विषय क्रमांक १ - पिरतिचा उघडला 'पिंजरा' तुमच्यापायी

Submitted by सस्मित on 29 August, 2012 - 09:18

पहाट नुकतीच फुटतेय. दोन बैलगाड्या, गावची वाट आणि गाडीवान गातो....
गंsssssssssssss साजणे
कुन्न्या गावाची कंच्या नावाची
कुन्न्या राजाची तु ग रानी
आली ठुमकत नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी
अह्हा काय ठेका गाण्याचा. गाणं ओळ्खीचच नव्हे तर आवडतं. अरे गाडीवान कोण? निळु फुले!!
खटार्‍याला पडदा. आत कोण ते एक कुतुहल. लगेच नामावली सुरु होते- व्ही शांताराम प्रस्तुत - पिंजरा !!!
कलाकार - संध्या - डॉ. श्रीराम लागु
बस्स. आजची दुपार सार्थकी लागणार हे कळुन चुकलं मला.
कॉलेजातुन दुपारी घरी आलं की जेवुन टीव्ही समोर लोळत पडायचं आणि लागलेला कुठलाही पिच्चर झोप येइपर्यंत (झोप येण्यासाठीच) बघायचा. त्या काळात बरेच चित्रपट पाहिले (खरं तर बोलीभाषेतलं 'पिच्चर' च लिहायचयं पण 'चित्रपट' म्हणलं की जरा भारी वाटत ना) तर अगदी नवे -जुने, अर्धनवे-अर्धजुने, काही काळजाचा ठाव घेणारे, काही बराच वेळ मनात रुंजी घालणारे, काही तद्दन बकवास कॅटेगरी, काहींचं गारुड तर अजुनही मनावर आहे असे खुप्पच खुप्प चित्रपट तेव्हा पाहिले. शाहरुख-सलमान-आमिर-सैफ खानावळ ते देव आनंद, राज कपुर, दिलिप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ(अँग्री यंग मॅन वाला हं) अगदी राजेंद्र कुमार सुद्धा - ह्यांच्या प्रेमात पडत गेले. माधुरी-जुही-काजोल बरोबर मधुबाला, वहीदा, नुतन, वैजयंती माला ही होत्या. सिनेमा आवडत होता. सिनेमाच्या प्रेमात पडत होते. काही सिनेमांनी निव्वळ मनोरंजन केले, काहींनी टाइमपास तर काहींनी मनात ठाण मांडलं. मनावर गारुड केलं.
व्ही शांतारामजींचे जे काही थोडेफार चित्रपट मी पाहिले त्यात- दो आंखे बारा हाथ, नवरंग आणि पिंजरा ह्यांची नशा अजुन आहे. तिनही चित्रपट शांताराम बापुंच्या अत्युक्रुष्ट (असा शब्द आहे ना??) कलाकृतीची उदाहरणे.
पिंजरा - उत्कृष्ट कथासुत्र, मांडणी, अत्युक्रुष्ट (परत तेच) अभिनय, जगदीश खेबुडकरांची आशयपुर्ण शब्दरचना असलेली गाणी आणि राम कदमांचे सुमधुर, ठसकेबाज, गाण्याच्या शब्दांतील आशय अधोरेखित करणारे संगीत आणि त्यामुळेच गाजलेलं प्रत्येक गाणं.
220px-Pinjra[1].jpg
गं साजणे पासुन सुरु होतो हा प्रवास. बैलगाड्यांतुन गावात तमाशाचा फड येतो. खटार्‍यातुन उतरते तमाशाची नर्तिका- चंद्रकला. संध्याला ह्या चित्रपटात पहिल्यांदाच पाहिले. डोळ्यांची वेगळीच लकब, भुवई उडवत मानेची हालचाल करत बोलणं आणि खरं तर अतिच सुंदर गाण्यांवर केलेलं संध्याबाईंच नृत्य म्हणजे वेगळंच कैतरीच वाटलेलं त्यावेळी.
"गावात तमाशा लावायचा तर मास्तरांना इचारायला पाहज्ये".कुणीतरी सांगत.
"अस्सं मग इचारु की"
मास्तर - एक आदर्श गाव नी त्या गावातला आदर्श तत्वनिष्ठ मास्तर- श्रीधर पंत. हा मास्तर म्हणजे श्रीराम लागु नी श्रीराम लागु म्हणजे पिंजरातला मास्तर हेच समीकरण अजुनही आहे माझ्यासाठी. श्रीराम लागुंचे नंतर काही सिनेमे पाहिले पण या सम हा. सारा गाव आदर्श, तंटामुक्त, शिक्षित आणि सुसंकृत व्हावा ह्यासाठी झटणारे मास्तर आणि त्यांचा नुसता आदरच नाही तर त्यांच्यावर श्रद्धा - भक्ती असलेला गाव. आपली तत्वे जोपासत, गावाचे भले ह्यात नाही हे ओळखुन मास्तर तमाशाच्या फडाला अपमानित करुन गावाबाहेर हाकलुन लावतात. अपमानित झालेली चंद्रकला सुडाने पेटुन उठते. "नाय ह्या मास्तराला बोर्डावर तुणतुणं घेउन उभा केला तर नावाची चंद्रकला चंद्रावळीकर नाय मी" आणि इथुनच सुरुवात होते आदर्श, तत्वनिष्ठ, गावासाठी विभुती ठरलेल्या श्रीधर मास्तरांच्या अधःपतनाला.
गावाबाहेर नदी पलिकडे तमाशाचा फड उभारला जातो. धोलकीची थाप. घुंगरांच्या आवाजाने गाव बहकते. गावकरी खोटं बोलुन, लपुन छपुन तमाशाला जाउ लागतात. ही चंद्रकलेच्या विजयाची सुरुवात असते. म्हणुन ती म्हणते

