१. माझी आवड - मा अन्नय्या (तेलुगु चित्रपट)

Submitted by चिन्नु on 31 August, 2012 - 10:21

मा अन्नय्या: तेलुगु चित्रपट.

मी कधी हे लिहीन असे मला वाटलं नव्हतं Happy ह्या स्पर्धेत भारतीय भाषा व भारतात निर्माण झालेले चित्रपट आहेत आणि आवडत्या तेलुगु पटाबद्दल लिहावंस वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.

लक्षवेधक म्हणावे असे चित्रपट कितीतरी आहेत. काही वरिजीनल तर काही हॉलीवूडपटांची ठिसूळ कॉपी. मा अन्नय्या - आमचा मोठा भाऊ, हा चित्रपट निवडायला बरीच कारणं आहेत. लहानपणापासून पाहीलेले जयश्री गडकर-चंद्रकांत-सूर्यकांत असे सोज्वळ घरेलू चित्रपट म्हणा, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान म्हणा किंवा वरिजीन्ल भारतीय चित्रपट जो कुठल्याच हॉलीवूड चित्रपटावर आधारीत नसलेला असल्याने म्हणा, हा चित्रपट मनात एक खास स्थान बाळगून आहे.

गोष्ट साधीशीच. एक भाऊ - ज्याचे लहान भाऊ आणि आजी म्हणजे जीव की प्राण आहेत. तो त्या भावंडांचा सर्व काही आहे. आई-वडील्-सर्वच. आपल्या भावंडांसाठी त्यागाची परिसीमा गाठते जेव्हा तो आपल्या प्राणप्रिय प्रेयसीशी लग्न करायचं नाकारतो. कारण- तिच्या भावाला ह्या लहान भावंडांची जबाबदारी आपल्या बहीणीने घेऊ नये असे वाटते. ह्या कारणाने नायक लग्न न करता प्रेयसीकडं पाठ फिरवतो. पण पुढील आयुष्यात मात्र प्रेयसीच्या भावाची मुलगी नायकाच्या लहान भावाच्या प्रेमात पडते. मग पुढे काय होतं? हे चित्रपटात पाहणेच योग्य ठरेल.

मारधाड, विचित्र प्राणी, रहस्यपट वगेरेंच्या जमान्यात हा चित्रपट मनःशांती देणारा, घरात सर्वांनी मिळून बघावासा आणि बघतांना आपल्याच कित्येक स्मृतींना उजाळा देऊन, क्षणक्षणाला आनंद देणारा असा मला वाटला. एक सुंदर, लांबसडक वेणी घातलेली, मोजके दागिने ल्यालेली, गजरा माळलेली आणि दारासमोर सुंदर रांगोळी घालणारी आपली आई, बहीण बघतांना जसा आनंद होतो, तो आनंद देणारा हा चित्रपट.

चित्रपटाची सुरुवात होते एका साध्याश्या घरात. रमाप्रभा (हो हो मुत्थुकोळी वालीच! ह्या चित्रपटात आज्जी आहे :)) चूल फुंकत असते आणि नातवंडांना शाळेत जाण्यासाठी उठवत असते. बस्स्. येथून जो धागा दिग्दर्शकाने पकडला आहे, तो साधेपणा पूर्ण चित्रपटात आणि आपल्या मनात भरून राहतो. कुठे भंपकपणा नाही, खोटेपणा नाही.. मुळात ते घर तुमचं-आमचं वाटतं, ती माणसं आपलीच वाटत राहतात..

या चित्रपटाला दर्शकांनी लयीच डोक्यावर घेतले. तसेही आंध्रातली जंता कुठलाही चित्रपट म्हणलं की यडीच होते. मग त्या नायकाच्या पोस्टरला हार कै, त्यात मडकी कै न नोटा कै, हैद्राबादचे रस्ते बंद होतील अशा तिकिटखिडकीवर रांगा कै, कैच्यकैच येडे! आता एवढा चांगला चित्रपट म्हणल्यावर लोक्स मेंटल व्हनारच Happy

चित्रपटात विनित, ब्रम्हाजी, नाजीर, दीप्ती भटनागर आणि इतर बर्‍याच कलाकारांनी काम केलंय, पण तरी अन्नय्याची भुमिका तसेच डबलरोलमध्ये आपल्याच लहान भावाची पण भुमिका साकरली आहे डॉक्टर राजशेखर यांनी. तिला तोडीसतोड भुमिका केली आहे मीनाने. जोडीला कैरीच्या फोडीसारखी - मला म्हातारी म्हणू नका म्हणून ठणकावून सांगणारी आज्जी - रमाप्रभा!

