विषय क्रमांक १ : मिलने को है कोई कही अब तुझसे

Submitted by शेळी on 28 August, 2012 - 16:05

हिंदी सिनेमाचा तंबू सांभाळणारे मुख्य खांब तीनच. एक, तगडा, देखणा हिरो, त्याची ( आणि आपली !) करमणूक करणारी त्याची हिरॉइन आणि या दोघांच्यात काड्या घालणारा विलन. खल्लास! या एवढ्या फॉर्मुल्यात रामायणापासून रा-वनपर्यंत कोणतीही स्टोरी मांडता येते. मुळात, हिंदी सिनेमाच्याच कशाला, आपल्याही स्टोरीत मुख्य घटक इतकेच तर असतात ! पण या स्टोरीतही कधीकधी अचानक फेरफार होतात. मुख्य कलाकार आणि सहकलाकार यांची धुमश्चक्री सुरु असताना अचानक नवीनच पात्रं पडद्यावर अवतरतात. आणि तापत्या उन्हात वळवाचा पाऊस पडावा , तसे काही क्षण जन्माला येतात.

हा आपल्याला आजवरचा सर्वात जास्त आवडलेला हिरो .. याचं गारूड मनावर इतकं होतं, अन आजही आहे की जागो मोहन प्यारे! हाच आयुष्याचा महामंत्र बनून राहिला ! सिनेमाची सुरुवात होते न होते तोच एक अलिशान लांबलचक गाडी घेऊन हा कुठल्या तरी खेड्यात जायला निघालेला. अन रस्त्यात त्याला भेटतो.. हा मलंग फकीर. दाढी वाढलेली, केस अस्ताव्यस्त, कपडे केवळ लोकलज्जा सांभाळण्यासाठी अंगावर चढवलेले. लिफ्ट घेऊन हा त्या गाडीत बसतो आणि अंगात आलेल्या बाईगत घुमत गायलाही लागतो.. त्याचा तो आलाप कानात मधाचा थेंब होऊन शिरतो आणि त्याने 'गाओ' असा दिलेला आदेश ही पडत्या फळाची आज्ञा मानून आपला हिरोही गायला सुरू करतो ...
ये रास्ता है कह रहा अब मुझसे
मिलने को है कोई कही अब तुझसे

10.jpg

यूंही चलाचल राही यूंही चलाचल राही
जीवन गाडी है समय पहियॉ........

आणि नंतरची चारदोन मिनिटं जे काही ऐकायला मिळते, ते जीवनावरचे निखळ भाष्य ... नदी, पहाड, झरे, घरं, आकाश, हवा यातून जीवन भरून राहिलेलं आहे. सुख दु:ख तुझ्या रस्त्यावर तुझी वाट पहात आहे..... जीवनाचं तत्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात सांगावं ते केवळ तुज आहे तुजपाशी मधल्या काकाजीनेच !

हिंदी सिनेमावाल्यानी आजवरच्या १०० वर्षाच्या इतिहासात असे शेकडो काकाजी आपल्याला दिलेले आहेत . कधी मलंग फकीर, कधी भिकारी, कधी माकडवाला, कधी कुठला तरी गायक, रस्त्यावर नाचणारी एखादी डोंबारीण ..... कुणाच्या रूपात कधी कोण अवतरेल , सांगता नाही यायचं. पण चित्रपटाच्या मुख्य कथानकात कुठेही नसलेले, एक बोटभर लांबीचाही संवाद नसताना केवळ एखाद्या गाण्यातून कथानकाला एक दिशा देऊन पुन्हा लुप्त होणार्‍या या व्यक्तीरेखा मनाला आजही भुरळ पाडतात.

भल्याभल्या सिनेमात - अगदी १०-१२ सुपरहिट असलेल्या गाणी असलेल्या सिनेमातही ही गाणी लख्ख उठून दिसतात. आशिकी आठवा. रागाच्या भरात हिरॉइनचा फोटो खिडकीतून भिरकावून देऊन, पुन्हा तोच फोटो रात्रीच्या अंधारात रस्त्यावर शोधणारा राहूल रॉय आठवा . राहूल रॉय कोण? हे 'आठवावे लागेल' पण ती रस्त्यावरची मुलगी, तिचा नाच आणि त्या गाण्याचे ते शब्द हे मात्र आजही काळाच्या कातळावर कोरलेले आहेत.
पहली मुहोब्बत का एहसास है तू
बुझके भी बुझ ना पाई वो प्यास है तू
तुझको भुला ना पाया मेरी बेबसी है
तू मेरी जिंदगी है

20.jpg

पुढचा अंतरा तर अक्षरशः या कल्पनेवर कळस चढवतो

हर जख्म दिल का तुझे दिल से दुवा दे
खुशियाँ तुझे गम सारे मुझको खुदा दे

खुशियाँ तुझे गम सारे मुझको खुदा दे.... या ओळीपर्यंत गाणं आलं की आजही गळा दाटून येतो. आशिकीतील बाकी गाणी पायाला ताल देतात, पण हे एकच गाणे अंतर्बाह्य स्तब्ध करून सोडते. याचं श्रेय द्यायचं तरी कुणाला? नाचवणारा महेश भट्ट, कुमार सानू, नदीम श्रवण , ......... का, ही ओरिजिनल धुन बांधणारे मेहदी हसन ....? मेहदी हसनच्या मूळ गाण्यातील 'तू ' या शब्दावर नदीम श्रवणनी जी हलकी, नाजूक कलाकुसर केलेली आहे, त्यातल्या गोडव्यासाठी त्याना ही चोरी माफ करायला हरकत नसावी. ती नाचणारी, तो पेटीवाला, तो ढोलकीवाला नंतर कुठेतरी विरून जातात. मूळ कथानक नेहमीच्या वाटेने निघून जाते.

