अगर साज छेडा तराने बनेंगे

Submitted by स्वप्ना_राज on 30 August, 2012 - 01:11

गीत कभी बुढे नही होते....उनके चेहेरोंपे झुर्रिया नही पडती
वो पलते रहते है, चलते रहते है
सुननेवालोंकी उम्र बदल जाती है तो कहते है
हां, उस पहाडका टीला जब बादलोंसे ढक जाता था तो एक आवाज सुनाई पडती थी........

गुलजारच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले हे शब्द हिंदी चित्रपटसॄष्टीतल्या अनेक गीतांना किती चपखल बसतात नाही? खरं तर किमान ४-५ गाणी असल्याशिवाय कुठलाही हिन्दी चित्रपट हा चित्रपट म्हणून घेण्याच्या लायकीचा नसावा (अपवाद बी.आर. चोप्राच्या 'कानून' चा). 'म्युझिक कोण वाजवतंय?' हा परदेशी लोकांना पडणारा प्रश्न आपल्याला कधी पडतच नाही.

ह्या गाण्यांत मानाचं पान हिरो आणि हिरॉईनच्या रोमॅन्टिक गाण्यांना. मग विरहाची आणि प्रेमभंगाची गाणी आलीच. आईने बाळासाठी म्हटलेली, होळी-भाऊबीज-दिवाळी अश्या उत्सवांशी निगडीत गाणी, मैत्रीबाबतची, देशप्रेम व्यक्त करणारी, देवाची आराधना करणारी, आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारी गाणीसुध्दा चित्रपटांचा आणि बर्‍याचदा मूळ कथानकांचा भाग बनून गेली.

बरं......पिक्चर चांगला तर गाणी चांगली आणि पिक्चर टुकार तर गाणी बेकार. किंवा चांगला गीतकार छानच गाणी लिहिणार आणि पाट्या टाकणारा गीतकार नुसता यमक जुळवणार असं साधं सोपं समीकरण कधीच नव्हतं. त्यामुळे 'पुराना मंदिर' सारख्या टिपिकल रामसे भूतपटात सुध्दा 'वो बीते दिन याद है' सारखं चांगला गाणं सापडतं. तर कधीकधी आपल्या सगळ्यांचा लाडका गुलजार 'मौसम मौसम लव्हली मौसम' म्हणून आपल्याला फेफरं आणतो.

हिरो आणि हिरॉईनने बागेत, पर्वतराजीत, समुद्रकिनारी बागडत गाणी म्हणावीत हा अलिखित नियम आहे खरा. पण तरी लीना चंदावरकर आणि जितेंद्र 'ढल गया दिन हो गयी शाम' म्हणत टेनिस कोर्टावर नाचले. 'वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ' अशी शर्मिला टागोरची विनवणी शशी कपूरने स्कीईंग रिंगमध्ये केली. आणि 'मिले मिले दो बदन' ह्या ब्लॅकमेल मधल्या गाण्यात राखी आणि धर्मन्द्र चक्क लाकडाच्या मोळ्यांखाली लपले होते - तेही तमाम व्हिलन मंडळी त्यांना शोधत बाहेर फिरत असताना.

हिंदी चित्रपटातल्या गाण्यात हिंदी शब्दच असले पाहिजेत हे बंधन मात्र कधीच नव्हतं. मग 'द ग्रेट गॅम्ब्लर' मधला व्हेनीसची गोन्डोला चालवणारा नाखवा ‘amore mio dove stai tu sto cercando sei solo mio’ असं गाऊन गेला. 'सायोनारा सायोनारा' म्हणत आशा पारेख 'लव्ह इन टोकियो' मध्ये नाचली. तर कधी 'मुत्तकौडी कव्वाडी हाडा' हे खडबडीत वाटणारे मल्याळी शब्द गाण्यात मस्त धमाल उडवून गेले. तेव्हढे 'आज तो जुनली रातमा' मधलं 'जुनली' हे काय प्रकरण आहे ते कोणाला कळलं तर मला कळवा. Happy

माणसं जशी आपापलं नशिब घेऊन जन्माला येतात तशी गाणीही नशिब घेऊनच जन्माला येत असावीत.म्हणूनच त्यांच्या जन्माच्या कहाण्या शेहेरजादीच्या कथांपेक्षाही सुरस आणि चमत्कारिक आहेत.