बरेच प्रसंग जसे मीनाचे साधे सहजपणे घरातली सून म्हणून वागणं, सर्वांना आईच प्रेम देणं, दीरांना प्रेमाची शिकवण देणं सहज सुंदर आहे. एक नकचढी मुलगी म्हणून महेश्वरीचे काम पण छान झालयं.

आता तुम्ही म्हणाल, यात काय मोठसं?

तर मला वाटलं की ही तर तुमची आमची कथा. जेव्हा मोठा भाऊ, कोसळत्या पावसात आपल्या भावंडांचा आधार होतो, तेव्हा मलाही आठवलेला आमच्या मुंबईचा पाऊस.. ठिकठिकाणी ठिबकणारं छप्पर आणि शेजार्‍यांना देऊ केलेला चहा..
लहान भाऊ मेडिकल शिकत असतांना मोठा भाऊ त्याला आवडतो म्हणून खरवस घेवून जातो, पण नातं नाकारून चेहेरा लपवणारा लहान भाऊ पाहतांना, कधीतरी मीच उर्मटपणे दिलेली दुरुत्तरंही आठवली.
लोभस अशी सद्-गृहिणी आणि श्रीमंतांची ल्येक असूनही माहेरची दौलत नाकारून नवर्‍याला लोणची-पापड बिझिनेस मध्ये मदत करणारी, मोठ्यांचा आब राखणारी मीना.. कुठेनाकुठे तुमच्याही घरात-मनात असेलच ना?
सर्वांनी मिळून साजरे केलेले सण डोळ्यासमोर तरळून जातात, असा चित्रपटात साजरा झालेला पाडवा..

हा चित्रपट म्हणजे एक सुंदर रंगीत रांगोळी आहे, सकाळी देवासमोर लावलेल्या उदबत्तीचा घमघमाट आहे. एक सात्विक समाधान आपल्या चेहेर्‍यावर आणण्याचे बळ आहे या चित्रपटात..

अवांतरः डॉ. राजशेखर यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला तेव्हा वाटले की अरे! किती साधा आहे हा माणूस.. आता राजकीय कंगोरे लाभले आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला पण तो भाग वेगळा. त्यांचा जुबिली हिल्स मधला साधासाच बंगला. appointment नाहीये म्हणून बाहेर अडवले असतांना त्यांनी स्वतः येऊन आमची सुटका केली. आत गेल्यावर सर्व काही दिसलं साधं, प्रसन्न.. फ्रीजवर तुमच्या आमच्या घरात असतात तशी लहानग्यांची फोटो डकवलेली. तशीच साधीशी त्यांची पत्नी जिविता. बरं नसूनही आमची अखंड बालिश बडबड त्यांनी ऐकून घेतली. मी त्यांना दिलेली एक पानाची कथाही (?) त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतली. नको म्हणत असतांनाही गार फेसाळ मसाला ताक देऊन आमची रवानगी केली Happy मी आणि मैत्रीण, आम्ही इतके एक्साईट झालेलो की किती वेळ त्यांचा घेतला काय बडबड केली आणि एका दमात ताक कसं संपवलं याचा आढावा घेत आम्ही बाहेर येऊन किती किती हसलो याला नेम नाही Happy
डॉ. राजशेखर यांना पाहून मात्र पदोपदी त्यांच्या या चित्रपटातील भुमिकेची आठवण येत राहिली. असा मा अन्नय्या, मला भावलेला..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंयस.
आता सीडी शोधून बघायला हवा.
बाबूमोहनचे आचरट विनोदवाले किंवा चिरंजीवीचे मारधाड वाले सिनेमे पाहून कंटाळा आलाय तेलुगु सिनेमाचा.

