विषय क्रमांक १ - थोडासा रुमानी हो जाये - अर्थात बारिशकर!

Submitted by नानबा on 29 August, 2012 - 12:54

कोरड्या दुष्काळाचे दिवस आहेत.. सगळीकडे नुसता रखरखाट... आकाशात एक काळा ढग नाही.. पावसाची कुठलीच लक्षणं नाहीत. माणसानं निराश न व्हावं तर करावं तरी काय! आणि अशात "मेरी मानिये तो ये बारिश खरिदिये, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश - सिर्फ पाच हजार रुपयमें!!" म्हणत दारात आलेला बारिशकर!

आणि बघा हं! त्याची बारिशही सामान्य नाहिये - ती त्याच्याच तोंडून अनुभवायची चीज आहे.

हां मेरे दोस्त - वही बारिश जो आसमान से आती है, बुंदों में गाती है
पहाडोसे फिसलती है, नदियों में चलती है
लहेरोमें मचलती है, कुएं पोखर से मिलती है
खपरेलोंपे गिरती है, गलियोमें फिरती है
मोड पर संभलती है, फिर आगे निकलती है
वही बारिश!

आणि ही बारिश विकत घ्यावी अशा मोहात पडलेला बिनीचा बाप. त्याच्या थोरल्या मुलाची तर पक्की खात्रीच पटली आहे की हा पाऊस विकतो म्हणून पाच हजार काढणारा नक्कीच कुणीतरी भामटा आहे. पाऊस काय असा पडतो काय! पण 'प्रयत्न तर करून बघूया' असं बापाला वाटतय.

आकाशातून पडणारं, हे "पाऊस" नावाचं पाणी विकणं हे त्या भामट्याचं 'घेतलेलं' रुप.. त्याच्या रांगड्या रुपात खरतर एक जादुगार दडलाय! पण सुरुवातीला बघताना हे आपल्याला तरी कुठं माहित असतं ! पाऊस विकणं वरवरचं.. खरतर तो त्यांना एक स्वप्न विकतोय. नव्हे नव्हे - स्वप्नं वाटतोय!

हां तर कशाबद्दल बरं बोलत होतो आपण? तर रखरखाट!
हा रखरखाट केवळ बाहेरचा नाहिये, हा माणसांच्या आतही आहे, मग तो दुसर्‍यावर अविश्वास असलेला दिलीप असो, 'मैं नही कर सकता' असा स्वतःवर अविश्वास असलेला बीम, "नको जाऊस" इतके दोन सोपे शब्द इगोपायी बोलता न येणारा आणि ती सोडून गेल्याचं दु:ख बाळगणारा जेडी असो, नाही तर स्वतःच्या स्त्रीत्वावरच विश्वास नसलेली बिन्नी असो.

ही सगळी माणसं आतून कातावलेली, धास्तावलेली, दुखावलेली आहेत. परिस्थितीनं हतबल झालेली आहेत. हाताबाहेरची परिस्थिती बदलण्याची गोष्ट सोडाच, परिस्थिती कधी बदलू शकते ह्याबद्दलही ते साशंक, प्रसंगी निराश दिसताहेत.

बादलोंका नाम ना हो अंबर के गांव में
जलता हो जंगलभी खुद अपने ही छाव में!
यही तो है मौसम ...

जगण्याच्या संघर्षात आपण बरेचदा दमून जातो - नियतीचे फटकारे खात खात कितीदा जखमी होतो, वैतागतो, निराश होतो, अगतिक होतो.. अशावेळी माणूस तग धरू शकतो ते केवळ त्याच्या आशेवर, त्याच्या स्वप्नांवर. अगदी अवघड अशा काळातून जात असतानाही आपल्या 'आतला झरा' जिवंत ठेवायचं काम करतात ती ही स्वप्नं. पण ह्या वैशाख वणव्यात माणसं स्वप्न बघायचीही विसरून गेली आहेत! आणि तीच स्वप्न घेऊन आलाय धूमकेतू सारखा गावोगाव भटकणारा हा बारिशकर. जो इन्द्रधनुष की सवारी करता है, बारिश जिसके इशारोपे नाचती है - असा "दृष्टद्युम्न पद्मनाथ प्रजापती नीलकंठ धुमकेतू बारिशकर"... !

रास्ता अकेला हो, हर तरफ अंधेरा हो
रात भी हो घात की दिन भी अकेला हो
यही तो है मौसम ... आओ तुम और हम
दर्द को बासुरी बनाये
थोडासा रुमानी हो जाये!

