नाव न सांगता) केला'.

गनिमी काव्यात कुलगुरू पारंगत असल्यामुळे त्यांनी तो अल्पसंतुष्ट आत्मा कोण ते शोधून काढलं.. तो मान्यवर प्रोफेसर आपल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून भाजी आणणे, आपल्या पोरांची शाळेतून ने आण करणे अशी घरकामं करून घेतो अशी स्फोटक माहिती त्यांच्या हाती लागली. मग ही बातमी प्रसिद्ध होणं अपरिहार्यच झालं!

दर महीन्या गणिक आकडा गाठण्याचं प्रेशर वाढतच होतं. काहीच न सुचल्याने एकाने मळलेली वाट चोखाळायचा प्रयत्न केला.. त्याने कुणाचा तरी पेपर कॉपी केला. दुर्देवाने, ते प्रकरण बाहेर पडलं! कुलगुरूंनी पण धोरणी पणाने त्याला निलंबित केलं.. पूर्ण चौकशी होई पर्यंत फक्त! दरम्यान कुलगुरूं सकट सर्वांना आकडा एकाने कमी झाल्याचं दु:ख झालं.

पुढच्या काही महीन्यात मात्र अनेक अभिनव, भूभंगी पेपर आले. त्यांचे गोषवारे असे..

मानसशास्त्राच्या एका प्रोफेसरांना कुतुहलाचं कुतुहल निर्माण झालं आणि त्यांचा निष्कर्ष भरपूर कुतुहल निर्माण करून गेला -- गरज ही शोधाची जननी आहे तर कुतुहल ही गरजेची! निव्वळ कुतुहलापोटी काही प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तरं मिळवणं काहींना गरजेचं वाटतं. प्रश्न असा आहे की कुतुहल कसं निर्माण होतं? न्यूटनला सफरचंद पडताना पाहूनच का कुतुहल निर्माण झालं? त्या आधी त्यानं इतर काही पडताना पाहीलंच नसेल हे काही खरं वाटत नाही. मग तेव्हा त्याचं कुतुहल का नाही जागृत झालं? तर आमच्या मते, त्याचं मर्म, सफरचंद टाळक्यात पडण्यात आहे.. केवळ त्यामुळेच त्याच्या विचारबुद्धीला धक्का बसला आणि ती कार्यान्वित झाली असावी! डोक्यात सफरचंद पडल्यावर मेंदुतील लहरींमधे वाढ होते असं आम्ही बर्‍याच प्रयोगाअंती सिद्ध केलं आहे. नंतर आमच्या असंही लक्षात आलं की डोक्यात काहीही पडलं तरी लहरींमधे वाढ होते, सफरचंदच पडायला पाहीजे असं काही नाही (ही खरी बुद्धिमत्तेची उत्तुंग झेप!).

म्हणजे, एखादा प्रश्न भेडसावत असेल तर भिंतीवर डोकं आपटा असं म्हणतात त्यात तथ्य आहे तर! त्या पेपरामुळे बर्‍याच विद्वानांच्या विचारबुद्धीला धक्का बसला मात्र! त्याच धक्क्याने त्यांना, न्यूटन नारळाच्या झाडाखाली बसला असता तर काय झालं असतं याचा विचार करण्यासाठी आपल्या डोक्यावर काय पडायला पाहीजे, याचा उहापोह करण्यास प्रवृत्त केलं!

जीवशास्त्रातल्या एकाचा हा शोध -- बेडका समोर नुसती पेन्सिल जरी आपटली तरी बेडूक उडी मारून बाजूला होतो. त्याचा एक पाय कापला तरी तो उरलेल्या ३ पायांवर बाजुला जायचा प्रयत्न करतो. अगदी तीन पाय कापले तरीही तो सरकण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण चारही पाय कापल्यावर मात्र नाही. सगळे पाय कापल्यावर त्याला पेन्सिल दिसत नाही असा अफलातून निष्कर्ष एका पेपरात होता.

काही संशोधनात 'गुणसूत्रांसारखी अवगुणसूत्रं पण असतात का?', 'कस्तुरीमृग, कांचनमृग आणि शहामृग हे जीवशास्त्रीय दृष्ट्या एकाच प्रकारचे प्राणी आहेत की नाहीत?' असल्या घोडा छाप प्रश्नांवर बरंच चर्वितचर्वण केलेलं होतं. काहींनी, आपण काही तरी मूलभूत आणि महत्वाचं सांगत आहोत असा आव आणून, जगाला आधी पासूनच माहीत असलेल्या गोष्टी सांगितल्या. त्या मागे संशोधकांची वैचारिक बद्धकोष्ठता असावी. नाही म्हणायला त्यांच्या पेपर संख्येत वेगवान भर पडली. त्यातले काही पेपर असे.. 'जास्त कंप्युटर गेम खेळणारे विद्यार्थी गृहपाठात मागे पडतात', 'नाक शिंकरणे ही मनुष्य प्राण्याची खासियत आहे, इतर प्राण्यांमधे ती आढळत नाही', 'हँगोव्हर मुळे त्रास होतो', 'कार्यालयात शुद्ध हवा मिळाली तर कर्मचार्‍यांचं आरोग्य चांगलं रहातं!', 'दूषित पाणी विकसनशील देशात जास्त मुलांचा बळी घेतं'.