स्वाती मुत्य्यम, सिरि सिरि मुव्वा याबद्दल पण लिही वेळ काढून

थांकु शैलजाताई.
Happy मेधाताई, सुरुवातीला लिंक दिली आहे, youtube वर पूर्ण चित्रपट आहे.

ह्या चित्रपटाची अजून एक जमेची बाजु म्हणजे संगीत. एकदातरी बघवतील Happy अशी गाणी आहेत या चित्रपटात.

मी खरंतर गुंडम्मा कथा, शंकराभरणम, सप्तपदी, अलै पयुथे किंवा एक तेलुगुपट ज्यावरून राजनीती काढला होता तो(नाव विसरले!), ऑमॉर साँगी किंवा हल्लीहल्लीचे Happy Days अश्या चित्रपटांबद्दल लिहीणार होते. तसेच अमच्या लाडक्या महेशबाबुचे अतिथी, पोकिरी, ओक्कडु पण लिस्ट्मध्ये होत्ये. पण गनीम शाळेतून आलाय आणि दुसर्‍याने कीबोर्डची एंटर की पळविली. अश्या थाटामाटात लिहिणे झाले. त्यामुळे त्या सर्वांबद्दल कधीतरी. Happy

ह्या लेखनामागचा सद्-हेतू फक्त चांगल्या तेलुगु चित्रपटांची ओळख सर्वांनी व्हावी एव्हढाच आहे.

शैतै, मी शंकराभरणमबद्दल लिहीणं म्हणजे लहान तोंडी मोठठा घास होइल. पण बघेन प्रयत्न करून.
त्या एकट्या चित्रपटाची काही भागांची लेखमाला होइल Wink

चिन्नू, आधी ती वरची यूट्यूबची लिंक उडव. या स्पर्धेच्या नियमांत "लेखाबरोबर यूट्युब किंवा तत्सम संकेतस्थळांवरील व्हिडिओंचे दुवे कृपया देऊ नयेत." असं दिसलं होतं मला. द्यायची असेल तर प्रतिसादात देऊन ठेव. उगाच त्यासाठी प्रॉब्लेम यायला नको असं मला वाटतं Happy

बाकी लेख छान Happy

चिन्नू मी स्वतः तेलुगु सिनेमांची फॅन आहे
हॅपी डेज, आर्या, हॅपी, बोमिरिल्लू, डुकुडू, डार्लिंग, कोंचुम इष्टम कोंचुम कष्टम हे माझे सगळ्यात आवडते सिनेमे.
मा अन्नय्या पाहिला नाहीये पण आज पाहिन बहुदा. त्या लिंकवर सबटायट्ल्स असावेत एवढीच इच्छा!

वेगळ्या भाषेतील सिनेमावर लेख लिहिल्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार. आता हा सिनेमा बघायलाच हवा चिन्नू. Happy
मला स्वतःला इतर भाषिक सिनेमे खूप आवडतात. मात्र नक्की कोणते चांगले हे कळत नाही Happy त्यामुळे लेख लिहिला नाहीस तरी मस्ट वॉच असे तेलुगु / तमिळ सिनेमांची लिस्ट लिहून दे ना.

थँक्स केश्वी. उडवते लिंक.
रीया, हो मलाही त्यात बोम्मरिल्लु गमतीदार वाटलेला. थांकु.
थँक्स संपदाताई, काही नावं मी वर दिलीच आहेत, अजून लिहीन.

मला फक्त गोडगोड चित्रपटच आवडतात असा गैरसमज कृपया करून घेऊ नका. मा अन्नय्या पाहीला तरच कदाचित मी काय म्हणत्येय ते सम्जू शकेल Happy

चिन्नु खूप छान लेख.
मा अन्नय्या पाहीला तरच कदाचित मी काय म्हणत्येय ते सम्जू शकेल << Happy

छान आहे की हे.. Happy लिहा अजून इतर भाषेतल्या चि. बद्द्ल.:) खरवसाबद्दल वाचून शामची आई मधले खरबस खेऊन जाणारे बाबा आठवले. Happy

छान लिहिलेय..
बाकी माझ्यासाठी तामिल, तेलगू, कन्नड सारेच सारखे..