अशा गाण्यानी रंगीतच नव्हे, अगदी ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यापासून सर्वाना भुरळ घातलेली आहे. ज्याला कुणाला असे धुमकेतू स्टाइल पात्र घेऊन त्याच्या तोंडात असे गाणे घालायची आयडिया सुचली असेल, त्याने हिंदी सिनेमाच्या रसिकांवर उपकारच करून ठेवलेले आहेत. त्याला लाखो सलाम!

देवानंदचा सी आय डी आठवा. कुणाचा तरी मुडदा पडतो आणि त्याचा आळ हिरोवर येतो , अशी सरबरीत कथा. आता या कथेतही अशी एक नव्हे तर दोन गाणी घालणारा डायरेक्टर धन्यच म्हटला पाहिजे नै का? समुद्रकिनार्‍यावरून चालत हिरॉईन तिच्या घरी निघाली आहे. आणि हिरोही त्याच्या कामासाठी नेमका तिच्याच घरी निघाला आहे. तिला वाटते, तो पाठलागच करत आहे. पार्श्वसंगीत शांत . आणि ध्यानीमनी नसताना अचानक हार्मोनियमचा क्लोज अप आणि हार्मोनियमचे ते जीवघेणे सूर उमटतात ...

लेके पहला पहला प्यार............

30.jpg

आजचे संगीतकार आणि ते इंडियन आयडॉल यानी रिअ‍ॅलिटी शो करण्यापेक्षा ओपीच्या घरी भांडी घासण्यात किंवा शमशाद बेगमच्या घरी धुणी बडवण्यात आपली ही जिंदगी घालवली असती, तर किमान पुढच्या जन्मी तरी त्याना चांगला संगीतकार किंवा गायक व्हायचं भाग्य नस्तं का लाभलं? पण आपलं दुर्दैव! ओपींची मेलडी आणि शमशादची हार्मनी ... सगळंच इतिहासात जमा झालं. याच सी आय डी मधलंच या सिचुएशनच्या आधी असलेलं आणखी एक उपरं गाणं ..

बूझ मेरा क्या नाव रे
नदीकिनारे गांव रे
पीपल झूमे मोरे आंगना
ठंडी ठंडी छाँव रे..

40.jpg

पूर्वीच्या काळी बायका पितळेच्या कळश्या नदीवर भरून आणायच्या आणि घरचे लोक ते पाणी प्यायचे म्हणे ! आणि ५० वर्षानी हे कुणाला खरं वाटेल का? दारात पिंपळाचं झाड आहे, हे सांगणारी पिढी शिल्लक असेल का? आमच्या घरासमोरचं पिंपळाचं मोठं झाड काही वर्षांपूर्वी संपूर्ण काढून टाकलं. आता खिडकीतून तो पिंपळ दिसत नाही. आणि मी मात्र घरात हे गाणं आजही न चुकता ऐकतो. या गाण्याचा एक लक्ष संकल्प झाला की तो पिंपळ पुन्हा उगवेल, असे मला उगाचच वाटत रहाते.

माझ्या टॉप टेन ब्लॅक व्हाइट गाण्यात ही दोन्ही आहेत आणि यांची पारायणं आजही होत असतात. बोटभर डायलॉग कापून दुसर्‍याला दिला, या कारणाने आजच्या नट्या रुसून सिनेमा सोडतात म्हणे ! सी आय डी मध्ये ही दोन गाणी हिरॉईन केवळ मख्खपणे बघत उभी असते. नाचणारे कुणीतरी दुसरेच, असे, की ज्यांचा मुख्य कथानकात काडीचाही संबंध नाही. शिवाय आणखीही एक गाणे दुसरी साइड हिरॉईन गाऊन जाते... आजकालच्या जमान्यात झाडाआड लपाछपी करण्यापासून पार्टी , आयटम साँग पर्यंत सगळी गाणी , कशीही असली तरी , मुख्य बयेलाच हवी असतात ! हादेखील गेल्या १०० वर्षात झालेला एक बदल मानावा का?