ह्याला आयुष्याचं मर्म कळलय. आयुष्य आहे म्हणजे दु:ख, त्रास तर असणारच आहे, पण ह्या त्रासाचच गाणं करायची जादू ह्याला जमली आहे. ह्या बारिशकरानं स्वतः भोवती एक आभासी दुनिया विणली आहे.
"मैने अपने लिये एक नाम रखा है" म्हणत "तुम्हे भी सिर्फ एक बिन्नी होने की क्या जरुरत है" असं विचारत त्या दुनियेत वावरतानाही, एकदा आपण आपल्याला आत गवसलो की बाकीच्या जगाच्या मान्यतेची गरजच काय - हे त्याला पक्कं माहितीये! म्हणूनच तो बिन्नीला "नही बिन्नी, आईना बाहर नही, यहां अंदर होता है" असं सांगू शकतो. तू सुंदर आहेसच, स्वत:वर विश्वास ठेव - काय गरज आहे त्या बाहेरच्या आरशाची, हे अगदी जीव तोडून सांगतो. त्याच्या स्वप्नाळू मनाला स्वप्नांइतक्याच ताकदीनं हे स्वत्वही गवसलय.

आणि तसं पहा, त्याचं आभासी जगणही आभासी कुठंय! आपण जन्माला येतो, आपल्याला एक नाव मिळतं, समाजाच्या रचनेप्रमाणे एक भूमिका घेऊन आपण जगत रहातो. पण आपण बाहेरून कितीही साच्यात जगत असलो तरी किती रंग असतात आपल्या मनाचे! रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा - हे आपल्या प्रत्येकाकरता आत कुठेतरी खरं असतं.. खरच काय गरज आहे आपल्याला फक्त एक बिन्नी म्हणून जगण्याची - एक बेरंग आयुष्य 'पार पाडण्याची'! आपली स्वप्नं छोटी असोत वा मोठी, ती उराशी बाळगायला, त्यांच्यावर विश्वास ठेवायला, त्या स्वप्नांद्वारे मांगल्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे! आयुष्याच्या सत्याला स्वप्नांचे पंख लावून एकदा बघुया तरी!

हे त्याला कळलय - म्हणूनच ह्या फाटक्या दिसणार्‍या माणसाचं जगणं पदोपदी एक उत्सव झालय.. खरतर अशा माणसांचं 'असणं' हाच एक उत्सव असतो!

शाळेत असताना पहिल्यांदा पाहिलेला हा चित्रपट तेव्हा पासून आजपर्यंत असंख्य वेळा पाहिलाय आणि दरवेळी हा चित्रपट तयार करणार्‍या, दिग्दर्शित करणार्‍या, ह्यात काम करणार्‍या अभिनेत्या, तंत्रज्ञांचे अनेक अनेक आभार मानलेत! अमोल पालेकरांचा हा चित्रपट मला प्रत्येक वेळी नव्यानं काहीतरी देऊन जातो. चित्रा पालेकरांचे संवाद आणि कमलेश पांड्यांचं शीर्षकगीत, चित्रपटातल्या एकनएक कविता मनावर गारुड करतात.

आणि ह्या सगळ्याला साथ देताना नाना पाटेकरांनी सशक्तपणे रंगवलेल्या बारिशकरच्या मी नव्यानं प्रेमात पडते!
अगदी "मै कर सकता हूं, मै करुंगा" चा मंत्र शिकवण्यापासून ते "मै सुंदर हूं" ची खात्री पटवण्यापर्यंत, लफ्फेदार संवादातून पाऊस विकायला निघालेला ते "तुम अगर साथ होगी तो मेरी नाव यहां वहां नही भटकेगी" म्हणत तिच्या कुशीत विसावू पहाणार्‍या आकाशासारखा तो. सगळ्या जगाच्या त्रासाचं ओझं स्वतःच्या डोक्यावर हसून वाहणारा, त्याबदल्यात लोकांना आनंद वाटणारा, जगायला शिकवणारा तो, शेवटच्या फ्रेम मधे पावसाबरोबर सृष्टीचाच एक भाग होऊन गेलेला तो - चित्रपटाच्या शेवटी पावसाला जसं पडावच लागतं तसच मलाही त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावच लागतं!

मला कधी निराश वाटायला लागलं तर मी हा चित्रपट बघतेच बघते. कारण? कारण तेच -

मुश्किल है जीना उम्मीद के बीना
थोडेसे सपने सजाये
थोडासा रुमानी हो जाये!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच नानबा.
अशी पाखरे येती वर पटेलांनी लिहीलेले वाचले होते. एक दिग्दर्शक कसा विचार करतो याचा वस्तुपाठ होता तो.

मूळ "अशी पाखरे येती" मधे अरुण सरनाईक ह्यांनी काम केले होते. "हो तुम्ही सुंदर आहात.." हा त्यांचा फेमस डायलॉग.

