तीर्थरुपांना चित्रपटांची ओढ नसल्याने लहानपणी चित्रपटगृहांचे अंतरंग पाहण्याचे फार योग आले नाहीत. पण त्याकाळी अनेकदा फिरते चित्रपट यायचे आणि आजुबाजुच्या योग्य व्यक्तींशी संधान साधून अनेक बोलपट कधी पुढून तर कधी सगळ्यांना डावखुरे बनवत मागून पाहिले. 'आम्ही जातो आमुच्या गावा' (१९६८) सारखा एखादा अपवाद वगळता ते कोणते हे ही आठवत नाहीत. ही गोष्ट १९८० च्या आधीच्या परभणीतील. नाही म्हणायला वडीलांना एकदा सिनेमाला ओढून नेले होते - आवडत्या नटाच्या नव्या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशीच्या सेकंड शोला: 'मुकद्दर का सिकंदर' (१९७८). ती आठवण कोरली जायचे अजून एक कारण म्हणजे त्या रात्री महामुसळधार पाऊस झाला. कल्याणजी - आनंदजींच्या साथीला थेटराच्या पत्र्यांवर वरूणदेवांनीही ठेका धरला होता. नशीब म्हणजे पत्रे जागेवर राहिले. घरी पोचल्यावर जे वादळ सुरु झाले (बाहेर) त्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे इतके उंच उडाले की लखलखणाऱ्या विजांमधे ते पतंगाइतके छोटे दिसत होते. पहिल्या दिवशी पिक्चर पाहिल्यामुळे झालेला कोप? पण खरंच, का जातात लोक पहिल्याच दिवशी सिनेमा पहायला? (इतक्यात तर हॅरी पॉटर सारख्या पुस्तकांचेही तेच झाले आहे) जणु काही शिळी 'स्टोरी' शिळी होते. की इतरांनी पाहिल्यावर त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटांचे हादरे बसु नयेत म्हणुन? की स्वत:ला तत्सम गौप्यस्फोट करणे आवडते म्हणुन? खुप जुन्या कथेतील सस्पेन्स फोडतांना परवाच एकाने विचारले होते की अशा स्पॉयलर्सवर एक्स्पायरी तिथी असते का म्हणुन …
वडलांबरोबर हा पाह्यला तसेच अकोल्याला काकाबरोबर रांबो फेम 'First blood' (१९८२). कोणाबरोबर कोणते (भलतेसलते) चित्रपट पाह्यले हे लिहायचं ठरवलं तर तो स्वतंत्र लेखच होईल. आलेल्या पाहुण्यांबरोबर कधीकधी जाणे व्हायचे. त्यामुळेही पाहिलेले चित्रपट खूपच मिश्र असत. त्यातही खालील प्रमाणे काही झाले की मज्जाच: चुलत-चुलत भावाबरोबर एकदा 'मुगल-ए-आजम' (१९६०) पहायला गेलो (एका सल्फरयुक्त तळ्याशेजारी हे चित्रपटगृह होते - मला त्याचेच जास्त कुतूहल). स्थानापन्न झालो, ट्रेलर्स वगैरे पाहून झाले, आणि शेवटी एकदाचा चित्रपट सुरु झाल्यावर कळले की तो होता 'पाहुणी' (१९७६). मुगलेआजम म्हणे पुढील आठवड्यात!
शेजाऱ्यांबरोबरही काही पाहिले. 'शोले' (१९७५) अर्थातच आवडला, पण 'द बर्नींग ट्रेन'चेही (१९८०) अप्रुप वाटले होते. एकामागून एक येणारी ती हिरो-हिरॉइन्सची ट्रेन, आणि सर्वात वेगवान गाडीला आग लागल्यावर त्या गाडीची बरोबरी करू शकणारी दुसरी गाडी. त्याकाळी सायकल चालवणे सुरु झाले असल्याने पिक्चर्स नाही तरी पोस्टर्स पहायला अधुनमधुन हजेरी असायची.
