उकलतील सगळी कोडी, काळाच्या ओघामध्ये!

Submitted by सतीश देवपूरकर on 29 August, 2012 - 10:36

गझल
उकलतील सगळी कोडी, काळाच्या ओघामध्ये!
येईल जीवनी गोडी, काळाच्या ओघामध्ये!!

कोणाला भरती किंवा ओहोटी चुकली आहे?
लागते किनारी होडी, काळाच्या ओघामध्ये!

पैशाची वा कीर्तीची, वा धुंद असो सत्तेची;
ओसरते थोडी थोडी काळाच्या ओघामध्ये!

कोणती समस्या आहे की, जिला तोडगा नाही?
होतात सफल तडजोडी काळाच्या ओघामध्ये!

आजन्म कुणीही इतके काबाडकष्ट करतो का?
सरतात सर्व उरफोडी काळाच्या ओघामध्ये!

लेखून गौण कोणाला, का दुय्यम ठरतो कोणी?
होतात उलट कुरघोडी काळाच्या ओघामध्ये!

विधिलेखामध्ये सुद्धा असतात दुरुस्त्या काही;
होतातच खोडाखोडी काळाच्या ओघामध्ये!

घर चालवणारा जेव्हा, घर मोडू बघतो तेव्हा.....
होतात अशा घरफोडी काळाच्या ओघामध्ये!

ही दुनिया बदलत असते! काहीही कायम नसते!
घडतील बघ घडामोडी काळाच्या ओघामध्ये!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर छान गझल
आवडली

_______________

काही सान्गायचे आहे सान्गू का

सर आज अक्षरशः देवासारखे धावून आलात बघा !!
याच कवाफीची योजना करून मी आज एक गझल करायला बसलो ....चारच शेर झाले पाचवा खयालही सुचला पण काफिया काहीएक करून सापडेच ना ...........शेरात बसवायचा लाम्बच राहिला!!
आपली ही गझल वाचली अन ; आपण माझ्याच्साठीच हे कवाफीचे भाण्डार उघडे केलेत अशी भावना मनात येते आहे. आता यातलाच एक काफिया घेवून काफियानुसारी शेर करावा म्हणतोय
शुभाशिर्वाद असू द्यात सर
धन्यवाद
-वैभवा

______________

माझे आजचे दोन शेर उदाहरणादाखल

विठ्ठल माझ्या श्वासांमधली 'जगायचे' ही गोडी
विठ्ठल माझी 'मारायचे' ही जाणीव थोडीथोडी

विठ्ठल माझ्या शब्दांच्या अर्थांमधली संपत्ती
विठ्ठल माझ्या काळजात मी केलीली घरफोडी

उर्वरित २ शेरात 'होडी' अन 'गाठोडी' हे काफिये आहेत
शुभाशिर्वाद असू द्यात सर!!