हा गाव लय न्यारा ह्याचा थंडगार वारा
ह्याला गरम शिणगार सोसना.......
सोंगा ढोंगाचा कारभार इथला साळसूद घालतोय आळिमिळी
सार वरपती रसा भुरकती घरात पोळी आन भाईर नळी

मास्तरांना कुणकुण लागते. ते गावकर्‍यांना रंगेहाथ पकडण्यासाठी व चंद्रकलेला समज देण्यासाठी तिथे जातात. तेव्हाच मास्तर प्रवेश करतात एका पिंजर्‍यात. एका क्षणिक मोहाच्या क्षणी ते ढासळतात आणि मग कोसळतातआणि कोसळतच जातात. अगदी चंद्रकलेने म्हटल्याप्रमाणे जेव्हा बोर्डावर तुणतुणं घेउन उभा राहिलेला नशेतला मास्तर 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' म्हणतो तेव्हा काळजात तुटत जातं. आपल्या दुखावल्या पायाचं निमित्त करुन चंद्रकला त्यांना भुलवु पहातेय - तिचा उघडा पाय - त्या पायाकडे डोळे विस्फारुन बघणारे मास्तर - आणी तेव्हाच पिंजर्‍यातील पोपटाकडे नेलेला कॅमेरा. अतिशय प्रतिकात्मक. जाण्यार्‍या मास्तरांना भुलवण्यासाठी थाम्बवण्यासाठी चंद्रकला म्हणते

लाडेलाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्यापायी
अशीच र्‍हावी रात साजणा
कधी न व्हावी सकाळ

मास्तर बहकतात. आपल्या कार्याचा, मान मरतब्याचा त्यांना विसर पडतो. आदर्श शिक्षक गावासाठी देव असलेल्या मास्तरांचे अस्तित्व एका नाचणारी पायी पतित होते. कलंकीत होते. नितिमुल्ये हरवलेला, वैफल्यग्रस्त मास्तर तमाशात तुणतुणं घेउन उभा रहातो.

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली.....

खुळ्या जीव कळला नाही खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली

इथे आठवतात ते एक निळु फुले. मास्तरांना कुत्र्याच्या पंगतीत बसून जेवायला देण्याचा सीन. निळू फुलेंनी त्या भुमिकेचं सोनं केलं.

चंद्रकलेचा सुड पुर्ण झाला अस वाटत असतांना जाणीव होते ती तिच्या प्रेमाची. मास्तरांची अवस्था बघुन आपल्याबरोबर तिच्याही काळजात काहीतरी तुटतं. तिला एका सज्जन तत्वनिष्ठ माणसाला आयुष्यातुन उठवल्याची बोचणी लागल्याचे स्पष्ट कळते. ती त्यांच्यावर प्रेम करु लागते. त्यांच्या सारख्या देव माणसाच्या पतनाला आपणच कारणीभुत आहोत याची तिला जाणीव असते.

इकडे गावासाठी मास्तर मरुन गेलेले असतात. त्यांचा खुन करणारा फरारी असतो. गावकर्‍यांनी त्या देवमाणसाचा पुतळा उभारलेला असतो. आपलाच जिवंतपणी उभारलेला पुतळा पाहुन मास्तर शरमिंदा होतात. तेव्हा आठवतं

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणे त्याला कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली

आणि शेवटी नियतीचा तमाशा कसा ते ह्या चित्रपटात कळते. मास्तरांना स्वत:च्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक होते. खटला चालु होतो. ह्या भोळ्या सज्जन माणसावर ही वेळ आपल्यामुळे आलीये ह्याची चंद्रकलेला जाणीव असते. ती तमाशा, ते आयुष्य सोडुन मास्तरांसोबत निघते. खटला चालु असतांना ती ' हेच मास्तर आहेत' असं सांगण्याचा प्रयत्न करते पण तिची वाचा जाते. मास्तरांना त्यांच्याच खुनाच्या आरोपात फाशीची शिक्षा होते. हे ऐकुन बाहेर असलेली चंद्रकला जीव सोडते.

सुन्न. अगदी सुरुवातीपासुन शेवटापर्यंत सुन्न होते मी. चित्रपट संपल्यावर एक उदासपण आलेलं. चुटपुट लागलेली.
असा पिंजरा. माझ्या निवडक दहात नेहमीच राहिल!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्ही शांताराम ग्रेटच डायरेक्टर होते. वादच नाही. पिंजराची पटकथाही सशक्त होती. संध्या, निळू फुले व श्रीराम लागू जबरदस्त कास्ट.

Pages