आवडते पिक्चर पुन्हा-पुन्हा पहायला तेंव्हाही आवडायचं, आताही आवडतं. तेंव्हा फुकटात पहायला मिळाला एखादा असा चित्रपट की जास्तच मजा यायची, हिडन कॉस्ट काहीही असली तरी. नांदेडला 'दिवार' (१९७५) ला गेलो होते. मधेच लाईट गुल. दुसऱ्या दिवशीचं तिकीट फुकटात मिळालं. घरी जाऊन पुन्हा यावं लागेल पेक्षा पुन्हा पहिल्यापासून गाडी, बंगला मिळवायची प्रक्रिया पाहता येणार याचाच आनंद.
परभणीहून यवतमाळला गेलो तेंव्हा व्हिडीओ पार्लर्सचे पेव फुटले होते. चौकाचौकात छोट्याछोट्या खोल्यांमधून व्हिडीओ कॅसेट लावून सिनेमे दाखवत. पैसे वेफर्स आणि सरबताचे म्हणून घ्यायचे. त्या काळात ब्रुसलीचे अनेक चित्रपट पाहून झाले. पुढे पोलिसांच्या धाडी पडून सुरु झाले त्याच वेगाने हे पार्लर्स बंदही झाले.
नंतर चंद्रपुरला पोचलो. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच कळले की इंग्रजी चित्रपट म्हणजे कराटे असं समीकरण नसतं. दर आठवड्याला जयंत टॉकीजला एक नवा (म्हणजे तसा जुनाच) इंग्रजी चित्रपट असायचा. त्यातील बरेच पाहिले. एक-दोन लक्षात राहिलेले म्हणजे Stalker (१९७९) आणि Hopscotch (१९८०). तिथल्याच एका दुसऱ्या सिनेमागृहात 'वेगळ्याच' इंग्रजी सिनेमांचा भरणा असायचा. पब्लिककरता त्यांची जाहिरात मात्र हिंदीतून असायची. X हा Y पेक्षा स्फोटक आहे, Z पेक्षा revealing आहे वगैरे विशेषणांनी ओतप्रोत ती लांबलचक यादी असायची. कधीकधी वाटायचं की ज्या चित्रपटाची जाहिरात आहे त्याचेच नाव चुकुन 'पेक्षा जास्त मसालेदार' च्या यादीत वापरतील म्हणुन.
IIT entrance करता एका मित्राबरोबर चंद्रपुरहुन नागपुरला आलो होतो. परिक्षाकेंद्राजवळच नव्याकोऱ्या अलंकार चित्रपटगृहात सुरु होता 'Go for it' (१९८३). मग काय - ३ तासांचे ते पेपर अॉप्शन सहीत एका तासात सोडवुन पिक्चरला. सिनेमा अफलातुन होता, पण IIT ने मात्र आम्हाला आमंत्रण दिले नाही.
गटांबरोबर पाहिलेले चित्रपट एका वेगळ्याच दुनियेतले असतात. 'रामलखन' (१९८९) आणि 'त्रिदेव' (१९८९) सारखे काही धमाल करण्याजोगे (नागपुर) तर 'दिल' (१९९०) आणि 'नगीना' (१९८६) सारखे काही धमाल करावीच लागेल असे (पुणे). पण एक वेगळ्याच प्रकारे लक्षात राहिलेला किस्सा आहे बंगलोरचा. इंडस्ट्रीयल टूर. दिवसभर रखडून रात्री थिएटरजवळ दाखल. भुका लागलेल्या पण वेळ नाही. 'टु-गो' प्रकार तेंव्हा नव्हता, तरी चिकन गेटकीपरच्या नजरा चुकवून थिएटरमधे.ट्रेलर्स सुरु असतांना चट्टामट्टा करुन सिनेमा सुरु व्हायच्या आत सगळे ढाराढुर. सिनेमा होता 'Nightmare on Elm street' (१९८४). यथावकाश नायीका जोरात किंचाळली. चित्रपटगृहांच्या प्रथेप्रमाणे आवाज तेंव्हा मुद्दाम वाढवलेला. सगळे दचकुन जागे. दोन मिनीट जड डोळ्यांनी काय सुरु आहे ते समजून घेण्याचा असफल प्रयत्न की पुन्हा झोप. थोड्यावेळानी अजून एक किंकाळी. असे चित्रपटभर. पुन्हा कधीतरी पहावा लागणार आहे हा चित्रपट.