काही शिरोमणींना माणसाच्या कुठल्याही कृतीशी, उत्क्रांती आणि लाखो वर्षांपूर्वीची त्याची रहाणी, याचा संबंध जोडण्याचा हव्यास दिसला. कुरूप तरुणाशी लग्न केलेल्या सुंदर तरुणी, सुंदर तरुणाशी लग्न केलेल्या कुरूप तरुणींपेक्षा जास्त सुखी असतात. कारण, सुंदर पुरुषांचा आपल्या जोडीदाराला भावनिक आधार देण्याकडे कमी कल असतो. याचं मूळ उत्क्रांतीमधे आहे ते असं.. सुंदर पुरुषांना सहजपणे भरपूर जोडीदार मिळू शकतात. किंवा, स्त्रियांना चष्मा लावणारे पुरूष, न लावणार्‍यांपेक्षा कमी आकर्षक वाटतात. कारण, प्राचीन काळी कुठे चष्मा होता? तसंच, स्त्रियांना नकाशे किंवा दिशा लवकर समजत नाहीत पण पुरुषांना समजतात. कारण, परत उत्क्रांतीच! पुरुष पूर्वी शिकारीला बाहेर पडायचा ना? त्यामुळे! त्यांना जरा स्कोप दिला तर, हल्लीच्या माणसाच्या नेटवरच्या भटकंतीत आदिमानवाच्या रानोमाळ भटकंतीच्या खुणा कशा आहेत, ते पण दाखवतील.

या लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांना नेहमी प्रमाणे ३ बाजू होत्याच. असल्या फालतू संशोधनावरचा खर्च बंद केला तर फी पण कमी होईल. किंवा, संशोधनाला चांगला विषय सुचण्यासाठी भिंतीवर डोकं आपटून पहा. निदान डोकं फुटून जगाचा छळ तरी वाचेल. वगैरे, वगैरे! उलट, कुलगुरूंसारख्या समर्थकांनी 'आपलं कुतुहल शमवणं हे तहान लागल्यावर विहीर खणण्याइतकं नैसर्गिक आहे' असं विधान करून आपला पाठिंबा दिला. खर्‍या बाजूबद्दल तुम्हाला सांगायला नकोच!

बायोफिजिक्सच्या एका संशोधकाने केवळ ३ महीन्यात १५ पेपर पाडलेले बघताच कुलगुरूंना आकडा लागल्याचा आनंद झाला. त्याच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी कुलगुरूंनी त्याला भेटायला बोलावलं. तर तो म्हणाला.. 'मी सचिन तेंडुलकरचा फॅन असल्यामुळे सचिनच्या सर्वच गोष्टींमधे मला कमालीचा रस वाटतो. धावा काढण्यासाठी सचिन आत्तापर्यंत किती किलोमिटर पळाला असेल असा प्रश्न पडल्यावर मला माझ्यातला शास्त्रज्ञ आणि फॅन स्वस्थ बसू देईनात. ही आकडेमोड तशी बरीच गुंतागुंतीची आहे म्हणून मी काही बाबी गृहीत धरल्या.

१> सचिनने चौकार, षटकार मारलेले असले तरी त्या सर्व धावा पळून काढल्या.
२> बाईज, लेग बाईज साठी तो किती पळाला ते आकडेमोडीत धरायचं नाही.
३> भागिदारीत दुसर्‍या फलंदाजाच्या धावांसाठी तो किती पळाला ते धरायचं नाही.
४> गोलंदाजी टाकण्यासाठी किंवा क्षेत्ररक्षणासाठी त्याला किती पळावं लागलं ते धरायचं नाही.

या गृहितकानंतर असं गणित मांडता येतं..

खेळपट्टीची लांबी २०.१२ मिटर असते.

एक दिवसीय सामन्यातल्या सचिनच्या धावा १८१११ * २०.१२ = ३,६४,३९३ मिटर्स = ३६४.३९ कि.मी.

कसोटीतील धावा १४६९२ * २०.१२ = २,९५,६०३ मिटर्स = २९५.६० कि.मी.

एकूण ३६४.३९ + २९५.६० = ६५९.९९ कि. मी. म्हणजेच आत्तापर्यंत सचिन ६६० कि.मी. पळाला.'