आठवायचं म्हटलं तर अशी खूप गाणी आहेत. 'दामिनी'मधलं आमीरखानचं गाणं - 'बिन साजन झूला झूले'. प्रसन्न गाणं. कॉर्पोरेटमधील ' ओ सिकंदर ओ सिकंदर' हे गाणे आणि त्यातील बुलबुल अनफर्गेटेबल. 'पुकार' मधील 'एक तूही सहारा' या गाण्यात चक्क लता मंगेशकर अवतरतात. दामिनीवरून मिनाक्षीचं आणखी एक गाणं आठवलं - लंबी जुदाई. ( हिरो, लक्ष्मीकांत प्यारेलाल) अशीच कुणीतरी अनामिका गाणे म्हणते. हातात डफ आणि गळ्यात रेश्माचा करिश्मा. आजही इतक्या वर्षांनंतर हिरोची आठवण होते ती लंबी जुदाई या गाण्यासाठी आणि त्यातील त्या बासरीवर वाजवलेल्या पीससाठी.

मौत न आई तेरी याद क्यूं आई
हाय .... लंबी जुदाई

60.jpg
सुभाष घईनी त्यांच्या चित्रपटांत त्यानंतरही अशी गाणी अचूकपणे वापरली. हो गया है मुझे प्यार - परदेस, चोली के पीछे - खलनायक ( अर्थात, यात मुख्य कलाकार माधुरीही आहे.) 'तुझे याद न मेरी आयी' - कुछ कुछ होता है , 'परदेसी परदेसी जाना नहीं' - राजा हिंदुस्तानी ही अजून काही आजही आठवणारी गाणी.

जोधा अकबरमधील ख्वाजा मेरे ख्वाजा हेही याच प्रकारातील गाणे. यातील रेहमानच्या बाकीच्या गाण्यांत हेही गाणे जास्त लक्षात रहाते. बेकसों की तकदीर या ओळीमधील तकदी SSSS र या शब्दात लांबवलेला कोमल निषाद . असा कोमल निषाद फार क्वचित ऐकायला मिळतो.

70.jpg

आजकालची आयटम साँग गाणीही खरे तर याच प्रकारात मोडतात. पण ही वरची गाणी वेगळ्याच दर्जाची आणि धाटणीची आहेत. या वरच्या गाण्यांच्या यादीत हेलनचं 'मुंगळा' ( चित्रपट - इन्कार) बसू शकेल. 'बॉबे' मधलं 'हम्मा हम्मा' बसू शकेल ....... कथानकात उपर्‍या असणार्‍या लोकानी पडद्यावर अवतरून अचानक गाणं सादर करणं ... ही मूळची थीम. आयटम साँग या प्रकारानं हा मूळचा प्रकार अगदीच चीप करून टाकला आहे. त्यातल्या त्यात 'आँखे' मधील 'हलका हलका जाम हूं मैं' आणि 'मेहेबूब मेरे' हे सुष्मिता सेनचं ( गायिका- सुनिधी) 'फिजा'मधील गाणं काही काळ का होईना लक्षात राहिलं होतं. अन्यथा, अशा गाण्यांच्या बाबतीत तसा दुष्काळच आहे.

भक्तीगीतापासून सवंग गीतापर्यंत या गाण्यांच्या नाना तर्‍हा आहेत. आणि हा प्रकार म्हणजे बॉलिवुड चित्रपटातील एक ओरिजिनल प्रकार मानायला हरकत नसावी. जगाच्या पाठीवर इतर सिनेमात फारशी गाणीच कदाचित नसतात . कुठल्या तरी तिसर्‍याच पात्रानं येऊन कुठल्या तरी दुसर्‍याच वेळेला कुठलं तरी एखादं गाणं सादर करणं, हा प्रकार जगात कुठे असेल असे वाटत नाही.

आणि नाही तरी, फक्त असे गाणेच कशाला, अख्खा सिनेमाच आपल्या जीवनात अचानक उगवलेला गाण्याप्रमाणे नसतो का? आपली रोजची जिंदगी सुरु असते. अचानक आपण एखाद्या पडद्यासमोर काही क्षण बसतो ..... समोर कुठले तरी तिसरेच लोक, ज्यांचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतो, असे लोक उगवतात ... थोडं फार हसतात, रडतात, नाचतात, गातात आणि पुन्हा 'द एंड' चा बोर्ड लावून निघूनही जातात.

50.jpg

आपण पुन्हा आपल्या मूळ कथेतील मूळ पात्रांबरोबर पुढच्या संवादांची जुळवाजुळव करायला मोकळे होतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक आगाऊ सल्ला देऊ का? स्पर्धेसाठी म्हणून सदस्यत्वाचे नावही थोडे नेहमीसारखे असलेले चांगले वाटेल नाही का? Happy शेळी ऐवजी एखादे योग्य नाव? (कृ गै न)

हाय्ला!
बेफिकिर हे नेहेमीसारखे नांव आहे असा नवीन फंडा कळाला Wink

- e-bliss इब्लिस

व्वा छान आणि वेगळा लेख.
आधी पहाण्यात आला नाही, स्पर्धेसाठी शुभेच्छा.

धन्यवाद.
-विजय आंग्रे

मला आवडला लेख... छान जमलाय. भलत्याच माणसांनी येऊन गाजवून गेलेले चित्रपट क्षण... किती वेगळा विचार...
शेळी... आवड्या.

Pages