चित्रपट आवर्जुन पाहिल्या जात नाहीत. अनेकदा ते जरा जास्तच वास्तववादी असतात (म्हणजे आसपास दिसतं तेच दाखवणार- ते वेळ घालवुन, पैसे देऊन कशाला पहायचे), किंवा प्रत्यक्षाशी काहीच ताळमेळ नसलेले. त्याऐवजी नव्या कल्पना, नवे विषय हाताळलेले आवडतात. साय-फायशी असलेली जवळीक त्यामुळेच. आज साय-फाय वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी उद्याचे वास्तव असतील (आणि तेंव्हा पहायला आवडणारही नाहीत) पण कदाचीत या कल्पनांमुळेच त्यासंबंधीत संशोधनाला चालना मिळेल.
भारतात खरंतर साय-फाय सिनेमे चांगले चालतील. 'मि. इंडीया' (१९८७) आणि 'कोई मिल गया' (२००३) लोकांनी हिट केले. पण तरीही अनेक दिग्दर्शक (आणि निर्माते) महाभारत स्टाईल युद्धातच रमतात. भारतातील समृद्ध इतिहास योग्य प्रकारे वापरुन अनेक सुंदर वैज्ञानिक कथानकं रचता येतील. तसं कोणी करेपर्यंत बहुदा अजून एका करुण 'जोकर' (३१ अॉगस्ट २०१२) वर समाधान मानावे लागेल.
आशिष, मस्त लिहिले आहेस. अगदी
आशिष, मस्त लिहिले आहेस. अगदी बारा गावचा सिनेमा पाहिला आहेस (बारा गावचं पाणी प्यायल्याच्या चालीवर)
---
यथावकाश नायीका जोरात किंचाळली. चित्रपटगृहांच्या प्रथेप्रमाणे आवाज तेंव्हा मुद्दाम वाढवलेला. सगळे दचकुन जागे. >>>> 'सरगम' पाहताना "डफलीवालेऽऽ" लागल्यावर वडिल असेच दचकून जागे झाले होते. खूप दमलेले असतानाही आमच्या हट्टाखातर ते बिचारे आम्हाला घेऊन नॉव्हेल्टी थेटरात आले होते.
---
अनेकदा ते जरा जास्तच वास्तववादी असतात (म्हणजे आसपास दिसतं तेच दाखवणार- ते वेळ घालवुन, पैसे देऊन कशाला पहायचे), >>> इंटेलेक्च्युअल कॅटेगरीला फक्त तेच आवडतात. सर्वसामान्यांना वास्तववादीबरोबरच निखळ करमणूकप्रधानही, प्रत्यक्षाशी काहीही ताळमेळ नसलेलेही आवडतात. मी याच सर्वसामान्य कॅटेगरीतली, त्यामुळे उंबरठा आवडतो त्याचबरोबर मुन्नाभाईही प्रचंड आवडतो
मस्त ! आवडलं
मस्त ! आवडलं
छान. माझासुध्दा चित्रपट
छान. माझासुध्दा चित्रपट पहाण्याचा प्रवास असाच काहीसा आहे. हिंगोली-प.नां. मुं. एकेका सिनेमाच्या आठवणी मजेदार आहेत. " काजल" पहायला आम्ही गेलो तर लाईट गेले, मग कागदावर शिक्का लावलेला पास मिळाला. दुसर्या दिवशी परत पहायला.. एकदा लहान भाऊ बरोबर तर त्याला आला कंटाळा . स्गळ बरोबर चे खाऊन शेवटी शिरा मागू लागला. कधीकधी मला घरी टाकून आईबहिण जायच्या. एकदा रात्री नवाच्या शो ला पाहुण्यांसमवेत सगळे जाऊ लागले. मी आपली ८:३० लाच झोपलेली . अचानक नऊ-स्व्वानऊला पहाते तर सगळे तयार.. ताबडतोब तयार होऊन रिक्षात (सायकलरिक्षा) पायाशी बसून का होईना गेलेच. चित्रपट - हा खेळ सावल्यांचा.. हे खरे नाहीबबर का असे आई आम्हाला वारंवार सांगायची. प्रेमपट पहाताना विशेषतः
'जोकर'ला अपेक्षेप्रमाणे बेकार
'जोकर'ला अपेक्षेप्रमाणे बेकार रिव्युज आहेत ...
(No subject)