तरीही यातून १५ पेपर कसे झाले हा पेच होताच! त्यावर संशोधकाने असा खुलासा केला.. 'एकदा सचिनवरचा पेपर अ‍ॅक्सेप्ट झाल्यावर पुढचं सगळं सोप्पं होतं. मग मी गावसकर, द्रवीड, सेहवाग अशा सर्व फलंदाजांवर पेपर टाकायला सुरुवात केली. प्रत्येक पेपरला सचिनवरच्या पेपरचा रेफरन्स होताच.' कुलगुरूंना मात्र एका छोट्या बीजाचा वटवृक्ष कसा होऊ शकतो याची साद्यंत कल्पना आली. पण संशोधकाच्या मते तर हे सगळं म्हणजे किस झाडकी पत्ती.. ही सगळी गणितं आणखी बिनचूक करून त्याच बीजाचं जंगल करणं शक्य होतं. त्यानं घेतलेली खेळपट्टीची लांबी तितकीशी बरोबर नाही. ती खरी २०.११६८ मिटर्स पाहीजे. तसंच, सचिनच्या एकट्याच्या धावा न घेता त्याच्या बरोबर झालेल्या भागिदारीतल्या सर्व धावा घ्यायल्या हव्यात. असा सुधारित पेपर सचिनवर झाला की परत गावसकर, द्रवीड, सेहवाग इ. इ. आहेतच!

अशा पद्धतीने पेपरांचा सडा पडणार हे समजताच कुलगुरू आनंदाने फुटाण्यासारखे उडाले, त्यांच्यासाठी ती गोष्ट म्हणजे सिटी बँक मोमेंट ऑफ सक्सेस होती.. आकडा गाठलेला होता, आता पुढची काही वर्ष तरी अनुदानाची चिंता नव्हती. या गोष्टीचं भांडवल करणं पुढच्या कुलगुरू पदासाठी आवश्यकच होतं. त्यांनी पेपर मधे लगेच 'संशोधनाला चालना आणि प्राधान्य देणारे द्रष्टे कुलग्रुरू' असा बँड वाजवून घेतला. 'मी फक्त संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं' हे त्यांच्या मुलाखतीत आलं. तिकडे, पदार्थविज्ञान प्रमुखांनी 'हेच दिवस बघायला जिवंत ठेवलंस का रे नारायणा?' म्हणून हताशपणे भिंतीवर डोकं आपटलं.

====== समाप्त ======

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला रे Happy
नाहीतरी बहुतांश विद्यापीठांत समाजशास्त्र आणि भाषा विषयांमधे (सायन्सचं काय माहित नाय ब्वा!) जवळजवळ ९०% संशोधन असंच चालतं की Proud

पर्दाफाश केलात कि राव !
आम्हाला आपले सगळे प्रबंधलेखक म्हणजे कुणीतरी अमानवीच वाटायचे !

चिमणराव,

तुम्ही चक्क जत्रा मासिकात लिहिता? Proud

पण लेख मात्र खासंच आहे. तुम्ही राहता तिथल्या बैलघाटावरही (=oxford) अशीच परिस्थिती आहे असं ऐकून आहे. मनमोहनसिंगाकडे पाहिलं की खात्री पटते! Lol

आ.न.,
-गा.पै.

मस्त रे चिमण .
गळे पाय कापल्यावर त्याला पेन्सिल दिसत नाही असा अफलातून निष्कर्ष एका पेपरात होता. >>> Lol

भन्नाट Lol मस्तच जमलं आहे. (आता तरी माझ्या वरच्या प्रश्नाचं उत्तर दे Proud )
बेडकाचा जोक मी झुरळासंदर्भात ऐकला होता. 'दिसत नाही'च्या जागी 'ऐकू येत नाही' होतं.

मस्त जमला लेख Happy

खालील लिंकची आठवण आली.
http://pdos.csail.mit.edu/scigen/

इथे तुमच्या नावाने random पेपर तयार करता येतो.
इथे तयार केलेला पेपर काही confernece मध्ये सिलेक्ट झाला आहे Happy

धन्यवाद!

@अजय जवादे, खरंच अफलातून आयडिया आहे ती! धन्यवाद!

>> हा लेख आत्ता इथे टाकण्याचं कारण??
@लले, कसदार विनोदी लेखाची तृष्णा असलेल्या तुझ्यासारख्या अनेक लोकांची गरज भागविण्यासाठी केलाय हा उपद्व्याप! हे घे तुझं उत्तर (एकदाचं)! Proud

>> बेडकाचा जोक मी झुरळासंदर्भात ऐकला होता. 'दिसत नाही'च्या जागी 'ऐकू येत नाही' होतं.
यालाच इनोव्हेशन ऐसे नाव! Wink