विषय क्र. ३ - माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपट,मागण लै नाही लै नाही

Submitted by शोभनाताई on 30 August, 2012 - 12:35

विषय क्र.३ माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपट
मागण् लै नाही लै नाही

'वाचे बरवे कवित्व
कवित्वी रसिकत्व
रसिकत्वी परतत्व
स्पर्शु जैसा'
आदर्श साहित्याच्या पश्चिमात्य आणि संस्कृत विचारवंतानी सांगितलेल्या व्याख्या सांगितल्यावर आमचे निकुंब सर ज्ञानेश्वरांचे वरील बोल आदर्श साहित्याची व्याख्या म्हणून सांगायचे. पंचेचाळीस वर्षे उलटुन गेली तरी आजही ती ताजी टवटवीत वाटते.
माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपट विषय वाचल्यावर मला याच ओळी आठवल्या. चित्रपटाबाबत कवित्वाकडे सशक्त कथा, रसिकत्वाकडे कलात्मक मांडणी आणि परतत्वु म्हणजे मनापर्यंत, आत्म्यापर्यंत पोचणारा, उच्च्य प्रतीचा आनंद देणारा एका व्यक्तीला नाही तर समिक्षक, सर्वसामान्य माणूस आणि त्या सिनेमाच्या निर्मितीत सहभागी असणार्‍या सर्वाना जेंव्हा एकमताने हेच वाटेल तेंव्हा तो परतत्वु स्पर्श करणारा नक्कीच असणार.
सशक्त कथा आहे आणि इतर बाबी यथातथाच आहेत हेही चालणार नाही. पटकथा, संवाद, कलादिग्दर्शन, वेषभुषा, रंगभूषा,गीत, संगीत, संकलन, गायन, दिगदर्शन, भूमिका ध्वनिचित्रण, छायाचित्रण अशा विविध अंगात अद्वैत हार्मनी हवी. त्यातून निर्मात्याला असेच सिनेमा काढण्यास भरपूर पैसा मिळाला तर सोने पे सुहागा. आणि हां सर्वात महत्वाचे म्हणजे तो अस्सल मराठी मातीतला हवा. तमाशा, विनोदी, कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक, कोणताही असला तरी मराठीपण महत्वाच..उसनवारी असली तरी चालेल पण ती मराठी साज ल्यालेली असावी. पिंजरासारखी (ही स्पर्धेतील लेख आणि त्यावरील चर्चा यातुन केलेली उसनवारी. मला इथला लेख वाचे पर्यंत पिंजरा हि उसनवारी आहे हे माहितच नव्हत. तो अस्सल मराठीच वाटत होता. हीच तर पिंजराच्या अस्सल मराठीपणाला दाद ना.)
माझ्या अपेक्षेतील मराठी सिनेमाला येणारा प्रेक्षकवर्ग फक्त मराठी असणार नाही. तर इतर भाषिकांचीही गर्दी खेचणारा असावा. पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी प्रादेशिक सिनेमा दाखवायचे. मी आणि माझ्या मुली आवर्जून पहायचो. शंकराभरणम् लागला होता. त्याला मराठी लोकानीही गर्दी केली होती. माझ्या अपेक्षेबद्दल आखुडशिंगी बहूदुधी असच वाटतय ना? अपेक्षाच सांगायची तर तिथं मोजून मापून कशाला? ही अस्सल शंभर नंबरीसाठीची अपेक्षा त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा असावा.
सगळी सोंग आणता येतात पैशाच आणता येत नाहीत अस म्हटल जाइल. फाळकेंच्या महाराष्ट्रात तरी अस नको ना म्हणायला. जुनं उदाहरण कशाला माबोवरील चँपियनच्या मुलाखतीच उदाहरण ताज आहे. नारकर पतीपत्नींनी यावर तोडगा काढलाच ना? इच्छा असेल तर मार्ग दिसतोच काही तरी चांगल करण्याचा ध्यास हवा.
चांगल्या कथाच मिळत नाहीत असही म्हटल जात. मराठी साहित्यात सशक्त कथांची वानवा नाही. अमोल पालेकरानी जी. एंच्या कथेवर केलेला कैरी, बनगरवाडी, गारंबीचा बापु, महानंदा, उत्तरायण, हल्ली आलेला शाळा असे प्रयत्न दिसतातच की. श्वास आणि पाठलाग हेही पूर्व प्रकाशित कथेवरच बेतलेले होते. अशी रग्गड उदाहरण आहेत .अर्थात कथा सक्षम असली तरी तिला योग्य न्याय दिला जातोच अस नाही. कथेच चित्रपट माध्यमाला योग्य अस रुपांतर व्हायला हव. तेही मूळ कथेच्या आत्म्याला धक्का न देता. जस गोनिदांच्या कादंबरीला जैत रे जैत मधे जब्बर पटेलनी दिल.
