विषय क्रमांक २- तुझे नि माझे जुळले नाते!

Submitted by Dev_K on 31 August, 2012 - 13:32

’नही चाहिये मुझे वो दिलफेक आशिक, जो माशूक का हाथ थामते ही अपने हथियार फेक दे' - असे १९८६मध्ये ’कर्मा’मध्ये कडाडणारा दिलीप कुमार १९६०मध्ये तेवढ्याच, कदाचित त्याहून अधिक आवेशात ' मुगल- ए- आजम'मध्ये 'तो मेरा दिल भी आपका हिंदुस्तान नही है, जो आप उसपर हुकुमत करे' असे गरजला होता.

'शराबी' मध्ये बापाची अथांग सागराएवढी धनदैलत आपल्या प्रेमापायी झुगारणारा अमिताभ कालांतराने (वय वाढल्यावर) 'मुहब्बते' आणि 'कभी खूशी कभी गम'मध्ये 'मुहब्बत'चाच 'दुश्मन' झाला होता.

थोडक्यात काय, तर आणखी काही वर्षांनी सद्य:स्थितीतल्या समस्त ' प्यार करनेवालों' च्या विचारसरणीचा शिरोमणी शाहरुखही 'दो प्यार करनेवालों के बीचकी दिवार’ बनल्यास आश्चर्य वाटणार नाही.

चित्रपट हा सामाजिक भावभावनांचे आणि आचार विचारांचे प्रतिबिंब असतो, असे म्हणतात. निदान माझा तरी त्यावर ठाम विश्वास आहे. शेवटी ' पब्लिक'ला जे रुचेल/ पटेल/ भावेल असेच उत्पादन 'फॅक्टरी'मधून बाहेर येणार ना? प्रश्न हा केव्ळ प्रेमाचाच नाही तर सगळ्याच मानवी गुणांचा / अवगुणांचा आहे. जे पडद्यावर दाखवले जाते, ते कुठेतरी, काहीतरी प्रमाणात घडत असतेच ना? त्यातला भडकपणा सोडला तर कित्येकदा, आपल्याच जीवनातील घटना रजतपटलावर आढळतात. 'ग्रंथमैत्री ही सर्वात उत्तम मैत्री ' असे आपल्या पंडितांनी म्हणून ठेवले आहे. खरेच आहे ते. मला त्या पंगतीत चित्रपटांनाही बसवावेसे वाटते. कित्येक वेगवेगळ्या विचारधारांतून, विचारमंथनातून, परमोच्च कलासक्तीमधून असा भव्यदिव्य आणि मानवी मनाचा छेद घेणार्या, कधी अंर्तमुख होण्यास भाग पाडणार्या कलाकृती, ह्या माध्यमाद्वारे आपल्यापुढे येत असतात. अडीचतीन तासांत विश्वाचे भौगोलिक, भावनिक, वैचारिक आणि सामाजिक दर्शन घडवणारा आणखी कोणी तेवढा प्रभावी गुरू मलातरी आढळत नाही. हो, सगळ्यांच कलाकृती ह्या पंक्तीत बसणार्या नाहीत हे मान्य. पण जसे पुस्तकांमध्येही चांगली/ वाईट, आईवडिलांनी लहानपणी आपल्यापासून महत्प्रयासाने दूर ठेवलेली अशीही पुस्तके असतातच ना? शेवटी हे तर मानवी पात्रावर असते की त्याने काय संचित करायचे आहे ते.

तर आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येतो, 'प्यार के दुश्मन' हे एक निमित्तमात्र किंवा एक आयकॉनिक उदाहरण. 'बदल (हवा) बदल (हवा)' असे बेंबीच्या देठापासून एका विशिष्ट वयोमानास ओरडणारे, प्रसंगी त्यासाठी संघर्षासही तयार होणारे, दुसर्या एका विशिष्ट वयोगटात बदलांचे तेवढेच कडाडून विरोध करणारे कसे होऊ शकतात? हा प्रश्न खरंच मला राहूनराहून सतावत असतो. आणि त्याचा खोलवर विचार करता मग बदलाचे वारे, नवयूग वगैरे शब्द फारच बोथट वाटू लागतात. पण मग अशावेळी 'सिनेमा' माझ्यासाठी धावून येतो आणि त्याची जादू एकदा फिरली कि मग परत एक वेगळी धुंदी आणि वेगळे विचारचक्र..... and life moves on. खरचं, 'The show must go on' हे विधान आपल्या अथक परिश्रमांतून राबवणार्या कलाप्रेमींना एक वेगळीच बांधिलकी ह्या माध्यमाद्वारे बांधली आहे आणि सामान्यदृष्ट्या तोचतोचपणा वाटणार्या कलाकृतींतूनही काही भिन्न दृष्टिकोन समोर येतच असतात.

सिनेमा आता वयात येतोय, असे म्हणणार्यांची कधीकधी कीवच येते. भारतीय चित्रसृष्टीचा 'ज्वेल इन क्राउन' मानला गेलेल्या 'मदर इंडिया' कर्ते मेहबूब खान यांनी १९४८मध्ये साकारलेला 'अंदाज' हा त्याकाळच्या विचारसरणीच्या कित्येक वर्षे पुढे होता. बिमल रॉय, व्ही. शांताराम यांसारख्यांनी नुसतेच विचारांस प्रवृत्त करायला लावणारे नाही, तर डोळ्यांत झळझळीत अंजन घालणारे चित्रपट समोर आणले. आत्ता तरीही आपणांस स्वित्झर्लंडमधल्या द्वंद्वगीतांची आणि हवेत साबणाचे फुगे उडवावेत तसे गाड्या आणि माणसे उडवणार्या दृश्यांचीच हौस असेल तर तेच लाड ्पुरवले जातील ना? थोडक्यात काय, 'जो बिकता है, वो दिखता है'.

एकदा जीवनविषयक तत्त्वज्ञान, गरम शेगडीतून लाह्या जशा फुटत असतात, तसे तोंडून फुटायला प्रवृत्त करणार्या 'गप्पांच्या' कार्यक्रमाच्यावेळी एका सहयोग्याने सध्याच्या एका जाहिरातीच्या धर्तीवर 'सोच बदलिए- सिनेमा अपने आप बदल जाएगा' असा एक 'डायलॉग' मारला होता. आणि त्यांस मैफिलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हो, माझं एक मनही तेच म्हणातं, पण लगेच दुसरा विचार- 'सिनेमा बदलू नये. किंबहूना त्याला कोणी बदलायला जाऊ नये'. त्याला तसेच free flowing, नाचत बागडत हवा तो आकार घेऊ दे. त्याच्यावर दडपण आलेले आमच्याच काळजाला कुठेतरी ठेच द्यायचे. काय करणार... 'फिर भी दिल है फिल्मीस्तानी'.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users