गळ्यात त्यांच्या माळा

Submitted by निशिकांत on 30 August, 2012 - 02:32

काळी करनी, खेळ खेळला
कोलगेटचा काळा
मंत्री, बाबू सर्व विजेते
गळ्यात त्यांच्या माळा

मालकिणीने छू छू म्हणता
भो भो करती सारे
नीच पातळी प्रत्त्यारोपी
डाकू देती नारे
कुणी म्हणावे त्या गुंडांना
लाज मनाची पाळा
मंत्री, बाबू सर्व विजेते
गळ्यात त्यांच्या माळा

राजपुत्रही तयार आहे
प्रधान मंत्री होण्या
हव्यात निवडुन येण्यासाठी
गुप्त धनाच्या गोण्या
धृतराष्ट्राचे स्थान उद्याचे
ठावे ना कळिकाळा
मंत्री, बाबू सर्व विजेते
गळ्यात त्यांच्या माळा

काळे वॉरंट जारी करण्या
मिळे न शाई काळी
कसाब, अफझल मजेत खाती
बिर्याणीची थाळी
दहशतवादी अन् नेत्यांच्या
जुळून गेल्या नाळा
मंत्री, बाबू सर्व विजेते
गळ्यात त्यांच्या माळा

शिक्षण साम्राटांचे आता
स्तोम माजले आहे
कठून पैसा आला गेला
कुणा समजले आहे?
पिढीस भावी बनवायाला
ते चलवती शाळा
मंत्री, बाबू सर्व विजेते
गळ्यात त्यांच्या माळा

भूमातेचे प्रेम तयांचे
सर्व जगाला ठावे
जमिनी लुटुनी लाख कमविती
कोण कुणाच्या नावे?
शेत कसाया वेळ कुणाला?
नकोत नांगर फाळा
मंत्री, बाबू सर्व विजेते
गळ्यात त्यांच्या माळा

उरली नाही चीड कुठेही
अन्यायाची आता
बलत्कारती देश लुटारू
बघती येता जाता
मशाल विझली, षंढ जगी या
कशा पेटतिल ज्वाळा
मंत्री, बाबू सर्व विजेते
गळ्यात त्यांच्या माळा

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users