कथा आहे राज कपूरच्या 'बॉबी' ची. राज कपूरने कामावर ठेवलेले विठठलभाई पटेल प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण काही केल्या नायक-नायिकेतली टिपिकल 'नोकझोक' व्यक्त करणारया गाण्याच्या ओळी त्यांना सुचत नव्हत्या. तेव्हढ्यात राज कपूरला सिमी गरेवालचा फोन आला. बोलता बोलता राज कपूर तिला म्हणाला 'देखो सिमी, झूठ मत बोलो, काला कौआ काट खायेगा'. पटेलांनी ते ऐकलं मात्र...त्यांना गाण्याचे शब्द सुचले - झूठ बोले कौआ काटे, काले कौवेसे डरियो. मै मायके चली जाउंगी तुम देखते रहियो'

नायक-नायिका कुठल्यातरी रम्य स्थळी भेटलेत ही सिच्युएशन नेहमीचीच. म्हणूनच की काय कोण जाणे पण गीतकार आनंद बक्षीना एकदा ह्या सिच्युएशनला साजेश्या गाण्याचे शब्दच सापडेनात. शेवटी कंटाळून पिक्चरचे संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल जायला निघाले. जाताना त्या दोघांपैकी एकाने सहज म्हटलं 'अच्छा तो हम चलते है.' आनंद बक्षीनी विचारलं 'फिर कब मिलोगे?' ह्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल काय म्हणाले मला माहीत नाही पण जन्माला आलं एक मस्त गाणं - 'आन मिलो सजना' मधलं 'अच्छा तो हम चलते है'

You See The Whole Country Of The System
Is Juxtaposition By The Hemoglobin In The Atmosphere
Because You Are Sophisticated Rhetorician
Intoxicated By The Exuberance Of Your Own Publicity

हे शब्द बोअर होऊन जांभया देणार्‍या कॉलेजच्या मुलांकडे जाड भिंगाच्या चष्म्यातून पहाणार्‍या प्रोफेसरच्या तोंडी शोभतील. एखाद्या हिंदी गाण्यात नाही, असं वाटतं ना? पण आनंद बक्षीनी ही किमया सुध्दा करून दाखवली. ह्या गाण्यातून अजरामर झालेला अ‍ॅन्थोनी गोन्साल्वीस खरं तरी आधी अ‍ॅन्थोनी फर्नांडिस होता. पण संगीतकार द्वयी लक्ष्मीकांत-प्यारेलाल ह्यांच्या एका मित्राचं नाव अ‍ॅन्थोनी गोन्साल्वीस होतं म्हणून त्याचं बारसं झालं.

आता ओळखा पाहू - किशोरदांचं कॅन्टीनचं किती बिल उधार होतं? बरोबर! ५ रुपय्या, बारा आना.

'जरा शैलेंद्रसाहेबांच्या घरी जा आणि गाणं घेऊन ये' "काला बझार"ची निर्मिती चालू असताना एकदा एस. डी. बर्मननी आपल्या मुलाला सांगितलं. पंचम शैलेंद्रच्या घरी गेला पण ते घरी नव्हते. घरच्यांनी सांगितलं की ते जुहू बीचवर गेले आहेत. पंचमला त्यांची नेहमीची बसायची जागा माहीत होती. त्याने त्यांना शोधून काढलं आणि त्यांच्याजवळ जाऊन गपचूप बसला. शैलेंद्र संध्याकाळचं आकाश निरखत होते. पंचमने हळूच आपण गाणं घ्यायला आलो असल्याचं सांगितलं. शैलेंद्र त्याला म्हणाले 'चाल गुणगुणून दाखव बरं'. पंचमने एक सुरावट म्हटली आणि शैलेंद्रने शब्द म्हटले 'खोया खोया चांद'. मग पंचमने पुढली चाल म्हटली. पाठोपाठ शैलेंद्रचे शब्द आले 'खुला आसमान'. आणि देव आनंदला वहिदा रेहमानशी रॉमेन्स करायला शब्द मिळाले.