इतरही अंग तितकीच महत्वाची ठरतात.
सिनेमाचा काळ, जिथ कथा घडते ती पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीला साजेस पार्श्वसंगीत, भाषा, वेशभूषा हेही महत्वाच आहे. अर्थात हे सिनेमासाठी म्हणून मुद्दाम लिहिलेल्या कथेबद्दल ही असायला हवे. बाबुबँडबाजा, घो मला असला हवा, ध्यासपर्व, वास्तुपुरुष, वळु अशा अनेक सिनेमात हे दिसतही. ऐतिहासिक ,पौराणिक सिनेमात तर याच भान जास्त ठेवायला हव. त्या काळाचा अभ्यास हवा. मी पाहिलेले सिनेमा म्हणून वरील उदाहरण दिली इतर अनेक असे असतीलही.
दिग्दर्शकाचा माझ्या अपेक्षेतील सिनेमाचा वाटा मोठ्ठा आहे. व्हि. शांताराम, भालजी पेंढारकर, राजा परांजपे, जब्बार पटेल, अमोल पालेकर अशा अनेकानी आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवला.नवीन पिढीही याबाबत मागे नाही. उत्तरायण, एवढस आभाळचे बिपिन नाडकर्णी; वळू, देऊळचे उमेश कुलकर्णी, जन गण मनचे अमित अभ्यंकर ही उदाहरणादाखल काही नावे.
भारतीय सिनेमात गीत, संगीत, गायक, गायिका याना खूप मोठ्ठ स्थान आहे.बर्‍याच वेळा सिनेमा उत्तम नसला तरी या लोकानी सिनेमाला तारुन नेल. राजकपूर, देवानंद यांच्या सिनेमात हे दिसायच. माझ्या अपेक्षेतील मराठी सिनेमात मात्र गाणी यावीत ती सिनेमात नैसर्गिकपणे आलेली. उपरी, कृत्रिम जोड वाटणारी नको. हिंदीची नक्कल तर नकोच नको. गदिमा, शांताबाई सारखे गीतकार; बाबुजी हुदयनाथ सारखे संगीतकार आणि भारतीय सिनेमावर आधिराज्या करणार्‍या लतादिदी आणि आशादिदी अशी तगडी मराठी मंडळी असताना आदर्श म्हणून बॉलीवुडकडे पहायला लागावं? काही सिनेमांच्या कथेचीच गरज असते. नटरंग, अंतर्नाद, एक होता विदुषक, पिंजरा इ..बाबत हे म्हणता येइल. उत्तरायण आणि एवढस आभाळमधे अशी मोजकी पण कथेला अनुरुप गाणी होती. कथेला बाधा येत असेल तर गाणी नसतील तरी चालतील.
मराठीने भारतीय सिनेमाला उत्तमौत्तम तंत्रज्ञ दिले. यात कलादिग्दर्शक, सिनेमोटोग्राफर, संकलक, वेषभुषाकार, कोरिओग्राफर हे सर्वच येतात. सतत बॉलिवुडने हॉलीवुडकडे, मराठीनी बॉलिवुडकडे पाहून नक्कल करण्यापेक्षा; तुझे आहे तुजपाशी हे ओळखून अस्सल मराठी सिनेमा निर्मिती करण कठीण नाही. तांत्रिक अंगाबद्दल मला फारस समजत नाही. पण सिनेमाच्या कलात्मक मांडणीसाठी या सर्वांचं महत्व नाकारुन कसं चालेल. फक्त या गोष्टी कथेवर हावी न होता कथा फुलवण्यास उपयुक्त हव्यात.
हे वरील पडद्या मागचे कलाकार दिसत नाहीत पडद्यावरचे मात्र प्रत्यक्ष दिसत असतात. त्यामुळे सिनेमा आठवतो तेंव्हा प्रथम हे कलाकार आठवतात. मराठी माणसाच्या मनावर आधिराज्य केलेले कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. माझ्या अपेक्षेतील सिनेमातील अभिनेते आणि अभिनेत्री त्यात्या व्यक्तिरेखेत मिसळून गेलेल्या हव्यात. जगाच्या पाठीवर मधील आणि संथ वाहते कृष्णामाई मधील राजा परांजपे, रात्र आरंभ मधील आणि चौकट राजा मधील दिलिप प्रभावळकर, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि जन गण मन मधील नंदु माधव, उंबरठा आणि जैत रे जैत मधील स्मिता पाटील, बनवाबनवी आणि कदाचित मधील आश्विनी भावे. पूर्णपणे वेगळ्या भूमिका पण त्या त्या व्यक्तिरेखेत चपखल बसलेल्या. विदूषकमधील लक्ष्मिकांत बेर्डे, सुंबरान मधील मकरंद अनासपुरे संधी मिळाली कि आम्हीही आमचे कर्तुत्व दाखवतो हेच दाखवतात. 'योजकस्य दुर्लभा' म्हणतात. असलेल्या सामग्रीतून कोंडयाचा मांडा करणारा सुगरणीचा हात जशी किमया करु शकतो तसेच उत्तम योजकही उपलब्ध सगळ्या घटकात सुंदर मेळ घालू शकतो.