लेख सुंदरच झाला आहे, माझाही अतिशय आवडता चित्रपट.

थँक्यू सगळ्यांना.
शोभाताई, आणखीन लिहिता आलं असतं.. तसं काही बाबींवर लिहावसं वाटतही होतं.. पण मग झालेला लेख पुन्हा वाचल्यावर वाटलं, नकोच तसं.. आहे ते अगदी मनातनं आलय, त्यापेक्षा खूप वाढवलं तर बाकीच्या गोष्टी कव्हर तर होतील पण मनातनं आल्याचा एक जो आनंद असतो (स्वतःलाच) - तो जाईल...
म्हणून मग तेवढच ठेवलं..

दिनेशदा मुसाफिर हि (नसर, रेखा यान्ची) फिल्म १९८६ ची आहे ना? कुठे बघायला मिळेल ही फिल्म? प्लीज कोणी सान्गेल का?

मला कधी निराश वाटायला लागलं तर मी हा चित्रपट बघतेच बघते. कारण? कारण तेच -

मुश्किल है जीना उम्मीद के बीना
थोडेसे सपने सजाये
थोडासा रुमानी हो जाये! >>>>> हेच कारण हा लेख परत परत वाचायचं .... Happy

आईशपथ, भारावून गेलेय मी लेख वाचून! काय लिहिलंयस अगं, वेड लावणारं Happy
असं वाटलं लेख संपूच नये अजिबात.. वाचतच रहावं, वाचतच रहावं.. तू मांडलेली आणि आपल्याला भावलेली साम्यस्थळं अगदी अगदी करत पुन्हा पुन्हा चव घेत वाचण्यासारखा लेख.

आवडता सिनेमा, आवडती व्यक्तिरेखा आणि 'मुश्किल है जीना' तर माझी इथली सही आहे...
तुझा विश्वास बसणार नाही पण ऑफिसच्या डेस्कटॉपवर चित्रपट कायमचा ठेवलेला आहे मी, कधीही कुठूनही सुरू करायचा बघायला, शीर्षकगीत मात्र प्रत्येक वेळी बघायचंच..

शेवटचे दोन परिच्छेद केवळ जमलेले आहेत. शेवटाकडे आल्यावर निष्कर्षाला पोचावं तसेच. त्या सगळ्या चित्रपटाचं मर्म अगदी आतून येऊन नेमक्या शब्दात उतरवलंयस. खुप खुप सुरेख Happy

मेजवानीबद्दल आभार Happy खुपच उशीर केला वाचायला..

शोभाताई, आणखीन लिहिता आलं असतं.. तसं काही बाबींवर लिहावसं वाटतही होतं.. पण मग झालेला लेख पुन्हा वाचल्यावर वाटलं, नकोच तसं.. आहे ते अगदी मनातनं आलय, त्यापेक्षा खूप वाढवलं तर बाकीच्या गोष्टी कव्हर तर होतील पण मनातनं आल्याचा एक जो आनंद असतो (स्वतःलाच) - तो जाईल...
म्हणून मग तेवढच ठेवलं..>>> किती खरंय! हा मोह आवरलास ते खुपच महत्वाचं आहे. जे मनातून उमटलं ते खरं..

सुंदर लिहिलंय. अगदी उत्कटतेने, समरसून.
खरंय, उत्सव करावा अशा कितीतरी गोष्टी आहेत हे आपण दिनक्रमाचे धक्के खाता खाता विसरतोच.

अप्रतिम लिहिलं आहेस गं नानबा! खूप वर्षांपूर्वी भेटले होते या बारिशकरला. आता आयुष्य 'गांभिर्यानं' वगैरे घेण्याचे बरेच अस्पेक्ट्स बदललेले असताना हा चित्रपट पुन्हा एकदा पाटी कोरी करून पहायलाच हवा याची जाणीव झाली हा लेख वाचून.

शशांक,
लेख वर काढल्याबद्दल धन्स, मी ही खूप दिवसांनी वाचला लेख आणि चांगलं वाटलं वाचून.. Happy

प्रतिसादाबद्दल धन्स मानसी, सई आणि सगळेच!

" आमच्या नानबाला १०० गावं इनाम देवुन टाका बिगी-बिगी!" इती विशाल कुलकर्णी +१०१

मी एक अभागी अजूनही एवढा सुंदर चित्रपट पाहिला नाही.
आता थोडे नाही बरेच रुमानी होतो.
नानबा खूप, खूप आभार या सुंदर लेखाबद्दल. निवडक दहात..
नानाची कविता ऐकली होती युट्यूबवर...

Pages