कोंबडी आधी का अंडं ह्या प्रश्नाइतका सनातन नसला तरी चाल आधी का शब्द हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदी चित्रपटगीतांच्या इतिहासात कदाचित दोन्ही उदाहरणे सापडतील. एका चित्रपटाच्या वेळचा किस्सा आहे. स्टुडीओचे मालक तोलाराम जालान ह्यांनी जाहीर केलं की हिरो हिरॉईनमध्ये 'प्यारका इकरार' झाला की त्या सिच्युएशनमध्ये चित्रपटात एक गाणं हवं. नायक होता शम्मी कपूर. तो गेला सुबोध मुकर्जीकडे. आणि म्हणाला नायिका गाणं म्हणत असताना मी काय करू? 'प्यारका इकरार' माझाही आहेच ना? मुकर्जी म्हणाला मी काही करू शकत नाही. तू ओ. पी. नय्यरकडे जा. मग शम्मी आणि दिग्दर्शक नासिर हुसेन ओ. पी. नय्यरच्या घरी गेले. त्याच्या घरात नुकताच बाळाचा जन्म झाला होता. शम्मीने बाळावरून १०० रूपये ओवाळून टाकले. तेव्हाच्या काळात ही रक्कम मोठी होती. शम्मीने तो पूर्ण चित्रपट २०००० रुपयात केला होता. मग त्याने आपली कैफियत नय्यरकडे मांडली. नय्यर म्हणाला 'अरे, ऐंसे कैसे हो सकता है? हिरोको तो गाना होनाही चाहिये. मे इस सिच्युएशनके लिये ड्यूएट लिखता हू. सुनो उसको मुखडा' असं म्हणून त्याने शम्मीला तिथल्या तिथे मुखडा ऐकवला. चित्रपट होता 'तुमसा नही देखा'. आणि ते गाणं होतं 'सरपर टोपी लाल हाथमे रेशमका रुमाल ओ तेरा क्या कहना.'

रेडीयो मिरची 98.3FM वरचा आर जे अनमोलचा गोल्डन एरामधल्या गाण्यांवर आधारित 'पुरानी जीन्स' हा माझा अतिशय आवडता कार्यक्रम. मागल्या वर्षी त्याने श्रोत्यांच्या घरातून आपला कार्यक्रम सादर करण्याचा प्रयोग केला. त्यातच मालाडचं एक बंगाली कुटुंब होतं. अगदी शंख वगैरे वाजवून अत्यंत पारंपारिक पध्दतीने त्यांनी अनमोलचं स्वागत केलं. त्या संध्याकाळची गाण्याची पहिली फर्माईश त्या कुटुंबातल्या १७ वर्षाच्या मुलाने केली. ते गाणं होतं - किशोरकुमारच्या "दूर गगनकी छावमे" मधलं "आ चल के तुझे मै लेके चलू". एका टीनएजरने त्याच्या जन्माच्या तीन ते चार दशकं आधी लिहिल्या गेलेल्या गाण्याची आवडतं म्हणून फर्माईश करावी ही त्याकाळातल्या गीतकार आणि संगीतकार दोघांनाही दिलेली पावती आहे.

गुलझार बरोबर म्हणतोय.....

गीत कभी बुढे नही होते....उनके चेहेरोंपे झुर्रिया नही पडती
वो पलते रहते है, चलते रहते है
सुननेवालोंकी उम्र बदल जाती है

वि.सू. ह्या लेखातल्या काही आठवणी एफ एम गोल्ड चॅनेलवरच्या एका कार्यक्रमात सांगितल्या गेल्या होत्या. तर काही 'मस्ती' ह्या टीव्हीवरच्या म्युझिक चॅनेलवरच्या अनू कपूर सादर करत असलेल्या गोल्डन एरावरच्या कार्यक्रमात (दररोज रात्री ९ ते १०. रिपिट टेलिकास्ट रात्री १२ ते १) त्याने सांगितल्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेळी....स्पर्धेत हा विषय १ मध्ये टाकायला लागला असता. त्या कॅटॅगरीत कमाल मर्यादा २ लेखांची आहे आणि मी २ लेख आधीच टाकलेत Happy

भरत, मी तरी अन्नू कपूरने हेच सांगितलेलं ऐकलं. तो नय्यर म्हणाला. नय्यर नावाचा कोणी गीतकार होता का?

(डिट्टेल्समे गडबड असेल... असली तर...) लेख सही जमलाय... तू म्हणजे पिच्चर म्हटला का एक नंबरी आहेस, बघ...

मंडळी खूप खूप धन्यवाद Happy दाद, गोल्डन एरा हा भारी आवडीचा विषय आहे बघ. निशदे, आणखी काही किस्से माहित असतील तर इथे लिही ना. सगळ्यांना वाचायला मिळतील.