सामाजिक बांधिलकीवाले म्हणतील कलात्मकतेच जरा जास्तच स्तोम वाटत. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद एकेकाळी खूपच रंगला होता. याबाबत गं. बा. सरदार यांचे विचार मला महत्वाचे वाटतात. त्यांच्यामते लेखकाचे व्यक्तिमत्व सामाजिक बांधिलकी असणारे असले की कलाकृतीत ते आपोआपच उतरेल शेवटी कलाकृती ही त्याचीच अभिव्यक्ती असते. त्यामुळे समाजाला शिकवण्याचा आम्ही मक्ता घेतलाय अशी भूमिका नको. सुमित्रा भावे यांना जे काही सांगायच आहे त्यासाठी सिनेमा हे माध्यम महत्वाच वाटल. त्यानी स्वतः त्याची तांत्रिक अंग शिकून घेतली. बाई, चाकोरी या त्यांच्या डॉकुमेंटरीही सुंदर कलाकृती झाल्या. नाही तर सामाजिक बांधिलकिचा आव आणून सिनेमा केला तर सिनेमाची डॉक्युमेंटरी होते. भावेंच्या दोघी, देवराई, नितळमधेही सामाजिक आशय असून बटबटीतपणा, प्रचारकी थाट आला नाही. प्रभातचे कुंकू, माणूस, शेजारी असेच सामाजिक आशय असणारे कलात्मक सिनेमा.
माझ्या अपेक्षित मराठी सिनेमा कडुन इतक्याच माफक अपेक्षा. मागण लै नाही.
मला आमच जुन कस चांगल होत म्हणून गळा काढायचा नाही आहे किंवा नव्या पिढीला दोष ही द्यायचा नाही आहे. उलट नव्या पिढिबद्दल मला खूप कौतुक आहे. आशा आहेत. कला साहित्यातल जगभरातला उत्तम उत्तम त्यांच्यापर्यंत विविध आधुनिक साधनातून येत आहे. त्यांतून चांगल काय निवडायच याची समज आहे. त्यांच्यासमोर उत्तुंग स्वप्न आहेत पण पाय जमिनीवर आहेत. पतंगाचा ज्योतीवर झडप घेण्याचा वेडेपणा नाही. पण धाडस आहे. आतला आवाज सांगत असेल तर चाकोरी मोडून हवी ती गोष्ट करण्याचा निडरपणा आहे. रोखठोकपणा आहे. मुख्य म्हणजे मराठीच प्रेम आहे. नाहीतर जगभरातले मराठी मायबोलीवर जमलेच नसते.(माझ्या आजुबाजुला असणार्‍या तरुण पिढीवरुन माझ अस मत बनलय.) दादासाहेब फाळके, व्हि. शांताराम यांनी निर्मिती, तंत्रज्ञान अशा अनेक बाबीत काळाच्या पुढच पाहिल तसच नव्या पिढीनीही आजच्या काळाच्या पुढच पाहाव. हीच त्यांच्याकडुन अपेक्षा आहे. थिएटर मधे लोक येउन सिनेमा पाहत नाहीत. आर्थिक अडचणी वगैरे वगैरे असा नन्नाचा पाढा न वाचता स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा उत्तम मार्ग शोधतील अशी मला तरी आशा आहे.
आणखी एक सर्व सामान्यांच्या(comman man)कुवतीला ताकदीला कमी समजू नये. ज्याना हे समजल त्यांच मिशन यशस्वी झालं. संतानी मूठभर लोकांपर्यंत बंदिस्त असलेल तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत सोप्या भाषेत पोचवल. ते त्याना समजल. शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांना ही सामान्यांची नस बरोबर सापडली. तुम्हाला जे काही म्हणायच आहे ते सर्वाना समजेल इतक सोप करता आल. तरच ते चिरकाल टिकणार असेल. त्यामुळे मला अपेक्षित मराठी सिनेमाबद्दल मी सुरुवातीला ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पुर्‍या करता आल्या तर तो सिनेमा नक्कीच चिरकाल टिकणारा असेल. माझ्या हयातीत तो बनेल याबाबत मला खात्री आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मराठी चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा" असा चिंतनीय विषय निवडल्याबद्दल शोभनाताई तुमचे खास अभिनंदन. यात मांडलेली मते खरेतर मराठी चित्रपट महामंडळाकडे पोस्ट करावीत इतकी महत्वाची आहेत.