पण मी त्यांचे हिंदीत डब केलेले चित्रपट न चुकता बघतो.. अर्थात ते सारे आचरट विनोदी मसालापट असतात.. मला त्या लोकांचे तेच आवडते..

पण कधी योग आला हा चित्रपट तर पुढच्या चॅनेलवर न पळता नक्की बघेन हा.. Happy

अन्य भारतीय भाषातल्या चित्रपटांची ओळख होत नाही आपल्याला फारशी. वरच्या लेखावरुन हा चित्रपट बघावासा वाटतोय.

अनघा, अभिषेक थांकु. नक्की बघा.

दिनेशदा, काल लिहीतांना तुमची आठवण आलीच. तुम्ही अवश्य वाचाल आणि चित्रपट पहाल ही खात्री होतीच मला.

मी पाहीलाय हा चित्रपट चिन्नु, अतिशय सुंदर चित्रपट !
या चित्रपटावर लिहील्याबद्दल तुझे खास आभार ! शुभेच्छा Happy

थँक्स अमा. स्वातीमुत्यम इज आल टाईम फेवरीट. सुंदर संगीत आहे त्यात. कमलच्या सिनेमांची सीरीज करावी लागेल.

धन्यवाद श्री Happy

छान लिहिलंयस गं. मिळवून बघणार हा सिनेमा.
चांगला सिनेमा किंवा खरतर प्रामाणिक सिनेमा कुठल्या का भाषेतला असेना तो बघायलाच हवा असं काहीतरी झालेलं आहे माझं.. हावरट आहे मी त्या बाबतीत Happy
तेलुगु चित्रपटांबद्दल लेखमालेसाठी जोरदार अनुमोदन.
लेखमालेच्या आधी एक नुसती लिस्ट दिलीस तरी चालेल.

चित्रपट बघेन की नाही सांगता येत नाही पण बहुतेक नाहीच. फार पूर्वी टिव्हीवर लागलेला 'चेलुवी' बघितला आणि खूप आवडला.
लेखात एक गोष्ट खटकली. स्पर्धेकरता लेख दिला असल्यामुळे गप्पांच्या बीबीवर वापरली जाणारी ' वरिजीनल' जंता ,लोक्स मेंटल व्हनारच ' टाईपची भाषा टाळता आली असती तर बरं झालं असतं.

खूप आवडला लेख!! चित्रपट नक्की बघणार! तेलुगु चित्रपटांच्या सिरिजबद्दल, किमानपक्षी लिस्टसाठी जोरदार अनुमोदन! नक्की लिही!
सायो, प्रत्येकाची आवड, पण मला गम्मत वाटली तसे वाचताना. स्पर्धा आहे म्हणजे हलकंफुलकं लिहायचे नाही असं थोडीच आहे? (तसा नियम असेल तर माहीत नाही..)

थँक्स रैना, नी, माधव, सायो आणि बस्कु!

सीरीजचा प्रयत्न नक्की करेन.

नी, प्रामाणिक सिनेमा या शब्द्फाबद्दल आभार. यासाठीच चाचपडत होत्ये Happy तुझा प्रतिसाद वाचून छान वाटलं.
हे परिक्षण वाचून मला प्रेमळ, मायाळू Lol अशी विशेषणे लागलीत! पण काहीही मसाला नसतांना, टीपिकल स्टोरी असतांना देखील केवळ साधेपणा, दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांनी केलेली मेहनत, निव्वळ या जोरावर तेही आजच्या युगात असा सिनेमा तुफान चालतो, हेच मुळी विशेष वाटलेले.
सायो, अनुमोदन. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
बस्कु, थँक्सगं. जरा वहावले खरे. मेंटल हा शब्द इकडं सर्रास वापरला जातो, पण टाळता आला असता.
सर्वांचे पुन्हा धन्यवाद!