आजच्या मराठी चित्रपटात 'चकचकाट' आला आहे हे तर उघडच आहे, शिवाय तांत्रिक बाजूही लक्षणीय वठत असल्याचे चित्र आहे, जे प्रगतीच्या दृष्टीने सुचिन्हच मानले जाईल. पण बॉलीवूडची नक्कल [विशेषतः गाण्यांचे टुकार चित्रीकरण] म्हणजेच आमची प्रगती असेल असे जर मराठी निर्माता मानत असेल तर मग प्रश्नच खुंटला. दिग्दर्शक कितीही क्षमतेचा असला तरीही तो अमराठी निर्माता आणि झी+सोनीच्या अटींपुढे मान झुकवतोच असे चित्र दिसते. अत्यंत फालतू पातळीवरील "विनोद" हे आजकालच्या सार्‍याच मराठी चित्रपटांचे 'बाय डीफॉल्ट' लक्षण झाले असून "विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांची आणखीन् एक नवीन विनोदी भूमिका' अशी बालीश जाहीरात गेली २५ वर्षे आम्ही वाचत आलो आहे. कंटाळा आला आहे अगदी.

शोभनाताई याना 'पिंजरा' ची मूळ कल्पना परकीय आहे याचे आश्चर्य वाटल्याचे त्यानी कबूल केले आहे. असे असले तरी शांतारामबापूंनी त्या जर्मन कथेला दिलेला मराठी बाज अस्सल अगदी इथल्या मातीतीलच वाटते, हे खरे तर त्यांच्यातील दिग्दर्शकाचे कौशल्य. कथाकल्पनांची वानवा आपल्या साहित्यात बिलकुल नाही, पण समर्थ दिग्दर्शकच नसेल तर हे साहित्य कायम बाजूलाच पडेल. साहित्यावर आधारित 'नटरंग' सारखा चित्रपट महोत्सवी यश संपादन करतो हे पाहूनही आनंद यादव, महादेव मोरे, शंकर पाटील, विद्याधर पुंडलिक, विजया राजाध्यक्ष, ह.मो.मराठे, उद्धव शेळके आदी समर्थ लेखकांच्या लेखनकृतीकडे निर्माता दिग्दर्शकाचे लक्ष जाऊ नये यासारखे दुर्दैव नाही.

लोक सिनेमा थिएटरकडे वळत नाहीत अशी एक नित्याची ओरड ऐकू येते. पण दुसरीकडे हाच मराठी प्रेक्षक हिंदी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये जाऊन पाहाण्यास का उत्सुक असतो याचा मागोवा घेतल्यास 'उत्तम जाहिरात तंत्र' हे एक उत्तर समोर येते.

असो.

एका सुंदर लेखाबद्दल शोभनाताईंचे अभिनंदन.

अशोक पाटील